जीवन कथा
मौल्यवान आध्यात्मिक वारशामुळे प्रगती करण्यास मदत झाली
रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आमच्यासमोर नाइजर नदी वाहत होती. नदीचा प्रवाह जोरदार असून ती नदी १.६ की.मी. रुंद होती. आणि नाइजेरीयन मुलकी युद्ध सुरू असल्यामुळे नदी पार करून जाणं धोक्याचं होतं. तरीसुद्धा आम्हाला जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागली आणि आम्हाला हे एकदा नाही तर, अनेक वेळा करावं लागलं. पण मी अशा परिस्थितीत कशा प्रकारे आलो? हे जाणण्यासाठी मी जन्माला येण्याआधी काय घडलं ते पाहू या.
१९१३ या साली माझ्या बाबांचा बाप्तिस्मा झाला तेव्हा ते २५ वर्षांचे होते. बंधू रस्सल यांनी बाप्तिस्म्याचं भाषण दिलं. त्याच्या काही काळानंतर माझे बाबा ट्रिनिदाद या ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी काँस्टंस फारमर नावाच्या बहिणीशी लग्न केलं. ती खूप आवेशी होती. “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” हा चित्रपट दाखवण्यासाठी माझ्या बाबांनी आपल्या मित्राला, विल्यम आर. ब्राऊन यांना मदत केली. ब्राऊन यांना पूर्व आफ्रिका या देशात १९२३ साली नेमणूक मिळाली तोपर्यंत ते हा चित्रपट दाखवत राहिले. माझे आईबाबा या दोघांना स्वर्गीय जीवनाची आशा होती आणि ते ट्रिनिदाद या ठिकाणी स्थायिक झाले.
प्रेमळ आईबाबा
आम्ही एकूण नऊ भावंडं. सर्वात मोठ्या भावाचं नाव रदरफर्ड. तेव्हाच्या वॉच टॉवर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या अध्यक्षाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं. माझा जन्म ३० डिसेंबर, १९२२ साली झाला. आणि माझं नावही क्लेटन जे. वुडवर्थ यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. ते द गोल्डन एज (आता सावध राहा!) या नियतकालिकाचे संपादक होते. आमच्या आईबाबांनी आम्हाला शालेय शिक्षण दिलं, पण आम्ही आध्यात्मिक लक्ष गाठावीत यावर त्यांनी जास्त जोर दिला. माझी आई वचनांवर चांगल्या रीतीने तर्क करायची. बाबांना बायबलच्या गोष्टी सांगायला खूप आवडायचं आणि असं करताना ते खूप हावभाव करून सांगायचे. यामुळे तो अहवाल आमच्या डोळ्यांसमोर उभा राहायचा.
त्यांच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम घडून आले. पाच भावांपैकी आम्हा तीन जणांना गिलियड प्रशालेला जाण्याची संधी मिळाली आणि तीन बहीणी ट्रिनिदाद आणि टोबॅगो या ठिकाणी कित्येक वर्षं पायनियर सेवा करत राहिल्या. आईबाबांनी जे शिकवलं आणि जे चांगलं उदाहरण मांडलं त्यामुळे आम्हाला “परमेश्वराच्या घरात” रोवण्यात मदत झाली. तसंच त्यांच्या प्रोत्साहनामुळे “देवाच्या अंगणात” राहून तिथे आमची वाढ होण्यास मदत झाली.—स्तो. ९२:१३.
प्रचारकार्यासाठी सगळे जण आमच्या घरी एकत्र यायचे. एकत्र आलेले पायनियर बंधुभगिनी सहसा बंधू जॉर्ज यंग यांच्याबद्दल बोलायचे. ते कॅनडाहून ट्रिनिदादमध्ये मिशनरी सेवेसाठी आले होते. माझे आईबाबा खूप उत्साहाने त्यांचे आधीचे सोबती म्हणजे ब्राऊन जोडपं यांच्याबद्दल बोलायचे. ते जोडपं त्या वेळी पश्चिम आफ्रिकेत होतं. या सर्व गोष्टींमुळे मला लहान वयातच प्रचार सेवा सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळाली. तेव्हा मी १० वर्षांचा होतो.
