यहोवाच्या सहनशीलतेची तुम्ही कदर करता का?
१ यहोवाने आजपासून दहापंधरा वर्षांआधीच किंवा त्यापेक्षाही आधी नाश आणला असता, तर तुम्हाला सत्य शिकायला मिळाले असते का? पण त्याने सहनशील राहून, प्रचाराचे कार्य आजही चालू दिले आहे आणि अशारितीने “सर्वांनी पश्चात्ताप करावा” म्हणून त्यांना संधी दिली आहे याबद्दल आपण त्याचे आभार मानायला नको का? पण आठवणीत असू द्या, “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल.” (२ पेत्र ३:९, १०) त्यामुळे परमेश्वर या दुष्ट जगावर नाश आणण्यास उशीर लावत आहे असा आपण कधीही गैरसमज करून घेऊ नये.—हब. २:३.
२ लोकांची तुम्हाला दया येते का? यहोवाची सहनशीलता आपल्या समजबुद्धीच्या पलीकडे आहे. पण तो सहनशीलता का दाखवतो हे आपण कधीही विसरू नये. (योना. ४:१-४, ११) यहोवा मानवांची दयनीय अवस्था पाहतो तेव्हा त्याला त्यांचा कळवळा येतो. येशूलाही असेच वाटत होते. लोकांना पाहून त्यांचा कळवळा आल्यामुळेच येशूची अशी इच्छा होती की प्रचाराचे क्षेत्र आणखी वाढावे आणि यामुळे अधिकाधिक लोकांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची संधी मिळावी.—मत्त. ९:३५-३८.
३ नैसर्गिक विपत्ती येतात किंवा दुर्घटना होतात, तेव्हा सत्याचे ज्ञान नसलेल्या लोकांबद्दल विचार केल्यावर आपल्याला त्यांची कीव येत नाही का? आज लोक “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे” आहेत; जगातली अंदाधुंदी पाहून त्यांना वाईट तर वाटते, पण हे का घडत आहे किंवा ही परिस्थिती कशी बदलेल याविषयी विचारले तर ते नुसते आपल्याकडे पाहात राहतात. (मार्क ६:३४) पण जेव्हा आपण आवेशाने सुवार्तेचा प्रचार करतो तेव्हा जे प्रामाणिक अंतःकरणाचे लोक आहेत त्यांना सांत्वन मिळते. तसेच आपण हे दाखवून देतो की यहोवाच्या सहनशीलतेबद्दल आपल्याला कदर आहे.—प्रे. कृत्ये १३:४८.
४ कमी वेळात बरेच कार्य करायचे आहे: मागच्या वर्षी ३,२३,४३९ लोकांनी बाप्तिस्मा घेतला, व स्मारकविधीला १,४०,००,००० लोक उपस्थित राहिले. म्हणजेच, या दुष्ट जगाच्या नाशातून बचावण्यासाठी आणखी कितीतरी लोकांना आपण मदत करू शकतो! “मोठा लोकसमुदाय” किती मोठा होणार हे आपल्याला ठाऊक नाही. (प्रकटी. ७:९) प्रचाराचे कार्य अजून किती काळ चालेल हे देखील आपल्याला माहीत नाही. पण यहोवाला माहीत आहे. त्याचे समाधान होईपर्यंत सुवार्तेचा प्रचार केला जाईल, “तेव्हा शेवट होईल.”—मत्त. २४:१४.
५ वेळ फार कमी राहिलेला आहे आणि देवाचा दिवस येऊन ठेपला आहे. (१ करिंथ. ७:२९अ; इब्री १०:३७) “आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे,” यात काहीच शंका नाही. (रोम. १३:११) तेव्हा, देवाने दाखवलेल्या सहनशीलतेचा उद्देश आपण कधीही विसरू नये. उलट, धार्मिकतेची आस धरणाऱ्या जास्तीतजास्त लोकांना यहोवाची अगाध कृपा लाभावी म्हणून आपण आता अधिकच आवेशाने प्रचार कार्य केले पाहिजे.