देवाचा हात तुमच्या जीवनात कार्य करत आहे का?
“परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रगट होईल.”—यश. ६६:१४.
१, २. देवाबद्दल काही लोक कसा विचार करतात?
बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आपण जे काही करतो त्याचं देवाला काहीच घेणं-देणं नसतं. आपल्यासोबत जे काही घडतं, त्याची देवाला मुळीच फिकीर नसते. उदाहरणार्थ, नोव्हेंबर २०१३ मध्ये फिलीपाईन्स इथं झालेल्या एका भीषण चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याबद्दल बोलताना तिथल्या एका शहराच्या नगराध्यक्षकानं म्हटलं: “त्या वेळी देव नक्कीच कुठंतरी गेला असावा.”
२ इतर असेही काही जण आहेत ज्यांना वाटतं, की आपण जे काही करतो ते देवाला दिसत नाही. (यश. २६:१०, ११; ३ योहा. ११) प्रेषित पौलाच्या काळातही काही जण असाच विचार करायचे. ते अनीतिमान, दुष्ट, लोभी आणि वाईट मनोवृत्तीचे होते. म्हणून, पौलानं त्यांना “देवाची जाणीव ठेवण्यास” मान्य नसलेले लोक असं म्हटलं.—रोम. १:२८, २९.
३. (क) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत? (ख) देवाचा ‘हात’ कार्य करत असल्याचं बायबलमध्ये जे म्हटलं आहे, त्याचा काय अर्थ होतो?
३ मग आपल्याबद्दल काय? आपण करत असलेल्या सर्व गोष्टी यहोवा पाहतो हे तर आपल्याला माहीत आहे. पण तो आपल्यामध्ये व्यक्तिशः आस्था घेतो, असं आपण मानतो का? आपल्या जीवनातील घडामोडींमध्ये त्याचा मदतीचा हात असल्याचं आपण पाहू शकतो का? आपल्या सेवकांना मदत करण्यासाठी आणि आपल्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी यहोवा आपल्या सामर्थ्याचा वापर करतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये देवाचा ‘हात’ काम करत असल्याचं आपण बायबलमध्ये वाचतो, तेव्हा ती गोष्ट साध्य करण्यासाठी देव आपल्या शक्तीचा वापर करत आहे, असा याचा अर्थ होतो. (अनुवाद २६:८ वाचा.) येशू म्हणाला होता की काही लोक “देवाला पाहतील.” (मत्त. ५:८) तेव्हा आपणही अशा लोकांमध्ये आहोत का, याचा विचार आपण केला पाहिजे. पण आपण देवाला कसं ‘पाहू’ शकतो? बायबलमध्ये अशा काही लोकांची उदाहरणं आहेत, ज्यांनी आपल्या जीवनात देवाचा हात काम करत असल्याचं पाहिलं आहे. आणि बायबलमध्ये अशीही काही उदाहरणं आहेत ज्यांनी देवाचा हात कार्य करत असल्याचं नाकारलं. चला त्यांच्यापैकी काहींची उदाहरणे आता आपण पाहू या. शिवाय, देवाचा हात कार्य करत असल्याचं पाहण्यासाठी विश्वास आपल्याला कशी मदत करतो हेदेखील आपण पाहू या.
त्यांनी देवाचा हात कार्य करत असल्याचं नाकारलं
४. यहोवाचा हात इस्राएली लोकांसोबत आहे याकडे त्यांच्या शत्रूंनी दुर्लक्ष का केलं?
४ प्राचीन काळात देवानं इस्राएलांना कशी मदत केली ते पाहण्याची किंवा त्याविषयी ऐकण्याची संधी बऱ्याच लोकांना मिळाली. देवानं मोठमोठे चमत्कार करून इस्राएलांना इजिप्तमधून सोडवलं. तसंच एका मागून एक, राजांचा पराभव करण्यासाठीही यहोवानं आपल्या शक्तीचा वापर केला. (यहो. ९:३, ९, १०) पण यहोवानं आपल्या लोकांना कसं वाचवलं आहे हे प्रत्यक्ष पाहून किंवा ऐकूनसुद्धा, आसपासच्या इतर राजांनी “एकोपा” केला आणि ते “यहोशवा व इस्राएल यांच्याशी लढावयाला जमा झाले.” (यहो. ९:१, २) इस्राएलांशी लढत असताना देवाचा पराक्रमी हात त्यांच्यासोबत कसा कार्य करत आहे हे या राजांनी पाहिलं. यहोवाच्या असीम सामर्थ्यामुळेच इस्राएलांनी “आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला.” (यहो. १०:१३) पण, या राजांनी इस्राएलांशी युद्ध करावं म्हणून यहोवानं “त्यांची मने कठीण केली.” (यहो. ११:२०) साहजिकच इस्राएलांच्या सर्व शत्रूंचा पराभव झाला. कारण यहोवा त्याच्या लोकांच्या वतीनं लढत आहे, या गोष्टीकडे त्यांनी डोळेझाक केली.
