आपल्या देवाच्या भवनाकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये
१ “सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरी ह्यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील आणि ह्या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील.” (अनु. ३१:१२) इस्राएलाच्या प्राचीन राष्ट्रास निक्षून सांगितलेले हे शब्द आजही यहोवाच्या सर्व खऱ्या उपासकांना लागू होतात कारण इब्री लोकांस १०:२५ येथे पौलाने ख्रिश्चनांनाही नियमितपणे एकत्र येण्याचा सल्ला दिला. त्याअर्थी सभा आपल्या उपासनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. स्पष्टपणे, अशाप्रकारे एकत्र येण्याचा उद्देश कान देऊन ऐकणे आणि शिकणे तसेच यहोवाकरवी शिकवले जाणे हा आहे. (यश. ५४:१३) प्राचीन इस्राएलात होत्या त्याप्रमाणे या सभा आनंददायक असतात; “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला,” असे म्हणणाऱ्या दावीदासारखाच मनोभाव त्या आपल्याही अंतःकरणांत जागृत करतात. (स्तोत्र १२२:१) यहोवाच्या भवनाकरता नहेम्याच्या आवेशाने त्याला असे म्हणण्याची चालना दिली की, “आम्ही आपल्या देवाचे मंदिर [भवन] सोडू नये.”—नहे. १०:३९
२ यहोवाचे साक्षीदार जेथे उपासनेकरता एकत्र येतात ती ठिकाणे, ख्रिस्ती धर्मजगताच्या अत्यंत दिमाखदार बांधकाम असणाऱ्या काही चर्चेससारखी नसून, राज्य सभागृह म्हणण्यात आलेली साधीशीच ठिकाणे असतात, पण त्यांत प्रसन्न आणि उत्साहपूर्ण वातावरण असते. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांनी हवाईला भेट देऊन तेथे एका सभागृहाच्या बांधकामाची व्यवस्था केली तेव्हा, म्हणजेच १९३५ साली, राज्य सभागृह हे नाव सर्वप्रथम उपयोगात आणण्यात आले. आजपावेतो हे नाव सबंध जगात स्वीकारण्यात आलेले आहे. १९६१ वेबस्टर्स विस्तृत शब्दकोशात (इंग्रजी) राज्य सभागृहाची व्याख्या, “जेथे धार्मिक सभा चालवण्यात येतात असे यहोवाच्या साक्षीदारांचे स्थानिक सभागृह,” अशी करण्यात आलेली आहे. उपासनेचे ठिकाण आहे याअर्थी राज्य सभागृह ही इतरांवर छाप पाडण्याच्या उद्देशाने बांधलेली दिमाखदार वास्तू नसावी. बांधकामाची शैली जागोजागी वेगळी असली तरीही त्याचे प्रयोजन हे मुख्यतः कार्यनिष्ठ असते.—प्रे. कृत्ये १७:२४.
प्रत्येक मंडळीच्या मालकीचे राज्य सभागृह असणे आवश्यक आहे का?
३ एखाद्या स्थानिक मंडळीचे स्वतःच्या मालकीचे राज्य सभागृह असावे अथवा असू नये हे संस्था ठरवत नाही. हा निर्णय स्थानिक मंडळीनेच घ्यावयाचा असतो. काहींनी आपली स्वतःची राज्य सभागृहे बांधली आहेत; इतरांनी सभा चालवण्याकरता सभागृहे भाड्याने घेतली आहेत. काहीही असो, सभेची ठिकाणे ही सुव्यवस्थित, स्वच्छ आणि यहोवाच्या उपासनेचे उदात्त दर्जे प्रतिबिंबित करणारी असावीत हे महत्त्वाचे आहे. यांचा उपयोग करत असताना सर्वांच्या नजरेत भरेल असे खेळीमेळीचे वातावरण तेथे असले पाहिजे. एक युनियन मेथोडिस्ट पाळक यहोवाच्या साक्षीदारांच्या एका राज्य सभागृहात एका सभेला उपस्थित राहिले आणि ते म्हणाले, “या लोकांची जी मनस्वी कळकळ आम्हाला पाहायला मिळाली ती आमच्यासाठी नवीनच होती. पण एकदाही त्यांच्याकडून आम्हाला काही दडपण असल्यासारखं वाटलं नाही, उलट आम्ही आमच्या सॅबटिकलच्या अर्थात आमच्या रजेच्या काळादरम्यान ज्या इतर वीस मंडळ्यांना भेटी दिल्या होत्या त्यांच्या तुलनेत आम्हाला इथेच एक खरं स्वागत लाभल्याची जाणीव झाली. इथे आम्हाला प्रेमळ, हसमुख आणि मनमोकळ्या लोकांची मंडळी आढळली ज्यांना देवाच्या वचनाची समज प्राप्त करण्यासोबतच एकमेकांबद्दल आणि अनोळखी माणसाबद्दलही अत्यंत कळकळ होती.”