सेवाकार्यातली सुरुवातीची वर्षं
त्या काळात आपल्या प्रकाशनांत दिलेला संदेश अगदी रोखठोक असायचा. खोटा धर्म, भ्रष्ट सरकारे आणि स्वार्थी व्यावसायिक जग यांचं त्या प्रकाशनांत पर्दाफाश करण्यात आला. याचा परिणाम म्हणजे, १९३६ साली एका पाळकाने ट्रिनिदादच्या गवर्नरला आपल्या सर्व प्रकाशनांवर बंदी टाकण्यासाठी चिथवलं. त्यामुळे आम्ही प्रकाशनं लपवून ठेवायचो आणि साठा संपेपर्यंत आम्ही ती प्रकाशनं लोकांना द्यायचो. आम्ही मोठमोठे साईन बोर्ड्स किंवा प्लॅकार्ड गळ्यात घालून रस्त्यावर व सायकलवर पूर्ण शहरात फिरायचो. आम्ही साऊंड कारच्या ग्रुपसोबत मिळून टुनापुना या शहरापासून ते ट्रिनिदादच्या अगदी दूरवर असलेल्या गावापर्यंत प्रचारकार्य करायचो. हे कार्य खूप रोमांचक होतं. अशा आध्यात्मिक वातावरणामुळे वयाच्या १६व्या वर्षी मला बाप्तिस्मा घेण्याची प्रेरणा मिळाली.
टुनापुना साऊंड कार ग्रूप
आमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक वारशामुळे आणि वर उल्लेख केलेल्या अनुभवांमुळे मला मिशनरी बनण्यास प्रेरणा मिळाली. १९४४ साली मी अरूबा या ठिकाणी गेलो. तिथे मी बंधू ऍडमन्ड डब्लु. कमिन्झ यांच्यासोबत सेवा केली तेव्हादेखील ती इच्छा माझ्या मनात तितकीच जिवंत होती. १९४५ या साली झालेल्या स्मारकविधीसाठी १० लोक आले ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला. पुढच्या वर्षी या बेटावर पहिलीवहिली मंडळी स्थापित झाली.
ऑरिसमुळे माझं जीवन नव्या अर्थाने समृद्ध झालं
त्याच्या काही काळानंतर मी जिथे काम करायचो तिथे मी ऑरिस विल्यम्स हिला अनौपचारिक रीत्या साक्ष दिली. आपल्या धर्माच्या शिकवणीला समर्थन करण्यासाठी ऑरिसने जोरदारपणे वादविवाद केला. पण बायबलच्या अभ्यासामुळे तिला सत्य कळलं आणि ५ जानेवारी, १९४७ रोजी तिने बाप्तिस्मा घेतला. काही काळानंतर आम्ही एकमेकांमध्ये आवड घेऊ लागलो आणि नंतर आमचं लग्न झालं. १९५० साली तिने पायनियर सेवा सुरू केली. ऑरिसमुळे माझ्या नवीन जीवनाची सुरुवात झाली.
नाइजीरियामध्ये रोमांचक सेवा
१९५५ साली आम्हाला गिलियड प्रशालेचं आमंत्रण मिळालं. या प्रशालेच्या तयारीसाठी आम्ही दोघांनी नोकरी सोडली, आमचं घर व सामान विकून टाकलं आणि अरूबाचा निरोप घेतला. मग २९ जुलै, १९५६ रोजी आम्ही गिलियड प्रशालेच्या २७ व्या वर्गामधून पदवीधर झालो आणि आम्हाला नाइजीरियामध्ये नेमण्यात आलं.
