“प्रीति कधी अंतर देत नाही”
साम्युएल डी. लॅडसुई यांच्याद्वारे निवेदित
गत वर्षांकडे सिंहावलोकन करून जे काही साध्य झाले ते मी पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटते. यहोवा संपूर्ण पृथ्वीवर आश्चर्यकारक कृत्ये करत आला आहे. आयलेश, नायजेरिया येथे १९३१ मध्ये आम्ही थोड्या जणांनीच प्रचार कार्य चालू केले होते आणि आता तेथे आमच्या ३६ मंडळ्या आहेत. सन १९४७ मध्ये वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचे पहिले पदवीधर नायजेरियात आले तेव्हा तेथे प्रचार करणाऱ्या ४,००० ही संख्या आता जवळजवळ १,८०,००० पेक्षा अधिक वाढली आहे. सुरवातीच्या दिवसांमध्ये, इतकी वृद्धी होईल अशी आम्ही कोणीही अपेक्षा केली नव्हती किंवा स्वप्न देखील पाहिले नव्हते. या आश्चर्यकारक कार्यात माझाही सहभाग होता यासाठी मी किती कृतज्ञ आहे! त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो.
माझे वडील, शहरोशहरी जाऊन बंदूकी आणि बंदूकीच्या दारूचा व्यापार करीत असल्यामुळे ते क्वचितच घरी असायचे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना सात पत्नी होत्या, पण सर्वच त्यांच्यासोबत राहत नव्हत्या. माझ्या वडिलांचा थोरला भाऊ मरण पावल्यावर माझ्या वडिलांनी त्याच्या पत्नीला आपली बायको म्हणून घेतले व ती माझी आई झाली. ती त्यांची दुसरी पत्नी होती आणि मी तिच्यासोबत राहात होतो.
एके दिवशी जवळपासच्या गावामध्ये राहणाऱ्या माझ्या वडिलांच्या पहिल्या बायकोला ते भेटून घरी आले. ते तेथे असताना, माझा सावत्र भाऊ शाळेला जात असल्याचे त्यांना समजले. माझा सावत्र भाऊ माझ्याच वयाचा म्हणजे दहा वर्षांचा होता. यास्तव मी देखील शाळेला जावे असे वडिलांना वाटले. त्यांनी मला नऊ पेन्स दिले—तीन पेन्स पाठ्यपुस्तकासाठी आणि सहा पेन्स पाटीसाठी. ही १९२४ ची गोष्ट आहे.
बायबल अभ्यास गट तयार होतो
मला लहानपणापासूनच देवाच्या वचनाची, बायबलची आवड होती. मला शाळेतील बायबल वर्ग आवडत असत व मला माझ्या संडे स्कूलच्या शिक्षकांकडून नेहमी शाबासकी मिळत असे. यास्तव, १९३० मध्ये आयलेश येथे भेट देणाऱ्या व पहिल्यांदाच प्रचार करणाऱ्या एका बायबल विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणाला उपस्थित राहण्याच्या संधीचा मी फायदा घेतला. भाषणानंतर, त्याने मला योरूबा भाषेतील देवाची वीणा (इंग्रजी) या पुस्तकाची एक प्रत दिली.
मी संडे स्कूलला नियमितरीत्या जात होतो. आता मी देवाची वीणा हे पुस्तक सोबत नेऊ लागलो आणि तेथे शिकवल्या जाणाऱ्या शिकवणी चुकीच्या असल्याचे मी त्यांना दाखवून देऊ लागलो. त्यामुळे वादविवाद होऊ लागले व मला वेळोवेळी या ‘नव्या शिकवणीला’ अनुसरण्याविरुद्ध चर्च पाळक ताकीद देत राहिले.
पुढील वर्षी, एकदा रस्त्यावरून फिरत असताना, काही लोक एका माणसाचे भाषण ऐकत असल्याचे मी पाहिले. एक बायबल विद्यार्थी जे. आय. ओवनपॉ हे वक्ता होते. लागोस येथे राज्य प्रचार कार्याची देखरेख करणाऱ्या विल्यम आर. ब्राऊन (त्यांना बहुधा बायबल ब्राऊन म्हटले जात होते) यांनी त्या विद्यार्थ्याला पाठवले होते.a आयलेशमध्ये एक लहानसा गट देवाची वीणा या पुस्तकाच्या अभ्यासासाठी तयार झाल्याचे मला समजताच मीही त्यांना सामील झालो.
