वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 १/१५ पृ. २३-२७
  • यहोवाच्या साहाय्यानं आपल्या विवाहाचं रक्षण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या साहाय्यानं आपल्या विवाहाचं रक्षण करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या अंतःकरणाचं रक्षण करा
  • देवाशी मैत्रीचं नातं जोडा
  • “नवा मनुष्य” धारण करा
  • मोकळेपणानं एकमेकांशी बोला
  • वैवाहिक हक्क देणं
  • आपल्या वैवाहिक नात्याचं रक्षण करा
  • ख्रिस्ती विवाह यशस्वी कसा बनवाल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुमच्या विवाहास टिकाऊ बंधन बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • तुमचं वैवाहिक नातं मजबूत आणि आनंदी बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे”
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 १/१५ पृ. २३-२७
१. हसत असलेलं एक आनंदी जोडपं; २. तेच जोडपं कामाच्या ठिकाणी प्रलोभनांचा सामना करताना आणि साक्षीदार नसलेल्या लोकांसोबत अनावश्‍यक वेळ घालवण्याचं टाळताना

यहोवाच्या साहाय्यानं आपल्या विवाहाचं रक्षण करा

“परमेश्‍वर जर नगर रक्षीत नाही तर पहारेकऱ्‍याचे जाग्रण व्यर्थ आहे.”—स्तो. १२७:१ब.

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण का केलं पाहिजे?

  • देवासोबत मैत्री करणं महत्त्वाचं का आहे?

  • मोकळेपणानं एकमेकांशी बोलल्यामुळे पती-पत्नी कशा प्रकारे एकमेकांच्या जवळ येतात?

१, २. (क) इस्राएली लोकांपैकी २४,००० जण वचन दिलेल्या देशात का जाऊ शकले नाहीत? (ख) पुरातन काळात घडलेली ही घटना आपल्यासाठी महत्त्वाची का आहे?

इस्राएली लोक वचन दिलेल्या देशाच्या अगदी जवळ येऊन पोचले होते आणि लवकरच त्यात प्रवेश करणार होते. पण, तेव्हा हजारो इस्राएली पुरुषांनी “मवाबी कन्यांशी व्यभिचार” केला. त्यामुळे, यहोवानं २४,००० इस्राएली पुरुषांचा नाश केला. खरंच, किती दुःखाची गोष्ट! वचन दिलेल्या देशात जाण्यासाठी ते बऱ्‍याच काळापासून वाट पाहत होते. पण, त्या देशाच्या इतक्या जवळ पोचूनसुद्धा ते त्यात प्रवेश करू शकले नाही आणि यहोवाकडून मिळणार असलेले सर्व आशीर्वाद गमावून बसले. असं का घडलं? मोहाला बळी पडून अनैतिक कृत्य केल्यामुळे!—गण. २५:१-५, ९.

२ इस्राएली लोकांसोबत घडलेली ही दुःखद घटना बायबलमध्ये का लिहून ठेवण्यात आली आहे? “जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी” ती लिहिण्यात आली आहे. (१ करिंथ. १०:६-११) आज आपण शेवटल्या काळाच्या अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोचलो आहोत. नवीन जग फार जवळ आलं आहे. (२ तीम. ३:१; २ पेत्र ३:१३) पण, दुःखाची गोष्ट म्हणजे यहोवाच्या उपासकांपैकी काही जणांनी देवाच्या नीतिनियमांकडे दुर्लक्ष केलं आहे. यामुळे ते मोहाला बळी पडून अनैतिक कृत्ये करून बसले आहेत. अशा अनैतिक कामांमुळे होणारे दुःखद परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागले आहेत. शिवाय जर त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही, तर नंदनवनात सर्वकाळ जगण्याचा आशीर्वादही ते कदाचित गमावून बसतील!

३. पती-पत्नींना यहोवा देवाच्या मार्गदर्शनाची आणि संरक्षणाची गरज का आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

३ आजच्या जगात व्यभिचारी वृत्तीला ऊत आला आहे. त्यामुळे पती-पत्नींना यहोवा देवाच्या मार्गदर्शनाची आणि संरक्षणाची खूप गरज आहे. (स्तोत्र १२७:१ वाचा.) पती-पत्नी कशा प्रकारे आपलं वैवाहिक बंधन सुरक्षित ठेवू शकतात याविषयी आपण या लेखात चर्चा करणार आहोत. यासाठी त्यांनी आपल्या अंतःकरणाचं रक्षण करणं, देवाशी मैत्रीचं नातं जोडणं, देवाला आवडणारे गुण उत्पन्‍न करणं, मोकळेपणानं एकमेकांशी बोलणं आणि आपल्या जोडीदाराला त्याचा वैवाहिक हक्क देणं हे गरजेचं आहे.

