विश्वासास आव्हान देणाऱ्या वैद्यकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही तयारीत आहात का?
ही माहिती अशा ठिकाणी ठेवा की ती गरज भासेल तेव्हा तुम्हाला चटकन मिळू शकेल
१ आज किंवा उद्या आपल्याला इस्पितळात जाण्याची शक्यता उद्भवेल असा सहसा कोणी विचार करीत नाही. तरीही, ‘काळ व अनपेक्षित प्रसंग आम्हा सर्वांवर येतात.’ (उप. ९:११) कदाचित तुम्ही आपल्या आरोग्यास्तव नियमित उपचारासाठी कोणा वैद्यकीय संघटनेचे सभासद नसाल, पण जेव्हा अचानकपणे तुमचा अपघात होतो व बेशुद्धावस्थेत असताना तुम्हाला इस्पितळात आणले जाते आणि रक्त संक्रमित करण्याचा प्रसंग येतो अशावेळी आपले संरक्षण होण्यासाठी तुम्ही काय करू शकता? होय, एखादा अपघात किंवा अचानक ढासळणारे आरोग्य हे तुम्हाला तुमच्या विश्वासास आव्हान देणाऱ्या परिक्षांना उभे करते.
२ तुम्ही इस्पितळात असल्याचे तुम्हाला दिसले व आता तेथे कोणी तुम्हाला म्हटले की, जर रक्त संक्रमण स्वीकारले नाही तर तुम्ही मराल, त्यावेळी तुम्ही आपली सचोटी राखण्यासाठी काय कराल? अशावेळी तुम्ही अगदी घाईने हा निर्णय घ्याल का की, परिस्थिती तशी मागणी करीत आहे तर मग नमते घेण्यास काही हरकत नाही? किंवा रक्त मुळीच न घ्यावे ही तुमची पूर्णपणे खात्री आहे? तुमच्या विश्वासाचे हे जे आव्हान तुम्हापुढे उभे राहिले आहे त्याला तोंड देण्याची व ‘रक्तापासून दूर राहण्याची’ तुमची तयारी आहे का?—प्रे. कृत्ये १५:२८, २९.
३ नको असलेले तसेच आध्यात्मिक दृष्ट्या अशुद्ध करणारे रक्त संक्रमण नाकारण्यासाठी दृढ निर्धार जरुरीचा आहे. हा निर्धार पवित्र शास्त्र रक्ताविषयी जे म्हणते त्याच्या स्पष्ट समजावणूकीवर आधारलेला असण्यास हवा. नाहीतर, तुम्ही भावनावश होऊन, तुम्हापेक्षा दुसऱ्याला परिस्थितीची चांगली जाणीव आहे असे वाटून तुम्ही सहजपणे भीतीच्या आहारी जाल. तेव्हा रक्ताच्या बाबतीत देवापेक्षा डॉक्टरांना अधिक चांगली माहिती आहे असा चुकीने विचार करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त व्हाल का? अशा परिस्थितीत असताना तुम्ही, लोकांनी काहीही म्हटले तरी यहोवाच्या दृष्टीने “जे यथार्थ आहे ते” करण्याचा ‘पूर्ण निश्चय’ राखण्याची इच्छा धरली पाहिजे. (अनु. १२:२३-२५) पण या आव्हानाला तुम्ही एकट्यानेच तोंड दिले पाहिजे असे आहे का?—उप. ४:९-१२.
इस्पितळाचे माहिती केंद्र आणि इस्पितळाच्या सल्लागार समित्या
४ रक्त संक्रमणाच्या तोंड देणाऱ्या कोणाला मदतीची गरज असल्यास त्यासाठी संस्थेने ब्रुकलिने येथे इस्पितळाचे माहिती केंद्र स्थापलेले आहे. याचप्रमाणे संस्थेने अमेरिकेतील प्रमुख शहरी १०० इस्पितळाच्या सल्लागार समित्या स्थापलेल्या आहेत. या समित्यामध्ये या खास कामासाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या ६०० वडीलांचा भरणा आहे.
