देवाकडील ज्ञान अनेक प्रश्नांची उत्तरे देते
१ सत्याचे अचूक ज्ञान प्राप्त करण्याआधी, जीवनाबद्दल अनेक प्रश्न बहुधा तुमच्या मनांत आले असावेत ज्यांची उत्तरे तुमच्याजवळ नव्हती. या प्रश्नांची बायबल आधारित उत्तरे मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद झाला होता बरे! आता हीच उत्तरे गवसण्यात इतरांची मदत करण्यास तुम्ही समर्थ आहात. (पडताळा २ तीमथ्य २:२.) सार्वकालिक जीवनाकडे नेणारे देवाचे ज्ञान तुम्ही त्यांना शिकवू शकता. (योहा. १७:३) परंतु, या ज्ञानाचे महत्त्व जाणून घेण्यास तुम्ही एखाद्याची मदत कशी करू शकता? सत्यामुळे तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरे मिळाली त्यांचाच विचार करा. सत्याचा शोध घेणारे काय जाणून घेण्यास इच्छुक असतात? या दिशेने विचार केल्यास, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, हे पुस्तक सादर करण्यास तुम्हाला साहाय्य मिळेल. जून महिन्यादरम्यान साक्षकार्याची तयारी करताना पुढील सूचनांची तुम्हाला मदत होईल.
२ आज जगामध्ये इतके दुःख का आहे, याचा अनेक लोक विचार करत असल्यामुळे कदाचित हीच प्रस्तावना चांगला प्रतिसाद मिळवील:
◼ “जेव्हा आपत्ती येते किंवा गुन्हे आणि हिंसाचार सतत वाढत राहतात तेव्हा पुष्कळवेळा लोकांना असा प्रश्न पडतो, की अशा भयानक गोष्टी का बरं घडतात. यावर तुम्ही काय उत्तर द्याल बरं?” प्रतिसादासाठी वाव द्या व त्या व्यक्तीच्या प्रतिसादास संमती दर्शवा. मग ज्ञान पुस्तकातील अध्याय ८ उघडा व परिच्छेद २ मध्ये जे काही लिहिले आहे त्याकडे लक्ष वेधा. वाईट गोष्टी का घडत असतात यावरील बायबलचे स्पष्टीकरण हे पुस्तक देते असे सांगा. पुस्तक सादर करा, पण असेही स्पष्टीकरण द्या, की केवळ पुस्तकांचे वितरण करण्यासच नव्हे तर ती समजून घेण्यात लोकांची मदत करण्यासही तुम्ही इच्छुक आहात. पुन्हा भेटण्याची व्यवस्था करा.
३ तुम्ही जेथे “ज्ञान” पुस्तक दिले होते तेथे पुन्हा भेट देण्यास जाता तेव्हा तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:
◼ “जगात इतकं दुःख का आहे यावर तुम्ही जे उत्तर दिलं होतं त्याविषयी मला आस्था आहे. पुस्तकात दाखवून दिलेल्या बायबलच्या उत्तराशी तम्ही सहमत आहात का?” प्रतिसादासाठी वाव द्या. ज्ञान पुस्तकातील पृष्ठ ७७ वरील परिच्छेद १७ वाचा आणि घरमालकाच्या बायबलमधून रोमकरांस पत्र ९:१४ वाचण्याचा प्रस्ताव मांडा. मग म्हणा: “आनंदाची बातमी अशी आहे, की देव अन्यायीपणे आपल्याला कष्ट आणि दुःख देत नाही. शांती व सौख्यानंदाचं सार्वकालिक जीवन देण्याचं वचन त्यानं आपल्याला दिलं आहे. या पुस्तकातील पहिल्या अध्यायाचे शीर्षक पाहा काय म्हणते, ‘तुम्हाला आनंदी भवितव्य मिळवता येईल!’ ही गोष्ट तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांसंबंधी एक वास्तविकता कशी होऊ शकते याचं स्पष्टीकरण देण्यास मला आवडेल.” अध्याय १ उघडून अभ्यास करण्याच्या आपल्या पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवा. परिस्थिती विचारात घेऊन अध्यायाचा होता होईल तितका भाग उरका.
