शिष्य बनविण्याच्या निकडीच्या कार्यावर एक प्रगत दृष्टिकोन
१ पृथ्वीवरील आपल्या शेवटल्या काळात येशूने त्याच्या अनुयायांना ‘सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनविण्याची’ आज्ञा दिली. याकरता आवश्यक होते, की त्यांनी प्रचार करावा आणि शिकवण्याचे काम मोठ्या नेटाने करावे तसेच त्यांच्या कार्याचा संपूर्ण पृथ्वीवर विस्तार व्हावा. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये १:८) त्यांनी या कार्याला असह्य ओझे समजले का? प्रेषित योहानाच्या मते नाही. शिष्य बनविण्याच्या कार्यात ६५ वर्षे घालविल्यानंतर त्याने असे लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहा. ५:३.
२ आरंभीच्या ख्रिश्चनांच्या कार्याचे शास्त्रवचनातील अहवाल हे शाबीत करतो, की त्यांनी येशूचे शिष्य बनविण्याचे कार्य मोठ्या निकडीने पार पाडले. (२ तीम. ४:१, २) हे कार्य निव्वळ एक कर्तव्य म्हणून केले नाही, तर देवाची स्तुती करण्याच्या आणि इतरांना उद्धाराची आशा देण्याच्या प्रेमळ इच्छेमुळे त्यांनी असे केले. (प्रे. कृत्ये १३:४७-४९) शिष्य झालेले त्यानंतर स्वतः इतरांना शिष्य बनवू लागल्यामुळे पहिल्या शतकातील मंडळीची भरभराट होत गेली.—प्रे. कृत्ये ५:१४; ६:७; १६:५.
३ शिष्य बनविण्याचे कार्य वेग घेते: या २० व्या शतकात शिष्य बनविण्याचे कार्य सर्वात मोठ्या प्रमाणात होत आहे! आतापर्यंत लाखो लोकांनी सुवार्तेचा स्वीकार करून तिच्या एकवाक्यतेत त्यांनी जीवन घालविले आहे. (लूक ८:१५) या व्यवस्थीकरणाचा शेवट फार जवळ येत असल्यामुळे ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ आपल्याला असे साहित्य पुरवले आहे ज्याद्वारे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना सत्य शिकवणे आपल्याला शक्य होते.—मत्त. २४:४५.
४ सन १९९५ मध्ये, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक आपल्या हाती आले; त्यानंतर १९९६ मध्ये देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक आपल्याला प्राप्त झाले. ज्ञान पुस्तकाविषयी जानेवारी १५, १९९६ च्या टेहळणी बुरूज अंकाने पृष्ठ १४ वर असे म्हटले: “या १९२ पानी पुस्तकाचा अभ्यास तुलनात्मकरीत्या अल्पावधीत केला जाऊ शकतो, व ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्यांना’ त्याच्या अभ्यासाद्वारे यहोवाला समर्पण करण्यास व बाप्तिस्मा घेण्यास पुरेसे शिकून घेता आले पाहिजे.”—प्रे. कृत्ये १३:४८.
५ आमची राज्य सेवा हिच्या जून १९९६ च्या अंकातील “ज्ञान पुस्तकाद्वारे शिष्य कसे बनवावेत” या पुरवणीने आपल्याकरता हे लक्ष्य दिले होते: “परिस्थिती व विध्यार्थ्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे, एक तासाच्या एका सत्रात अभ्यासाची घाईघाई न करता तुम्ही बहुतांश अध्याय पूर्ण करू शकाल. शिक्षक तसेच विध्यार्थी या दोघांनीही प्रत्येक आठवडी अभ्यासाच्या वेळेला धरून राहिल्यास विद्यार्थी चांगली प्रगती करील.” या पुरवणीने पुढे असे म्हटले: “एखादा, ज्ञान पुस्तकाचा अभ्यास पूर्ण करतो तेव्हा देवाची सेवा करण्यात त्याची प्रामाणिकता आणि त्याला किती आस्था आहे हे तोवर दिसून आले असेल अशी अपेक्षा केली जाते.” आमची राज्य सेवा हिच्या ऑक्टोबर १९९६ च्या अंकातील प्रश्न पेटीमध्ये असे सांगण्यात आले: “सापेक्षपणे कमी कालावधीतही एक परिणामकारक शिक्षक, सर्वसाधारण क्षमतेच्या प्रामाणिक विद्यार्थ्याला यहोवाची सेवा करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्याइतपत पुरेसे ज्ञान संपादन करण्यास मदत करू शकेल अशी आशा केली जाते.”
