तुमचं भविष्य, तुमची निवड!
तुमचं भविष्य कसं असेल याची निवड तुम्ही करू शकता का? काही जण असं मानतात की आपल्या जीवनात जे घडतं ते आपल्या निर्णयांमुळे नाही तर नशिबामुळे घडतं. त्यांना जेव्हा एखादं ध्येय गाठता येत नाही, तेव्हा आपल्या नशिबात नाही असं म्हणून प्रयत्न करायचं ते सोडून देतात. “माझ्या भाग्यात असतं तर मिळालं असतं,” असं कारण ते देतात.
इतरांना या दुष्ट व अन्यायी जगातून आपली सुटका होणं अशक्य आहे या विचाराने निराशा येते. ते कदाचित आपली जीवनशैली चांगली बनवण्याचा प्रयत्न करतात. पण नंतर युद्ध, गुन्हेगारी, नैसर्गिक विपत्ती आणि रोगराई यांमुळे पुन्हा-पुन्हा त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतात. मग शेवटी ते असा निष्कर्ष काढतात: ‘आपल्या हातात थोड्याच असतात या गोष्टी! मग प्रयत्न करून तरी काय उपयोग?’
हे खरं आहे की आपल्या जीवनात जी परिस्थिती येते तिचा परिणाम आपल्या योजनांवर होऊ शकतो. (उपदेशक ९:११) पण अनंतकाळ जगण्याचं भविष्य मिळवण्याच्या बाबतीत मात्र निवड तुमच्या हातात आहे. खरंतर बायबल म्हणतं की तुम्ही घेत असलेल्या निर्णयांवर तुमचं भविष्य अवलंबून आहे. त्यात काय म्हटलं आहे ते पाहा.
प्राचीन इस्राएल राष्ट्र जेव्हा वचन दिलेल्या देशात पोहोचणार होतं, तेव्हा त्यांचं नेतृत्व करणाऱ्या मोशेने त्यांना म्हटलं: “जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा.”—अनुवाद ३०:१५, १९, २०.
“जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे.”—अनुवाद ३०:१९
देवाने इस्राएली लोकांना मिसरच्या गुलामीतून सोडवलं आणि त्यांच्यासमोर वचन दिलेल्या प्रदेशात स्वतंत्र व आनंदी जीवन जगण्याची आशा ठेवली. पण हे सर्व त्यांना सहजासहजी मिळणार नव्हतं. ते आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना ‘जीवन निवडावं’ लागणार होतं. ‘देवावर प्रीति करण्याद्वारे, त्याची वाणी ऐकण्याद्वारे व त्याला धरून राहण्याद्वारे’ ते हे करू शकणार होते.
आज तुमच्या पुढेही निवड करण्याचा पर्याय आहे आणि तुम्ही जी निवड कराल त्यावरून ठरेल की तुमचं भविष्य कसं असेल. जीवन निवडण्यासाठी म्हणजे या पृथ्वीवर नंदनवनात सर्वकाळ जगण्यासाठी देवावर प्रेम करण्याचा, तो सांगत असलेल्या गोष्टी ऐकण्याचा आणि त्याला धरून राहण्याचा निर्णय घेण्याद्वारे तुम्ही ही निवड करू शकता. पण या तीन गोष्टींमध्ये कशा-कशाचा समावेश होतो?
देवावर प्रीति कर
देवाच्या प्रेरणेने प्रेषित योहान याने म्हटलं की “देव प्रेम आहे.” (१ योहान ४:८) प्रेम हा देवाचा प्रमुख गुण आहे. येशूला ही गोष्ट माहीत होती; म्हणूनच जेव्हा त्याला विचारण्यात आलं की सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे तेव्हा तो म्हणाला: “तू आपला देव यहोवा याच्यावर आपल्या पूर्ण मनाने आणि आपल्या पूर्ण जिवाने आणि आपल्या पूर्ण बुद्धीने प्रेम कर.” (मत्तय २२:३७) भीतीमुळे किंवा डोळे बंद करून केलेल्या आज्ञापालनामुळे एका व्यक्तीची यहोवा देवासोबत मैत्री होऊ शकत नाही. त्याच्यासोबतची खरी मैत्री प्रेमावर आधारित असली पाहिजे. पण आपण त्याच्यावर प्रेम करण्याचं का निवडलं पाहिजे?