आपल्या अंतःकरणाचं रक्षण करा

४. काहींना कशामुळे अनैतिक कृत्ये करण्याचा मोह झाला?

४ पण, यहोवाच्या एखाद्या उपासकाच्या हातून व्यभिचारासारखं अनैतिक कृत्य घडतं तरी कसं? याची सुरवात सहसा डोळ्यांपासून होते. येशूनं म्हटलं: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्त. ५:२७, २८; २ पेत्र २:१४) व्यभिचारात पडलेल्या अनेकांनी सुरवातीला अश्‍लील चित्रं पाहण्याद्वारे, कामुक भावना उत्तेजित करणाऱ्‍या कथा-कादंबऱ्‍या वाचण्याद्वारे किंवा इंटरनेटवर घाणेरडी दृश्‍यं पाहण्याद्वारे यहोवाच्या नैतिक तत्त्वांकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली होती. इतरांना अश्‍लील चित्रपट, नाटकं किंवा टीव्ही कार्यक्रम पाहण्याची सवय होती. तर, काही जण डान्सबारमध्ये किंवा जिथं घाणेरडे प्रकार चालतात अशा मसाज सेंटर्सला जात होते.

५. आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण करणं गरजेचं का आहे?

५ काही जण आपल्या जोडीदाराशिवाय दुसऱ्‍या व्यक्‍तीकडून मैत्रीची व आपुलकीची अपेक्षा करतात आणि त्यामुळे ते वाईट कृत्य करण्याच्या मोहाला बळी पडतात. आजच्या जगात लोक संयम बाळगत नाहीत. तसंच, ते सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टींनी स्वतःचं मनोरंजन करतात. अशा वातावरणात आपण राहत असल्यामुळे आपलं कपटी हृदयदेखील आपल्याला सहज फसवू शकतं. आणि अशा रीतीनं आपल्या जोडीदाराशिवाय दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीकडे आपण आकर्षित होऊ शकतो. (यिर्मया १७:९, १० वाचा.) येशूनं म्हटलं: “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे . . . ही निघतात.”—मत्त. १५:१९.

६, ७. (क) मनात अयोग्य इच्छा निर्माण झाल्यास काय घडू शकतं? (ख) आपण यहोवाविरुद्ध पाप करण्याचं कसं टाळू शकतो?

६ एकदा मनात वाईट इच्छा उत्पन्‍न झाल्या, की मग एकमेकांकडे आकर्षित झालेल्या दोन व्यक्‍ती नको त्या विषयांवर एकमेकांशी चर्चा करू लागतात. असे विषय, ज्यांवर खरंतर एका व्यक्‍तीनं फक्‍त आपल्या विवाह जोडीदाराशीच बोललं पाहिजे. काही काळानं या दोन व्यक्‍ती एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी काही ना काही निमित्त शोधू लागतात. लोकांना मात्र ते असं दाखवतात की आपण ठरवून नाही, तर अचानकच भेटलो आहोत. एकमेकांप्रती त्यांचं आकर्षण जसजसं वाढू लागतं, तसतसं ते यहोवाच्या नीतिनियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागतात. पापाच्या मार्गावर मग ते इतक्या पुढे निघून जातात की तिथून मागे फिरणं जवळजवळ अशक्य असतं. आपण चूक करत आहोत हे माहीत असूनही ते स्वतःला रोखू शकत नाहीत.—नीति. ७:२१, २२.

७ हळूहळू या दोन व्यक्‍तींना यहोवाच्या नैतिक तत्त्वांचा पूर्णपणे विसर पडतो. आता ते फक्‍त एकमेकांशी बोलण्यावरच थांबत नाहीत, तर हात धरणं, चुंबन घेणं किंवा कामुक भावना उत्तेजित होतील अशा प्रकारे स्पर्श करणं यांसारख्या गोष्टीही ते करू लागतात. दुसऱ्‍या शब्दांत, ज्या गोष्टी फक्‍त आणि फक्‍त विवाह जोडीदारासोबतच केल्या जाव्यात अशा गोष्टी ते करू लागतात. अशा रीतीनं ते ‘आपल्या वासनेने ओढले जाऊन भुलवले जातात आणि मोहात पडतात.’ मग वासना गर्भवती होऊन “पापाला जन्म देते,” म्हणजेच ते व्यभिचार करून बसतात. (याको. १:१४, १५) खरंच, ही किती दुःखाची गोष्ट आहे! जर या दोन्ही व्यक्‍तींनी विवाहाच्या पवित्र बंधनाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन स्वीकारला असता, तर असं भयंकर पाप त्यांच्या हातून घडलंच नसतं. तर मग, एक व्यक्‍ती कशा प्रकारे यहोवाच्या मदतीनं आपल्या मनात विवाहाबद्दल आदर उत्पन्‍न करू शकते?

देवाशी मैत्रीचं नातं जोडा

८. यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडल्यामुळे अनैतिक गोष्टींपासून दूर राहण्यास कशा प्रकारे मदत मिळते?

८ स्तोत्र ९७:१० वाचा. यहोवाशी जवळचा नातेसंबंध जोडणं हा अनैतिक गोष्टी टाळण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. जेव्हा आपण देवाच्या सुंदर गुणांबद्दल ज्ञान घेतो तेव्हा “देवाची प्रिय मुले या नात्याने” त्याचे “अनुकरण” करण्याची आणि “प्रीतीने चालण्याची” आपल्याला प्रेरणा मिळते. असं केल्यामुळे लैंगिक अनैतिकता आणि सर्व प्रकारच्या अशुद्ध गोष्टींना ठामपणे नकार देणं आपल्याला शक्य होतं. (इफिस. ५:१-४) देव, “जारकर्मी व व्यभिचारी यांचा न्याय” करेल हे माहीत असल्यामुळे पती व पत्नी नेहमी आपल्या विवाहाचं बंधन पवित्र ठेवण्याचा, म्हणजेच एकमेकांना विश्‍वासू राहण्याचा प्रयत्न करतात.—इब्री १३:४.

९. (क) योसेफानं मोहाचा सामना कसा केला? (ख) योसेफाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

९ देवाच्या उपासकांपैकी काहींनी नोकरीच्या ठिकाणी स्वतःला धोकादायक परिस्थितीत टाकलं आहे. साक्षीदार नसलेल्या सहकर्मींसोबत कामाच्या वेळांनंतर सहवास करण्याद्वारे त्यांनी असं केलं आहे. खरंतर, कामाच्या वेळांतसुद्धा एका व्यक्‍तीसमोर अनैतिक गोष्टी करण्याचा मोह येऊ शकतो. योसेफाचं उदाहरण लक्षात घ्या. तो तरुण आणि देखणा होता. त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला एका कठीण परीक्षेला तोंड द्यावं लागलं. त्याच्या मालकाची बायको त्याच्याकडे आकर्षित झाली होती, आणि तिला कसंही करून त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं होतं. ती दररोज त्याला आपल्यासोबत वाईट काम करण्याची गळ घालायची. एकदा तर तिनं जबरदस्तीनं त्याला आपल्यासोबत अनैतिक कृत्य करायला लावण्याचा प्रयत्न केला. पण, योसेफ तिथून पळून गेला. अशा बिकट परिस्थितीत सापडूनही यहोवाला विश्‍वासू राहणं योसेफाला कशामुळे शक्य झालं? यहोवासोबतच्या त्याच्या मैत्रीमुळे. त्याला कोणत्याही परिस्थितीत यहोवासोबतचा आपला नातेसंबंध बिघडू द्यायचा नव्हता. हे खरे आहे, की योसेफाला त्याची नोकरी गमवावी लागली आणि निर्दोष असूनही तुरुंगात जावं लागलं; पण यहोवानं त्याला अनेक आशीर्वाद दिले. (उत्प. ३९:१-१२; ४१:३८-४३) आज, यहोवाच्या उपासकांनी चुकीचं कृत्य करण्याचा मोह होऊ शकेल असे सर्व प्रसंग टाळले पाहिजेत; मग ते कामाच्या ठिकाणी असोत किंवा आणखी कुठं.

“नवा मनुष्य” धारण करा

१०. “नवा मनुष्य” धारण केल्यामुळे आपला कशापासून बचाव होतो?