५ इस्पितळाचे माहिती केंद्र हे जगभरातील ३,६०० नियतकालिकांचा परामर्श घेते आणि रक्तविनाच्या शस्त्रक्रिया व उपचाराचे कोणकोणते प्रकार व प्रभावी मार्ग उपलब्ध आहेत ते शोधून काढते. मग, ही माहिती हे केंद्र इस्पितळाच्या सल्लागार समित्या, आरोग्य सेवा केंद्र, आणि काही डॉक्टरांना या वैद्यकीय प्रगतीची माहिती कळविते. (काही वेळेला इस्पितळाच्या माहिती केंद्राने रक्ताशिवाय काय केले जाऊ शकते त्याचे वैद्यकीय लेख इस्पितळात पाठविले की, ज्यामुळे तेथील वादविवाद संपुष्टात आणला.) ते समित्यांना आपल्या वतीने लागलेले कोर्टाचे निकाल पाठविते, जे न्यायाधिशांना आपल्या काही केसेस अधिक अंतर्दृष्टीने हाताळण्यास साहाय्य देते. याशिवाय हे केंद्र ७,००० पेक्षा अधिक सहकारी वैद्यांची यादी ठेवते की ज्यामुळे समित्यांना अद्ययावत माहिती हाती राहते, जी कदाचित रक्त संक्रमणाची समस्या सामोरी आलीच तर उपयोगी ठरते.
६ इस्पितळाचे माहिती केंद्र इस्पितळाच्या सल्लागार समित्यांचे प्रशिक्षण तसेच कामकाज यावर देखरेख ठेवते. ज्या शहरात या समित्या आहेत त्या नियमितपणे इस्पितळातील अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध, त्यांना माहितीयुक्त साहित्य देऊन अद्ययावत ठेवतात. याशिवाय ते या अधिकाऱ्यांत कोणी अधिक डॉक्टर्स आले असल्यास त्यापैकीचे कोण रक्त न वापरता इलाज करू शकतील त्याचा परामर्श घेतात. हे बांधव तुम्हाला मदत देण्यास तयार आहेत, पण यासाठी अगाऊ अशी काही खडतर पावले तुम्ही उचलली पाहिजेत, म्हणजे या बांधवांना आपली सेवा परिणामकारक रितीने देता येण्यासाठी आधारभूत पाया मिळू शकेल.
आगाऊ अशी खडतर पावले—तुम्ही ती घेतली का?
७ पहिल्या प्रथम ही खात्री करून घ्या की, तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाने त्याचे मेडिकल डिरेक्टीव्ह डॉक्युमेंट संपूर्णपणे भरले आहे—तारीख, सही व आणि साक्षीदारांच्या सह्या. काही बांधव इस्पितळात आले तेव्हा त्यांच्या या ऐवजावर तारीख आणि/किंवा साक्षीदारांच्या सह्या नव्हत्या, त्यामुळे ते चालू आहे की नाही याविषयीचे आव्हान प्रस्तुत झाले. तसेच दुसरी गोष्ट, आमच्या घरातील बाप्तिस्मा न झालेल्या सर्व मुलांनी आपले ओळखपत्र दर्शविणारे कार्ड भरले आहे का? नसल्यास, तुमच्या मुलास तातडीने इस्पितळात भरती करावे लागल्यास इस्पितळातील अधिकाऱ्यांना तुमची रक्ताविषयीची काय भूमिका आहे व कोणाचा संपर्क ठेवावा हे कसे कळणार?
८ यानंतर याकडे लक्ष द्या की, हे दस्तऐवज सर्वजण आपणापाशी सर्वदा बाळगीत आहेत. मुले शाळेत जाण्याआधी दरदिवशी याची तपासणी करा, होय, बाहेर खेळायला जाताना किंवा कोठे करमणूकीच्या कार्यक्रमाला जाताना सुद्धा ते तपासून पहा. आम्ही सर्वांनी ही खात्री ठेवावी की, हे दस्तऐवज आम्ही कामाला जाताना, सुटीवर असताना किंवा कोठे ख्रिस्ती अधिवेशनाला जाताना आम्हासोबत आहेत. त्यांचेशिवाय राहू नका!
९ आता समजा की, तुम्हाला गंभीर स्थितीत तातडीने इस्पितळात आणले आहे. तुम्ही बेशुद्धावस्थेत आहात आणि/किंवा तुम्हाला बोलता येत नाही. आता तुमच्यापाशी तो रक्ताविषयीचा दस्तऐवज नसला, तसेच तुमचे कोणी घरचे सोबत नाही आणि तुमच्या वतीने बोलण्यासाठी कोणी वडील देखील नाही तर अशावेळी हे गृहीत धरले जाऊ शकते की, तुम्हाला ‘रक्ताची गरज आहे’ व मग, तुम्हात रक्त संक्रमित होऊ शकते. हे खेदाने सांगावे लागते की, अशी काही प्रकरणे घडली आहेत. पण जेव्हा तो दस्तऐवज आम्हापाशी असतो, तेव्हा तो आमच्या वतीने बोलत असतो व आमची इच्छा काय आहे ते डॉक्टरांना सांगत असतो.