५. दुष्ट राजा अहाबानं कोणती गोष्ट नाकारली?
५ नंतर दुष्ट राजा अहाबालादेखील, यहोवाचं सामर्थ्य कशा प्रकारे कार्य करत आहे हे पाहण्याची बऱ्याचदा संधी मिळाली. एलीयानं त्याला सांगितलं: “जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पर्जन्य पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.” (१ राजे १७:१) एलीयानं सांगितलेली गोष्ट केवळ यहोवाच्या ताकदीनंच शक्य होणार होती. पण अहाबानं ते मान्य केलं नाही. नंतर जेव्हा एलीयानं यहोवाला प्रार्थना केली तेव्हा आकाशातून अग्नी पाठवून यहोवानं त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. हे सर्व अहाबानं पाहिलं. शिवाय नंतरही एलीयानं अहाबाला असं सांगितलं, की यहोवा आता दुष्काळ संपवून जोरदार पाऊस पाडणार आहे. (१ राजे १८:२२-४५) अहाबानं हे सर्व चमत्कार पाहिले. पण तरीही यहोवाचं सामर्थ्य त्यानं नाकारलं. मग या सर्व उदाहरणांतून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच की, यहोवा आपल्या जीवनात कार्य करत आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
त्यांनी यहोवाचा हात पाहिला
६, ७. गिबोनी लोकांच्या आणि राहाबच्या उदाहरणातून कोणती गोष्ट दिसून येते?
६ गिबोनी लोक मात्र शेजारच्या राष्ट्रांपेक्षा खूप वेगळे होते. इस्राएली लोकांना यहोवाचा पाठिंबा आहे, हे त्यांनी ओळखलं. शिवाय यहोवा आणि त्यानं केलेल्या सर्व गोष्टींबद्दल त्यांनी ऐकलं होतं. त्यामुळे इस्राएलांशी लढण्यापेक्षा, त्यांच्यासोबत शांतीनं राहणं त्यांनी पसंत केलं. (यहो. ९:३, ९, १०) खरंच यहोवा इस्राएलांच्या वतीनं लढत आहे, हे ओळखणं त्यांच्यासाठी शहाणपणाचं ठरलं.
७ यहोवा आपल्या लोकांसाठी सक्रियपणे कार्य करतो हे राहाबनंदेखील ओळखलं. ती एक इस्राएली स्त्री नव्हती. पण इजिप्तमधून यहोवानं आपल्या लोकांची कशी सुटका केली हे तिनं ऐकलं होतं. त्यामुळे, जेव्हा दोन इस्राएली हेर तिच्याकडे आले, तेव्हा तिनं अगदी आत्मविश्वासानं त्यांना म्हटलं: “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे.” शिवाय, यहोवा आपल्याला आणि आपल्या परिवाराला वाचवू शकतो यावरही तिचा विश्वास होता. यहोवावर विश्वास असल्याचं दाखवणं आपल्यासाठी धोक्याचं आहे, हे माहीत असूनही तिनं यहोवावर विश्वास असल्याचं दाखवून दिलं.—यहो. २:९-१३; ४:२३, २४.
८. काही इस्राएली लोकांनी यहोवाचा हात कार्य करत आहे, हे कसं ओळखलं?
८ काही इस्राएली लोक दुष्ट राजा अहाबासारखे नव्हते. एलीयानं प्रार्थना केल्यानंतर स्वर्गातून अग्नी येताना त्यांनी पाहिला. आणि यामागे यहोवाचीच शक्ती असल्याचं त्यांनी ओळखलं. तेव्हा ते अगदी मोठ्यानं ओरडून म्हणू लागले: “यहोवा हाच देव आहे.” (१ राजे १८:३९, पं.र.भा.) हे यहोवाच्या ताकदीनंच घडलं होतं, याबद्दल त्यांच्या मनात जराही शंका नव्हती.
९. यहोवा कार्य करत असल्याचं आपण कसं पाहू शकतो?
