सेवेसाठी पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना तयार करा
१ पवित्र शास्त्राभ्यास चालवण्याचे मुख्य ध्येय नवीन शिष्य बनवणे हे आहे. ते, इतरांना शिकवण्यात आमच्यासोबत सहकारी असतील. (मत्त. २८:१९, २०) यास्तव, अभ्यासाचा उद्देश केवळ ज्ञान देणे एवढाच नाही. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, अंतःकरणपूर्वक विश्वास बिंबला गेला पाहिजे. तसेच, त्यांच्या आशेची सहभागिता इतरांसोबत करण्यात सहभाग घेण्यासाठी त्यांना तयार केले पाहिजे. (२ करिं. ४:१३) कोणत्या व्यावहारिक मार्गांनी त्यांना इतरांना शिकवण्यात योग्य बनण्यास आपण त्यांची मदत करू शकतो?—२ तीम. २:२.
२ सेवेला एक ध्येय बनवा: अगदी सुरवातीपासूनच खऱ्या उपासनेत ‘तारणासाठी मुखाने कबूल करणे’ गोवलेले आहे हे स्पष्टपणे सांगा. (रोम. १०:१०) यहोवाचे साक्षीदार, हे आमचे नावच दर्शवते की आम्ही इतरांशी बोलले पाहिजे. त्यांना हे पाहण्यास मदत करा की, त्यांना केवळ त्यांच्या स्वतःच्याच तारणासाठी शिकवले जात नाही. ते स्वतः शिक्षक बनल्यावर, त्यांच्या ऐकणाऱ्यांना देखील तारण प्राप्त करण्यास वाव मिळतो.—१ तीम. ४:१६.
३ शिकलेल्या गोष्टींची उजळणी करा: शिकलेल्या गोष्टींची अधूनमधून उजळणी केल्यामुळे, ते मौल्यवान शिकवण्याचे साधन ठरले आहे. विद्यार्थ्याच्या मनात व अंतःकरणात नवीन शिकलेल्या सत्यांना रुजवले जाते तसे, ते त्यास आध्यात्मिकतेत वाढण्यास मदत करते. टेहळणी बुरुज अभ्यासातील उजळणीच्या प्रश्नांची उत्तरे देताना आम्ही स्वतः याचा अनुभव घेतला आहे. तुमच्या विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या शब्दात उत्तर देता यावे म्हणून, त्याच्यासाठी सोपे व सरळ प्रश्न तयार करा.
४ तुमची उजळणी क्षेत्र सेवेच्या रुपात असू शकते. इतरांना साक्ष देताना आढळणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांचे किंवा परिस्थितीचे वर्णन करा. तुम्ही घरमालक होऊन, तुमच्या विद्यार्थ्याला काय म्हणायचे आहे ते प्रदर्शित करू द्या. त्याने जे चांगले केले त्याबद्दल त्याची प्रशंसा करा. पुढच्या वेळी अधिक प्रभावकारी होण्यात त्यास मदत करतील अशा व्यावहारिक सूचना सादर करा. या शिक्षणामुळे त्याने जे शिकले आहे ते कसे वापरावे हे त्यास शिकवले जाईल. ते पवित्र शास्त्र वापरण्याच्या त्याच्या कुशलतेला देखील वाढवेल.
५ युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तक: तुमच्या विद्यार्थ्याकडे युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकाची एक प्रत आहे याची खात्री करा. ते वापरण्यास त्याला शिकवा. संभाषण सुरु करण्याबद्दल, पवित्र शास्त्रीय प्रश्नांची उत्तरे देण्याबद्दल किंवा आक्षेपांचा सामना करण्याबद्दल ते कसे सूचना पुरवते ते दाखवा. इतरांना खात्री पटेल अशा पद्धतीने बोलण्याच्या मार्गांबद्दल दाखवण्यासाठी या पुस्तकाचा अभ्यासात उपयोग करा. हे पुस्तक त्याचा आत्मविश्वास उभारू शकते. राज्य संदेशाची घोषणा करण्यास पुढाकार घेण्याचे अधिक वाढवू शकते.
६ सभांच्या महत्त्वावर जोर द्या: मंडळीच्या सभा, खासकरून सेवा सभा व ईश्वरशासित सेवा प्रशाला, आम्हाला क्षेत्र सेवेसाठी तयार करण्यास बनवल्या आहेत. अनुभवी व कुशल असणाऱ्यांकडून, प्रभावकारी साक्षकार्याच्या सर्व मूलभूत गोष्टींची उजळणी केली जाते व त्यांना प्रदर्शित केले जाते. सभांच्या महत्त्वावर जोर द्या. त्यास उपस्थित राहण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला जमेल ते करा. नियमित उपस्थितीमुळे, येशूचा खरा शिष्य होण्यास आवश्यक असणारे उत्तेजन ते पुरवू शकते.
७ तुमच्या स्वतःच्या उदाहरणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. प्रचार कार्यात तुमची स्वेच्छा आणि नियमितपणा याद्वारे सत्याबद्दल तुमची गुणग्राहकता प्रदर्शित होते. अशा मार्गक्रमणामुळे तुमच्या विद्यार्थ्याला त्याचा विश्वास प्रदर्शित करण्यात अधिक करण्यास उत्तेजन देते. (लूक ६:४०) या सर्वामुळे एखाद्या नवीन व्यक्तीला त्याची सेवा ही एक सुसंधी आहे या दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करील. तसेच त्यात सहभाग घेण्यास मिळाल्याबद्दल, कृतज्ञता व्यक्त करण्यास साहाय्य करील.—१ तीम. १:१२.