त्या गटातील मी सर्वात लहान होतो—शाळेला जाणारा केवळ एक १६ वर्षांचा मुलगा. ३० वर्षे वयाच्या आणि वृद्ध लोकांसोबत इतक्या जवळचा सहवास ठेवण्यास मला खरे तर अस्वस्थ किंवा भीती वाटण्यास हवी होती. परंतु मी त्यांच्यामध्ये होतो त्यामुळे त्यांना आनंद वाटत होता व त्यांनी मला उत्तेजन दिले. ते मला वडिलांसमान होते.
पाळकांचा विरोध
लवकरच आम्हाला पाळकांकडून तीव्र विरोध होऊ लागला. आधी कॅथलिक, अँग्लिकन आणि इतर आपापसात भांडत होते पण आता ते सर्व आमच्या विरोधात एक झाले. आम्हाला निरुत्साहीत करण्यास पावले उचलण्यासाठी त्यांनी स्थानिक प्रमुखांसोबत कट रचला. आमची पुस्तके लोकांना हानीकारक होती असा दावा करून त्यांनी ती जप्त करण्यासाठी पोलिसांना पाठवले. परंतु, त्यांना पुस्तके घेण्याचा काही अधिकार नाही अशी जिल्हा अधिकाऱ्याने ताकीद दिली व दोन आठवड्यांनी आम्हाला आमची पुस्तके पुन्हा देण्यात आली.
त्यानंतर, आम्हाला ओबा किंवा सर्वश्रेष्ठ प्रमुख आणि शहराच्या इतर प्रमुख लोकांबरोबर असलेल्या एका सभेला उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात आले. आम्ही त्यावेळी एकूण ३० जण होतो. आम्ही त्या “घातक” पुस्तकांचे वाचन थांबवावे यासाठी ती सभा बोलावण्यात आली होती. आम्ही परके लोक आहोत का असे आम्हाला विचारण्यात आले पण जेव्हा त्यांनी आमचे चेहरे निरखून पाहिले तेव्हा ते म्हणाले: “यांच्यापैकी काही परकी लोकं असली तरी बाकीची तर आपलीच मुलं आहेत.” आम्हाला हानी करणाऱ्या धर्माच्या पुस्तकांचा अभ्यास आम्ही चालू ठेवावा अशी त्यांची इच्छा नाही असे त्यांनी आम्हाला सांगितले.
आम्ही काहीही न बोलता तेथून निघालो, कारण या प्रमुख लोकांकडे लक्ष द्यायचे नाही असे आम्ही ठरवले होते. आमच्यापैकी बहुतेक जण जे काही शिकत होते ते त्यांना आवडत होते व अभ्यास सतत चालू ठेवण्याचा आमचा निर्णय होता. यास्तव, आमच्यापैकी काहींनी घाबरुन जाऊन आमचा गट सोडून दिला तरीपण बहुतेकांनी एका सुताराच्या कारखान्यात अभ्यास चालू ठेवला. आमच्यामध्ये कोणी संचालक नव्हता. आम्ही प्रार्थनेने सुरवात करून पुस्तकातील प्रत्येक परिच्छेदाचे वाचन आळीपाळीने करीत असू. जवळजवळ एका तासानंतर, आम्ही पुन्हा प्रार्थना करून घरी जात असू. पण आमची गुप्तरीतीने टेहळणी केली जात होती व प्रत्येक दोन आठवड्याला धार्मिक नेते आम्हाला बोलावून बायबल विद्यार्थ्यांच्या साहित्यांचा अभ्यास करण्याविरुद्ध ताकीद देत असत.
या दरम्यान, आमच्याकडे जे अल्प ज्ञान होते ते लोकांना मदत करण्यासाठी आम्ही वापरण्याचा प्रयत्न करीत होतो आणि पुष्कळ जण आमच्याशी सहमत होत होते. एक एक करून लोक आमच्यामध्ये सामील होत होते. आम्हाला अतिशय आनंद झाला, पण आम्ही कोणत्या धर्माशी निगडित आहोत हे आम्हाला अद्यापही चांगल्या रीतीने समजले नव्हते.
