त्याचे अनुयायी होण्यास त्यांना उद्युक्त करा
१ पौलाने १ करिंथकर ३:६, मध्ये लिहिले: “मी लाविले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला.” बांधवांनी ख्रिस्ताच्या मस्तकपदाखाली ऐक्याने काम करण्याच्या आवश्यकतेला ओळखण्यास मदत करण्यासाठी पौलाने ही कारणमीमांसा केली. अशाप्रकारे पेरण्याच्या आणि पाणी घालण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यात त्यांनी जी अत्यावश्यक भूमिका पार पाडली त्याची गुणग्राहकता बाळगण्यासही त्याने त्यांची मदत केली.
२ याच काळात त्या जीवन वाचवण्याच्या कार्याचा समारोप करावयाचा आहे. समर्पित ख्रिस्ती या नात्याने, इतरांना येशूचे अनुयायी होण्यास त्यांची मदत करण्याची गंभीर जबाबदारी आपल्यावर आहे. (प्रे. कृत्ये १३:४८) तुम्ही सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाचा उपयोग करून उद्दीपित केलेल्या आस्थेचा मागोवा कसा घ्याल?
३ पुस्तक स्वीकारलेल्या व्यक्तीची भेट घेण्यास तुम्ही परत जात असाल तर, असे म्हणू शकता:
▪“आपण मागच्या वेळी बोललो तेव्हा, येशू ख्रिस्त मनुष्य या नात्याने कसा होता याबद्दल आपण चर्चा केली होती. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक तुम्हाला देऊन जाण्यास मला आनंद झाला. येशूची शिकवण व त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दलच्या कोणत्या गोष्टीचा तुम्हावर अधिक प्रभाव झाला आहे?” प्रतिसादासाठी वाव द्या. अध्याय ११३ उघडा आणि येशूच्या नम्रतेच्या उत्तम उदाहरणाबद्दल चर्चा करा. प्रेषित पौलाने येशूच्या नम्र मनोवृत्तीला कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले हे दाखवण्यासाठी फिलिप्पैकर २:८ वाचा. मग, बायबलच्या नियमित अभ्यासाद्वारे अधिक शिक्षण कसे घेता येते हे तुम्ही समजावून सांगू शकता.
४ तुम्हाला कदाचित ही प्रस्तावना आवडेल:
▪“येशूने पृथ्वीवर असताना ज्या गोष्टी केल्या त्यावरून तो खरोखर आपली काळजी घेतो हे प्रदर्शित होते त्याबद्दल आपण बोललो होतो. शेवटी, ज्यांनी पुष्कळ सहन केले आहे त्यांची सुटका करण्यासाठी तो काय करील असे तुम्हाला वाटते?” प्रतिसादासाठी वाव द्या. अध्याय १३३ उघडा आणि पाचव्या परिच्छेदातील विवेचनांची उजळणी करा. पुढील पृष्ठावरील चित्राकडे वळा आणि देवाची इच्छा स्वर्गामध्ये आहे त्याप्रमाणे पृथ्वीवर पूर्ण झाल्यावर ते कशासारखे असेल हे समजावून सांगा. अधिक शिकल्याने जे लाभ प्राप्त केले जाऊ शकतात ते दाखवा.
५ घरमालकाने सुरवातीच्या भेटीत पुस्तक स्वीकारले नसल्यास, कदाचित तुम्ही अशाप्रकारे चर्चा सुरु करू शकता:
▪“आज पुष्कळ लोक, आदर्श मानत असलेल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे त्यांचे जीवन आचरतात यावर आपण दोघेही सहमत आहोत असे मला वाटते. येशू ख्रिस्त हा सर्वात उत्तम आदर्श आहे. येशूने मांडलेल्या उदाहरणाबद्दल अभ्यास करून शिकलेल्या एका महत्त्वपूर्ण धड्याची सहभागिता तुमच्याबरोबर करावयास मला आवडेल. [सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील अध्याय ४० काढा आणि येशूने दयेबद्दल दिलेल्या उत्तम धड्याकडे लक्ष आकर्षित करा.] मी इतरांबद्दल हा गुण किती प्रदर्शित केला पाहिजे याची त्याने मला जोरदारपणे आठवण करून दिली.” मत्तय ५:७ वाचा. ते पुस्तक पुन्हा सादर करण्याची किंवा देव खरोखर आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक सादर करण्याची ही उचित घटका असेल.
६ किंवा तुम्हाला कदाचित हा थेट प्रस्ताव वापरावा असे वाटेल:
▪“मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा, आपण येशूबद्दल ज्ञान प्राप्त करण्याच्या महत्त्वाबद्दल चर्चा केली होती. योहान १७:३ म्हणते की, अशाप्रकारचे ज्ञान घेणे हेच ‘सार्वकालिक जीवन . . . आहे.’ आपण ते कसे घेऊ शकतो?” प्रतिसादासाठी वाव द्या. पुढे, आपल्या बायबल अभ्यासाच्या व्यवस्थेबद्दल आणि त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजावून सांगा.
७ पौल म्हणतो की कापणीतील ‘प्रत्येक कामकऱ्याला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजुरी मिळेल.’ (१ करिंथ. ३:८) इतरांना येशूचे अनुयायी बनवण्यात त्यांची मदत करण्यासाठी आपण जोराने यत्न केला, तर आपल्याला निश्चितच मोठा मोबदला मिळेल.