प्रगतिशील गृह बायबल अभ्यास संचालित करणे
१ टान्झानियामधील एक नर्स, अर्जेंटिनामधील एक युवती आणि लात्वियामधील एक माता या तिघांमध्ये कोणती एक साम्यता आहे बरे? १९९७ वार्षिक पुस्तक (पृ. ८, ४६, आणि ५६) अहवाल देते, की या तिघींनी आपापल्या गृह बायबल अभ्यासांत जलद प्रगती केली; प्रत्येक आठवडी, ज्ञान पुस्तकातून अभ्यास करण्याचे एकापेक्षा अधिक सत्र घेण्याच्या त्यांच्या स्वेच्छेमुळेच त्यांना हे करता आले. शक्य असेल तेव्हा प्रचारकांनी प्रत्येक अभ्यास सत्रात पुस्तकातील एका संपूर्ण अध्यायाची चर्चा करण्याचा प्रयत्न करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. तथापि, काहींना हे एक मोठे आव्हानच वाटते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या परिस्थितींवर तसेच त्याच्या ग्रहण शक्तीवर, पुष्कळ काही अवलंबून असले तरी पुढील सूचना लागू केल्याने अनुभवी शिक्षकांच्या पदरी यश पडले आहे.
२ जून १९९६ च्या आमची राज्य सेवा पुरवणीत चर्चिल्याप्रमाणे, तुमच्या विद्यार्थ्याला अभ्यासाची तयारी करण्यास प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. तयारी कशी केली जाते, याचे अगदी सुरवातीलाच स्पष्टीकरण देणे किंवा त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे उत्तम असू शकेल. ज्ञान पुस्तकाची तुमची वैयक्तिक अभ्यासाची प्रत त्यांना दाखवा. पहिल्या अध्यायाची एकत्र मिळून तयारी करा. छापील प्रश्नाचे थेट उत्तर देणारे मुख्य शब्द अथवा वाक्यांश शोधण्यास आणि मग ते रेखांकित करण्यास अथवा ठळक करण्यास विद्यार्थ्यांना मदत करा. काही प्रचारकांनी तर उत्तरे रेखांकित करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना अक्षरे ठळक करणारा मार्करही दिला आहे. अभ्यासाची तयारी करत असताना, सर्व शास्त्रवचने वाचण्याचे त्यांना उत्तेजन द्या. असे केल्याने, तुम्ही त्यांना मंडळीचा पुस्तक अभ्यास तसेच टेहळणी बुरूज अभ्यास यांची तयारी करण्यासही प्रशिक्षित करत असाल.—लूक ६:४०.
३ एक उत्तम शिक्षक, स्वतःच अधिक बोलण्याऐवजी विद्यार्थ्याला बोलका करेल. क्षुल्लक बाबींना महत्त्व देऊन विषयापासून विचलित होण्याचे तो टाळतो. क्वचितच, तो अतिरिक्त माहिती समाविष्ट करील. याउलट, तो धड्यातील मुख्य मुद्दे ठळकपणे स्पष्ट करतो. प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी काहींनी आपल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त साहित्यही पुरवले आहे. शिवाय, मंडळीच्या सभांना उपस्थित राहिल्याने आस्थेवाईकांस अधिक तपशीलवार माहिती मिळेल.
४ बायबल अभ्यासादरम्यान धड्यात उल्लेखित केलेली सर्वच शास्त्रवचने उघडून वाचण्याची कदाचित आवश्यकता नसेल. परिच्छेदात उद्धृत केलेल्या वचनांतील काही मुख्य मुद्द्यांचे स्पष्टीकरण दिले जाऊ शकते. उजळणी करताना, चर्चिलेल्या मुख्य शास्त्रवचनांवर जोर द्या आणि ती स्मरणात ठेवण्याचे विद्यार्थ्याला उत्तेजन द्या.
५ प्रत्येक सत्राची वेळमर्यादा किती असावी?: एका तासापर्यंतच अभ्यास मर्यादित ठेवण्याची गरज नाही. काही घरमालकांकडे अधिक वेळ असल्यामुळे ते जादा वेळ अभ्यास करू इच्छितील. अथवा आठवड्यातून अधिक वेळा अभ्यास करण्यास विद्यार्थी इच्छुक असेल. ज्यांना असे करणे शक्य आहे त्यांच्यासाठी हे फायदेकारकच असेल.
६ यशया ६०:८ शब्दचित्रित करते त्याप्रमाणे, आज यहोवाचे लाखो नवीन स्तुतीकर्ते त्याच्या लोकांच्या मंडळ्यांत, ‘मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्याकडे उडून जातात तसे ते उडत आहेत.’ यहोवा, मेंढरासमान लोकांचे वेगाने एकत्रीकरण करत असता त्याच्याशी अगदी जडून कार्य करण्यात आपल्या परीने होताहोईल तितके आपण करू या.—यश. ६०:२२.