१० यासाठीच, वैद्यकीय पट्टा किंवा हार यापेक्षा लिखित वैद्यकीय दस्तऐवज बरा. कारण तो पट्टा वा हार आमच्या भूमिकेचे पवित्र शास्त्राधारित कारण काय आहे ते सांगत नाही व तसेच त्यावर दुजोरा देण्यासाठी सही ही नसतेच. कॅनडातील एका कोर्टाने आमच्या एका भगिनीच्या त्या दस्ताऐवजाविषयी असे म्हटलेः “[रुग्णाने] या शक्य असणाऱ्या ऐवजाकरवी डॉक्टरांना तसेच इतर आरोग्य सेवा केंद्रांना हे कळविले आहे की, तिला बेशुद्धावस्था आली किंवा आपली काय इच्छा आहे ते कळविणे अशक्य झाले तर या दस्तऐवजाकरवी ती कळवू इच्छिते की, तिची रक्त संक्रमण स्वीकारण्याची इच्छा नाही.” तेव्हा त्याशिवाय कधीही राहू नका!
११ आमचे मेडिकल डिरेक्टीव्ह हा दस्तऐवज खासपणे तातडीच्या स्थितीसाठी अनुलक्षून असल्यामुळे तुम्हाला शस्त्रक्रियेच्या बाबतीत (आपल्या मेडिकल डिरेक्टीव्ह दस्तऐवजावर आधारीत असा) तुमच्या स्वतःचा पूर्ण रुपाचा ऐवज तयार करता येईल ज्यात सर्व गोष्टीचा खुलासा, जसे की, शस्त्रक्रियेचा प्रकार, डॉक्टरांचे व इस्पितळाचे नाव नमूद करू शकता. हे करण्याचा तुमचा हक्क आहे व याकरवी तुम्हाला पसंत वाटणारा इलाज करून घेता येईल. कदाचित तुम्हाला व तुमच्या डॉक्टरांना गंभीर समस्या वाटत नसली तरी त्यांना याचे स्पष्टीकरण द्या की, हा ऐवज अनपेक्षित अशी घटना घडू लागताच त्याचा वापर व्हावा.—नीती. २२:३.
१२ यानंतरचे पुढचे पाऊल म्हणजे ज्यांचा इलाजाशी संपर्क येणार त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आधीच तुम्ही घेणाऱ्या किंवा तातडीच्या इलाजाविषयी बोलावे. पण, याबाबतीत तुम्ही कोणाशी बोलावे?
वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोला
१३ वैद्यकीय गटः ही अशी वेळ असते जेथे मनुष्याची भीती पाशरुप होण्यास नको. (नीती. २९:२५) तुम्ही बोलताना खात्रीने बोलला नाही तर मग, तुम्ही तितके प्रांजळ नाही असे अनुमान निघेल. जेव्हा शस्त्रक्रिया, मग ती निवडक किंवा तातडीची असो, तुम्ही वा तुमच्या जवळच्या कौटुंबिक सदस्याने त्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या गटात जे प्रमुख आहेत त्यांना सूक्ष्म प्रश्न विचारले पाहिजेत. एक महत्त्वाचा प्रश्न हा की, शस्त्रक्रिया करणारा गट रुग्णाच्या इच्छेचा आदर करील का व सर्व परिस्थितीत रक्ताविना इलाज करील का? याची हमी मिळाल्याशिवाय तुम्हाला सुरक्षेचे वाटणार नाही.
१४ तुमच्या काय इच्छा आहेत ते साधेपणात पण दृढतेने सांगा. हे स्पष्ट करा की, तुमच्या आजाराच्या बाबतीत तुम्हाला पर्यायी असा रक्तहीन वैद्यकीय इलाज मान्य आहे. तुम्ही स्वतः अगाऊ तयार केलेला वैद्यकीय दस्तऐवज तसेच इस्पितळाला त्याच्या जबाबदारीपासून मुक्त करण्याचा अर्ज याविषयी शांतपणे व आत्मविश्वासाने बोलणी करा. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना तुमच्या इच्छेनुसार काम करण्याचे पसंत पडले नाही तर मग, इस्पितळाच्या व्यवस्थापकाला तुमच्यासाठी दुसरा कोणी डॉक्टर बघण्यास सांगून तुम्हाला आपला वेळ वाचविता येईल. दुसरा डॉक्टर बघणे हे त्या व्यवस्थापकाचे काम आहे.
१५ भूल देणारा (अनेस्थेसीऑलॉजिस्ट): शस्त्रक्रियेच्या आधी ज्या वैद्यकीय गटाशी तुम्ही बोलणी करण्यास हवी त्यामध्ये या डॉक्टरांशी बोलण्याची कधीही कुचराई करू नका. शस्त्रक्रिया चालू असताना तुम्हास जिवंत ठेवावे ही जबाबदारी असल्यामुळे हे अनेस्थेसीऑलॉजिस्ट यांना रक्ताच्या वापराविषयीचा निर्णय घ्यावा लागत असतो. या कारणास्तव नुसत्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांशी बोलणे उपयोगी नाही. तेव्हा तुमची भूमिका काय आहे, मग ती मान्य होवो वा न होवो, ते अनेस्थेसीऑलॉजिस्ट सोबत बोलून त्यांना खात्री करून दिली पाहिजे.—पडताळा लूक १८:३-५.
१६ तुम्ही रक्ताविषयी घेतलेल्या भूमिकेसंबंधाने जर अनेस्थेसीऑलॉजिस्ट मान्य होत नसेल तर त्याने शस्त्रक्रियेच्या रात्री उशीरा नव्हे तर आधी रुग्णाबरोबर बोलावे हा प्रघात आहे. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी तुम्हाला सहकार्य देणाऱ्या अनेस्थेसीऑलॉजिस्टची आधी निवड करून द्यावी हे त्यांना आर्जवून सांगा, म्हणजे ठरविलेल्या शस्त्रक्रियेच्या बऱ्याच आधी तुम्हाला त्यांच्याशी बोलता येईल. यामुळे जर त्यांनी तुमच्या इच्छेशी सहमत दर्शविले नाही तर दुसऱ्याच्या शोध घेता येईल. तुमच्या शस्त्रक्रियेच्या संदर्भात अनेस्थेसीऑलॉजिस्ट बरोबर बोलण्यासाठी इतर कोणाला प्रयत्न करू देऊ नका; हा तुमचा हक्क आहे.
१७ या सर्वांना तुम्ही तुमची न बदलणारी भूमिका स्पष्ट करा व ती आहेः रक्त नको. तुमच्या प्रकरणाच्या अनुषंगाने पर्यायी रक्तहीन वैद्यकीय इलाजाविषयी विचारणा करा. हा पर्याय तुमच्या बाबतीत लागू होत नाही असे वैद्यकीय गटाचे म्हणणे असल्यास त्यांना वैद्यकीय साहित्यातून इतर शक्यता शोधण्यास सांगा. त्यांना आणखी माहिती हवी असल्यास ती तुम्ही तुमच्या वडीलांना लोणावळा शाखा दप्तरातील वैद्यकीय माहिती केंद्रामार्फत गोळा करण्यास लावून मिळवू शकता हे त्यांना सांगा.
आपला हक्क बजावणे
१८ इस्पितळात प्रवेश घेतल्यावर व्यवस्थापन तुम्हाला ज्या कागदपत्र, अर्जावर सह्या करण्यास सांगते ते काळजीपूर्वक तपासा. यात जबाबदारीपासून मुक्तता तसेच मान्यता कळविणे हे फॉर्म असतात. या फॉर्मवर प्रथमतः रुग्णाच्या इच्छेचा आदर करण्यात येईल असे म्हटलेले असते पण पुढच्या परिच्छेदात असेही म्हटले असते की, जर गुंतागुंत सामोरी आली तर इस्पितळाने “जीवन वाचविणारा” इलाज करावा असे खाली सही करणारा कबूल करतो. यात रक्ताचा समावेश असू शकतो. अशावेळी अनावश्यक विधाने, जशी की, रक्त द्यावे किंवा तशा आशयाचे संपूर्ण वाक्य खोडून टाकण्याचा तुमचा अधिकार आहे. परिचारिका म्हणतील की, तुम्हाला ते करता येणार नाही, पण ते करता येईल! यासाठी त्यांना स्पष्टीकरण द्या की यावर सही करणे हे एका कराराप्रमाणे आहे, आणि ज्याच्याशी आपले सहमत नाही अशा करारावर तुम्हाला सही देता येणार नाही. कोणी तुम्हाला सही करण्याची जबरदस्ती केली तर तुम्हाला त्या आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक आणि/किंवा तेथे रुग्णांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी बोलायचे आहे असे त्यांना सांगा.
