वारंवार जाणे आवश्यक
१ तुम्हाला कोणीतरी पहिल्यांदा सुवार्ता सांगितली तेव्हा त्या पहिल्या भेटीतच तुम्ही सत्य स्वीकारण्याची तयारी दाखवली होती का? कदाचित नाही. पण मग नक्कीच तुम्ही त्या यहोवाच्या साक्षीदारांचे अत्यंत कृतज्ञ असाल ज्यांनी बायबलचा अभ्यास करायची तुम्ही तयारी दाखवेपर्यंत वारंवार तुम्हाला भेटी दिल्या होत्या. आपल्यालाही नेमलेल्या क्षेत्रात पुन्हापुन्हा जावे लागते तेव्हा आपण नेहमी आपला हा अनुभव आठवणीत ठेवला पाहिजे.
२ लोकांची परिस्थिती बदलत राहते. कधीकधी त्यांच्यासमोर अनपेक्षित प्रश्न किंवा पेचप्रसंग उभे राहतात, कधी त्यांच्या राहत्या परिसरात किंवा इतरत्र एखादी धक्कादायक घटना घडते, एखाद्यावर आर्थिक संकट कोसळते, एखादा आजाराने बेजार होतो, किंवा मग एखाद्याच्या जवळच्या माणसाचा मृत्यू होतो. या दुर्घटनांमुळे, असे दुःखद प्रकार का घडत असतील हे जाणून घ्यायला ते साहजिकच उत्सुक होतात. त्यामुळे, आपण लोकांचे जिव्हाळ्याचे विषय ओळखून त्यानुसार त्यांना आपला सांत्वनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
३ एक बचाव कार्य: एखाद्या दुर्घटनास्थळी लोकांचे जीव वाचवण्यासाठी खटपट करणाऱ्या बचाव कार्यकर्त्यांचे उदाहरण घ्या. ते ज्या भागात दुर्घटनेतून जिवंत राहिलेल्यांची शोधाशोध करताहेत, त्या विशिष्ट भागात कदाचित एखाददुसराच माणूस सापडत असेल; पण म्हणून काही ते आपल्या कामात सुस्ती करत नाहीत; किंवा दुसरीकडे त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्यापेक्षा जास्त माणसे सापडत असतील, म्हणून काही ते आपले काम थांबवत नाहीत. तसेच आपले जीवन वाचवण्याचे कार्यही सुरूच आहे, ते बंद करण्याची सूचना अद्याप आपल्याला मिळालेली नाही. किंबहुना, “मोठ्या संकटातून” बचावण्याची इच्छा असणारे लाखो लोक आपल्याला दर वर्षी सापडत आहेत.—प्रक. ७:९, १४.
४ “जो कोणी प्रभुचे [यहोवाचे, NW] नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” (रोम. १०:१३-१५) हे लक्षात घेता, प्रचार कार्य करत राहणे अत्यंत आवश्यक आहे याविषयी काही शंकाच उरायला नको. शिवाय, आपण आपल्या क्षेत्रात कार्य सुरू केले होते तेव्हापासून बराच काळ लोटला आहे; लहान मुले आता मोठी झाली आहेत, स्वतःच्या भविष्याबद्दल, जीवनाच्या उद्देशाबद्दल विचारपूर्वक निर्णय घेण्याइतकी ती आता समजदार झाली आहेत. कोण, कधी आपला संदेश ऐकून घ्यायला तयार होईल हे सांगताच येत नाही. (उप. ११:६) पूर्वी विरोध करणाऱ्या बऱ्याच जणांनीही अलीकडे सत्य स्वीकारल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा, कोण चांगला कोण वाईट हे ठरवण्याचे आपले काम नाही; आपले काम काय, तर लोकांना आपला संदेश ऐकण्याची आणि या जगाच्या नाशातून बचावण्याची वारंवार संधी देत राहणे. येशूच्या सुरवातीच्या शिष्यांसारखेच आपणही लोकांकडे ‘वारंवार जाऊन’ राज्याच्या संदेशाबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—मत्तय १०:६, ७, NW.
५ आपल्याला अजूनही प्रचार करणे शक्य आहे, ही खरे तर यहोवाची दयाच आहे. (२ पेत्र ३:९) लोकांना वारंवार आपला संदेश ऐकण्याची संधी दिल्यामुळे आपण सर्वांपुढे यहोवाचे प्रेम जाहीर करतो आणि त्याअर्थी त्याला गौरव आणतो.