१० नवा मनुष्य हा “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला” आहे, असं बायबल सांगतं. म्हणून, हा नवा मनुष्य धारण केल्यामुळे, म्हणजेच देवाला आवडणारे ख्रिस्ती गुण विकसित केल्यामुळे पतीला व पत्नीला सर्व प्रकारच्या अशुद्ध कामांपासून दूर राहणं शक्य होईल. (इफिस. ४:२४) जे “नवा मनुष्य” धारण करतात ते “जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ” यांसारख्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आपल्या शारीरिक अवयवांना ‘जिवे मारतात.’ (कलस्सैकर ३:५, ६ वाचा.) या वचनांत “जिवे मारा” असं जे म्हटलं आहे त्याचा काय अर्थ होतो? अनैतिक वासनांवर मात करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण केलं पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. आपल्या जोडीदाराशिवाय इतर व्यक्‍तीबद्दल आपल्या मनात अयोग्य इच्छा ज्यांमुळे उत्पन्‍न होतील, अशा सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. (ईयो. ३१:१) देवाच्या नैतिक तत्त्वांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केल्यामुळे, “वाइटाचा वीट” मानणं आणि “बऱ्‍याला चिकटून” राहणं आपल्याला शक्य होईल.—रोम. १२:२, ९.

११. “नवा मनुष्य” धारण केल्यामुळे पती-पत्नीचं वैवाहिक नातं कशा प्रकारे दृढ होतं?

११ जेव्हा आपण “नवा मनुष्य” धारण करतो तेव्हा आपण यहोवाच्या गुणांचं अनुकरण करू लागतो. (कलस्सै. ३:१०) असं केल्यामुळे “ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता” यांसारखे गुण आपण दाखवू लागतो. यामुळे आपल्याला सर्व अनैतिक गोष्टींपासून दूर राहायला मदत मिळते आणि आपल्या वैवाहिक जीवनावर यहोवाचा आशीर्वाद असतो. (कलस्सै. ३:१२) तसंच, जेव्हा आपण ‘ख्रिस्ताच्या शांतीला आपल्या अंतःकरणावर राज्य’ करू देतो तेव्हा एकमेकांसोबत जास्त प्रेमानं व आदरानं वागणं आपल्याला शक्य होतं. (कलस्सै. ३:१५) पती व पत्नी यांच्यात “खरा स्नेहभाव” असतो तेव्हा त्यांचं वैवाहिक जीवन खरोखरच सुखी होतं. ते आपल्या जोडीदाराला आदर दाखवण्यात स्वतःहून पुढाकार घेतात.—रोम. १२:१०.

१२. तुमच्या मते सुखी वैवाहिक जीवनासाठी कोणते गुण महत्त्वाचे आहेत?

१२ ‘तुमच्या आनंदी वैवाहिक जीवनाचं रहस्य काय?’ असं जेव्हा सिड नावाच्या एका बांधवाला विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले: “सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे प्रेम. आणि आम्ही नेहमी आमच्यातलं प्रेमाचं बंधन आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न करतो. तसंच, सौम्यपणासुद्धा खूप महत्त्वाचा गुण आहे असं आम्हाला वाटतं.” त्यांची पत्नी सोनिया म्हणते: “विचारशीलपणे वागणंही खूप गरजेचं आहे. तसंच नम्रपणा दाखवणंही महत्त्वाचं आहे. हे नेहमीच सोपं नसतं, तरी आम्ही एकमेकांशी नम्रतेनं वागण्याचा प्रयत्न करतो.”

मोकळेपणानं एकमेकांशी बोला

१३. वैवाहिक नातं टिकवून ठेवण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे आणि का?

१३ वैवाहिक नातं टिकवून ठेवण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा विचार करून त्याच्याशी बोलणं नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. काही जण कधीकधी अनोळखी लोकांशी, इतकंच काय तर पाळीव प्राण्यांशीही प्रेमानं बोलतात; पण, आपल्या जोडीदाराशी मात्र प्रेमानं आणि आदरानं बोलत नाहीत. ही खरंच किती दुःखाची गोष्ट आहे! पती व पत्नी एकमेकांशी रागानं बोलतात, एकमेकांच्या अंगावर ओरडतात आणि एकमेकांचा अपमान करतात तेव्हा हळूहळू त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागतो. (इफिस. ४:३१) म्हणूनच, सतत टीका करून किंवा खोचक बोलून एकमेकांचं मन दुखावण्याऐवजी पती-पत्नींनी प्रेमळ, सौम्य आणि विचारशीलपणे एकमेकांशी बोललं पाहिजे. असं केल्यामुळे त्यांचं नातं दिवसेंदिवस घट्ट होत जाईल.—इफिस. ४:३२.

१४. पती-पत्नींनी काय करण्याचं टाळलं पाहिजे?