४ अनेक मंडळ्यांच्या आर्थिक स्थितीमुळे स्वतःच्या मालकीचे सभागृह मिळवण्याचा विचार करणे त्यांना सध्याच शक्य नाही हे कबूल करावे लागेल. शिवाय, काही ठिकाणी सभागृह विकत घेण्यापेक्षा किंवा बांधण्यापेक्षा ते भाड्याने घेणे अधिक सोयीचे आहे. तथापि, पुष्कळशा मंडळ्यांना जमीन विकत घेऊन आपल्या सुविधांनुरूप स्वतःचे राज्य सभागृह बांधणे अधिक पसंत पडले आहे. किंवा त्यांनी तयार इमारत विकत घेऊन तिचे नविनीकरण केले आहे. प्रत्येक मंडळीजवळ स्वतःचे राज्य सभागृह असल्यास याचे निश्चितच अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, केरळ येथील एक विभागीय पर्यवेक्षक सांगतात, की दोन मंडळ्यांनी त्यांचे स्वतःचे राज्य सभागृह बांधल्यानंतर पहिल्या वर्षातच उपस्थितांच्या संख्येत एवढी भराभर वाढ झाली की शेवटी या मंडळ्यांना वेगवेगळ्या वेळेस दोनदा सभा घेणे आवश्यक झाले. राज्य सभागृहाच्या बांधकाम प्रकल्पाला केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे, तर त्याच्या बांधकामासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याद्वारे त्यास पाठिंबा देण्यास—तसेच त्याची सुस्थिती कायम राखण्यासाठी, अर्थात त्यास स्वच्छ, शोभिवंत आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी हातभार लावण्यास साक्षीदारांनी आपला सुहक्क समजला पाहिजे. राज्य सभागृहाचा आतील तसेच बाहेरील परिसरही यहोवा व त्याच्या संघटनेला शोभेल असाच असावा.
५ स्वतःच्या मालकीचे राज्य सभागृह मिळवण्याच्या स्थितीत आहोत असे एखाद्या मंडळीला जाणवल्यास काय करावे? हा निर्णय स्थानिक बांधवांनी घ्यावयाचा आहे. जमीन खरेदी करताना, योजना आखताना तसेच सभागृह बांधताना पद्धतशीरपणे पाळण्यासाठी संस्थेने अनेक कार्यपद्धतींच्या रूपरेषा आखून दिलेल्या आहेत. सर्वप्रथम, मंडळीने या निर्णयाला संमती देणारा ठराव पास करावा आणि त्यानंतर संस्थेच्या राज्य सभागृह विभागाशी संपर्क साधावा. कोणतीही मंडळी जमीन विकत घेण्याचे पाऊल उचलते त्याआधी अनेक गोष्टींची सावधगिरी बाळगणे अगत्याचे आहे. झोनिंगचे कायदे, बांधकामाचे कोड्स आणि धार्मिक उद्देशांसाठी बांधकाम करण्याकरता परवानगी यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींविषयी खात्री करून घेणे जरूरीचे आहे.