मानवजातीबद्दल असलेलं यहोवाचं प्रेम आपल्या मुलांसाठी असलेल्या पालकांच्या प्रेमासारखं आहे. अपरिपूर्ण असले तरी प्रेमळ पालक आपल्या मुलांना सूचना आणि प्रोत्साहन देतात. तसंच शिस्त लावतात आणि साहाय्यही करतात. कारण आपल्या मुलांनी आनंदी आणि यशस्वी व्हावं अशी त्यांची इच्छा असते. याच्या बदल्यात पालकांची मुलांकडून काय अपेक्षा असते? हीच की मुलांनी त्यांच्यावर प्रेम करावं. तसंच पालक या नात्याने त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मुलांच्या फायद्याच्या असल्यामुळे त्या त्यांनी ऐकाव्यात असंही त्यांना वाटतं. त्याच प्रकारे यहोवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपण मनापासून कृतज्ञ असावं अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. मग ही अपेक्षा योग्यच नाही का?
त्याची वाणी ऐक
बायबल ज्या मूळ भाषेत लिहिण्यात आलं होतं त्यात ‘ऐकणं’ याचा अर्थ सहसा ‘आज्ञा पाळणं’ असा होतो. आपण जेव्हा एका मुलाला म्हणतो की “आई-बाबांचं ऐक” तेव्हा आपल्या म्हणण्याचा अर्थ त्यांच्या आज्ञेत राहा असा असतो. यावरून कळतं की ‘देवाचं ऐकणं’ यात तो शिकवत असलेल्या गोष्टी शिकणं आणि त्यांचं पालन करणं सामील आहे. आपण देवाचा आवाज तर ऐकू शकत नाही. पण त्याच्या वचनात म्हणजे बायबलमध्ये जे म्हटलं आहे ते वाचण्याद्वारे व लागू करण्याद्वारे आपण त्याचं ऐकू शकतो.—१ योहान ५:३.
देवाच्या आज्ञांचं पालन करण्याचं महत्त्व पटवून देताना येशू एके प्रसंगी म्हणाला: “मनुष्याने केवळ भाकरीनेच नाही, तर यहोवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगावे.” (मत्तय ४:४) शारीरिक अन्न आपल्यासाठी महत्त्वाचं असतं, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं देवाबद्दलचं ज्ञान घेणं! असं का म्हणता येईल? बुद्धिमान राजा शलमोनने म्हटलं: “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते.” (उपदेशक ७:१२) देवाकडून मिळणाऱ्या ज्ञानामुळे आणि बुद्धीमुळे आज आपलं संरक्षण होऊ शकतं. तसंच आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यासाठीही मदत मिळेल आणि त्यामुळे भविष्यात सार्वकालिक जीवन मिळणं शक्य होईल.
त्याला धरून राहा
आधीच्या लेखात येशूने दिलेलं उदाहरण आठवा. त्याने म्हटलं होतं: “जीवनाकडे जाणारा दरवाजा अरुंद आणि रस्ता अडचणीचा आहे व फार कमी लोकांना तो सापडतो.” (मत्तय ७:१३, १४) अशा रस्त्यावरून चालताना कुशल मार्गदर्शकाची सोबत फायद्याची ठरू शकते. कारण यामुळे आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळवणं शक्य होईल. यहोवासोबत नातेसंबंध जोडण्याचं हे किती चांगलं कारण आहे! (स्तोत्र १६:८) आणि आपण हे कसं करू शकतो?
दररोज अशा बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर येतात ज्या करणं आपल्याला गरजेचं असतं आणि अशाही बऱ्याच गोष्टी असतात ज्या करायला आपल्याला आवडतं. पण या गोष्टींमुळे आपण व्यस्त होऊ शकतो किंवा आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. इतकं की देवाच्या इच्छेनुसार करण्यासाठी आपल्याकडे थोडाच वेळ उरेल किंवा वेळच उरणार नाही. यामुळेच बायबल आपल्याला सांगतं: “तुम्ही कसे चालता याकडे बारकाईने लक्ष द्या; मूर्खांसारखे नाही, तर बुद्धिमानांसारखे चाला. वेळेचा सर्वात चांगला उपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” (इफिसकर ५:१५, १६) देवासोबतचा नातेसंबंध जीवनात सर्वात महत्त्वाचा समजण्याद्वारे आपण त्याच्या आणखी जवळ जाऊ शकतो.—मत्तय ६:३३.
शेवटी निवड तुमच्या हाती आहे
भूतकाळातल्या गोष्टी बदलणं आपल्या हातात नसतं, पण तुमचं आणि तुमच्या प्रियजनांचं भविष्य सुरक्षित करणं तुमच्या हाती आहे. बायबल सांगतं की आपला स्वर्गीय पिता यहोवा देव आपल्यावर मनापासून प्रेम करतो आणि आपण काय केलं पाहिजे हे तो आपल्याला सांगतो. मीखा नावाचा संदेष्टा काय म्हणतो ते पाहा:
“हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:८.
तुम्ही यहोवासोबत चालण्याचं आमंत्रण स्वीकाराल का? कारण हे आमंत्रण स्वीकारणाऱ्यांना यहोवा सर्वकाळ टिकणारे आशीर्वाद देईल. पण काय निवडावं हे शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे.