१९९९ च्या थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल कार्यक्रमाचा पुरेपूर फायदा करून घ्या
१ येशू हा उत्तम शिक्षक होता. त्याची शिकवण्याची पद्धत पाहून “लोक थक्क” व्हायचे. (मार्क १:२२) बोलण्यात किंवा शिकवण्यात आपल्यापैकी कोणीही येशूची बरोबरी करू शकत नाही, हे जरी खरे असले तरीसुद्धा आपण त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. (प्रे. कृत्ये ४:१३) थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूलच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे इतरांशी उत्तमप्रकारे बोलण्याचे आणि शिकवण्याचे आपले कौशल्य दिवसेंदिवस वाढत जाईल.
२ स्कूलची पहिली नेमणूक १९९९ सालादरम्यान, खासकरून १९९७ सालच्या टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांतील लेखांवर आधारित असेल. आपण हे लेख घरून वाचून आलो तर स्कूलच्या कार्यक्रमातून पुन्हा ऐकल्यावर, आध्यात्मिक विषय आपल्याला दिवसेंदिवस आणखी स्पष्ट होत जातील. इंस्ट्रक्शन टॉक देणाऱ्यांनी, विषयाचा दररोजच्या जीवनाशी कसा संबंध आहे हे सांगावे; आणि त्यांनी हे भाषण लोकांना आवडेल अशा पद्धतीने, उत्साहाने द्यावे. तिसऱ्या आणि चवथ्या नेमणुकीचा विषय कधी कौटुंबिक सौख्यानंद या पुस्तकातून तर कधी बायबलमधल्या एखाद्या व्यक्तीबद्दल असेल. त्यामुळे स्कूल ओव्हरसियरने स्कूलच्या नेमणुका देताना विचारपूर्वक द्याव्यात. कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकातून माहिती सांगणाऱ्यांचे स्वतःचे कौटुंबिक जीवन, कोणाला बोट दाखवता येणार नाही असे असावे.
३ काउन्सिल मिळते तेव्हा तिचा उपयोग करा आणि चांगली तयारी करा: उत्तमप्रकारे बोलण्याचे आणि शिकवण्याचे कौशल्य वाढवण्याची सर्वांना संधी आहे. (१ तीमथ्य ४:१३) त्यामुळे, काउन्सिल म्हणताच नाक मुरडण्याऐवजी आपण ती ऐकून स्वीकारली पाहिजे. (नीति. १२:१५; १९:२०) सभांमध्ये आणि प्रचार कार्यात सत्याविषयी बोलताना चांगले परिणाम व्हावेत असे जर आपल्याला वाटत असेल, तर नुसतीच माहिती लोकांपुढे मांडल्याने किंवा तोंडपाठ केल्यासारखी बायबलमधून वचने वाचून दाखवल्याने काम चालणार नाही. आपले शब्द लोकांच्या मनापर्यंत पोचले पाहिजेत आणि ते ऐकून त्यांना त्यांप्रमाणे वागण्याची इच्छा झाली पाहिजे. यासाठी आपण स्वतः सत्याबद्दल बोलताना पूर्ण खात्रीने आणि मनापासून बोलणे महत्त्वाचे आहे. (पडताळा प्रे. कृत्ये २:३७.) स्कूलच्या कार्यक्रमात मिळणारे मार्गदर्शन आपल्याला यासाठीच सहायक ठरेल.
४ कोणतीही नेमणूक मिळाल्याची सूचना मिळताच, उत्तम भाषणाच्या कोणत्या खास मुद्द्यावर तुम्हाला काम करायचे आहे त्यावर विचार करा आणि त्याबद्दल स्कूल गाईडबुक काय स्पष्टीकरण देते ते पाहा. यापूर्वीच्या नेमणुकांत मिळालेल्या काउन्सिलचा यावेळी कसा उपयोग करायचा हे मनात ठरवा. मुख्य विषयावर, विशिष्ट सेटिंग वापरायचे असेल तर त्यावर, शिवाय, तुम्हाला सोपवलेल्या भागात आलेल्या वचनांवरही विचार करा. लोकांना काहीतरी शिकायला मिळेल आणि शिकल्याप्रमाणे वागण्याची त्यांना प्रेरणा होईल अशा पद्धतीने मला हा विषय कसा मांडता येईल यावर मनन करा.—१ तीम. ४:१५, १६.
५ स्कूलमध्ये आपले नाव नोंदवायला तुम्हाला भीती वाटत असेल तर याबद्दल प्रार्थना करा आणि मग स्कूल ओव्हरसियरकडे जाऊन त्यांना याविषयी सांगा. १९९९ सालादरम्यान थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूलमध्ये सादर केल्या जाणाऱ्या माहितीचा पुरेपूर फायदा करून घेण्याची सर्वांना संधी आहे.