१९ हे तुम्हाला करता येईल का? होय, नक्कीच. या कारणास्तव, रुग्ण या अर्थाने आपल्या हक्काविषयी जागृत असा. हे मानवी हक्क तुम्ही जेव्हा इस्पितळात प्रवेश करता तेव्हा डॉक्टरांपुढे लय पावत नाहीत. इलाजाखातर तुम्ही त्यांच्यावर पाणी सोडण्याची जरुरी नाही. काय करावे हे दुसऱ्या कोणाला तुम्हाला सांगायला लावू नका.
२० यापैकीचा एक हक्क आहे, मान्यता कळविण्याचा हक्क. याचा अर्थ हा होतो की, तुमच्या अनुमतीशिवाय कसलाही इलाज केला जाणार नाही. तुमची इच्छा आहे तर सगळा इलाज नाकारू शकता. तुम्ही इलाजासाठी जी मान्यता कळवता त्यामागे वैद्यकीय गट काय करण्याची इच्छा दर्शवून आहे व त्यात कोणत्या जोखीमा आहेत याविषयीचे स्पष्ट स्पष्टीकरण दिलेले असावे. आणखी, त्या गटाने तुम्हाला उपलब्ध असणारा पर्यायही कळविला पाहिजे. तुम्हाला ही सर्व माहिती मिळाल्यावर मग कोणत्या प्रकारचा इलाज अनुसरायचा आहे ते तुम्ही निवडावे.
२१ आपण कशाविषयी मान्यता दाखविणार आहोत याची खात्री करून घेण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हास समजल्या नसतील, इस्पितळ अधिकाऱ्यांमार्फत वापरल्या जाणाऱ्या संज्ञा वा मोठमोठे शब्द, त्याविषयी तुम्ही योग्य प्रश्न विचारले पाहिजे. उदाहरणार्थ, डॉक्टरांनी म्हटले की, ते “प्लाझ्मा”चा वापर करतील तेव्हा तुम्हाला ते “प्लाझ्मा व्हॉल्यूम एक्स्पांडर” विषयी बोलत आहेत अशी तुमची धारणा होणे सहाजिक आहे. पण ते तसे नसते. यावर सहमत कळवण्याआधी विचाराः “त्यात रक्ताचा घटक आहे का?” डॉक्टरांच्या कसल्याही उपचारपद्धतीविषयी हे विचारू शकताः “यात रक्ताच्या उत्पादनाचा वापर करण्याचा संबंध आहे का?” ते ज्या हाताळणीची पद्धत वापरणार असे सांगतील तेव्हा हे विचाराः “या हाताळणीमध्ये माझे रक्त कोठे साठवून ठेवले जाईल का?”
२२ तुम्ही एवढे सर्व करूनही तुम्हाला आवश्यक असणारे सहकार्य मिळत नाही किंवा तुमच्या भूमिकेला विरोध होत आहे तर तुम्ही काय करावे? मदतीची विचारणा करण्यास हेळसांड करू नका. काहींनी मदत मिळावी म्हणून दीर्घकाळ घालविला पण याकरवी त्यांनी आपले जीवन धोक्यात आणले.