१९५७ साली लागोस नाइजीरिया इथे बेथेल कुटुंबासोबत
मागे वळून पाहताना, ऑरिस म्हणते: “मिशनरी जीवनात येत असलेल्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी यहोवाचा आत्मा एका व्यक्तीला मदत करू शकतो. माझ्या पतीसारखं मला मिशनरी बनण्याची मुळीच इच्छा नव्हती. उलट, माझं एक घर असावं, मुलं असावीत अशी माझी इच्छा होती. पण जेव्हा मला जाणीव झाली की आनंदाचा संदेश सांगणं किती गरजेचं आहे तेव्हा माझा दृष्टिकोन बदलला. तसंच गिलियड प्रशालेच्या प्रशिक्षणामुळेही मी सुवार्तिक म्हणून मिशनरी सेवेसाठी सज्ज झाले. जेव्हा आम्ही क्वीन मेरी या जहाजावर चढणार होतो तेव्हा बंधू नॉर यांच्या ऑफिसमधून बंधू वर्थ थॉर्टन आम्हाला भेटायला आले. त्यांनी आम्हाला म्हटलं की आम्हाला बेथेल सेवेची नेमणूक देण्यात आली आहे. हे ऐकताच मी म्हणाले ‘अरे देवा!’ कारण हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. पण मी लगेच माझा दृष्टिकोन बदलला आणि बेथेल सेवा मला आवडू लागली. तिथे मला वेगवेगळ्या नेमणुकी मिळाल्या. त्यातली सर्वात आवडती नेमणूक म्हणजे रिसेप्शनीस्टची नेमणूक. मला लोकांशी बोलायला आवडतं. या नेमणुकीमुळे मला नाइजीरियामधल्या अनेक बांधवांना प्रत्यक्षपणे भेटता आलं. बरेच बांधव तिथे पोहोचूपर्यंत प्रवासामुळे फार दमलेले आणि तान्हलेले असायचे. आणि त्यांचे कपडेही धुळीमुळे मळलेले असायचे. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायला मला आवडायचं. हे सर्व यहोवासाठी असलेली पवित्र सेवा होती आणि यातून मला समाधान व आनंद मिळायचा.” खरंच, प्रत्येक नेमणुकीमुळे आम्हाला आध्यात्मिक रीत्या समृद्ध व्हायला मदत झाली.
१९६१ मध्ये ट्रिनिदादमध्ये असताना जेव्हा एकदा कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र आले तेव्हा बंधू ब्राऊन यांनी आफ्रिकेतले काही रोमांचक अनुभव सांगितले. त्यानंतर मी नाइजीरिमध्ये होत असलेल्या वाढीबद्दल सांगितलं. बंधू ब्राऊने प्रेमळपणे माझ्या खांद्यावर हात ठेऊन बाबांना म्हटलं: “जॉनी, तू कधीच आफ्रिकेला पोहोचू शकला नाही पण वुडवर्थ मात्र पोहोचला!” यावर बाबांनी म्हटलं: “वर्थ, असंच काम करत राहा बेटा!” अशा आध्यात्मिक रीत्या अनुभवी जणांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे सेवा पूर्ण करण्याची माझी इच्छा आणखी प्रबळ झाली.
विल्यम “बायबल” ब्राऊन आणि त्यांची पत्नी ॲन्टोनिया यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं
१९६२ साली मला आणखी प्रशिक्षणासाठी गिलियड प्रशालेच्या ३७ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला. ही दहा महिन्यांची प्रशाला होती. बंधू विल्फ्रेड गूश हे तेव्हा नाइजीरियाचे शाखा पर्यवेक्षक होते. त्यांना गिलियडच्या ३८ व्या वर्गासाठी बोलवण्यात आलं आणि नंतर इंग्लंडमध्ये नेमण्यात आलं. यानंतर नाइजीरिया शाखेची देखरेख करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. बंधू ब्राऊनच्या उदाहरणाचं अनुकरण करून मी नाइजीरियामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रवास केला. यामुळे आपल्या बांधवांना आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेणं मला शक्य झालं आणि त्यांच्यावरचं माझं प्रेम वाढलं. विकसित देशांतल्या लोकांजवळ सहसा ज्या गोष्टी असतात, त्या त्यांच्याकडे नसल्या तरी ते आनंदी आणि समाधानी होते. यावरून त्यांनी दाखवून दिलं की अर्थपूर्ण जीवन पैशावर आणि भौतिक गोष्टींवर अवलंबून नसतं. जरी ते गरीब असले तरीही ते सभांना नेहमी स्वच्छ, नीटनेटके आणि शालीन कपडे घालून यायचे. हे पाहून मला खूप नवल वाटायचं. ते सर्व मिळून ट्रक आणि बोलेकेजास,a म्हणजेच दोन्ही बाजूंनी उघड्या असलेल्या जीपसारख्या गाड्यांमधून अधिवेशनाला यायचे. सहसा या गाड्यांवर लक्षवेधक घोषवाक्यं लिहिलेली असायची. त्यांतलं एक असं होतं: “छोट्या छोट्या थेबांनीच महासागर बनतो.”
