तुम्ही देवावर रागावला आहात का?
“माझ्यावरच हे संकट का आलं? देवानं असं का होऊ दिलं?” ब्राझीलमधील २४ वर्षीय सिडनेला सतत हे प्रश्न भेडसावत होते. एकदा वॉटरपार्कमध्ये खेळत असताना त्याचा अपघात झाला ज्यामुळं त्याचं आयुष्यच बदलून गेलं. आता त्याला कायम व्हीलचेअर वापरावी लागते.
अपघात, आजारपण, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, नैसर्गिक आपत्ती आणि युद्ध यांमुळं लोकांना दुःख सहन करावं लागतं तेव्हा ते देवावर रागावतात. पण हे असं देवावर रागावणं नवीन नाही. बायबल लिहिले त्या काळात, ईयोब नावाचा एक मनुष्य होता ज्याच्यावर एका पाठोपाठ एक अशी संकटं आली. त्याला वाटलं, देवानंच त्याच्यावर ही संकट आणली. म्हणून अगदी दुःखी मनानं तो त्याला म्हणाला, ‘मी तुझ्याकडं मदतीची याचना करतोय पण तुझं माझ्याकडं लक्ष नाही. मी समोर उभा राहिलोय, पण तू फक्त माझ्याकडं पाहतोस. तू इतका क्रूर कसा झालास? तुझ्या सर्व शक्तीनं तू माझ्यावर हल्ला करतोस.’—ईयोब ३०:२०, २१.
ही संकटं का आली, किंवा देवानं ती त्याच्यावर का येऊ दिली, ते ईयोबाला ठाऊक नव्हतं. पण आज आपल्यावर संकटं का येतात, आपल्याला दुःख का सहन करावं लागतं त्याची कारणं आपल्याला बायबलमधून माहीत झाली आहेत. तसंच, अशा वेळेला आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे, तेही बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे.
लोकांनी दुःख भोगत राहावं, असा देवाचा उद्देश होता का?
बायबलमध्ये यहोवा देवाबद्दल असं म्हटलं आहे, की “त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) मग, “न्यायी व सरळ” असलेला देव मानवांनी दुःखात दिवस काढावेत असा विचारदेखील करू शकतो का? किंवा, मानवांवर संकटं आणून त्यांना तो शिक्षा देत असतो किंवा सुधारत असतो, ही गोष्ट आपल्या मनाला पटते का?
याऐवजी बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “कोणाची परीक्षा होत असता, त्याने देवाकडून माझी परीक्षा होत आहे असे म्हणू नये; कारण वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा होत नाही, आणि तो कोणाचीही परीक्षा तशी पाहत नाही.” (याकोब १:१३, पं.र.भा.) देवानं पहिल्या मानवी जोडप्याला अर्थात आदाम आणि हव्वा यांना बनवलं तेव्हा त्यानं एक उत्तम सुरुवात करून दिली होती, असं बायबलमध्ये सांगितलं आहे. त्यानं त्यांना राहायला एक छान घर दिलं अर्थात ही सुंदर पृथ्वी दिली होती. या पृथ्वीवर त्यांना हवं असलेलं सर्वकाही होतं. शिवाय, त्यांना आवडेल असं कामही देवानं त्यांना दिलं. तो त्यांना म्हणाला: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” त्यामुळं, आदाम व हव्वा अगदी आनंदात राहू शकत होते.—उत्पत्ति १:२८.
पण आजची परिस्थिती, आदाम आणि हव्वा जगत असलेल्या परिस्थितीच्या अगदी उलट आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहतो, मानवाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे,” हे बायबलमध्ये दिलेलं वर्णन किती खरं आहे. (रोमकर ८:२२) पण मग मानवावर दुःख का आलं? काय झालं आदाम आणि हव्वेचं?
दुःखाची सुरुवात कशी झाली?
त्याचं असं झालं: सुरुवातीला सर्व काही चांगलं होतं. पण एका देवदूतानं बंड केला आणि त्यामुळं त्याला दियाबल सैतान म्हटलं गेलं. या बंडखोर देवदूतानं मग, आदाम व हव्वा यांनासुद्धा त्याच्याप्रमाणं बंड करण्यास प्रवृत्त केलं. बरोबर काय आणि चूक काय हे, दुसरं-तिसरं कुणी नव्हे तर आपण स्वतः ठरवू शकतो, असं सांगून त्यानं त्यांनाही देवाविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केलं. देवानं सांगितलं होतं, की “बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ” खाऊ नका. पण, ही आज्ञा पाळण्याची काही गरज नाही, असं त्यानं या दोघांना सांगितलं. सैतान एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं देवावर असा दोष लावला, की तो लोकांपासून एक हक्क हिरावून घेत होता. चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याचा हक्क. (उत्पत्ति २:१७; ३:१-६) देवाच्या शासनाच्या अधीन न राहता मानव जर स्वतंत्रपणे जगला, तर तो खऱ्या अर्थानं सुखी होईल, असं म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. पण मग या सर्वामुळं एक महत्त्वाचा वादविषय उपस्थित झाला: देव शासन करण्यास पात्र आहे की नाही?