गरजेच्या वेळी महत्त्वपूर्ण मदत
२३ आवश्यक मदत मिळविण्यासाठी पुढील पद्धत लक्षात घ्याः (१) तुम्ही किंवा तुमच्या प्रियजनांना एकतर निवडलेली वा तातडीची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले जाते तेव्हा तेथे पुढील कारणामुळे सामना होणार असतो; तुम्ही रक्त घ्यावे अशी इस्पितळाची इच्छा असते; किंवा (२) तुमची किंवा तुमच्या प्रियजनांची स्थिती एकदमच चिंताजनक होते; किंवा (३) मूल (किंवा प्रौढ) याच्या बाबतीत डॉक्टर, परिचारिका किंवा व्यवस्थापक म्हणतात की, ते कोर्टाकडून लेखी मान्यता आणणार. अशावेळीः
२४ तुम्ही आधी केले नसल्यास तुमच्या स्थानिक वडीलांना बोलवा. (खरे म्हणजे आम्ही रक्ताविषयी जी भूमिका ग्रहण करून आहोत ती बघता, इस्पितळात जाण्याचा प्रसंग येताच आमच्या वडीलवर्गाला जागृत करणे हे सूज्ञपणाचे आहे.) पुढे, गरज आहे तर हे वडील लोणावळा येथील शाखा दप्तरी असलेल्या इस्पितळ माहिती केंद्राचा संपर्क करतील.—यशया ३२:१, २.
२५ इस्पितळ माहिती केंद्रास तुमच्या विभागात सहकार्य देणाऱ्या डॉक्टरांची माहिती असेल; किंवा जवळपासच्या एखाद्या सहकार्य देणाऱ्या डॉक्टरांचा ते संपर्क घालून देऊ शकतील. शिवाय ते केंद्र पर्यायी अशा रक्तहीन वैद्यकीय इलाजाची माहिती देतील जी उपलब्ध केली जाण्यास हवी. अर्थात, हे बांधव तुम्हासाठी निर्णय घेऊ शकणार नाहीत, पण एकंदर प्रकरणाविषयी संस्थेचा दृष्टीकोण कसा आहे तसेच तुमचे मत तुम्ही वैद्यकीय तसेच कायदेशीरपणे कसे बदलू शकता याविषयीचा विचार करण्यात ते मदत देऊ शकतील.
२६ अद्याप वैद्यकीय गटाने सहकार्य देण्याचा नकार दर्शविला तर मग इस्पितळाच्या व्यवस्थापकाला त्यांच्यापाशी असणारा दुसऱ्या कर्मचारी गटाला, जो तुमच्या इच्छेचा आदर करू शकेल त्याला पाचारण करण्यासाठी सांगावे. जर व्यवस्थापक ते करायला राजी नसेल आणि तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी कोणी शस्त्रक्रिया करणारा निश्चितपणे माहीत आहे आणि तुम्हाला स्थलांतरीत होता येऊ शकते तरच तुम्ही व्यवस्थापकाला असहकारी डॉक्टर्स हे कारण दाखवून व तुमची केस त्यांच्याकडून काढून घेत आहोत असे लेखी व तारीख नमूद केलेले व सही केलेले निवेदन देता येईल.
२७ तुम्हाला असे करता येते का? होय, तो तुमचा हक्क आहे. आणि हे प्रकरण जर न्यायप्रविष्ट झाले तर मग तुमचे लेखी निवेदन न्यायाधिशांना तुमची इच्छा काय आहे ते दीर्घकाळ सांगत राहील. यामुळे नैतिकदृष्ट्या दुसरा कोणी शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर सामोरा येऊन तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला सेवा देण्याचे कबूल करील ही शक्यता घडू शकेल. आणि महत्त्वाचे ते हे की, तुमची स्थिती अधिक धोकादायक होण्याआधीच आवश्यक असणारा इलाज तुम्हाला मिळणे सुरु होईल. तेव्हा अधिक काळ थांबून राहू नका!
२८ आरोग्य विमा घ्यावा असे आम्हाला सांगता येत नसले तरी एक गोष्ट मात्र आम्ही कळवू इच्छितो की, ज्यांच्यापाशी वैद्यकीय इलाजासाठी पुरेसे आर्थिक संरक्षण नाही, जे विमा पॉलीसीमुळे दिले जाते, अशांसाठी सहसा सहकार्य देणारे डॉक्टर मिळवणे कठीण जाते.
ज्याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रश्न
२९ तुम्हाला याची जाणीव असण्यास हवी की, डॉक्टर्स तसेच इतर असे काही प्रश्न विचारीत असतात जे चांगल्या हेतूचे नसतात. जो बहुधा डॉक्टर्स (आणि काही न्यायधीश) विचारतात तो हा प्रश्न आहेः
• “हे ‘जीवनदायक रक्तसंक्रमण’ स्वीकारण्यापेक्षा तुम्हाला मरणे (किंवा तुमच्या मुलाला मरु देणे) आवडेल का?”
