तुम्ही दुसरीकडे राहायला जाणार आहात का?
राहण्याचे ठिकाण बदलताना, काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही आणि इतरांनी केल्या पाहिजेत, त्या खाली दिल्या आहेत. या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्यास नवीन मंडळीला आपलेसे करण्यासाठी तुम्हाला फार उशीर लागणार नाही.
(१) तुम्ही कोठे राहायला जाणार आहात हे ठरल्यावर तुमच्या सध्याच्या मंडळीचे सचीव, तुमच्या नवीन मंडळीच्या राज्य सभागृहाचा पत्ता संस्थेला विचारून तुम्हाला सांगू शकतील. नवीन ठिकाणी पोहंचल्यावर पहिल्यांदा राज्य सभागृह कुठे आहे आणि सभा कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी होतात याची माहिती काढा. एकाच सभागृहात एकापेक्षा जास्त मंडळ्या सभांसाठी एकत्र येत असल्यास तुम्ही त्यांपैकी कोणत्या मंडळीच्या क्षेत्रात येता हे वडिलांना विचारा. शक्य तितक्या लवकर सभांना उपस्थित राहायला सुरवात करा आणि मंडळीच्या वडिलांशी ओळख करून घ्या.
(२) दोन्ही मंडळीचे सचीव अर्थात तुमच्या आधीच्या मंडळीचे सचीव आणि नवीन मंडळीचे सचीव तुमच्या आणि तुमच्या कौटुंबिक सदस्यांचे प्रचारक नोंद कार्ड नवीन मंडळीत पाठवण्यासाठी सहकार्य करतील. आणि त्यासोबतच तुम्ही ज्या मंडळीशी सहवास राखणार आहात तिथल्या वडिलांना तुमची ओळख करून देणारे एक पत्र देखील पाठवले जाईल. (मार्च १९९१ आमची राज्य सेवा यातील प्रश्न पेटी पाहा.) नवीन मंडळीच्या सेवा समितीने तुमच्या पुस्तक अभ्यास संचालकाला तुमच्याविषयी कळवावे जेणेकरून ते तुमची भेट घेऊन तुमच्या नवीन पुस्तक अभ्यास गटाचा पत्ता तुम्हाला सांगू शकतील.—रोम. १५:७.
(३) तुमच्या आगमनामुळे मंडळीतील सर्व प्रचारकांना तुमच्याशी ओळख करून घेण्याची, मोठ्या आनंदाने तुमचे स्वागत करण्याची तसेच एकमेकांना उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्याचीही संधी मिळते. (पडताळा ३ योहान ८.) अर्थात, उत्तेजनाची देवाणघेवाण करण्याची ही संधी तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्वतः सभांना उपस्थित राहाल.
(४) क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यासाठी नवीन ठिकाणी स्थिरस्थावर होईपर्यंत तुम्हाला थांबून राहण्याची गरज नाही. तुम्ही आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास बाकीचे प्रश्न सुटतील आणि नवीन परिसरात तुम्ही अगदी रूळून जाल. (मत्त. ६:३३) मग हळूहळू मंडळीतील लोकांशी अधिक ओळख करून घेण्याच्या उद्देशाने तुम्ही त्यांना आपल्या घरी आमंत्रित करू शकता.—रोम. १२:१३ब.
नवीन ठिकाणी बिऱ्हाड हलवणे काही साधीसोपी गोष्ट नाही. पण, येथे सुचवलेल्या सर्व गोष्टी सर्वांनी पाळल्या तर तुमचा आध्यात्मिक नित्यक्रम सुरळीत राहील. आणि आपल्या प्रेमळ ख्रिस्ती बंधुत्वाचा सर्वांवर सकारात्मक प्रभाव पडेल.