ते घोषवाक्य किती खरं होतं! प्रत्येकाची मेहनत महत्त्वाची असते आणि त्यात आमचाही वाटा होता. १९७४ मध्ये, नाइजीरिया हा एक लाख प्रचारकांची संख्या गाठणारा अमेरिकेनंतरचा पहिला देश बनला. खरंच, नाइजीरियामध्ये भरपूर प्रगती झाली होती!
नाइजीरियामध्ये ही वाढ होत असताना, १९६७ ते १९७० या दरम्यान मुलकी युद्ध सुरू होतं. त्यामुळे नाइजर नदीच्या पलीकडे असलेल्या बायफ्रान भागातल्या बांधवांचा बऱ्याच महिन्यांसाठी शाखा कार्यालयाशी संपर्क तुटला होता. म्हणून आम्हाला त्यांच्यासाठी आध्यात्मिक अन्न घेऊन जाणं गरजेचं होतं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, प्रार्थना केल्यामुळे आणि यहोवावर भरवसा ठेवल्यामुळेच आम्हाला पुष्कळदा नदी पार करणं शक्य झालं.
नाइजर नदी पार करण्यासाठी आम्हाला बऱ्याच धोक्यांचा सामना करावा लागायचा. त्या आठवणी अजूनही माझ्या डोळ्यांपुढे येतात. आमच्या जिवाला सतत धोका असायचा कारण सैनिक पुढचामागचा विचार न करता बंदूक चालवायचे; तसंच, रोग आणि इतर धोकेही होते. एकतर, आमच्याकडे संशयाने पाहणाऱ्या नाइजीरियन सैनिकांच्या गटांना आम्हाला पार करावं लागायचं. शिवाय नाकेबंदी केलेल्या बायफ्रान भागात तर परिस्थिती आणखीनच धोकेदायक होती. एकदा रात्री मी आसाबापासून प्रवासी नावेने नदी पार करून ओनीशा या शहरात गेलो. पुढे एनुगु शहरात जाऊन मी देखरेख करणाऱ्या बांधवांना प्रोत्साहन दिलं. आणखी एकदा ॲबा या शहरात प्रकाशबंदीचा आदेश होता तेव्हा मी तिथे जाऊन वडिलांना दिलासा दिला. पोर्ट हारकोर्ट या ठिकाणी, एकदा आम्हाला आमची सभा प्रार्थना करून अचानक बंद करावी लागली. कारण नाइजीरियाचे सैनिक शहराबाहेर असलेल्या बायफ्रानच्या संरक्षक दलांवर हल्ला करून आत शिरले होते.
त्या सभा महत्त्वाच्या होत्या कारण यहोवा आपली प्रेमाने काळजी घेत आहे हे आश्वासन बांधवांना त्यांतून मिळालं. तसंच तटस्थ राहण्याबद्दल आणि एकता टिकवून ठेवण्याबद्दल ज्या सल्ल्याची त्यांना अत्यंत गरज होती तोही त्यांना सभांद्वारे मिळाला. नाइजीरियाच्या बांधवांनी त्या भयानक युद्धाच्या काळाचा यशस्वी रीत्या सामना केला. त्यांनी एकमेकांबद्दल प्रेम दाखवून जातीय द्वेषभावावर विजय मिळवला आणि आपली ख्रिस्ती एकता टिकवून ठेवली. त्या कठीण काळात त्यांच्यासोबत राहून त्यांना आधार देणं हा किती मोठा बहुमान होता!