सन १९३२ च्या सुरवातीला लागोस येथून एक बांधव आम्हाला संघटित करण्यासाठी आले व एप्रिलमध्ये “बायबल” ब्राऊन देखील आले. ३० लोकांचा आमचा गट पाहून बंधू ब्राऊन यांनी आमच्या वाचनामध्ये आम्ही करत असलेल्या प्रगतीविषयी विचारणा केली. आम्हाला माहीत असलेल्या सर्व गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या. आम्ही सर्व जण बाप्तिस्म्यास पात्र आहोत असे ते म्हणाले.
पावसाळा नसल्यामुळे, आम्हाला आयलेशपासून १४ किलोमीटर दूर एका नदीपर्यंत चालत जावे लागले व तेथे सुमारे ३० जणांचा बाप्तिस्मा झाला. तेव्हापासून पुढे आम्ही राज्याचे प्रचारक आहोत असे आम्हाला वाटू लागले व आम्ही घरोघरी जाऊ लागलो. आम्ही अशी अपेक्षा केली नव्हती पण आम्हाला जे समजले ते इतरांना जाऊन सांगण्यास आम्ही उत्सुक होतो. चर्चा करताना खोट्या शिकवणी चुकीच्या आहेत हे बायबलच्या आधारावर दाखवून देण्यासाठी आम्हाला चांगली तयारी करावी लागत असे. म्हणून, आमच्या सभांमध्ये आम्ही शिकवणींची चर्चा करत होतो व माहीत असलेल्या गोष्टी एकमेकांना सांगून मदत करीत होतो.
आमचे प्रचार कार्य
आम्ही आमचे संपूर्ण शहर प्रचार कार्य करून उरकले. लोकांनी आमची थट्टा केली, आमच्यावर ओरडत होते पण आम्ही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. आम्हाला खूप आनंद झाला होता व आम्हाला आणखी पुष्कळ काही शिकावयाचे असले तरी आमच्याजवळ सत्य होते.
आम्ही प्रत्येक रविवारी घरोघरी गेलो. लोक आम्हाला प्रश्न विचारत आणि आम्ही त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत होतो. रविवारी संध्याकाळी आम्ही जाहीर भाषण देत होतो. आमचे स्वतःचे राज्य सभागृह नसल्यामुळे आमच्या सभा मैदानावर होत होत्या. आम्ही लोकांना एकत्र करून एक भाषण देत व त्यांना प्रश्न विचारण्यास सांगत असू. काही वेळा आम्ही चर्चमध्ये प्रचार केला.
लोकांनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल कधीच ऐकले नव्हते अशा क्षेत्रांमध्येही आम्ही गेलो. बहुतेकवेळा आम्ही सायकलींवर जात असू पण कधीकधी एखादी बस भाड्याने ठरवत असू. एखाद्या खेडेगावात पोहंचल्यावर आम्ही मोठ्याने कर्णा वाजवत असू. संपूर्ण खेडेगावाला ते ऐकू जात होते! काय चालले आहे ते पाहण्यासाठी लोक धावतपळत येत. मग आम्ही आमचा संदेश देत असू. आमचे सर्व काही बोलून झाल्यावर लोक आमच्याकडे असलेले साहित्य घेण्यासाठी धडपड करीत असत. आम्ही मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप करीत होतो.
आम्ही देवाच्या राज्याची आतुरतेने वाट पाहत होतो. मला आठवते की एकदा आम्हा सर्वांना १९३५ वार्षिक पुस्तक (इंग्रजी) मिळाले तेव्हा संपूर्ण वर्षासाठी वचनांच्या चर्चेचा पूर्ण आराखडा पाहिल्यावर एका बांधवाने विचारले: “म्हणजे हर्मगिदोन येण्याआधी आपण आणखी एक वर्ष घालवणार की काय?”
तेव्हा संचालकाने विचारले: “तुम्हाला काय वाटतं, जर हर्मगिदोन उद्याच आले तर आपण वार्षिक पुस्तक वाचण्याचे सोडून देऊ का?” त्या बांधवाने नाही असे उत्तर दिल्यावर संचालक पुन्हा म्हणाले: “मग तुम्हाला इतकी काळजी का पडली?” आम्ही यहोवाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो व अजूनही वाट पाहत आहोत.
