तुम्हाला माहीत होतं का?
पहिल्या शतकातलं सभास्थान: गमला या ठिकाणी असलेल्या पहिल्या शतकातल्या सभास्थानातले काही पैलू या चित्रातून दिसतात. गमला हे ठिकाण गालील समुद्राच्या उत्तरपूर्वेपासून १० कि.मी.च्या अंतरावर आहे. या चित्रावरून आपण कल्पना करू शकतो की प्राचीन काळातलं सभास्थान कसं होतं.
सभास्थानाची सुरुवात कशी झाली?
“सभास्थान” हा शब्द एका ग्रीक शब्दापासून आला आहे. याचा अर्थ “सभा” किंवा “एकत्र जमणे” असा होतो. हे नाव योग्य आहे कारण सभास्थानं अशी ठिकाणं होती जिथं मार्गदर्शनासाठी आणि उपासनेसाठी यहुदी एकत्र यायचे. आणि ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. इब्री शास्त्रवचनांत सभास्थानांबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही. पण पहिल्या शतकातपर्यंत अशी सभास्थानं अस्तित्वात होती हे आपल्याला ग्रीक शास्त्रवचनांतून स्पष्टपणे समजतं.
बरेच विद्वान असं मानतात, की यहुदी लोक बाबेलच्या बंदीवासात असताना सभास्थानं अस्तित्वात आली. दी एन्सायक्लोपिडिया जुडायका यात असा तर्क केला आहे: “यहुदी परक्या देशात बंदिवान होते आणि तिथे उपासनेसाठी मंदिर नव्हतं. अशा कठीण परिस्थितीत त्यांना प्रोत्साहानाची गरज होती. आणि त्यासाठी कदाचित ते शब्बाथाच्या दिवशी नियमितपणे एकत्र येऊन शास्त्राचं वाचन करायचे.” पण बंदिवासातून सुटका झाल्यानंतर यहुदी जिथे कुठे स्थायिक झाले तिथे त्यांनी सभास्थानं बांधली आणि प्रार्थना व शास्त्राचं वाचन करण्यासाठी ते एकत्र येत राहिले.
पहिल्या शतकापर्यंत यहुदी भूमध्य समुद्राच्या आसपास, सबंध मध्य-पूर्व आणि इस्राएल या ठिकाणी पसरले होते. आणि तिथल्या यहुद्यांसाठी सभास्थानं ही धार्मिक आणि सामाजिक जीवनासाठी महत्त्वाचं केंद्र बनली होती. जेरुसलेम इथल्या हिब्रू विद्यापीठातले प्रोफेसर ली लवेन म्हणतात: “अभ्यास करणं, शब्बाथ व सणांचं भोजन करणं, न्यायालयीन कार्यवाही, समाजासाठी पैसे गोळा करणं आणि राजकीय व सामाजिक सभा या गोष्टींसाठी सभास्थानाचा वापर केला जायचा.” तसंच ते पुढे म्हणतात: “खरंतर इथे या सर्वांपेक्षा धार्मिक कार्यांना जास्त महत्त्व दिलं जायचं.” म्हणूनच, यात आश्चर्य करण्यासारखं नाही की येशू नियमितपणे सभास्थानांत जायचा. (मार्क १:२१; ६:२; लूक ४:१६) तिथे उपस्थित असलेल्यांना तो शिकवायचा आणि त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यायचा. ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतर प्रेषित पौलनेसुद्धा सभास्थानांमध्ये जाऊन बऱ्याचदा प्रचार केला. देवाला जाणून घ्यायची इच्छा असणारे लोक सहसा सभास्थानात यायचे. आणि म्हणूनच कोणत्याही शहरात गेल्यावर पौल सर्वात आधी सभास्थानात जाऊन प्रचार करायचा.—प्रे. कार्ये १७:१, २; १८:४.