प्रादेशिक बांधकाम समितीची भूमिका
६ राज्य सभागृहांच्या बांधकामासंबंधाने मदत आणि मार्गदर्शन देण्याकरता आध्यात्मिकरित्या परिपक्व वडिलांची एक प्रादेशिक बांधकाम समिती (प्राबांस) संस्थेने स्थापन केली आहे. पाच सदस्यांची ही समिती तुमचे ठिकाण विचारात घेऊन तसेच मंडळीला उपलब्ध असलेली आर्थिक साधने आणि आवश्यक असलेले आकारमान नजरेसमोर ठेऊनच राज्य सभागृहाच्या खरेदी किंवा बांधकामासंबंधी सल्ला देईल. प्रादेशिक बांधकाम समिती, स्थानिक राज्य सभागृह बांधकाम समितीची जागा घेणार नसून ती या समितीला बांधकाम कार्यक्रमात मदत करील. जमीन खरेदी करण्याच्याही आधी स्थानिक बांधकाम समितीने प्राबांसशी सल्ला मसलत केल्यास बरे होईल. प्राबांस मध्ये खर्चानुमान आणि बांधकामाच्या विविध क्षेत्रात वाकबगार असणारे सक्षम पुरुष असल्यामुळे अशाप्रकारचे प्रकल्प हाती घेताना त्यांची मोलाची मदत मिळू शकते.
७ उत्तम पूर्वयोजना आवश्यक असणारे एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे राज्य सभागृहाचे आकारमान—त्याचा प्लॅन आणि बैठक क्षमता. साधा पण सोयीचा प्लॅन सर्वात उत्तम. प्राबांसजवळ असे अनेक प्लॅन्स आहेत पण ती मुख्यतः १००, १५० आणि २५० लोकांच्या अशा तीन वेगवेगळ्या बैठक आवश्यकतांकडे लक्ष पुरवते. सभागृहाचे क्षेत्रफळ एका सूत्राच्या आधारे ठरवण्यात येते; यासाठी, बसणाऱ्या लोकांच्या संख्येचा १.८ चौरस मीटरने गुणाकार करतात. उदाहरणार्थ, १०० लोकांना बसवण्याच्या क्षमतेचे सभागृह बांधावयाचे असल्यास १८० चौरस मीटरचे क्षेत्रफळ आवश्यक असेल. यात इतर आवश्यकताही समाविष्ट असतील उदाहरणार्थ प्रसाधनगृहे, मॅगझीन व लिटरेचर काउंटर, एक अतिरिक्त प्रशाला इत्यादि. अशाप्रकारे आकडेमोड व आखणी केल्यामुळे राज्य सभागृह फारच लहान न पडता मोकळे व आरामदायक होऊ शकेल. सोईस्कर व्यासपीठ, साऊंड सिस्टम, लाईट्स व पंख्यांची ठिकाणे शिवाय इतर विद्युत बारकावे, जेनरेटर रूम आणि नळकाम तसेच मलवहन व्यवस्था यांबद्दलही सल्ला देण्यास प्रादेशिक बांधकाम समिती समर्थ आहे.
८ काहीवेळा, एकापेक्षा अधिक मंडळ्या एकाच राज्य सभागृहाचा उपयोग करण्याद्वारे कमीतकमी खर्चात सभागृहाचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. दोन किंवा त्यापेक्षा जास्त मंडळ्यांनी एकमेकांत असा सहयोग केल्यास बांधकाम कार्यक्रम आर्थिक दृष्ट्या सुलभ बनेल. मात्र आगाऊ रक्कम व इतर व्यवस्थांबाबतीत संस्था यांपैकी केवळ एकाच मंडळीशी संबंध ठेवते. या वेगवेगळ्या मंडळ्यांच्या सभा केव्हा चालवण्यात येतील यांसंबंधी सहभाग घेणाऱ्या मंडळ्यांच्या वडीलवर्गांनी ठरवावे.
राज्य सभागृहाला अर्थसाहाय्य
९ जेथे कार्य प्रगतीशील आहे अशा ठिकाणी दोन किंवा त्याहून अधिक मंडळ्या सभागृहाचा उपयोग करू शकत असल्यास काही तुरळक केसेसमध्ये संस्थेने जरी जमीन विकत घेण्यासाठी अर्थसाहाय्य केले असले तरीसुद्धा, संस्था सभागृहासाठी जमीन खरेदी करून देत नाही याकडे लक्ष द्यावे. २ करिंथकर ८:१३-१५ येथे पौलाने जो मनोभाव ठेवण्यास प्रोत्साहित केले तोच मनोभाव यहोवाचे आधुनिक काळातील सेवकही दाखवतील: “दुसऱ्यांचा भार हलका करिण्याकरिता तुमच्यावर भार घालावा असे नाही. तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यातून त्यांची गरज भागावी, आणि पुढे त्यांच्या वैपुल्यातून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी; ‘ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही,’ असे शास्त्रात लिहिले आहे.” नवीन राज्य सभागृहे बांधण्यात मदत व्हावी म्हणून आपला वेळ आणि साधनसंपत्ती दिल्यास आपण एका उत्तम मार्गाने यहोवाला सम्मान देत असतो.—नीति. ३:९.
१० सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी उदार देणग्यांची गरज पडली होती तेव्हाच्या प्रसंगाचा विचार करा. यहोवाने आपल्या उपासनेसाठी मोशेला एक निवासमंडप किंवा ‘दर्शनमंडप’ बांधण्याची आज्ञा दिली होती. देवाने दिलेल्या अभिकल्पासाठी निरनिराळ्या मौल्यवान वस्तूंची आवश्यकता होती. यहोवाने आदेश दिला: “तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे.” (निर्ग. ३५:४-९) लोकांनी या आवाहनास कसा प्रतिसाद दिला? अहवाल आपल्याला सांगतो की, “ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ति झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणिले.” ही स्वयंस्फूर्त अर्पणे इतकी झाली की यहोवाने आज्ञा दिलेल्या कार्यासाठी आवश्यक होते त्यापेक्षा ती “पुष्कळच अधिक” होती. (निर्ग. ३५:२१-२९; ३६:३-५) त्या लोकांनी खरोखर किती निःस्वार्थ, उदार मनोभाव प्रदर्शित केला!
११ यानंतर ५०० वर्षे उलटल्यावर पुन्हा इस्राएली लोकांकडून उदार देणग्यांसाठी आवाहन देण्यात आले. जेरुसलेम येथे यहोवासाठी एक कायमचे मंदिर बांधण्याची राजा दावीदाची मनसा त्याचा पुत्र शलमोन पूर्णत्वास नेणार होता. दावीदाने स्वतः आवश्यक साहित्याच्या पुष्कळशा भागाची जमवाजमव केली तसेच त्याने त्यासाठी योगदानही दिले. दावीदाने ‘यहोवासाठी देणगी आणण्याचे’ आवाहन केले तेव्हा त्याच्यासोबत इतरजणही सामील झाले. याचा परिणाम? “लोकांस फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने व स्वच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ ती अर्पणे केली होती; दावीद राजासहि मोठा हर्ष झाला.” (१ इति. २२:१४; २९:३-९) सध्याच्या चलनांत बोलायचे झाल्यास फक्त चांदी व सोन्याचीच किंमत जवळजवळ दोन दशलक्ष-दशलक्ष रुपयांपर्यंत जाईल!—२ इति. ५:१.
१२ आधुनिक काळातही जगातील वेगवेगळ्या भागांत आपले बांधव असाच मनोभाव प्रदर्शित करतात. आपल्या सार्वभौम प्रभू, यहोवाच्या उपासनेसाठी एक स्थान बांधण्याची इच्छा दाखवण्यात येते हे जाणूनच केवढे प्रोत्साहन मिळते; अनेक रोमांचक अनुभवांतून आपल्या बांधवांच्या ‘मनाचा खरेपणा व स्वेच्छा’ दिसून येते. उदाहरणार्थ, पोलंडमध्ये काही भागांत बांधव शेते भाड्यावर घेतात, पीक उत्पन्न करतात आणि मग ते विकतात किंवा फळे गोळा करतात जेणेकरून त्यांना पैसे मिळतील आणि कालांतराने ते एक राज्य सभागृह बांधू शकतील. अशा प्रकल्पांसाठी काहींनी पैशाचा रूपात तर काहींनी दागदागिने आणि संपत्तीच्या रूपात देणग्या दिल्या आहेत. अनेक लहान मुलांनी संस्थेला आपले खाऊचे पैसे पाठवण्याद्वारे बांधकाम प्रकल्पांसाठी आपली कळकळ व्यक्त केली आहे; या रकमा जगिक दृष्टिकोनातून अगदीच लहानशा असल्या तरीसुद्धा, यहोवाच्या नजरेत त्यांना भारी मोल आहे.
