तुमच्या उपाध्यपणात कुशल व्हा
१ प्रेषित पौलाने उपाध्यपणात कुशलता वाढविण्याचे प्रोत्साहन दिले. त्याने लिहिलेः “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.”—२ तीमथ्य २:१५.
२ उपाध्यपणात कुशलता संपादिली जाऊ शकते. यासाठीच आपल्याला “होईल तितके” केले पाहिजे, याचा अर्थ कुशल उपाध्याय व्हावयाचे आहे तर पराकाष्टा केली पाहिजे. पण यात काय आम्हाला मदत देणार?
देवाच्या वचनापासून शिका
३ शास्त्रवचनाचे आम्ही प्राप्त केलेले ज्ञान, उपाध्याय म्हणून आमच्या कुशलतेवर थेट परिणाम करणारे ठरते. पवित्र शास्त्र शिकविते त्या गोष्टींशी आम्ही जितके अधिक परिचित होऊ तितक्या अधिकपणे आम्हाला ‘सत्याचे वचन नीट हाताळता येईल.’ तेव्हा वैयक्तीक अभ्यासासाठी वेळ देणे हे महत्त्वपूर्ण आहे.—१ तीम. ४:१५, १६.
४ मंडळीच्या सभांमध्ये ज्या पवित्र शास्त्र आधारीत सूचना दिल्या जातात त्यांच्याकडे “आपण विशेष लक्ष” लाविल्यामुळे आम्ही देवाच्या वचनाशी परिचित होऊ शकतो. (इब्री. २:१) उपाध्यपणात उपयोगात आणण्याजोगे सुंदर बोलके मुद्दे जाहीर व्याख्यानात सादर केले जातात तसेच ते मंडळीच्या पुस्तक अभ्यासातूनही प्राप्त होऊ शकतात. ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा देखील आम्हाला प्रभावी वक्ते होण्यासाठी महत्त्वपूर्ण तालीम देते आणि सेवा सभेचा कार्यक्रम आम्हाला उपाध्याय या नात्याने पारंगत बनविण्यासाठी साहाय्यक सूचना व व्यावहारिक प्रात्यक्षिके सादर करतो. तरीपण, खऱ्या अर्थाने लाभ मिळविण्यासाठी आम्ही सभांची चांगली तयारी करुन त्यात क्रियाशीलपणे भाग घेतला पाहिजे.
सूचनांचे अवलंबन करा
५ पौलाने फिलिप्पै येथील मंडळीला म्हटले की त्यांनी त्याच्यापासून शिकून घेतलेल्या गोष्टी आचरणात आणाव्या. (फिलि. ४:९) आम्ही देखील यहोवाच्या संस्थेकडून शिकलेल्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, जुलै १५, १९८८ च्या द वॉचटावर मासिकात आम्हाला, जेथे सतत कार्य होत राहते त्या ठिकाणी “नवीन” कार्यक्षेत्रे कशी निर्माण करता येतात त्याविषयी शिकायला मिळाले. तेथे आमचा पवित्रा ताजा, अपीलकारक व सरळ असावा असे सांगण्यात आले व शिवाय घरमालकाने आमच्या पुन्हा भेटींची अपेक्षा धरावी अशी त्याच्या मनाची तयारी करण्याचे प्रोत्साहनही तेथे दिले गेले. जे लायक आहेत अशांचा कसून शोध घेण्याची, एकाच छपराखाली राहणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींची भेट घेण्याची सूचनाही मिळाली. या सूचनांचे अवलंबन केल्यामुळे आपण शिकलेल्या गोष्टी आचरीत राहतो व त्यामुळे उपाध्यपणातील आमची कुशलता वाढते.
६ आम्ही क्षेत्रकार्यात नियमितपणे रिझनिंग पुस्तकाचा वापर करतो का? सुचविलेल्या प्रस्तावनांचा वापर तसेच संभाषण थांबविणाऱ्या लोकांशी कसे बोलावे हे सदर आम्हाला आमची साक्ष देण्याची कुशलता प्रज्वलित करू शकते. याचप्रमाणे संभाषणाच्या विषयाची तयारी व तालीम व महिन्याची सादरता आपण ज्या पद्धतीने सादर करू ते उपाध्यपणातील आमचे यश वाढवीत राहील.
७ तुम्हाला उपाध्यपणात सुधारणा करण्याचे आणखी प्रस्ताव हवे असल्यास सेवा देखरेखे यांचा किंवा तुमच्या गटाच्या पुस्तक अभ्यास चालकांचा संपर्क साधून त्यांची मदत मिळवा. ‘सत्याचे वचन नीट सांगणारे’ उपाध्याय या नात्याने आम्ही सर्व आपली कुशलता वाढवू शकतो. लवकरच यहोवा देव या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करील. तोपर्यंत, शक्य आहे तितक्या अधिक लोकांना तारण मिळविण्यास मदत करावी व त्याद्वारे आमचा देव यहोवा याचे गौरव व्हावे हीच आमची अंतःकरणपूर्वक इच्छा असावी.—योहा. १५:८.