युद्धाची वर्षे
दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, आमच्या पुस्तकांची आयात करण्यावर बंदी घालण्यात आली. आयलेशमध्ये एका बांधवाने अजाणतेत संपत्ती (इंग्रजी) नावाचे एक पुस्तक एका पोलिसाला दिले. पोलिसाने विचारले: “हे पुस्तक कोणाचं आहे?” बांधवाने म्हटले, की ते त्याचे स्वतःचे आहे. त्यावर पोलिसाने म्हटले, की हे मना केलेले पुस्तक आहे, आणि त्याला पोलीस चौकीत नेऊन डांबून ठेवण्यात आले.
मी पोलीस चौकीत गेलो आणि चौकशी केल्यानंतर त्या बांधवाला जामिन देऊन सोडवून आणले. मग मी लागोस येथील बंधू ब्राऊन यांना घडलेला सर्व प्रकार दूरध्वनीने कळवला. आमच्या पुस्तकाच्या वितरणावर बंदी असलेला कोणता नियम आहे का असेही मी विचारले. तेव्हा बंधू ब्राऊन यांनी, केवळ आपल्या पुस्तकांच्या आयातीवर बंदी आहे वितरणावर नव्हे असे मला सांगितले. तीन दिवसानंतर बंधू ब्राऊन यांनी काय चालले आहे ते पाहण्यासाठी लागोस येथून एका बांधवाला पाठवले. आम्ही सर्वांनी दुसऱ्या दिवशी नियतकालिके आणि पुस्तके घेऊन प्रचार कार्याला निघावे असे या बांधवाने आम्हाला सांगितले.
आम्ही वेगवेगळ्या दिशेला पांगलो. एका तासानंतर, बहुतेक बांधवांना अटक केल्याची बातमी माझ्या कानी पडली. यास्तव, भेट देणारा बांधव आणि मी आम्ही दोघे पोलीस चौकीत गेलो. पुस्तकांवर बंदी नाही याचे स्पष्टीकरण ऐकण्यास पोलीस तयार नव्हता.
अटक केलेल्या ३३ बांधवांना इफ येथील मुख्य दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात पाठवले, व मीही त्यांच्यासोबत गेलो. आम्हाला घेऊन जात असताना ज्या शहरवासीयांनी आम्हाला पाहिले ते ओरडू लागले: “आता या लोकांचे कार्य बंद पडले. ते आता पुन्हा येणार नाहीत.”
मुख्य दंडाधिकारी जो स्वतः एक नायजेरियन होता त्याच्यासमोर हा दोषारोप मांडण्यात आला. सर्व पुस्तके आणि नियतकालिके त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. या लोकांना अटक करण्यासाठी पोलिसांच्या प्रमुखाला कोणी परवानगी दिली होती असे त्याने विचारले. पोलिस प्रमुखाने उत्तर दिले की त्याने जिल्हा अधिकाऱ्याच्या सूचनांनुसार कारवाई केली होती. मुख्य दंडाधिकाऱ्याने पोलीस प्रमुखाला, मला आणि चार प्रतिनिधींना त्याच्या कक्षेत बोलावले.
त्याने मिस्टर ब्राऊन कोण आहेत असे विचारले. ते लागोस येथील वॉचटावर संस्थेचे प्रतिनिधी असल्याचे आम्ही त्याला सांगितले. आमच्याबद्दलची एक तार त्याला मिस्टर ब्राऊन यांच्याकडून मिळाल्याचे त्याने आम्हाला सांगितले. त्याने त्या दिवशी ते प्रकरण स्थगित केले आणि बांधवांचा जामीन स्वीकारला. दुसऱ्या दिवशी त्याने बांधवांना दोषमुक्त करून बंधमुक्त केले आणि पोलिसांना पुस्तके परत देण्याचा आदेश दिला.
आम्ही आयलेश येथे गाणी गात पुन्हा आलो. आम्हाला पाहून लोक पुन्हा ओरडू लागले, पण आता ते म्हणू लागले, “ते बघा ते पुन्हा आले!”
विवाहाविषयी यहोवाचा दर्जा स्पष्ट करण्यात आला
सन १९४७ मध्ये नायजेरियात पहिल्या तीन गिलियड पदवीधरांचे आगमन झाले. यांच्यापैकी एक बांधव टोनी ऑटवुड अजूनही येथेच, नायजेरिया बेथेलमध्ये सेवा करीत आहे. तेव्हापासून आम्ही नायजेरियातील यहोवाच्या संघटनेमध्ये मोठे बदल पाहिले आहेत. बहुपत्नीकत्वविषयीचा आमचा दृष्टिकोन हा त्यापैकीचा एक मोठा बदल होता.
मी फेब्रुवारी १९४१ मध्ये ओलॉबिसी फॉसुबॉ हिच्याबरोबर विवाह केला व आणखी पत्नी घेऊ नयेत हे मला कळत होते. परंतु, १९४७ पर्यंत मिशनरी आले तेव्हा मंडळ्यांमध्ये बहुपत्नीकत्व सर्वसामान्य गोष्ट होती. अनेक पत्नी असलेल्या बांधवांना सांगण्यात आले, की त्यांनी अजाणतेत एका पेक्षा अधिक पत्नींसोबत विवाह केला होता. यास्तव, जर त्यांना दोन, तीन, चार, किंवा पाच पत्नी असल्या तरी ते त्यांना घरात ठेवू शकतात पण त्यांनी येथूनपुढे आणखी पत्नी घेऊ नयेत. हे आमचे धोरण होते.
अनेक लोकांना आमच्यामध्ये सामील होण्याची इच्छा होती, खासकरून आयलेशमधील खेरुबीम आणि सेराफीम समाज. यहोवाचे साक्षीदारच केवळ सत्य शिकवणारे लोक होते असे ते म्हणत होते. त्यांना आमच्या शिकवणी पटल्या आणि त्यांच्या चर्चचे रूपांतर सभागृहांमध्ये करण्याची त्यांची इच्छा होती. हे ऐक्य साध्य करण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेत होतो. त्यांच्या वडिलांना प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या येथे केंद्रे देखील होती.
मग बहुपत्नीकत्वाविषयी नवे मार्गदर्शन मिळाले. मिशनऱ्यांपैकी एकाने १९४७ मध्ये एका विभागीय संमेलनामध्ये एक भाषण दिले. त्यांनी चांगले वर्तन आणि सवयींबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी १ करिंथकर ६:९, १० हे वचन उद्धृत केले जेथे, अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही असे म्हटले आहे. त्यानंतर ते पुढे म्हणाले: “आणि बहुपत्नी असलेल्यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही!” श्रोत्यांमधील लोक मोठ्याने म्हणाले: “काय, बहुपत्नी असलेल्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही!” तेव्हा विभाग पडले. ते जणू काय युद्धासारखे होते. नव्यानेच येऊन सामील झालेल्या अनेकांनी त्यांचा सहवास थांबवला व म्हणू लागले: “बरं झालं आम्ही या संस्थेच्या अधिक जवळ गेलो नाही.”
परंतु बहुतेक बांधवांनी, त्यांच्या जादा पत्नींना विवाह बंधनातून मोकळे करून त्यांच्या वैवाहिक परिस्थितीत सुधारणा करण्यास सुरवात केली. त्यांनी त्यांना पैसे देऊन म्हटले: “तुम्ही तरुण आहात तर जा आणि दुसरा एखादा नवरा शोधा. मी तुझ्यासोबत लग्न करून चूक केली. आता मला एकाच पत्नीचा पती असले पाहिजे.”
त्यानंतर लगेचच आणखी एक समस्या उभी राहिली. बाकीच्या पत्नींना विवाह बंधनातून मोकळे करून एकच पत्नी ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काहींनी त्यांचे मन बदलले व त्यांनी आधी जी पत्नी ठेवली होती तिला सोडून दुसऱ्या पत्नींपैकी एकीला ठेवण्याची इच्छा दाखवली! यास्तव पुन्हा एकदा समस्या उभी राहिली.
“तारुण्यातल्या स्त्रीच्यामध्ये” असा उल्लेख असलेल्या मलाखी २:१४ वर आधारित याविषयी ब्रुकलिनवरून पुढील माहिती आली. पतींनी ज्या पत्नीसोबत विवाह केला आहे त्या पहिल्या पत्नीलाच ठेवावे असे ते मार्गदर्शन होते. अशा प्रकारे तो प्रश्न सरतेशेवटी सोडवण्यात आला.
सेवेचे विशेषाधिकार
सन १९४७ मध्ये संस्था मंडळ्यांना बळकट व विभागांमध्ये संघटित करू लागली. त्यांना ज्ञानी आणि प्रौढ बांधवांना, ‘बांधवांचे सेवक’ म्हणून नियुक्त करावयाचे होते ज्यांना आता विभागीय पर्यवेक्षक म्हटले जाते. मी अशा प्रकारच्या नियुक्तीचा स्वीकार करीन का अशी विचारणा बंधू ब्राऊन यांनी मला केली. मी त्यांना म्हणालो, की यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच तर माझा बाप्तिस्मा झाला आहे आणि पुढे म्हणालो, “तुम्हीच मला बाप्तिस्मा दिला. यहोवाची सेवा अधिक करण्याची संधी मला मिळत असताना मी तिला नाकारीन असे तुम्हाला वाटते का?”
