नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
फेब्रुवारी २००० पासून सुरू होणाऱ्या खास संमेलन दिवस कार्यक्रमाचे शीर्षक असेल: ‘देवाच्या गहन गोष्टींचा शोध.’ (१ करिंथ. २:१०) या कार्यक्रमात, कोणत्या मौल्यवान गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील?
बरेच लोक ज्ञान संपादन करण्यासाठी आयुष्य वेचतात, पण त्यांना प्राप्त होणारे ज्ञान चैतन्यदायक नसते. बायबलचे ज्ञान मात्र मनुष्याला नवे चैतन्य देते. हीच गोष्ट, ‘देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतल्याने नवे चैतन्य लाभते’ या विभागीय पर्यवेक्षकांच्या भाषणातून स्पष्ट केली जाईल. त्यानंतर, देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेणे आणि प्रचार कार्य करणे या दोन गोष्टी एकमेकांशी कशा संबंधित आहेत हे पाहुणा वक्ता आपल्याला समजावेल; त्याच्या भाषणाचे शीर्षक असेल: “राज्य प्रचार कार्याबद्दल तुमची मनोवृत्ती.”
पालक आपल्या मुलांना देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेण्याचे शिक्षण कसे देऊ शकतात याचे उत्तर “पालकांनो, तुमच्या मुलांच्या मनात देवाचे वचन रुजवा” या भाषणात, व्यावहारिक सल्ल्यांच्या स्वरूपात दिले जाईल. मंडळीत जे लोक आध्यात्मिकदृष्ट्या प्रौढ आहेत अशा लोकांच्या सहवासामुळे ख्रिस्ती युवकांवर सकारात्मक प्रभाव पडतो. आपल्या काही युवकांवर अशा प्रौढांचा कोणता सकारात्मक प्रभाव पडला याची उदाहरणे, “प्रौढांचे अनुकरण करणारे युवक,” या भाषणात आपल्याला ऐकायला मिळतील.
यहोवा परमेश्वर गुप्त गोष्टी प्रकट करतो; आजच्या या काळात आपल्याला गुप्त आध्यात्मिक धनाचा मेहनतीने शोध घेणे का महत्त्वाचे आहे? याचा खुलासा, “यहोवा क्रमाक्रमाने गहन गोष्टी प्रकट करतो” या भाषणात केला जाईल; यात, पूर्वीच्या काळी आणि आज देखील यहोवाने काय काय प्रकट केले आहे हे पाहुणा वक्ता आपल्याला सांगेल. हे भाषण ऐकून, ‘देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेत राहण्याचा’ आपला संकल्प आणखीनच दृढ होईल.
तेव्हा, या नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच तयारीला लागा. जे लोक, यहोवाला केलेल्या आपल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेऊ इच्छितात त्यांनी याबद्दल लवकरात लवकर अध्यक्षीय पर्यवेक्षकांना कळवावे. या कार्यक्रमात आपण जे काही शिकणार आहोत त्यामुळे देवाच्या वचनातील गहन गोष्टींचा अधिकाधिक शोध घेण्याची आपली उत्कट इच्छा अधिक प्रबळ होईल. तेव्हा, आध्यात्मिक शिक्षणाच्या या खास कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहा!