मानवी दुःख त्याला देव अनुमती का देतो?
मनुष्याच्या इतिहासाच्या सुरवातीला, दुःख नव्हते, अश्रू नव्हते. मानवी दुःख अस्तित्वातच नव्हते. मानवजातीला परिपूर्ण सुरवात करून दिली होती. “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”—उत्पत्ती १:३१.
परंतु काही असा आक्षेप घेतात की, ‘एदेन बागेतील आदाम आणि हव्वेची कथा, केवळ एक रुपकात्मक वर्णन आहे.’ दुःखाची गोष्ट अशी की, ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक पाळक असे म्हणतात. परंतु ज्याच्या इतका कोणालाही अधिकार नाही त्या येशू ख्रिस्ताने देखील एदेन बागेतील ह्या घटना ऐतिहासिक असल्याची खात्री दिली. (मत्तय १९:४-६) शिवाय, देवाने मानवी दुःखाला अनुमती का दिली आहे हे समजून घेण्याचा एकच मार्ग म्हणजे, मानवाच्या सुरवातीच्या इतिहासाचे परीक्षण करणे होय.
पहिला मनुष्य आदाम याला, एदेन बागेची निगा राखण्याचे समाधानकारक काम दिले होते. त्यासोबतच, देवाने त्याच्यासमोर या एदेन गृहाचा विस्तार विश्वव्यापी आनंदमय बागेत करण्याचे ध्येय ठेवले होते. (उत्पत्ती १:२८; २:१५) हे मोठे कार्य साध्य करण्यास मदत व्हावी म्हणून देवाने त्याला हव्वा त्याची विवाहसोबतीण दिली. त्याने त्यांना फलद्रुप होण्यास, बहुगुणित होण्यास व पृथ्वी व्यापून टाकण्यास सांगितले. तरीही पृथ्वी आणि मानवजातीसाठी असलेल्या देवाच्या उद्देशाच्या यशाला बळकटी येण्यास आणखी कशाची तरी गरज होती. देवाच्या प्रतिरूपाचे बनवलेले असताना, मानवाकडे इच्छा स्वातंत्र्य होते; यास्तव, मानवाची इच्छा देवाच्या इच्छेच्या विरोधात न येण्याची आवश्यकता होती. नाहीतर, संपूर्ण विश्वात अव्यवस्था माजेल, आणि पृथ्वीला शांतीमय मानवी कुटुंबाद्वारे व्यापून टाकण्याचा देवाचा उद्देश साध्य होऊ शकणार नाही.
देवाच्या शासनाला अधीनता आपोआप येणार नव्हती. ती मानवाच्या प्रेमळ इच्छा स्वातंत्र्यातून व्यक्त व्हावयाची होती. उदाहरणार्थ, आम्ही वाचतो की, येशू ख्रिस्त कडक परीक्षेचा सामना करत असताना, त्याने प्रार्थना केली: “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”—लूक २२:४२.
त्याचप्रमाणे, देवाच्या शासनाला अधीन व्हावयाचे की नाही हे शाबीत करून दाखवण्याचे आदाम आणि हव्वेवर अवलंबून होते. या उद्देशास्तव, यहोवा देवाने एक साधी परीक्षा ठेवली. बागेतील एका झाडाला ‘बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणारे झाड’ असे म्हटले होते. ते, योग्य वर्तणूकीचे दर्जे ठरवणे देवाचा अधिकार आहे याचे प्रतिनिधीत्त्व करत होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, देवाने या विशिष्ट झाडाचे फळ खाण्याची मनाई केली. आदाम आणि हव्वेने जर अवज्ञा केली, तर त्याचा परिणाम त्यांच्या मृत्यूत होणार होता.—उत्पत्ती २:९, १६, १७.
मानवी दुःखाची सुरवात
एके दिवशी देवाच्या एका आत्मिक पुत्राने, देवाच्या शासन करण्याच्या पद्धतीविषयी शंका घेण्याचे धाडस केले. एका सापाचा माध्यम म्हणून वापर करून त्याने हव्वेला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” (उत्पत्ती ३:१) अशाप्रकारे हव्वेच्या मनात, देवाची शासन करण्याची पद्धत योग्य आहे की नाही अशा शंकेचे बीज पेरले गेले.a हव्वेने मात्र तिच्या पतीकडून जे ऐकले होते तेच बरोबर उत्तर दिले. परंतु मग त्या आत्मिक प्राण्याने देवाच्या विरूद्ध प्रतिपादन केले आणि अवज्ञा केल्यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी लबाडी केली. तो म्हणाला: “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”—उत्पत्ती ३:४, ५.
परंतु हव्वेला असे वाटले, की अवज्ञा केल्यामुळे मानवी दुःख नव्हे तर एक उत्तम जीवन मिळेल आणि अशाप्रकारे तिची दिशाभूल झाली. जितका अधिक वेळ ती ते फळ पाहात राहिली तितकेच तिला ते इष्ट वाटू लागले, आणि ती ते खाऊ लागली. नंतर तिने आदामालाही ते खाण्याची गळ घातली. आदामाने देवापेक्षा त्याच्या बायकोची मर्जी प्राप्त करण्याचे निवडले.—उत्पत्ती ३:६; १ तीमथ्य २:१३, १४.
या बंडाळीला चेतविल्याने, त्या आत्मिक प्राण्याने स्वतःला देवाचा एक विरोधक बनवले. अशाप्रकारे त्याला सैतान हे नाव पडले. हा इब्री शब्द आहे ज्याचा अर्थ “विरोधक” असा होतो. शिवाय त्याने देवाविषयी लबाडी करून स्वतःला निंदक बनवले. यास्तव, त्याला दियाबल असे म्हटले जाते. हा ग्रीक शब्द असून त्याचा “निंदक” असा अर्थ होतो.—प्रकटीकरण १२:९.
अशाप्रकारे, मानवी दुःखाची सुरवात झाली. देवाच्या तीन प्राण्यांनी त्यांच्या इच्छा स्वातंत्र्याच्या देणगीचा गैरवापर केला होता, त्यांनी त्यांच्या निर्माणकर्त्याच्या विरोधात जाऊन स्वार्थी जीवनशैली निवडली. आता प्रश्न समोर उभा राहिला की, देव त्याच्या बाकीच्या बुद्धिमान सृष्टिला, ज्यामध्ये स्वर्गातील विश्वासू देवदूत आणि आदाम व हव्वेचे भवितव्यातील संतान यांचाही समावेश असलेल्यांना पुन्हा आश्वासन मिळेल अशा न्याय्य मार्गाने या बंडाळीला कशाप्रकारे हाताळेल?
देवाचा सुज्ञ प्रतिसाद
काही जण असा वाद करतील की, देवाने लगेचच सैतान, आदाम आणि हव्वेचा नाश केला असता तर बरे झाले असते. परंतु अशाने बंडाळीमुळे जो वादविषय समोर उभा झाला होता तो सोडवला गेला नसता. सैतानाने देवाच्या शासन करण्याच्या पद्धतीविषयी वाद मांडला होता, तो असे सूचित करत होता की, मानव देवाच्या शासनातून स्वतंत्र होऊन जीवनाचा आनंद मुक्तपणे लुटू शकतील. शिवाय, पहिल्या दोन मानवांना देवाच्या शासनाविरूद्ध वळवण्यात यश मिळाल्यामुळे आणखी इतर वादविषय सामोरे आले. आदाम आणि हव्वेने पाप केल्यामुळे, देवाने मनुष्याला निर्माण करताना काही तरी घोटाळा झाला होता असा त्यातून अर्थ निघतो का? देवाशी विश्वासू राहू शकणारा असा कोणी त्याच्या पक्षाचा पृथ्वीवर असू शकेल का? सैतानाच्या बंडाळीला प्रत्यक्षात पाहिलेल्या यहोवाच्या दूतांबद्दल काय? ते त्याच्या सार्वभौमत्त्वाच्या धार्मिकतेला उंचावून धरतील का? निश्चितच, या वादविषयांना सोडवण्यासाठी पुरेसा वेळ हवा होता. याच कारणास्तव देवाने आमच्या दिवसापर्यंत सैतानाला अस्तित्वात राहू दिले आहे.
आदाम आणि हव्वेच्या बाबतीत पाहता, त्यांनी ज्या दिवशी अवज्ञा केली त्याच दिवशी देवाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. तेव्हापासून मृत्यूची क्रिया सुरू झाली. आदाम आणि हव्वेने पाप केल्यानंतर त्यांना जी मुले झाली, त्या सर्वांना त्यांच्या अपूर्ण पालकांकडून पाप आणि मृत्यूचा वारसा प्राप्त झाला.—रोमकर ५:१४.
सैतानाने पहिल्या दोन मानवांना त्याच्या बाजूने घेऊन त्याच्या ह्या वादविषयाची सुरवात केली. आदामाच्या सर्व संतानाला त्याच्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला जितक्या काळाची अनुमती देण्यात आली त्या सर्व काळाचा त्याने वापर केला आहे. त्याच्या बंडाळीत सामील होण्यास पुष्कळ देवदूतांनाही फुसलावण्यात त्याने यश मिळवले आहे. परंतु, देवाच्या बहुतेक दूतांनी, यहोवाच्या प्रभुत्वाची धार्मिकता निष्ठावानपणे उंचावून धरली आहे.—उत्पत्ती ६:१, २; यहुदा ६; प्रकटीकरण १२:३, ९.
देवाचे शासन विरूद्ध सैतानाचे, हा वादविषय होता आणि तो ईयोबाच्या दिवसातही ताजा होता. ह्या विश्वासू पुरूषाने हाबेल, हनोख, नोहा, अब्राहाम, इसहाक, याकोब आणि योसेफ या देव-भिरू लोकांनी केले त्याप्रमाणे, त्याच्या वागणुकीद्वारे सैतानी स्वातंत्र्याऐवजी देवाचे धार्मिक शासन निवडले. स्वर्गात देवाच्या विश्वासू दूतांसमोर झालेल्या चर्चेचा ईयोब एक विषय बनला. त्याने देवाच्या धार्मिक शासनाची कड घेतल्यामुळे देव सैतानाला म्हणाला: “माझा सेवक ईयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.”—ईयोब १:६-८.
स्वतःचा पराजय स्वीकारण्यास कबूल नसल्यामुळे, सैतानाने दावा केला की, देवाने ईयोबाला भौतिक संपत्ती देऊन समृद्ध केल्यामुळे तो स्वार्थी कारणांसाठी त्याची सेवा करत होता. यास्तव, सैतानाने स्वतःची बाजू हिरिरीने मांडून म्हटले: “तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” (ईयोब १:११) सैतान आणखी पुढे गेला, देवाच्या सर्व प्राण्यांच्या सत्वनिष्ठेविषयी त्याने वाद मांडला. त्याने आरोप लावला की, “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयोब २:४) या निंदात्मक हल्ल्यात केवळ ईयोबच नव्हे तर स्वर्गातील आणि पृथ्वीवरील देवाचे सर्व विश्वासू उपासक गोवले गेले. त्यांचे जीवन धोक्यात आल्यावर ते यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध तोडून टाकतील असे सैतानाने सुचवले.
यहोवा देवाला ईयोबाच्या सत्वनिष्ठेवर पूर्ण भरवसा होता. त्याचा पुरावा दाखवण्यासाठी त्याने सैतानाला ईयोबावर मानवी दुःख आणण्याची अनुमती दिली. ईयोबाने त्याच्या विश्वासूपणाद्वारे, त्याचे नाव निर्दोष ठरवले, व त्याहूनही महत्त्वपूर्ण म्हणजे, यहोवाच्या सार्वभौमत्त्वाच्या धार्मिकतेला उंचावले. दियाबल लबाड आहे हे तेथे शाबीत झाले.—ईयोब २:१०; ४२:७.
परंतु, परीक्षेत असताना विश्वासूपणाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण येशू ख्रिस्ताचे होते. देवाने या देव-पुत्राचे जीवन स्वर्गातून एका कुमारिकेच्या पोटी स्थलांतरीत केले होते. यास्तव, येशूला पाप आणि मृत्यूचा वारसा प्राप्त झाला नाही. उलट त्याची एक परिपूर्ण पुरूष म्हणून वाढ झाली, पहिल्या पुरूषाने त्याचे परिपूर्णत्व गमावण्याआधी तो ज्याप्रमाणे होता त्याच्या अगदी तुल्य येशू झाला. सैतानाने येशूला एक खास लक्ष्य बनवले. त्याच्या समोर अनेक मोहपाश व परीक्षा आणल्या व शेवटी मानखंडन करून मृत्यूने त्याचा अंत केला. परंतु सैतान येशूची सत्वनिष्ठा तोडण्यात अपयशी ठरला. एका पूर्ण मार्गाने येशूने त्याच्या पित्याच्या शासनाच्या धार्मिकतेला उंचावून धरले. त्याने हेही शाबीत करून दाखवले की, परिपूर्ण आदामाकडे देखील सैतानाच्या बंडाळीला सामील होण्याची काही सबब नव्हती. आदाम त्याच्या त्या लहानशा परीक्षेत विश्वासू राहू शकला असता.
आणखी काय शाबीत झाले आहे?
आदाम आणि हव्वेने बंडाळी केल्यापासून मानवी दुःखाची ६,००० वर्षे लोटली आहेत. या वेळेदरम्यान देवाने मानवजातीला पुष्कळ विविध प्रकारच्या सरकारांचा प्रयोग करण्यासाठी अनुमती दिली. मानवी दुःखाचा भयानक अहवाल हेच शाबीत करतो की, मनुष्यामध्ये स्वतःहून शासन करण्याचे सामर्थ्य नाही. वास्तविक पाहता, पृथ्वीच्या अनेक क्षेत्रांमध्ये अराजकता चालू आहे. देवापासून स्वतंत्र राहावे हे सैतानाने केलेले समर्थन आपत्तीकारक आहे.
यहोवाला स्वतःसाठी काहीही शाबीत करून घ्यायचे नाही. त्याला हे पूर्णपणे ठाऊक आहे की, शासन करण्याची त्याची पद्धत धार्मिक व त्याच्या प्राण्यांच्या हितावह आहे. परंतु, सैतानाच्या बंडाळीने जितके वाद समोर मांडले आहेत त्या सर्वांना समाधानकारक उत्तरे देण्यासाठी, त्याने त्याच्या बुद्धिमान प्राण्यांना त्याच्या धार्मिक शासनाला त्यांची पसंती प्रदर्शित करण्याची संधी दिली आहे.
दियाबलाच्या हातून दुःख सोसण्याच्या या तात्पुरत्या काळापेक्षा, देवावर प्रीती केल्याने आणि त्याला विश्वासू राहिल्याने मिळणारी प्रतिफळे अधिक श्रेष्ठ आहेत. ईयोबाची घटना याचे उदाहरण देते. दियाबलाने ईयोबावर आणलेल्या आजारातून यहोवा देवाने त्याला पूर्णपणे बरे केले. त्यासोबत, “पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली.” सरतेशेवटी, एकशे चाळीस वर्षे जगल्यानंतर, “ईयोब वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला.”—ईयोब ४२:१०-१७.
ख्रिस्ती बायबल लेखक याकोब असे म्हणून लक्ष आकर्षित करतो: “तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभुचा [यहोवा, NW] जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्यावरून यहोवा फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.”—याकोब ५:११, तळटीप, NW.
आता सैतान आणि त्याच्या जगाला दिलेला वेळ संपला आहे. लवकरच, देव सैतानाच्या बंडाळीने मानवजातीवर आणलेल्या सर्व दुःखाला उलटविणार आहे. मृतांना देखील उठविण्यात येईल. (योहान ११:२५) मग, ईयोबासारख्या विश्वासू पुरूषांना नंदनवनमय पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची संधी मिळेल. देव भवितव्यात त्याच्या विश्वासू सेवकांवर ज्या आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे, त्यामुळे त्याला तो धार्मिक सार्वभौम, खरोखर “फार कनवाळू आणि दयाळू” या नात्याने युगानुयुगासाठी गौरविले जाईल.
[तळटीपा]
a २० व्या शतकातील एक वकील आणि लेखक, फिलिप्प मोरो यांनी “दुष्टतेचा उगम” या त्यांच्या पुस्तकातील चर्चेत या वादविषयाचे परीक्षण केले व अशी समाप्ती केली की, “हेच सर्व मानवजातीच्या दुःखाला कारणीभूत” आहे.
[८ पानांवरील चित्रं]
पृथ्वीला एदेनासारख्या नंदनवनात रूपांतर करण्याचा देवाचा उद्देश पूर्ण झालाच पाहिजे!