लोकांना अंधारातून उजेडात आणा
१ पृथ्वीला आध्यात्मिक काळोख आच्छादून आहे. (यशया ६०:२) मानवजातीचे पापात पतन घडल्यापासून “या युगाचा देव” सैतान याने लोकांना आध्यात्मिक काळोखात ठेवले आहे व यामुळे नैतिक अधःपतन होण्याचा परिणाम घडला गेला.—२ करिंथ. ४:४.
२ आपण सध्या सत्याने प्रज्वलित झालो आहोत तर मग, येशूला वाटत होता तसा आपल्याला लोकांचा कळवळा वाटतो का? (मत्तय ९:३६) जर होय, तर त्याने प्रेषित पौलाला ‘लोकांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे म्हणून त्याने त्यांचे डोळे उघडावे’ अशी जी नेमणूक दिली होती त्याची अर्थसूचकता आपल्याला नक्कीच समजू शकेल.—प्रे. कृत्ये २६:१६-१८.
प्रज्वलित झालेली मने व अंतःकरणे
३ वस्तुतः सैतान लोकांची मने अंधळी करतो व त्यांची अंतःकरणे कठीण करतो तर मग, आपण काय करू शकतो? आपल्याला लोकांची मने व अंतःकरणे यांजकडे देवाच्या वचनाकरवी जाता येईल. पौलाने प्रार्थिले की, इफिसकरांचे ज्ञानचक्षु प्रकाशित व्हावे. (इफिस. १:१७, १८) अंतःकरणाप्रत पोहोचण्यासाठी देवाच्या वचनाशिवाय दुसरे अधिक प्रभावी माध्यम नाही. (इब्री. ४:१२) हे जाणले तर लोकांशी बोलणी करताना आपल्याला पवित्र शास्त्राचा चातुर्यपूर्ण उपयोग करण्याची चालना मिळाली पाहिजे.
४ पुढील प्रश्नांना जी उत्तरे तुम्ही द्याल ती तुम्हाला तुमच्या सेवकपणात अधिक प्रभावी होण्याची मदत देतील. तुम्ही क्षेत्रकार्यासाठी चांगली तयारी करीत आहात का? घरमालकाचे लक्ष वेधून घेता येईल अशा संभाषणाशी परिचित होण्यासाठी तुम्ही तालीम करीत आहात का? अद्ययावत संभाषणाचा विषय शिकून घेण्याची तुम्ही सवय लावली आहे का? घरमालकासोबत बोलताना तुम्ही शास्त्रवचनावर पटणारी चर्चा करण्याचा प्रयत्न करता का?—प्रे. कृत्ये १७:२.
टेहळणी बुरुज एक साहाय्यक
५ टेहळणी बुरुज मासिकाने पुष्कळांना अंधःकारातून उजेडात येण्याची मदत दिली आहे. हे मासिक पवित्र शास्त्रातील नैतिक तत्त्वांचा कसा अवलंब करावा, आमच्या काळातील भविष्यवादांची कशी समज प्राप्त करावी, आणि यहोवा ज्या मार्गास संमती देतो त्याने चालण्यासाठी खरा व खोटा धर्म यातील भेद कसा समजून घ्यावा याविषयीची माहिती देते.
६ टेहळणी बुरुज मासिकाने पवित्र शास्त्रीय सत्याचा जो पुरस्कार केला त्यामुळे काय घडले? देव व त्याचा पुत्र याविषयीच्या अचूक ज्ञानामुळे आज सर्व प्रकारच्या लोकांना तारण मिळविण्यात मदत दिली जात आहे. (योहान १७:३; १ तीमथ्य २:४) एका वाचकाने लिहिलेः ‘टेहळणी बुरुज मला किती आवडतो! त्यात प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमुळे सर्वांनी, आपण कोणत्या समयात व ऋतुत आहोत ते समजून घेतले पाहिजे. टेहळणी बुरुज यात लेख प्रसिद्ध करण्यासाठी जे प्रचंड संशोधन, जी तयारी व काम केले जाते त्याविषयी मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. ते खरेच आध्यात्मिक अन्न आहे.’
विवेकी दृष्टी वापरा
७ आमच्या टेहळणी बुरुज मासिकाच्या वार्षिक वर्गणी मोहिमेच्या दुसऱ्या महिन्यात आम्ही लोकांना अंधारातून उजेडाकडे आणण्याची संधि हेरत राहिले पाहिजे. आम्ही घरोघरी लोकांना भेटल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या पवित्र शास्त्र चर्चेद्वारे हे साध्य होते. लोकांनी राज्य संदेशाविषयी अस्सल आस्था बाळगावी ही आमची इच्छा आहे. याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्यांना टेहळणी बुरुजची एका वर्षाची वर्गणी सादर करणे हा होय. कोणी वर्गणी करण्याचे इच्छित नाही, पण आपल्या मासिकांना स्वीकारतो तर अशांना तुम्ही आपल्या मासिक फेऱ्यात समाविष्ट करू शकता. काही काळातच त्यांच्या ठायी, हे मासिक टपालाद्वारे आपल्या घरी येत राहावे ही जिज्ञासा उत्पन्न होऊ शकेल. जेथे वर्गण्या घेतल्या जातात त्यांची चांगली नोंद आपणाकडे ठेवा, त्यांची परत भेट घ्या आणि ती वर्गणी संपण्याच्या बेतात आली असताना तिचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न करा.
८ आम्ही घरोघरचे कार्य करीत असता, रस्त्यावरील साक्षीकार्य करीत असता किंवा आपल्या सहकर्मचाऱ्यास, शाळकरी मित्रास वा नातेवाईकांना साक्ष देताना त्यांच्यासोबत अशा सत्याची सहभागिता करीत असतो ज्यामुळे त्यांची मुक्तता होऊ शकते. (योहान ८:३२) टेहळणी बुरुज हे असे खास साधन आहे जे त्यांना मुक्त होण्यात त्यांची मदत करू शकते, त्यांना चिरकालिक जीवनाची आशा देऊ शकते व अंधःकारापासून उजेडात आणू शकते.