“विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर”
१ प्रेषित पौलाने तीमथ्याला ‘विश्वासाचे सुयुद्ध करण्यास’ सांगितले. (१ तीम. ६:१२) पौलाने स्वतः असे युद्ध केले होते. म्हणूनच वयोवृद्ध झाल्यानंतर तो आत्मविश्वासाने म्हणू शकला की मी सुयुद्ध केले आहे. (२ तीम. ४:६-८) त्याने सेवा निर्भयतेने, धैर्याने व सातत्याने करण्यासाठी हरएक प्रयत्न केला. पौलाच्या उदाहरणाचे आपण सर्वांनी अनुकरण केले पाहिजे. मग आपण देखील आत्मविश्वासाने म्हणू शकतो, की खिस्ती विश्वासाचे सुयुद्ध करण्यात आपण कोणतीही कसूर बाकी सोडली नाही.
२ मेहनत घ्या: पौलाने सेवेकरता खूप मेहनत घेतली. (१ करिंथ. १५:१०) आज आपल्याला देखील नम्र अंतःकरणाच्या लोकांना शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. (मत्त. १०:११) आपल्या काही बांधवांना, लोकांना भेटण्यासाठी अगदी सकाळीच रस्त्यावरील साक्षकार्य सुरू करावे लागते. तर काही ठिकाणी दुपारी उशिरापर्यंत किंवा संध्याकाळी लोक कामावरून परत आल्यानंतर साक्षकार्य सुरू करावे लागते.
३ आपल्या पुस्तक अभ्यासाच्या गटासोबत प्रचार कार्याकरता नियमितपणे आणि वेळेवर उपस्थित राहण्याकरता आपल्याला कदाचित बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील. उदाहरणार्थ, बेथेलचे काही बांधव त्यांच्या मंडळीच्या क्षेत्रात प्रचार करण्यासाठी दर शनिवारी व रविवारी जवळजवळ १ तास प्रवास करतात. तुमच्या मंडळीतील देखील काही बांधव बऱ्याच दुरून प्रचार कार्याला वेळेवर येत असतील. अशा बांधवांची आपण प्रशंसा करू नये का? वेळेवर येण्यासाठी ते मेहनत घेतात आणि आपल्या कामांचे चांगल्याप्रकारे नियोजन करतात; आपण त्यांचे अनुकरण करू नये का?
४ आस्था दाखवलेल्या सर्व लोकांना पुन्हा जाऊन भेटण्याचाही आपण पक्का निर्धार केला पाहिजे. रस्त्यावर किंवा अनौपचारिक प्रसंगी आपले साहित्य देताना आपण त्या व्यक्तीचा पत्ता किंवा टेलिफोन नंबर लिहून घेतला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीची आस्था आणखीन वाढवण्यासाठी व बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपल्याला तिची पुन्हा भेट घेता येईल.
५ सेवेत नियमित सहभाग घ्या: पौलाने सातत्याने व पूर्णपणे सेवाकार्यात भाग घेतला. (रोम. १५:१८) तुम्ही देखील असेच करत आहात का? सेवेत तुम्ही नियमित आहात का? या महिन्यात तुम्ही कितीवेळा क्षेत्र सेवेला गेला होता? पुस्तक अभ्यास चालवणारे ऑगस्ट महिन्यात खासकरून त्यांच्या गटातल्या प्रत्येकाला सेवेत सहभाग घ्यायचे प्रोत्साहन देणार आहेत. तुम्हालाही ते यासाठी मदत करतील.
६ सुवार्ता घोषित करण्याच्या कार्याला पूर्ण पाठिंबा देण्याच्या बाबतीत पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यास आपण सातत्याने ‘विश्वासाचे सुयुद्ध’ लढत राहू.