९ आतापर्यंत आपण काही चांगली आणि वाईट उदाहरणं पाहिलीत. या उदाहरणांवरून, ‘देवाला पाहणं’ किंवा देवाचा हात कार्य करत असल्याचं पाहणं म्हणजे काय, हे आपण समजू शकलो. यहोवा आणि त्याच्या गुणांची ओळख झाल्यानंतर, आपण यहोवाचा ‘हात’ कशा प्रकारे कार्य करत आहे, ते आपल्या ‘अंतःचक्षुंनी’ म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या डोळ्यांनी पाहू शकतो. (इफिस. १:१८) त्यामुळेच गतकाळातील आणि सध्याच्या अशा विश्वासू सेवकांचं अनुकरण करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते, ज्यांनी यहोवाचा हात कार्य करत असल्याचं पाहिलं आहे. पण आज आपल्याजवळही असे काही पुरावे आहेत का, ज्यांवरून देव आपल्या लोकांना आजही मदत करतो हे दिसून येतं?
आजही देवाचा हात कार्य करत असल्याचे पुरावे
१०. यहोवा आजही लोकांना मदत करतो, याचा काय पुरावा आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१० यहोवा आजही त्याच्या लोकांची मदत करतो याचे पुष्कळ पुरावे आपल्याजवळ आहेत. उदाहरणार्थ, कुणीतरी मदतीकरता देवाला प्रार्थना करत होतं, आणि त्याच्या प्रार्थनेचं त्याला उत्तर मिळालं, हे सांगणारे कित्येक अनुभव आपण नेहमीच ऐकत असतो. (स्तो. ५३:२) जसं की, फिलीपाईन्स इथल्या एका लहान बेटावर प्रचारकार्य करताना ॲलन नावाच्या एका प्रचारकाला एक स्त्री भेटली. त्याला भेटताच ती स्त्री रडू लागली. तो म्हणतो: “त्या दिवशी सकाळीच तिनं, एका यहोवाच्या साक्षीदाराशी आपली भेट व्हावी म्हणून यहोवाला प्रार्थना केली होती.” काही काळाआधी साक्षीदारांसोबत ती बायबल अभ्यास करायची, पण लग्न झाल्यावर जेव्हा ती या बेटावर आली तेव्हा तिचा अभ्यास बंद झाला. देवानं तिच्या प्रार्थनेचं असं पटकन उत्तर दिल्यामुळे तिचं अंतःकरण भरून आलं. एका वर्षाच्या आतच तिनं यहोवाला समर्पण केलं.
यहोवाचा हात तुमच्या जीवनात ज्या वेगवेगळ्या मार्गांनी कार्य करत आहे, त्यांना तुम्ही ओळखू शकता का? (परिच्छेद ११-१३ पाहा)
११, १२. (क) यहोवा आपल्या सेवकांना कशी मदत करतो? (ख) यहोवानं एका बहिणीला कशी मदत केली? स्पष्ट करा.
११ धुम्रपान, मादक पदार्थांचं सेवन किंवा अश्लील साहित्य पाहण्याच्या वाईट सवयींवर मात करताना यहोवाच्या कित्येक सेवकांनी त्याची मदत अनुभवली आहे. काही जण म्हणतात, की आम्ही स्वतःच्या हिंमतीवर या गोष्टी सोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यात आम्हाला यश मिळालं नाही. पण जेव्हा त्यांनी यहोवाकडे मदत मागितली, तेव्हा यहोवानं त्यांना पराकोटीचं सामर्थ्य दिलं. त्यामुळे, त्यांना या वाईट सवयींपासून मुक्त होता आलं.—२ करिंथ. ४:७; स्तो. ३७:२३, २४.
१२ यहोवा व्यक्तिगत अडचणींवर मात करण्यासाठीसुद्धा आपल्या सेवकांना मदत करतो. ॲमीच्या बाबतीतही असंच झालं. पॅसिफिक महासागरातील एका बेटावर तिला राज्य सभागृह आणि मिशनरी होम बांधण्याच्या कामात नेमण्यात आलं होतं. तिथली संस्कृती वेगळी होती. शिवाय वीज-पाण्याची नेहमी टंचाई असायची. रस्तेसुद्धा पुरानं भरून जायचे. यासोबतच तिला घरची आठवणही येत होती. हॉटेलच्या एका लहान खोलीत तिच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. या सगळ्या अडचणी तर होत्याच त्यात एके दिवशी तिच्यासोबत काम करणाऱ्या एका बहिणीवरही ती खेकसली. पण नंतर तिला याचं खूप वाईट वाटलं. लाईट नसल्यानं अंधारलेल्या आपल्या खोलीत गेल्यावर तिनं यहोवाला मदतीकरता प्रार्थना केली. शिवाय लाईट आल्यावर गिलियड पदवीदान समारंभाविषयी टेहळणी बुरूज मासिकात असणारा एक लेखदेखील तिनं वाचला. या लेखात तिला सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींबद्दल चर्चा करण्यात आली होती. ती म्हणते: “त्या रात्री यहोवा जणू माझ्याशी बोलत असल्यासारखं मला वाटलं. मी करत असलेल्या सेवेत टिकून राहण्याचं प्रोत्साहन मला त्यामुळे मिळालं.”—स्तो. ४४:२५, २६; यश. ४१:१०, १३.
