निरंतर येशूला अनुसरा
१ एके प्रसंगी येशूने म्हटले: ‘माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने आत्मत्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन निरंतर मला अनुसरावे.’ (मत्त. १६:२४) येशूच्या या शब्दांना, आपण निश्चितच सकारात्मक प्रतिसाद देऊ इच्छितो. त्याने दिलेल्या आमंत्रणाच्या प्रत्येक वाक्यांशात काय अंतर्भूत आहे याचे आपण परीक्षण करू या.
२ ‘त्याने आत्मत्याग करावा’: आपण यहोवाला आपले जीवन समर्पित करतो तेव्हा आत्मत्याग करत असतो. ‘आत्मत्याग’ असा अनुवादित, मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ “नाकारणे” असा होतो. याचा अर्थ, युगानुयुग देवाला प्रसन्न करण्याच्या निर्धारास्तव—आपण स्वेच्छेने आपल्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, सुखसोयी आणि स्वार्थी भोगविलासांचा परित्याग करतो.—रोम. १४:८; १५:३.
३ ‘आपला वधस्तंभ उचलावा’: यहोवाला सादर केलेल्या यज्ञार्पित सेवेचा वधस्तंभ उचलण्याचे जीवन हेच एखाद्या ख्रिश्चनाचे जीवन आहे. स्वत्यागाचा आत्मा प्रदर्शित करण्याचा एक मार्ग म्हणजे सेवेत कठोर परिश्रम करणे. इतःपर यावर्षी, अनेक प्रचारक सहायक पायनियर कार्याचा आनंद घेत आहेत. कदाचित, तुम्हीही यांपैकी एक असाल, आणि याविषयी तुम्ही विश्वस्त असू शकता, की यातून तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तुम्ही केलेल्या त्यागांपेक्षा कितीतरी अधिक आहेत. ज्यांना सहायक पायनियर म्हणून सेवा करणे शक्य नाही असे लोक मंडळीचे प्रचारक या नात्याने प्रचार कार्यात अधिकतर वेळ खर्च करण्याची वेळोवेळी व्यवस्था करत असतात. या उद्देशास्तव, क्षेत्र सेवा सभेसाठी मंडळ्या एकेकाळी जी वेळ नियोजित करत होत्या त्यापेक्षा आता काही मिनीटे आधी नियोजित करत आहेत. विशेषतः उन्हाळ्यात, लवकर सुरवात करून क्षेत्रसेवेसाठी मिळत असलेल्या या अधिक वेळेचे महत्त्व अनेक प्रचारक जाणतात. काहींनी तर, ‘केवळ आणखी एकच घर’ करू अथवा ‘काही मिनीटे अधिक’ कार्य करू असे ठरवल्यामुळे अत्युत्तम परिणाम अनुभवले आहेत.
४ स्वत्यागाचा आत्मा प्रदर्शित करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे वैयक्तिक ध्येये राखणे. काटेकोर योजना आखल्याने, तसेच आपल्या आराखड्यात फेरबदल केल्याने काहीजण नियमित पायनियर बनले आहेत. इतर काहीजण, बेथेल अथवा मिशनरी सेवा करण्याच्या उद्देशाने आपल्या व्यवहारांत काही तडजोडी करू शकले. काहींनी तर, राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या क्षेत्रांत स्थलांतर केले आहे.
५ ‘निरंतर मला अनुसरा’: येशूच्या शिष्यांनी अनेक संकटप्रसंगे अनुभवली असली तरी, सेवेतील येशूचा जाज्वल्य आवेश आणि त्याची सहनशीलता पाहून त्यांना उत्तेजन मिळाले. (योहा. ४:३४) त्याच्या उपस्थितीमुळे व त्याच्या संदेशामुळे, आपल्या आत्म्यात नवचैतन्य आल्याचे त्यांना जाणवले. म्हणूनच, ज्यांनी त्याचे अनुसरण केले त्यांनी खरा आनंद परावर्तित केला. (मत्त. ११:२९) आपणही याचप्रमाणे, सर्वात महत्त्वपूर्ण अशा प्रचाराच्या आणि शिष्य बनविण्याच्या कार्यात टिकून राहण्यास एकमेकांना उत्तेजन देऊ या.
६ आपण सर्वजण स्वत्यागाचा आत्मा विकसित करून, निरंतर येशूला अनुसरण्याच्या त्याच्या आमंत्रणास सकारात्मकपणे प्रतिसाद देऊ. असे केल्याने, आपल्याला सद्यःकालात विपुल आनंद तर मिळेलच शिवाय, भविष्यात मिळणाऱ्या अगम्य आशीर्वादांकडेही आपण दृष्टी लावू शकतो.