३० तुम्ही होय, म्हणालात तर ते धार्मिक अर्थाने बरोबरचे उत्तर आहे; पण त्याविषयी सहसा गैरसमजूत होऊन कधीकधी प्रतिकूल न्याय मिळतो. या खेपेला तुम्ही आपल्या उपाध्यपणात नसता हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. उलटपक्षी, योग्य तो वैद्यकीय इलाजाच्या अनुषंगाने आपले म्हणणे मांडीत असता. यासाठीच तुम्हाला आता तुमच्या वैद्यकीय किंवा कायदेशीर प्रतिवाद्यानुरुप जुळवून घेण्यास हवे.—स्तोत्र. ३९:१; कलस्सै. ४:५, ६.
३१ डॉक्टर, न्यायाधीश किंवा इस्पितळ व्यवस्थापकाला तुमच्या “होय” म्हणण्याचा अर्थ, तुम्ही हुतात्मिक होऊ इच्छिता किंवा तुमच्या मुलाचा आपल्या विश्वासाखातर बळी देता असा होऊ शकतो. तुम्हाला पुनरुत्थानाविषयी केवढा विश्वास आहे ते सांगणे या परिस्थितीत उपयुक्त ठरणार नाही. ते म्हणतील की, जीवन इतके पणाला लागले आहे तरी तुम्हाला सारासार निर्णय घेता येत नाही, तुम्ही धर्मवेडे आहात. तुमच्या मुलाच्या प्रकरणात ते तुम्हाला, “जीवनप्रदायक” वैद्यकीय इलाज नाकारणारे निष्काळजी पालक असे गृहीत धरतील.
३२ पण वस्तुतः तुम्ही वैद्यकीय इलाजाचा नकार करणारे नाहीत. तर कोणत्या प्रकारचा इलाज केला जावा याविषयी तुमचे डॉक्टरांशी दुमत आहे. तुमची भूमिका तुम्हासाठी व त्यांच्यासाठी एकंदर स्वरुप सहसा बदलवील. शिवाय, रक्त हे सुरक्षित आहे व तेच केवळ “जीवनप्रदायक” इलाज आहे हे भासविणे त्यांना चुकीची दिशा दाखवते. (पहा हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ? पृष्ठे ७-२२.) यासाठी तुम्ही आपला मुद्दा स्पष्टरित्या मांडला पाहिजे. हे तुम्हाला कसे करता येईल? तुम्ही म्हणू शकालः
• “मला (किंवा माझा मुलगा) मरण्याची इच्छा नाही. मला (किंवा माझ्या मुलाच्या बाबतीत) ती इच्छा असती तर मी घरीच राहिलो असतो. पण मला (किंवा माझ्या मुलाला) जगता यावे यासाठी येथे वैद्यकीय इलाजाखातर आलो. मला, माझ्या (किंवा माझ्या मुलाच्या) केसच्या अनुषंगाने मला पर्यायी असा रक्तहीन वैद्यकीय इलाज हवा आहे. पर्यायी औषधे उपलब्ध आहेत.”
३३ डॉक्टर्स किंवा न्यायाधीश यांजमार्फत आणखी काही असे प्रश्न विचारले जातातः
• “न्यायालयाच्या आदेशाने तुम्हामध्ये रक्त संक्रमित केले गेले तर काय होईल? तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल का?”
• “संक्रमण स्वीकारले वा जबरदस्तीने घेतले तर तुम्हाला तुमच्या धर्मातून बाहेर घालवतील का? किंवा तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही? तुमच्या मंडळीतील लोक तुम्हाकडे कसे बघतील?”
३४ याचे उत्तर देताना एक भगिनी न्यायाधिशाला म्हणाली की, ते जे ठरवतील त्याविषयी ती जबाबदार राहणार नाही. हे एका दृष्टीने बरोबर असले तरी, न्यायाधिशांनी त्याचा हा अर्थ घेतला की, जर तिला जबाबदार धरले जाणार नाही तर मग तिच्यासाठी ते जबाबदार राहतील. या कारणामुळे तिला संक्रमण द्यावे असा आदेश त्यांनी दिला.