सैतानानं आणखी एक वादविषय उपस्थित केला. मानव देवाची सेवा स्वार्थापोटी करतात, असाही त्यानं आरोप केला. देवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्या ईयोबाविषयी तो देवाला म्हणाला: “तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. . . . पण जर तू त्याच्याजवळ जे काही आहे त्या सगळ्यावर आघात केलास तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करेल.” (ईयोब १:१०, ११, ईझी-टू-रीड व्हर्शन) इथं सैतान ईयोबाविषयी बोलत असला तरी, सर्व मानव स्वार्थी इच्छा बाळगूनच देवाची सेवा करतात, असंच त्याला म्हणायचं होतं.
देवानं हे वादविषय कसे सोडवले?
हे महत्त्वाचे वादविषय एकदाचेच सोडवण्याचा उत्तम मार्ग कोणता असू शकतो? सर्व-ज्ञानी असलेल्या देवाकडं सर्वोत्तम उपाय होता. त्यानं असा उपाय काढला ज्यामुळं आपण कोणीच त्याच्यावर रागावू शकत नाही. (रोमकर ११:३३) त्यानं असं ठरवलं, की मानवांना काही काळ राज्य करू द्यायचं आणि मग जे परिणाम होतील त्यावरून राज्य करायची कोणाची पद्धत योग्य आहे हे स्पष्टच होईल.
पृथ्वीवरील लोकांची दयनीय परिस्थिती पाहून कोणीही सांगू शकतं, की मानवाचं राज्य पूर्ण म्हणजे पूर्णपणेच अपयशी ठरलंय. जगातलं एकही सरकार शांती आणू शकलं नाही, लोकांना सुरक्षितता किंवा सुख देऊ शकलं नाही. शिवाय, त्यांनी पृथ्वीची नासाडीदेखील केलीय. “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही,” हे बायबलमधील वचन किती सत्य आहे! (यिर्मया १०:२३) फक्त देवाच्या राज्य करण्याच्या पद्धतीनंच मानवांना सुख, शांती व समृद्धी मिळू शकते. आणि देवाचा हाच उद्देश आहे!—यशया ४५:१८.
मग देव त्याचा हा उद्देश केव्हा पूर्ण करेल? येशूनं त्याच्या अनुयायांना एक प्रार्थना शिकवली होती. “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) तर या राज्याद्वारे देव, दुःखास कारणीभूत असलेल्या सर्व गोष्टी कायमच्या काढून टाकणार आहे. आणि हे तो त्याच्या ठरवलेल्या वेळी करणार आहे. (दानीएल २:४४) तेव्हा गरीबी, रोगराई, मृत्यू या सर्व गोष्टी इतिहासजमा होतील. “धावा करणारा दरिद्री, . . . ह्यांना तो सोडवेल,” असं वचन बायबलमध्ये दिलं आहे. (स्तोत्र ७२:१२-१४) या राज्यात, “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) देवाच्या स्मृतीत किंवा त्याच्या स्मरणात असलेल्या मृत जनांबद्दल येशूनं म्हटलं: “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील . . . आणि बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) आहेत की नाही ही हृदयस्पर्शी अभिवचनं!
देवावरचा आपला विश्वास वाढला की त्याच्याबद्दल आपल्या मनात असलेला राग निघून जाईल
देवाविषयी मनातील राग कसा घालवाल?
लेखाच्या सुरुवातीला सिडनेचा उल्लेख करण्यात आला होता. त्याचा अपघात होऊन १७ वर्षं उलटली आहेत. तो म्हणतो: “माझ्या अपघाताबद्दल मी यहोवाला दोष दिला नाही. पण हो, मी त्याच्यावर रागवलो होतो. आजही कधीकधी मी खूप निराश होतो. पूर्वीचे माझे दिवस मला आठवतात तेव्हा मला रडू येतं. पण बायबलमधून मी शिकलो, की माझा हा अपघात देवाकडून शिक्षा नव्हती, तर ‘समय व प्रसंग’ हे सर्वांवरच येतात म्हणजे वाईट प्रसंग कुणावरही ओढवू शकतात. यहोवाला प्रार्थना केल्यामुळं व बायबलमधील विशिष्ट वचनं वाचल्यामुळं त्याच्याबरोबरचं माझं नातं आणखी घनिष्ठ झालं आहे. आणि सकारात्मक विचार करायला मला मदत मिळाली आहे.”—उपदेशक ९:११, पं.र.भा.; स्तोत्र १४५:१८; २ करिंथकर ४:८, ९, १६.
देवानं अजूनपर्यंत दुःख का काढून टाकलेलं नाहीए त्याच्या कारणांवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्याबद्दल आपल्या मनात असलेला राग नक्कीच नाहीसा होईल. शिवाय, या दुःखामुळं आपल्याला भोगावे लागणारे परिणामदेखील तो लवकरच नाहीसे करणार आहे या गोष्टीनंसुद्धा आपल्याला दिलासा मिळू शकतो. यहोवाचा “शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ” देतो, असं वचन आपल्याला देण्यात आलं आहे. त्याच्यावर आणि त्याचा पुत्र येशू याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणावरही निराश व्हायची वेळ येणार नाही.—इब्री लोकांस ११:६; रोमकर १०:११. ▪ (w15-E 09/01)