४ “पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या,” या पुस्तिकेत पृष्ठ ६ वर “वृद्धापकाळ/मृत्यू” या उपशीर्षकाखाली आढळणारी प्रस्तावना वापरण्यास कदाचित तुम्हाला आवडेल:
◼ “तुम्ही कधी स्वतःला असं विचारलं का: ‘मृत्यू हाच सर्वांचा शेवट आहे का? किंवा मरणानंतर आणखी काही असतं का?’ [प्रतिसादासाठी वाव द्या.] मृत्यूसंबंधी असणाऱ्या कोणत्याही प्रश्नाची सुस्पष्ट उत्तरं बायबल आपल्याला देतं. [वाचा उपदेशक ९:५, १०.] ते हे देखील दाखवून देतं, की विश्वास ठेवणाऱ्यांकरता एक खरी आशा आहे. [ज्ञान पुस्तकात पृष्ठ ८४ वरील परिच्छेद १३ कडे वळा; योहान ११:२५ मधील येशूचे शब्द वाचून त्यांचे स्पष्टीकरण द्या.] या संपूर्ण अध्यायात, आपल्या मृत प्रियजनांचे काय होते?, या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. तसेच या पुस्तकातील इतर अध्यायांत, जीवन व भवितव्य यांबाबतीत असणाऱ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत.” पुस्तक सादर करा.
५ पुनर्भेट करताना, पुन्हा एकवार स्वतःची ओळख करून देऊन मग असे म्हणू शकता:
◼ “मागे आपण याविषयी बोललो होतो, की एखादी व्यक्ती मरते तेव्हा तिचं काय होतं. पुष्कळशा लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, किंवा ते असा विश्वास करतात की मेल्यानंतर एखादी व्यक्ती स्वर्गात किंवा नरकात जीवन व्यतीत करत असते. परंतु, याच पृथ्वीतलावर मृतजन पुन्हा जीवन जगू शकतील, याविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल सांगते त्याप्रमाणे, पृथ्वीचे वतन पावणाऱ्या लीन जनांमध्ये, पुनरुत्थित लोक देखील असतील. [स्तोत्र ३७:११, २९ वाचा, मग ज्ञान पुस्तकातील पृष्ठ ८८ वर परिच्छेद २० वाचा.] या आशेमुळं, मृत्यूच्या भयात जीवन कंठणाऱ्या लाखो लोकांना सांत्वन लाभले आहे. ही गोष्ट आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास हे पुस्तक तुमची मदत करील. ते कसे तुमची मदत करील हे मी तुम्हाला दाखवू का?”
६ तुम्हाला एखादी साधीसोपी प्रस्तुती हवी असल्यास तुम्ही या प्रस्तुतीचा वापर करू शकता:
◼ “ज्ञान जे सार्वकालिक जीवनाकडे नेते या पुस्तकातून मला एक चित्र तुम्हाला दाखवावयास आवडेल. हे चित्र तुम्हाला सुंदर वाटत नाही का?” घरमालकाला पृष्ठे ४-५ वरील चित्र दिसावे यासाठी पुस्तक उघडा. त्याच्या प्रतिसादासाठी वाव द्या. मग पृष्ठ ५ वरील मजकूर वाचा. “वाटल्यास तुम्ही हे पुस्तक वाचण्यासाठी ठेवू शकता,” असे म्हणून समारोप करा. “याच्या वितरणासाठी छोटेसे अनुदान आम्ही घेत असतो; एका प्रतीचे अनुदान आहे २०.०० रुपये.” जी काही आस्था दाखवली जाते तिचा मागोवा घेण्यासाठी कोणती वेळ सोईस्कर असेल याची माहिती करून घ्या.
७ जीवनाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देणारे देवाकडचे ज्ञान आपल्याजवळ आहे. प्रामाणिकपणे तयारी करा, तसेच सत्याचा शोध घेणाऱ्यांना, जीवन देणारी ही माहिती विदित करण्याचे तुमचे प्रयत्न यहोवा आशीर्वादित करील.