१३. प्रचारकार्याच्या आपल्या हक्काचं समर्थन करण्यासाठी यहोवानं आपल्याला मदत केली आहे, हे कोणत्या पुराव्यांवरून दिसून येतं?
१३ सुवार्ता सांगण्याच्या आपल्या अधिकाराचं समर्थन करण्यासाठी आणि न्यायिक स्तरावर तो हक्क प्राप्त करण्यासाठीदेखील यहोवानं त्याच्या लोकांना मदत केली आहे. (फिलिप्पै. १:७) उदाहरणार्थ, जेव्हा काही राजकीय सरकारांनी आपल्या प्रचारकार्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपल्या हक्कासाठी आपण न्यायालयात दाद मागितली. जगभरात आजवर आपण असे कमीतकमी २६८ उच्च न्यायालयीन खटले जिंकले आहेत. यांपैकी सन २००० पासून मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयातच आपण २४ खटले जिंकले आहेत. यावरून हेच स्पष्ट होतं, की देवाच्या कार्याला कोणीच खीळ घालू शकत नाही.—यश. ५४:१७; यशया ५९:१ वाचा.
१४. यहोवा आपल्या लोकांसोबत आहे, याचा आणखी कोणता पुरावा आपल्याकडे आहे?
१४ देवाचा हात कार्य करत असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे, जगभरात चाललेलं प्रचाराचं काम. (मत्त. २४:१४; प्रे. कृत्ये १:८) संपूर्ण जगभरातील यहोवाच्या सेवकांमध्ये असलेलं ऐक्य केवळ यहोवाच्या मदतीनंच शक्य आहे. असं ऐक्य आणखी कुठं पाहायला मिळेल! यहोवाला न मानणारे लोकही, “देव खरंच तुमच्यात आहे” असं म्हणून या गोष्टीला कबूल करतात. (१ करिंथ. १४:२५) खरंच, यहोवा त्याच्या लोकांसोबत आहे या गोष्टीचे पुष्कळ पुरावे आज आपल्याकडे आहेत. (यशया ६६:१४ वाचा.) पण तुमच्या व्यक्तिगत जीवनातही यहोवाचा हात कार्य करत असल्याचं तुम्ही पाहू शकता का?
व्यक्तिगत जीवनातही तुम्ही यहोवाचा हात पाहू शकता का?
१५. कधीकधी यहोवाचा हात आपल्या जीवनात कार्य करत असल्याचं आपल्या लक्षात का येत नाही?
१५ देवाचा हात आपल्या जीवनात कार्य करत असल्याचं, कधीकधी आपल्या लक्षात येत नाही. का बरं? याचं एक कारण म्हणजे जेव्हा आपल्यावर समस्या येतात, तेव्हा यहोवानं आपल्याला बऱ्याचदा मदत केली होती, हे आपण विसरून जातो. हीच गोष्ट एलीयाच्या बाबतीतही घडली. तो धाडसी होता. पण ईजबेल राणीनं त्याला मारण्याचा कट केला, तेव्हा तो घाबरला. यहोवानं याआधी त्याला कशी मदत केली होती, हे तो काही वेळापुरतं विसरला. बायबल सांगतं की त्याला अगदी मरून जावंसं वाटलं. (१ राजे १९:१-४) मग हवं असणारं धैर्य आणि मदत त्याला कुठून मिळणार होती? यासाठी त्याला यहोवाकडे पाहण्याची गरज होती.—१ राजे १९:१४-१८.
१६. समस्या असतात तेव्हादेखील आपण यहोवाला कसं पाहू शकतो?