१३ आर्थिक साहाय्य देणे शास्त्रवचनांशी सुसंगत आहे. “अर्पण” याअर्थी अनुवाद केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “पवित्र निधी” असा होतो. (निर्ग. २५:२, रेफरन्स बायबल, तळटीप.) ख्रिश्चन लोक आपला वेळ, शक्ती आणि आपल्या मालकीच्या वस्तू राज्याच्या वाढीकरता अर्पण करू इच्छितात हे योग्यच आहे. एखादी मंडळी जेव्हा राज्य सभागृह बांधण्याची योजना आखते तेव्हा कदाचित काही विशिष्ट जण या प्रकल्पासाठी लगेच देणगी देण्याच्या स्थितीत असतील किंवा जिची त्यांना सध्याच गरज नाही अशी रक्कम लोन म्हणून देऊ शकतील. याव्यतिरिक्त, दर महिन्यात विशिष्ट रक्कम नियमितपणे देण्याविषयीही सर्वजण ठरवू शकतात. हा दशांश किंवा सक्तीचे नसून संपूर्णतः स्वेच्छिक असले तरीही योजना आखणे सोयीचे जावे म्हणून वडील, मंडळीच्या सदस्यांकडून याविषयी माहिती मिळवू शकतात. निनावी चिठ्ठ्यांवर फक्त रक्कम लिहिली तरी हा अंदाज बांधणे शक्य होईल.
१४ राज्य सभागृहाच्या बांधकामासाठी रोकड निधी गोळा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे राज्य सभागृहात ‘बांधकाम निधी’ असे लेबल लावलेली दानपेटी ठेवून या कार्यासाठी वर्गण्या देण्याचे बांधवांना उत्तेजन देणे होय. १९९५ च्या ऑगस्ट महिन्यात संस्थेने भारतातील सर्व मंडळ्यांना अशी एक दानपेटी ठेवण्यास सांगितले. ज्या मंडळ्यांजवळ आधीच त्यांचे स्वतःचे राज्य सभागृह आहे आणि त्याची पूर्ण किंमत देऊन झाली आहे किंवा ज्या मंडळ्यांनी अद्याप स्वतःच्या राज्य सभागृहाचे बांधकाम हाती घेतलेले नसून निकट भविष्यात असे करण्याचा त्यांचा विचार नाही, अशांनी या दानपेटीतून प्राप्त झालेली पूर्ण रक्कम दर महिन्यात संस्थेला पाठवावी. ही रक्कम पाठवताना त्यावर ‘राष्ट्रीय राज्य सभागृह निधी’ (रारासनि) अशी खूण असावी. रारासनि हा एक ‘फिरता निधी’ आहे व त्यातून देशभरातील मंडळ्यांना त्यांच्या राज्य सभागृहाच्या प्रकल्पांसाठी आर्थिक साहाय्य म्हणून आगाऊ रक्कम पुरवण्यात येते. या आगाऊ रकमा परत देता येण्यासारख्या असून परत करताना, हाताळणी खर्चांचा समावेश करण्यासाठी तसेच इतर सभागृहांना आर्थिक मदत देता येण्यासाठी त्या रकमेसोबत नाममात्र तीन टक्क्यांचा जादा आकार द्यावा लागतो. स्थानिक मंडळीच्या खर्चासाठी वर्गणी देण्यासोबतच, आपापल्या समर्थतेनुसार आणि इच्छेनुसार या निधीलाही हातभार लावण्यासाठी नियमितपणे थोडेफार पैसे बाजूला ठेवण्याचे सर्वांना प्रोत्साहन देता येईल. (पडताळा १ करिंथ. १६:१-४.) टर्टुलियन या इतिहासकाराने सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीविषयी लिहिले: “प्रत्येक जण दर महिन्यात एकदा—किंवा त्याची इच्छा असेल तेव्हा, शिवाय इच्छा असल्यास आणि त्याला शक्य असेल तरच काही लहानशी देणगी आणतो; कारण कोणावरही असे करण्याचे बंधन नाही; ते सर्वतोपरी स्वेच्छिक अर्पण होय.” आजकालच्या अनेक धर्मांत वर्गण्यांची मागणी करण्यासाठी दान पात्र फिरवतात, पण खऱ्या ख्रिस्ती मंडळीत सर्व भौतिक वर्गण्या स्वयंस्फूर्तपणे अंतःकरणापासून देण्यात येतात.—२ करिंथ. ९:७.
१५ प्राबांसने सुचविलेल्या गोष्टी कृतीत आणून स्थानिक वडील वर्गाने बांधकामाचे प्लॅन्स एकदा का मंजूर केले, की मग सबंध प्रकल्पाच्या एकूण खर्चाचा पुन्हा एकदा प्रादेशिक बांधकाम समितीच्या मदतीने अंदाज बांधण्यात यावा. आपल्याजवळ एकूण किती पैसा आहे याविषयी एव्हाना मंडळीलाही कल्पना आलेली असेल. या टप्प्याला, आगाऊ रकमेची गरज असल्यास ती मिळवण्याकरता मंडळी संस्थेला अर्ज करू शकते. संस्था त्यांच्या विनंतीवर विचार केल्यावर आगाऊ रक्कम देण्यात यावी किंवा कसे हे ठरवील; ही आगाऊ रक्कम दहा वर्षांच्या कालावधीत मासिक हफ्त्यांच्या रूपात परत करता येते. संस्थेकडून आगाऊ रकमेची विनंती करण्याअगोदर बांधवांनी एकत्र बसून, येणार असलेल्या खर्चाचा अचूक आणि वास्तविक हिशोब करावा हे फार महत्त्वाचे आहे कारण यामुळे त्याच प्रकल्पासाठी आगाऊ रकमेसाठी पुन्हा संस्थेला विनंती करण्याचे टाळता येईल. (लूक १४:२८) एखादा फ्लॅट किंवा इतर कोणते तयार बांधकाम खरेदी करून त्याची राज्य सभागृह म्हणून पुनर्रचना करण्यासाठी आगाऊ रकमेची विनंती करण्यात येते अशा वेळेस, हा प्लॅन व्यावहारिक असल्यास त्यावरही विचार करण्यात येईल.
राज्य सभागृह साहाय्य तरतूद
१६ तुमच्या स्वतःचे किंवा भाड्याने घेतलेले राज्य सभागृह असून त्या वास्तूची किंवा त्यातील हलवता येण्यासारख्या वस्तूंची सुरक्षा हवी असल्यास संस्थेची एक राज्य सभागृह साहाय्य तरतूद (राससात) आहे. याविषयीचे एक माहितीपत्रक सर्व मंडळ्यांना पाठवण्यात आले आहे. आपण कठीण दिवसांत जगत आहोत आणि चोरी किंवा इतर विध्वंसकारी कृत्यांचा धोका वाढतो आहे हे लक्षात घेता ही तरतूद अत्यंत उपयुक्त आहे. संस्थेने ठरवलेली एक लहानशी रक्कम दर वर्षाला भरल्यास, संपत्ती किंवा वस्तूंचे नुकसान भरून काढण्यासाठी मंडळीला मदत मिळू शकते. साऊंड सिस्टम आणि फर्निचर यांसारख्या मोलवान वस्तूंना देखील या तरतुदीमुळे सुरक्षा मिळते. ही एक अत्यंत प्रेमपूर्ण तरतूद असून सर्व मंडळ्यांनी तिचा जरूर फायदा घ्यावा.
१७ उदार मनोवृत्तीचा मुळारंभ स्वतः यहोवा देव आहे. तो मोठ्या मनाने आपल्या पृथ्वीवरील लेकरांना प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान देतो. (याको. १:१७) आणि इतक्या विपुल प्रमाणात अद्भूत देणग्या देऊनही तो त्यांऐवजी आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो? स्तोत्रकर्त्याने हाच प्रश्न विचारला: “परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?” (स्तोत्र ११६:१२) यहोवाची प्रेमळ कृपा आणि सार्वकालिक जीवनाच्या उज्ज्वल भवितव्याच्या ऐवजात आपण त्याला काय देऊ शकतो? स्वतःच याचे उत्तर देताना स्तोत्रकर्ता म्हणतो: “मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन.” (स्तोत्र ११६:१३, १७) खरोखर, आपण यहोवाला देऊ शकतो अशी सर्वात मोलवान देणगी म्हणजे त्याच्या नावाचा धावा करताना आपली सत्त्वनिष्ठा कायम राखून आपल्या क्षेत्रांत त्याच्या शुद्ध उपासनेचा पुरस्कार करणे होय. असे करण्याचा सर्वात अप्रतिम मार्ग, आपले स्वतःचे राज्य सभागृह मिळविणे हा आहे, जेथे लोक असे म्हणत येतील की “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”—जख. ८:२३.