३५ तुम्हाला याची जाणीव ठेवली पाहिजे की, हे प्रश्न विचारुन ते लोक, तुम्ही रक्त नाकारण्याविषयी जे म्हणता त्यामधून काही मार्ग मिळतो का हे सहसा बघत असतात. यासाठी आपल्या वक्तव्याद्वारे त्यांना वाट मोकळी करू नका! मग, आम्हाला ती गैरसमजूत करण्याचे कसे टाळता येईल? तुम्हाला असे म्हणता येईलः
• “मजमध्ये कोणत्याही मार्गी जबरदस्तीने रक्त भरण्यात आले तर ते जणू बलात्कार घडल्यासारखे असेल. या नको असलेल्या हल्ल्यामुळे माझ्या सबंध आयुष्यभर भावनिक तसेच आध्यात्मिक परिणाम होत राहणार. माझ्या शरीरावर माझ्या संमतीशिवाय हे जे अतिक्रमण केले जात आहे त्याविषयी मी माझ्या शक्तीनुसार प्रतिकार करीत राहीन. बलात्कार प्रकरणी जसे हल्लेखोरांवर खटले भरतात तशाच प्रकारे मी येथेही पिच्छा पुरवणार.”
३६ जबरदस्तीने देण्यात येणारे संक्रमण हे आमच्या शरीरांवर विपरीत रितीने आक्रमण आहे हे अगदी जोरदारपणे, वर्णनात्मक रितीने सांगितले गेले पाहिजे. ही किरकोळ बाब नव्हे. यासाठीच आपला पाया दृढ ठेवा. आपल्याला पर्यायी असे रक्तहीन वैद्यकीय इलाज हवेत हे स्पष्टपणे संगा.
तयारीसाठी तुम्ही काय कराल?
अनैच्छिक रक्तसंक्रमणापासून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे म्हणून काय करण्याची गरज आहे त्याविषयीच्या काही माहितीची आपण येथे उजळणी केली आहे. (काही काळात, बालके तसेच मुलांना संक्रमणाविषयी दहशत घातल्यामुळे उद्भवलेल्या समस्या हाताळण्याच्या बाबतीत अधिक माहिती देण्याची आशा करतो.) आम्हाला हेही दिसले की, गरजेच्या वेळी मदत मिळावी यासाठी संस्थेने केवढ्या प्रेमळपणे आपली मदत दिली आहे. तर मग, विश्वासास आव्हान देणाऱ्या वैद्यकीय परिस्थितीचा सामना खात्रीने करण्याच्या तयारीसाठी आता ही जी माहिती उपलब्ध करण्यात आली आहे तिचा वापर कसा करता येईल?
प्रथम: या माहितीची आपल्या कुटुंबात चर्चा करा व हे समजून घ्या की तातडीची गरज उद्भवल्यास काय करावे व काय बोलावे.
नंतर: आपणापाशी आवश्यक असणारे सर्व दस्तऐवज आहेत याची खात्री करून घ्या.
त्यानंतर: ‘रक्तापासून दूर राहा,’ हा आपला निर्णय पाळून चालण्यासाठी पाठबळ मिळावे यासाठी यहोवाकडे गंभीरतेने प्रार्थना करा. रक्ताविषयी त्याने दिलेल्या कायद्यांचे पालन आम्हाला त्याजकडून अनंतकाल जीवनासाठी त्याची मर्जी प्राप्त करून देईल.—प्रे. कृत्ये १५:२९; नीती. २७:११, १२.
[५ पानांवरील चौकट]
जेथे कोठे रुग्णाची परिस्थिती अगदी चिंताजनक होत आहे व असे भासवले जाते की, रक्तसंक्रमण जरुरीचे आहे त्यावेळी या तक्त्यातील माहिती, तुम्ही काय करावे त्यासाठी चाळावीः
१. तुमची मदत करण्यासाठी मंडळीच्या वडीलांना बोलवा.
२. वडीलांनी जरुर आहे तर लोणावळा शाखा दप्तरातील इस्पितळ माहिती केंद्राचा संपर्क साधावा.
३. वडील तुम्हाला डॉक्टर तसेच इतरांशी बोलणी करण्यामध्ये मदत करू शकतात.
४. वडील इतर डॉक्टरांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया हाती घेतलेल्या डॉक्टरांसोबत पर्यायी उपचाराविषयी बोलणी करण्यात तुमची मदत करू शकतात.
५. आवश्यकता आहे तर जरुरीच्या इलाजासाठी वडील अधिक आदरणीय व्यवस्था असणाऱ्या इस्पितळात स्थलांतरीत होण्यासाठी तुमची मदत करू शकतात.