त्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात, आमच्यापैकी सात जणांना लागोस येथे बोलावून विभागीय कार्यासाठी पाठवण्याआधी प्रशिक्षण देण्यात आले. त्या काळी विभाग बरेच मोठाले होते. संपूर्ण राष्ट्र केवळ सात विभागांमध्ये विभाजित करण्यात आले होते. मंडळ्या देखील अल्प होत्या.
बांधवांचे सेवक या नात्याने आमचे कार्य बरेच कठीण होते. आम्ही दरदिवशी अनेक किलोमीटर चालत जात होतो व बहुतेक वेळा उष्णकटिबंधाच्या जंगलातून जात होतो. प्रत्येक आठवडी आम्हाला एका गावातून दुसऱ्या गावी जावे लागत होते. कधीकधी मला वाटायचे की माझे पाय निखळून पडतील. काही वेळा मला वाटायचे की मी मरणाला टेकलोय! परंतु यामध्ये आम्हाला पुष्कळ आनंदही मिळत होता, खासकरून वाढत्या प्रमाणात लोक सत्याचा स्वीकार करत असलेले पाहून आम्हाला जास्त आनंद व्हायचा. इतकेच नव्हे, तर केवळ सात वर्षांमध्ये त्या राष्ट्रातील प्रचारकांची संख्या चौपट झाली!
मी विभागीय कार्यात १९५५ पर्यंत कार्य केले पण त्यानंतर माझी तब्येत बिघडल्यामुळे मला आयलेश येथे पुन्हा यावे लागले. तेथे मला शहर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. घरी राहिल्यामुळे माझ्या कुटुंबाला आध्यात्मिक रीत्या साहाय्य करण्याकडे अधिक लक्ष देण्यास मला शक्य झाले. आज माझी सहाही मुले विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत.
खरी प्रीती कधी अंतर देत नाही
मी गत वर्षांकडे पाहतो तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ अनेक कारणे आहेत. पुष्कळ निराशा, चिंता आणि आजारपण होते, पण आनंदाचे देखील अनेक क्षण होते. इतक्या वर्षांमध्ये आपले ज्ञान आणि समज वाढली असली तरी, “प्रीति कधी अंतर देत नाही” या १ करिंथकर १३:८ मधील वचनाचा अर्थ मी अनुभवानिशी शिकलो. तुम्ही यहोवावर प्रेम केले आणि त्याच्या सेवेत अविचल राहिलात तर तो तुम्हाला तुमच्या अडचणींमध्ये मदत करील व तुम्हाला समृद्धतेने आशीर्वाद देईल.
सत्याचा प्रकाश दिवसानुदिवस तेजोमय होत चालला आहे. आम्ही प्रथम सुरवात केली त्या वर्षांमध्ये, हर्मगिदोन फार लवकर येणार असे आम्हाला वाटत होते व म्हणून आम्ही होता होईल ते सर्व लवकरात लवकर करू पाहत होतो. पण आम्ही जे काही केले ते सर्व आमच्या लाभास्तव होते. त्यामुळेच मी स्तोत्रकर्त्याच्या शब्दांशी सहमत आहे: “माझ्या जिवांत जीव आहे तोवर मी परमेश्वराचे [यहोवा, NW] स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.”—स्तोत्र १४६:२.
[तळटीपा]
a अंतिम पुरावा बायबल आहे ही बंधू ब्राऊन यांची रीत असल्यामुळे यांना बायबल ब्राऊन असे म्हटले जात होते.—वॉचटावर (इंग्रजी) सप्टेंबर १, १९९२, पृष्ठ ३२ वरील “वास्तविक सुवार्तिकाची कापणी” हा लेख पहा.
[२३ पानांवरील चित्रं]
साम्युएल सन १९५५ मध्ये मिल्टन हेन्शल यांच्यासोबत
[२४ पानांवरील चित्रं]
साम्युएल त्यांची पत्नी ओलॉबिसी हिच्यासोबत