१९६९ साली न्यूयॉर्क शहरात यांकी स्टेडियम इथे “पृथ्वीवर शांती” हे आंतरराष्ट्रीय संमेलन झालं. त्या संमेलनाचे अध्यक्ष बंधू मिल्टन हेन्शेल होते. त्या संमेलनात मी त्यांचा साहाय्यक म्हणून काम करत होतो आणि त्यामुळे त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. ही योग्य वेळी मिळालेली मदत होती, कारण १९७० साली नाइजीरिया मध्ये लागोस या ठिकाणी, “त्याची कृपा असलेले मनुष्य” हे आंतरराष्ट्रीय संमेलन झालं. मुलकी युद्ध नुकतंच संपलं होतं. त्यामुळे फक्त यहोवाच्या आशीर्वादानेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. १७ भाषांमध्ये झालेलं हे पहिलंच संमेलन होतं आणि त्याची उपस्थिती १,२१,१२८ एवढी होती. बंधू नॉर, बंधू हेन्शेल आणि इतर पाहुणे भाड्याने घेतलेल्या विमानांनी अमेरिका आणि इंग्लंडवरून आले होते. या बांधवांना या संमेलनात ३,७७५ जणांचा बाप्तिस्मा होताना पाहण्याची संधी मिळाली. पेन्टेकॉस्टनंतर एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात बाप्तिस्मा होण्याची ही पहिलीच वेळ होती. या संमेलनाच्या तयारीसाठी आम्हाला भरपूर वेळ द्यावा लागला. तो माझ्या जीवनातला सगळ्यात व्यस्त काळ होता. प्रचारकांच्या संख्येत अचानक फार मोठी वाढ झाली होती!
“त्याची कृपा असलेले मनुष्य” या आंतरराष्ट्रीय संमेलनात १,२१,१२८ लोक आले होते आणि त्यात इबो भाषेसोबतच इतर १६ भाषा बोलणारे लोक होते
नाइजीरियामध्ये मी ३० पेक्षा जास्त वर्षं सेवा केली. या काळात मला पश्चिम आफ्रिकेत अधून-मधून प्रवासी पर्यवेक्षक आणि झोन ओव्हरसियर म्हणून सेवा करण्याचा आनंद मिळाला. मिशनरी बांधव त्यांना मिळणाऱ्या व्यक्तिगत मदतीची आणि प्रोत्साहनाची खूप कदर करायचे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं नाही, याची त्यांना खात्री करून द्यायला मला फार आनंद वाटायचा! हे काम करत असताना मला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, वैयक्तिक आस्था दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. बांधवांना प्रगती करायला मदत करण्याचा, आणि यहोवाच्या संघटनेला मजबूत करून बांधवांची एकता टिकवून ठेवण्याचा हाच सगळ्यात चांगला मार्ग आहे.
युद्धामुळे आणि आजारामुळे आलेल्या समस्यांना तोंड देणं आम्हाला फक्त यहोवाच्या मदतीनेच शक्य झालं. यहोवाचा आशीर्वाद आमच्यावर आहे हे स्पष्टच होतं. ऑरिस म्हणते:
“आम्हा दोघांना बऱ्याच वेळा मलेरिया झाला. एकदा यांना बेशुद्ध अवस्थेत लागोसच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी मला सांगितलं की ते कदाचित वाचणार नाहीत पण देवाच्या कृपेने तसं काही झालं नाही! जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांची काळजी घेणाऱ्या मेल नर्सला त्यांनी देवाच्या राज्याबद्दल सांगितलं. त्यांच्या मनात बायबलबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी नंतर मी माझ्या पतीसोबत त्यांना भेटायला गेले. त्यांचं नाव होतं, न्वामबीवे. त्यांनी सत्य स्वीकारलं आणि नंतर ते अबा या मंडळीत वडील म्हणून सेवा करू लागले. मलासुद्धा बऱ्याच जणांना यहोवाचे सेवक बनायला मदत करण्यात यश मिळालं. त्यातले काही तर कट्टर मुस्लिम होते. पण नाइजीरियाच्या लोकांशी ओळख करून त्यांच्याशी मैत्री केल्यामुळे आणि त्यांची संस्कृती, रितीरिवाज व भाषा यांबद्दल माहिती घेतल्यामुळे आम्हाला आनंद झाला.”
आम्हाला अजून एक धडा शिकायला मिळाला: परदेशातल्या नेमणुकीत यशस्वी होण्यासाठी, बंधुभगिनींवर प्रेम करायला शिकणं महत्त्वाचं आहे; मग त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा कितीही वेगळी असली तरीही.