१६ ईयोबसुद्धा आपल्या चिंतांनी इतका भारावून गेला होता, की त्याला यहोवाच्या दृष्टिकोनातून आपल्या परिस्थितीकडे पाहता आलं नाही. (ईयो. ४२:३-६) आणि कधीकधी आपणही आपल्या समस्यांमुळे यहोवाला पाहू शकत नाही. मग यहोवा आपल्यासाठी जे काही करत आहे, ते पाहता यावं म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? बायबल आपल्या समस्येविषयी काय म्हणतं यावर आपण मनन केलं पाहिजे. म्हणजे यहोवा करत असलेलं कार्य आपल्याला जाणवेल आणि मग आपल्यालाही असं म्हणता येईल: “मी तुजविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे.”
इतरांनाही आपली ओळख व्हावी म्हणून यहोवा तुमचा वापर करत आहे का? (परिच्छेद १७, १८ पाहा)
१७, १८. (क) यहोवाचा हात आपल्या जीवनात कार्य करत असल्याचं आपण कसं पाहू शकतो? (ख) यहोवा आज आपल्याला मदत कशी करतो, हे दाखवणारं उदाहरण सांगा.
१७ यहोवाचा हात आपल्या जीवनात कार्य करत असल्याचं तुम्ही कसं ओळखू शकता? थोडा विचार करा: सत्य समजून घेण्यासाठी यहोवानं तुम्हाला मदत केली आहे असं तुम्हाला वाटतं का? सभेत एखादं भाषण ऐकल्यावर, “हे खास माझ्यासाठीच होतं!” असं तुम्हाला कधी वाटलं आहे का? तुम्ही यहोवाला प्रार्थना केली, आणि यहोवानं त्या प्रार्थनेचं उत्तर दिलं असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का? तुम्ही आपलं सेवाकार्य वाढवण्याचं ठरवलं आणि त्यासाठी यहोवानं तुम्हाला कशी मदत केली, हे पाहून तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं आहे का? किंवा काही आध्यात्मिक कारणांसाठी तुम्ही नोकरी सोडली, पण “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही,” या देवाच्या वचनाची सत्यता तुम्ही कधी अनुभवली आहे का? (इब्री १३:५) या पाच गोष्टींपैकी एखादी गोष्ट जरी तुमच्या बाबतीत खरी ठरली असेल, तर यहोवाचा हात तुमच्या जीवनात कार्य करत आहे असं म्हणता येईल. यहोवासोबतचं आपलं नातं आणखी बळकट केल्यानं, आपल्या जीवनात तो कार्य करत असल्याचं आपण अगदी स्पष्टपणे पाहू शकतो.
१८ केनियामधील सारा नावाच्या एका बहिणीनं म्हटलं: “एकदा मी माझ्या एका बायबल विद्यार्थिनीसाठी प्रार्थना करत होते. बायबल अभ्यासाचं महत्त्व तिला पटलेलं नाही, असं मला वाटत होतं. तिचा बायबल अभ्यास मी बंद करावा का, असं मी यहोवाला विचारलं. आणि आश्चर्य म्हणजे, मी ‘आमेन’ म्हणताच फोन वाजला. तो तिचाच फोन होता आणि चक्क माझ्यासोबत ती सभेला येऊ शकते का, असं तिनं मला विचारलं! मला तर धक्काच बसला!” देव आपल्यासाठी काय करत आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न केला, तर त्याचा हात मदत करत असल्याचं आपल्यालाही पाहता येईल. आशिया खंडात राहणारी रॉना नावाची एक बहीण म्हणते, की यहोवा आपल्याला कसं साहाय्य करतो हे समजण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण, “एकदा का आपल्याला हे समजलं, की मग यहोवाला आपल्यात किती आस्था आहे हे पाहणं खरंच रोमांचक होऊन जातं.”
१९. देवाला पाहणं शक्य व्हावं म्हणून आपण आणखी काय करू शकतो?
१९ येशूनं म्हटलं की “जे अंतःकरणाचे शुद्ध” असतील, तेच “देवाला पाहतील.” (मत्त. ५:८) याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, आपण आपले विचार नेहमी शुद्ध ठेवले पाहिजेत आणि जे वाईट आहे ते करण्याचं टाळलं पाहिजे. (२ करिंथकर ४:२ वाचा.) या लेखात, आपण हे शिकलो की देवाला पाहता येण्यासाठी आपण त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध बळकट करत राहिला पाहिजे. आपल्या व्यक्तिगत जीवनात यहोवाचा हात कशा प्रकारे कार्य करत आहे, हे पाहण्यासाठी आपला विश्वास आपल्याला कशी मदत करतो यावर पुढील लेखात आपण चर्चा करू या.