६ ज्ञान पुस्तकाचे परिणाम मिळतात: ज्ञान पुस्तकाचा अभ्यास आपल्याला कसा वाटला, याविषयी एका तरुणीने तिच्या बाप्तिस्म्याच्यावेळी सांगितले. काही काळापर्यंत ती अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाचा अभ्यास करत होती. ज्ञान पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर तिचा अभ्यास घेणाऱ्या बहिणीने या नव्या पुस्तकातून तिचा अभ्यास घेण्यास सुरवात केली. लवकरच तिला कळाले, की तिला स्वतःला आता निर्णय घ्यायचा होता आणि तेव्हापासून वेगाने प्रगती करण्यास ती प्रवृत्त झाली. ती तरुणी आता आपली बहीण आहे, ती म्हणते: “अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाने यहोवावर प्रेम करण्यास मला मदत केली आणि त्याची सेवा करण्याचा निर्णय घेण्यास ज्ञान पुस्तकाने प्रेरित केले.”
७ आणखी एका स्त्रीने कशाप्रकारे लवकर प्रगती केली त्याकडे पाहा. अभ्यासाच्या दुसऱ्या वेळेनंतर विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीच्या सप्ताहात ती सभेकरता राज्य सभागृहामध्ये आली. आपण यहोवाला समर्पण केले असून बाप्तिस्मारहित प्रचारक होण्याची आपली इच्छा आहे, असे तिने त्या आठवड्यातील तिच्या अभ्यासाच्या तिसऱ्या वेळी बांधवाला सांगितले. तिने वडिलांची भेट घेतली आणि वडिलांनी तिला प्रचारक म्हणून मान्यता दिली व त्यानंतरच्या सप्ताहापासून ती क्षेत्र कार्याला जाऊ लागली. ती बायबल अभ्यासात इतका रस घेत होती, की आठवड्यातून दोन-तीन वेळा अभ्यास करण्यासाठी आणि सेवाकार्यात जास्तीत-जास्त वेळ घालवण्यासाठी तिने कामावरून चक्क सुट्टी घेतली. काही वेळा तर ते एकाच वेळी दोन किंवा तीन धडे पूर्ण करत. शिकत असलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करण्यास तिने सुरवात केली आणि चार आठवड्यांतच तिने ज्ञान पुस्तक पूर्ण केले आणि बाप्तिस्मा घेण्यापर्यंत प्रगती केली!
८ एका बहिणीचा पती स्वतःला “एका मूर्तिमंत सत्यात नसलेला पती” म्हणवत असे. एके दिवशी एका बांधवाने या व्यक्तीसोबत ज्ञान पुस्तकातून अभ्यास या अटीवर सुरवात केला, की तो पहिल्या अभ्यासानंतर अथवा त्यानंतर केव्हाही अभ्यास करण्याचे थांबवू शकतो. करून पाहायला काय हरकत आहे असे वाटून त्याने अभ्यास करायला सुरवात केली. हा मनुष्य त्याच्या शालेय दशेत इतका हुशार नव्हता आणि गेल्या २० वर्षांमध्ये त्याने कोणत्याही धार्मिक साहित्याचे वाचन केले नव्हते. ज्ञान पुस्तकाच्या अभ्यासाविषयी त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? त्याने म्हटले: “हे पुस्तक इतक्या सोप्या भाषेत लिहिलेले पाहून मला खरोखरच फार आनंद झाला. त्यातील माहिती इतकी स्पष्ट आणि तर्कशुद्ध आहे, की मी पुढील अभ्यासाची मोठ्या आशेने वाट पाहू लागलो. माझ्या शिक्षकाने मोठ्या कौशल्याने शिष्य बनविण्याच्या संस्थेच्या सूचना लागू केल्या आणि यहोवाच्या आत्म्याच्या मदतीमुळे मी चार महिन्यांत बाप्तिस्मा घेतला. मी हे अगदी ठामपणे म्हणू शकतो, की जर आपण शिष्य बनविण्याच्या कामाबद्दल प्रेम वाढवले आणि क्षेत्र कार्यात प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांचा शोध घेतला, संस्थेच्या ज्ञान पुस्तकाचा आणि इतर बायबल साहित्याचा उपयोग केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्गदर्शनासाठी यहोवाकडे प्रार्थना केली, तर शिष्य बनविण्याचा विशेष अधिकार आपल्याकडे असेल.” वरील अनुभव खरोखरच अपवादात्मक आहेत. आपले बहुतेक विद्यार्थी इतक्या लवकर सत्यात येत नाहीत.
९ भिन्न गतीने विद्यार्थ्यांची प्रगती: हे मान्य करण्यास हवे, की देवाच्या वचनाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या क्षमतांमध्ये मोठी तफावत असू शकते. आध्यात्मिक वृद्धी मंद किंवा जलद गतीने होऊ शकते. काही विद्यार्थी काही महिन्यांत प्रगती करतात, तर काहींना तेवढे महिने निव्वळ समज प्राप्त होण्याकरता लागतील. शिक्षण, आध्यात्मिक गोष्टींची कदर आणि यहोवाप्रती गाढ भक्ती या गोष्टीवर एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक वृद्धी अवलंबून असते. आपण ज्यांचा अभ्यास घेतो ते सर्व प्रत्येक दिवशी “मोठ्या उत्सुकतेने” शास्त्रवचनांचा अभ्यास करतीलच असे नाही. परंतु प्राचीन बिरुयातील लोकांनी नेमके हेच केले आणि विश्वासू बनले.—प्रे. कृत्ये १७:११, १२.
१० यास्तव, आमची राज्य सेवा हिच्या मे १९९८ च्या अंकाच्या “पाहिजेत—आणखीन बायबल अभ्यास” या पुरवणीमध्ये खालील वास्तविक सूचना देण्यात आली: “अर्थात, प्रत्येक बायबल विद्यार्थी एकाच गतीने प्रगती करतो असे नाही. आध्यात्मिकतेकडे इतरांचा कल असतो तसा काहींचा नसेलही किंवा शिकवल्या जात असलेल्या गोष्टींची त्यांची ग्रहणशक्ती इतरांएवढी तीक्ष्ण नसेल. काहींच्या बाबतीत जीवन अतिशय व्यस्त असल्यामुळे प्रत्येक आठवडी एक संपूर्ण अध्याय उरकण्याइतका वेळ कदाचित त्यांच्यापाशी नसेल. यास्तव, काही प्रकरणांत विशिष्ट अध्याय उरकण्यासाठी कदाचित एकाहून अधिक सत्रे घेण्याची गरज असेल व संपूर्ण पुस्तक उरकण्यासाठी आणखीन काही महिने लागतील.”
११ शिष्य बनविणाऱ्यांचा संतुलित दृष्टिकोन: विद्यार्थ्याची परिस्थिती आणि ग्रहणशक्ती यांवर अभ्यासाचा वेग आधारित ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला अपेक्षा माहितीपत्रकाद्वारे अभ्यास घेण्याचे उत्तेजन दिले जात असल्यामुळे ज्ञान पुस्तकाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी हे माहितीपत्रक पूर्ण करण्यासाठी कदाचित दोन किंवा तीन महिने लागतील. आमची राज्य सेवा हिच्या जून १९९६ च्या अंकातील पुरवणीत दिलेल्या सूचनांचा आपण उपयोग केल्यास ज्ञान पुस्तक पूर्ण करण्याकरता सहा ते नऊ महिने लागतील. ज्ञान पुस्तकातून अलीकडेच अभ्यासाला सुरवात केलेल्या काहींनी अपेक्षा माहितीपत्रकातून अभ्यास घेण्यास सुरवात केली जेणेकरून विद्यार्थ्याला बायबलच्या मूलभूत सत्यांचे लवकर ज्ञान व्हावे. आणि त्यानंतर पुन्हा ज्ञान पुस्तकाचा अभ्यास सुरू करण्यात आला. ज्ञान पुस्तकातून अभ्यास घेण्यास सुरवात केली असल्यास आणि त्यातील पुष्कळ धडे पूर्ण झाले असल्यास त्या पुस्तकाचा अभ्यास पूर्ण करूनच अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास सुरू केल्यास ते लाभदायक होऊ शकेल आणि अशाप्रकारे देवाच्या वचनाच्या मूलभूत सत्यांची जलद रीतीने उजळणी करता येऊ शकेल. कोणत्याही बाबतीत, अभ्यासाच्या वेगाच्या मागे लागून विद्यार्थ्याच्या स्पष्ट समजेकडे दुर्लक्ष करण्याची आपली इच्छा नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला देवाच्या वचनावरील त्याच्या नवीन प्राप्त झालेल्या विश्वासाकरता भक्कम पायाची आवश्यकता असते.
१२ हे जाणून, की आपण कोणत्या काळात जगत आहोत, इतरांना सत्य शिकवण्यात मदत करणे आणखी निकडीचे बनले आहे. नवीन बायबल अभ्यास प्राप्त होण्याकरता निरंतर प्रार्थना करण्याशिवाय आपण ज्यांच्यासोबत सध्या अभ्यास करत आहोत त्यांच्यासाठीही आपण प्रार्थना करू या. “युगाच्या समाप्तीपर्यंत” आणखीन शिष्यांना बाप्तिस्मा देत राहण्यात आपल्याला निश्चित आनंद मिळेल.—मत्त. २८:२०.