नवीन नेमणुकी
नाइजीरिया बेथेलमध्ये सेवा केल्यानंतर, १९८७ मध्ये आम्हाला मिशनरी म्हणून कॅरिबियन द्वीपसमुहातल्या सेंट लुसिया या सुंदर ठिकाणी नवीन नेमणूक मिळाली. ही नेमणूक छान होती, पण त्यासोबतच काही नवीन समस्यासुद्धा आमच्यासमोर आल्या. आफ्रिकेत एका माणसाला एकापेक्षा जास्त पत्नी असतात पण इथे सेंट लुसियामध्ये अशी समस्या होती, की लोक कायदेशीर लग्न न करताच सोबत राहायचे. देवाच्या प्रेरणादायक वचनामुळे आमच्या बऱ्याच बायबल विद्यार्थ्यांना जीवनात आवश्यक बदल करायला मदत झाली.
आमच्या ६८ वर्षांच्या वैवाहिक जीवनात मी ऑरिसवर मनापासून प्रेम केलं
वाढत्या वयासोबत आधीसारखी शक्ती नसल्यामुळे नियमन मंडळाने आमच्यासाठी एक प्रेमळ योजना केली. २००५ मध्ये त्यांनी आम्हाला ब्रुकलिन, न्यूयॉर्क इथे संस्थेच्या जागतिक मुख्यालयात सेवा करण्यासाठी बोलवलं. ऑरिसला माझ्यासाठी जोडीदार म्हणून दिल्याबद्दल मी आजही यहोवाचे दररोज आभार मानतो. २०१५ मध्ये तिचा मृत्यू झाला. ती नसल्याची जाणीव मला शब्दांत व्यक्त करता येत नाही. ती अतिशय चांगली सोबती होती, प्रेमळ होती आणि तिच्यात बरेच चांगले गुण होते. आमच्या ६८ वर्षांच्या वैवाहिक जीवनात मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं. आमच्या वैवाहिक जीवनात आणि मंडळीत आनंद टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला एक सूत्र सापडलं होतं. ते म्हणजे मस्तकपदाला आदर दाखवणं, मनापासून क्षमा करणं, नम्रता टिकवून ठेवणं आणि आपल्या वागण्या-बोलण्यात आत्म्याची फळं दाखवणं.
आम्हाला निराशेचा सामना करावा लागला, किंवा आम्ही निरुत्साहित झालो, तेव्हा आम्ही नेहमी यहोवाकडे मदत मागितली. आम्ही केलेल्या त्यागांवर त्याने आशीर्वाद द्यावा अशी आम्ही त्याला विनंती केली. देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या दृष्टिकोनात बदल करत राहिल्यामुळे आजपर्यंत आम्हाला बऱ्याच सुधारणा पाहायला मिळाल्या आणि भविष्यात तर आणखी चांगल्या गोष्टी घडतील!—यश. ६०:१७; २ करिंथ. १३:११.
ट्रिनिदादमध्ये आणि टोबॅगोमध्ये यहोवाने माझ्या आईबाबांच्या आणि इतर बांधवांच्या सेवेवर भरपूर आशीर्वाद दिला. अलीकडच्या अहवालांनुसार तिथे ९,८९२ लोकांनी खरी उपासना स्वीकारली आहे. अरूबामध्ये मी पूर्वी ज्या मंडळीत होतो तिला मजबूत करण्यासाठी बऱ्याच जणांनी हातभार लावला. त्या बेटावर आता १४ प्रगतिशील मंडळ्या आहेत. नाइजीरिया इथे प्रचारकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आणि आता तिथे ३,८१,३९८ प्रचारक आहेत. आणि सेंट लुसिया या बेटावर ७८३ जण यहोवाच्या राज्याला पाठिंबा देत आहेत.
मी आता नव्वदी पार केली आहे. स्तोत्र ९२:१४ प्रमाणे जे यहोवाच्या घरात लावलेल्या वृक्षांसारखे आहेत, त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे: “वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील.” यहोवाच्या सेवेत घालवलेल्या माझ्या संपूर्ण जीवनाबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. मला मिळालेल्या समृद्ध ख्रिस्ती वारशामुळे, यहोवाची अगदी पूर्ण मनाने सेवा करण्याची प्रेरणा मला मिळाली. यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळे त्याने मला “[माझ्या] देवाच्या अंगणात समृद्ध” होऊ दिलं.—स्तो. ९२:१३.