सभांपासून अधिकाधिक आनंद घेण्यासाठी
१ आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपल्या ख्रिस्ती सभा फार महत्त्वाच्या असतात. पण, या सभांपासून आपल्याला आनंद मिळतो की नाही हे सभांच्या आधी, सभांमध्ये आणि सभांच्या नंतर आपण काय करतो यावर अवलंबून असते. तर मग, सभांपासून अधिकाधिक आनंद घेण्यासाठी आणि इतरांनाही सभांचा आनंद घेण्यात मदत करण्यासाठी आपल्याला काय करता येईल?
२ सभांच्या आधी: तयारी केल्याशिवाय सभांचा आनंद घेणे शक्य नाही; तेव्हा तयारी करणे फार जरूरीचे आहे. आपण चांगली तयारी करून सभांना जातो तेव्हा आपोआपच आपण लक्षपूर्वक ऐकतो आणि उत्तरेही देतो. शिवाय आपल्याला एखादे भाषण नेमून दिलेले असल्यास त्याचीही उत्तम तयारी केली पाहिजे. असे केल्याने, दिलेल्या सूचनांना अनुसरून आवश्यक ती माहिती आपल्याला अचूकपणे सादर करता येईल आणि श्रोत्यांचे लक्षही खिळवून ठेवता येईल. अर्थात, यासाठी बरेचदा प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. अशाप्रकारे, आपल्या सभा उत्साहपूर्ण आणि उत्तेजनात्मक बनवण्यासाठी आणि त्यांपासून सर्वांना फायदा होण्यासाठी आपण होता होईल तितका प्रयत्न करतो तेव्हा आपली आध्यात्मिक प्रगती लपून राहत नाही आणि सभांपासून आपल्याला अधिक आनंद मिळतो.—१ तीम. ४:१५, १६.
३ सभांमध्ये: सभांमधील आपला आनंद द्विगुणीत करणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे सभांमध्ये सहभाग घेणे किंवा उत्तरे देणे. खरे तर, सभांमध्ये जे भाग प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात हाताळले जातात त्यात प्रत्येकाने उत्तरे देणे ही आपल्याला नेमून दिलेली जबाबदारी आहे असे समजून सहभाग घेण्याचा विशेष प्रयत्न केला पाहिजे. आपण सभांमध्ये उत्तर देतो तेव्हा आपले उत्तर अगदी थोडक्यात आणि विचारलेल्या प्रश्नाचे नेमके उत्तर असावे; अशीच उत्तरे सगळ्यात परिणामकारक असतात. असेही काही भाग असतात जेव्हा श्रोत्यांना अनुभव सांगण्याची संधी मिळते; अशावेळी आपले अनुभव थोडक्यात सांगण्यास नेहमी तयार असा. त्यामुळे सर्वांनाच उत्तेजन मिळेल आणि मंडळीची उभारणी होईल. (नीति. १५:२३; प्रे. कृत्ये १५:३) सभेत कोणताही भाग सादर करताना आपण उत्साहाने आणि आत्मविश्वासाने बोलावे; यामुळे श्रोत्यांसाठी आपला भाग लक्षवेधक, उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल.
४ सभांच्या नंतर: सभा संपल्यानंतर एकमेकांना भेटणे, प्रेमाने एकमेकांची विचारपूस करणे तसेच सभेमध्ये शिकलेल्या एखाद्या मुख्य मुद्द्याविषयी बोलणे यामुळे एकंदर सर्वांनाच लाभ होऊ शकतो. तसेच, सभांमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्वांचीच अर्थात तरुणांची, वृद्धांची आणि नवीन लोकांची प्रशंसा केल्याने आपल्यातील प्रीतीचे बंधन आणखीन मजबूत होईल. आणि शेवटी, सभा चुकवणाऱ्या लोकांची टीका करण्याऐवजी आपल्या सभा किती आनंददायक असतात याबद्दल सांगून आपण त्यांना सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन देऊ शकतो.—इब्री १०:२४, २५.
५ तेव्हा, एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी सभांची जी महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे तिचा आपण पुरेपूर लाभ घेऊ या. (रोम. १:११, १२) अशाप्रकारे, आपल्या परीने होईल तितका प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपण सभांपासून अधिकाधिक आनंद घेऊ शकू.