आपला वेगळेपणा दिसून येतो
१ मागच्या वर्षी ३,००,००० लोक बाप्तिस्मा घेऊन आपल्यात सामील झाले. या लोकांना यहोवाच्या साक्षीदारांमध्ये असे काय दिसले की ज्यामुळे देवाच्या संघटनेत येण्याची त्यांना प्रेरणा मिळाली? सर्व धर्मांच्या लोकांपेक्षा आपण वेगळे का दिसून येतो? याची कारणे उघडच आहेत आणि यांपैकी काही खाली दिलेली आहेत:
—आपण कोणाच्या वैयक्तिक मताचा नव्हे तर नेहमी केवळ बायबलचाच आधार घेतो: येशूने सांगितल्याप्रमाणे आपण “आत्म्याने व खरेपणाने” यहोवा देवाची उपासना करतो. आणि असे करण्यासाठी आपण खोट्या धार्मिक चालीरितींकडे पाठ फिरवून देवाच्या वचनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत आहोत.—योहा. ४:२३, २४; २ तीम. ३:१५-१७.
—लोक आपल्याकडे येतील म्हणून वाट पाहण्याऐवजी आपण स्वतःहून त्यांच्याकडे जातो: ख्रिस्ताने प्रचार करण्याची आणि शिकवण्याची जी आज्ञा दिली होती ती आपण स्वीकारली आहे; त्यामुळे आपणही त्याच्यासारखेच प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधत असतो; घरोघर, रस्त्यांवर, जिथे कोठे ते सापडतील तिथे.—मत्त. ९:३५; १०:११; २८:१९, २०; प्रे. कृत्ये १०:४२.
—आपण कोणताही मोबदला न घेता सर्व लोकांना बायबलचे शिक्षण देतो: आपण स्वेच्छेने आपले पैसे, शक्ती खर्च करून दर वर्षी शंभर कोटींहून जास्त तास देवाच्या सेवेसाठी देत असतो. कोणताही भेदभाव न करता आपण सर्व प्रकारच्या लोकांना बायबलमधून शिकवतो.—मत्त. १०:८; प्रे. कृत्ये १०:३४, ३५: प्रक. २२:१७.
—लोकांना आध्यात्मिक स्वरूपाची मदत करण्यासाठी आपली चांगली तयारी करून घेतली जाते: बायबलचा वैयक्तिक अभ्यास करण्यासोबतच आपल्याला मंडळीच्या सभांमधून, संमेलनांतून आणि अधिवेशनांतून देखील मार्गदर्शन दिले जाते; आणि हे मोलाचे ईश्वरशासित शिक्षण मिळत राहिल्यामुळे इतरांना आध्यात्मिक ज्ञान देणे आपल्याला शक्य होते.—यश. ५४:१३; २ तीम. २:१५; १ पेत्र ३:१५.
—सत्याचे शिक्षण आपण गांभिर्याने घेतो, त्यानुसारच जीवन जगतो: देवावर आपले प्रेम असल्यामुळे, देवाच्या इच्छेनुसार जगण्यासाठी आपण आपल्या जीवनात बदल करतो. ख्रिस्ताचे गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपले व्यक्तिमत्त्वही बदलते आणि या नव्या व्यक्तिमत्त्वामुळे इतर लोकही सत्याकडे येतात.—कलस्सै. ३:९, १०; याको. १:२२, २५; १ योहा. ५:३.
—आपण इतरांसोबत नेहमी शांतीने राहण्याचा प्रयत्न करतो: देवाचे गुण जेव्हा आपण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण आपल्या बोलण्यात आणि वागण्यात चुका करण्याचे टाळतो. आणि अशारितीने सर्व लोकांसोबत “नेहमी शांतीने जगण्याचा प्रयत्न [करतो].”—१ पेत्र ३:१०, ११, सुबोध भाषांतर; इफिस. ४:१-३.
२ लोक जेव्हा यहोवाच्या संस्थेत ख्रिस्ती तत्त्वांनुसार जगणाऱ्यांची उदाहरणे पाहतात तेव्हा त्यांनाही सत्याचा स्वीकार करण्याची प्रेरणा होते. आपल्याला ओळखणाऱ्यांना आणि आपल्याला जवळून पाहणाऱ्यांना आपल्या उदाहरणाने देखील अशीच प्रेरणा मिळाली पाहिजे.