[६ पानांवरील चौकट]
राज्य सभागृहाच्या बांधकामासाठी योगदान देण्यास तुमचे हृदय तुम्हाला प्रेरणा देते का?
राज्य सभागृह बांधण्याविषयी तुम्ही अनेक मार्गांनी आपली आस्था आणि इच्छा प्रदर्शित करू शकता. संस्थेचा एक राष्ट्रीय राज्य सभागृह निधी आहे जो अशा प्रकल्पांना आर्थिक हातभार लावतो. तुम्ही पुढील मार्गांनी मदत देऊ शकता:
१. दाने: स्वेच्छेने दिलेल्या पैशाच्या देणग्या, थेटपणे वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीकडे पाठवल्या जाऊ शकतात. दागिने किंवा इतर मौल्यवान गोष्टींची देखील देणगी दिली जाऊ शकते. या वर्गण्या राष्ट्रीय राज्य सभागृह निधीसाठी थेट दान आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्र देखील यासोबत पाठवावे.
२. सशर्त-देणगी योजना: देणगी देणाऱ्याच्या मृत्यूपर्यंत, वॉच टावर संस्थेकडे पैसे सुपूर्द केले जाऊ शकतात. शिवाय, वैयक्तिक गरज भासल्यास देणगी देणाऱ्याला हे पैसे परत केले जाऊ शकतील अशी देखील योजना आहे. या रकमेवरही, वरील निधीसाठी असल्याची स्पष्ट खूण असावी.
३. बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाणपत्र किंवा वैयक्तिकाचे सेवानिवृत्ती खाते, स्थानिक बँकेच्या अटींनुसार वॉच टावर संस्थेला सुपूर्द किंवा मृत्यूनंतरचे देय म्हणून दिले जाऊ शकते. या रकमा वरील निधीसाठी उपयोगात आणण्यात याव्यात असे स्पष्ट करावे. अशा कोणत्याही योजनेबद्दल संस्थेला कळवावे.
४. शेअर भाग आणि बंधपत्रे: वॉच टावर संस्थेला शेअर भाग आणि बंधपत्रे, थेट दानाकरवी किंवा दात्यालाच त्याचे उत्पन्न मिळेल अशा योजनेकरवी दिली जाऊ शकतात. काही रक्कम असल्यास, ती संस्थेच्या राज्य सभागृह निधीसाठी असल्याची खूण असावी.
५. स्थावर संपत्ती: वॉच टावर संस्थेला विक्रीयोग्य स्थावर संपत्ती, थेट दानाकरवी किंवा दाता त्याच्या किंवा तिच्या जीवनभर त्यावर राहू शकतो, अशी जीवन संपत्ती राखून ठेवण्याद्वारे दिली जाऊ शकते. कोणत्याही स्थावर संपत्तीचा लेखी करार करण्याआधी, त्या व्यक्तीने संस्थेशी संपर्क साधला पाहिजे. यातून उत्पन्न होणारा पैसा राज्य सभागृह निधीच्या उपयोगासाठी आहे असे स्पष्टपणे कळवावे.
६. मृत्यूपत्रे आणि ठेवी: मालमत्ता किंवा पैसा कायद्याने निष्पादन केलेल्या मृत्युपत्राद्वारे वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीला दिला जाऊ शकतो किंवा संस्थेला उपभोग घेणारी ठेव करार हे नाव देण्याद्वारे दिला जाऊ शकतो. धार्मिक संस्थेला लाभदायक असणारी ठेव, विशिष्ट कराचे फायदे देऊ शकते. मृत्यूपत्र किंवा ठेव कराराची एक प्रत संस्थेला पाठवावी तसेच मृत्यूपत्र अथवा ठेवीच्या रकमेवर राज्य सभागृह निधीसाठी अशी स्पष्ट खूण असावी.
या विषयांवर अधिक माहिती हवी असल्यास, पुढील पत्त्यावर लिहा, Watch Tower Bible and Tract Society of India, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, MAH., INDIA.