१४ “मौन धरण्याचा समय” असतो असं बायबल म्हणतं. (उप. ३:७) पण, मतभेद होतात तेव्हा आपण आपल्या जोडीदाराशी बोलणंच सोडून द्यावं असा याचा मुळीच अर्थ होत नाही. कारण, सुखी विवाहासाठी पती-पत्नींनी एकमेकांना आपले विचार मोकळेपणानं सांगणं खूप गरजेचं असतं. जर्मनीत राहणारी एक विवाहित बहीण असं म्हणते, “अशा परिस्थितीत अबोला धरून खरंतर आपण जोडीदाराला दुखावत असतो.” पण ती पुढे असंही म्हणते: “तणावात आपल्या भावनांवर ताबा ठेवणं कठीण असलं, तरीसुद्धा रागाच्या भरात आपण जोडीदाराला वाटेल ते बोलू नये. कारण आपल्या शब्दांमुळे किंवा वागण्यामुळे त्याच्या भावना दुखावून समस्या आणखीनच चिघळू शकते.” आरडाओरडा करून किंवा अबोला धरून समस्या सुटत नसतात हे पती-पत्नींनी लक्षात ठेवलं पाहिजे. याउलट, जेव्हा ते झालेले मतभेद लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न करतात; आणि वादाचं रूपांतर भांडणात होऊ देण्याचं टाळतात तेव्हा ते आपलं वैवाहिक नातं टिकवून ठेवू शकतात.

१५. मोकळेपणानं एकमेकांना आपले विचार सांगितल्यामुळे वैवाहिक जीवन कशा प्रकारे सुखी बनू शकतं?

१५ पती-पत्नी मोकळेपणानं आपले विचार आणि भावना एकमेकांना सांगतात तेव्हा त्यांच्या नात्यातली वीण दिवसेंदिवस घट्ट होत जाते. आपण काय बोलतो, इतकंच नव्हे तर ते कसं बोलतो हेसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे, तुमच्यात मतभेद होतात तेव्हासुद्धा तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा विचार करूनच त्याच्याशी बोला. तुम्ही ज्या आवाजात बोलता आणि ज्या शब्दांत आपले विचार मांडता त्यामुळे जोडीदार दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. असं केल्यास तुमच्या जोडीदाराला तुमचं म्हणणं ऐकून घेणं सोपं जाईल. (कलस्सैकर ४:६ वाचा.) एकमेकांना प्रोत्साहन मिळेल आणि आनंद वाटेल अशा प्रकारे जेव्हा पती-पत्नी बोलतात, तेव्हा त्यांचं वैवाहिक जीवन सुखी बनतं.—इफिस. ४:२९.

मोकळेपणानं एकमेकांशी बोलताना पती-पत्नी

पती-पत्नी मोकळेपणानं एकमेकांना आपले विचार सांगतात तेव्हा त्यांचं वैवाहिक नातं आणखी मजबूत होतं (परिच्छेद १५ पाहा)

वैवाहिक हक्क देणं

१६, १७. पती-पत्नींनी एकमेकांच्या भावनिक आणि शारीरिक गरजांकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे?

१६ वैवाहिक नातं घट्ट करण्यासाठी पती-पत्नींनी स्वतःपेक्षा आपल्या जोडीदाराचा विचार करणंदेखील खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्‍या शब्दांत, त्यांनी स्वतःच्या इच्छांपेक्षा जोडीदाराच्या इच्छांना महत्त्व देणं गरजेचं आहे. (फिलिप्पै. २:३, ४) पतीनं आणि पत्नीनंसुद्धा एकमेकांच्या भावनिक आणि शारीरिक गरजा समजून घेतल्या पाहिजे.—१ करिंथकर ७:३, ४ वाचा.

१७ दुःखाची गोष्ट म्हणजे, बरेच जोडीदार एकमेकांप्रती प्रेम व्यक्‍त करण्याचं आणि आपल्या जोडीदारासोबत शारीरिक जवळीक करण्याचं टाळतात. शिवाय, पत्नीबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यात आणि तिच्याशी कोमलतेनं वागण्यात काही पुरुषांना कमीपणा वाटतो. पण बायबल असं सांगतं: “पतींनो, . . . आपल्या पत्नींना समजून घेण्याचा प्रयत्न करा.” (१ पेत्र ३:७, सुबोधभाषांतर) वैवाहिक हक्क देणं म्हणजे फक्‍त शरीरसंबंध नव्हे, हे पतींनी समजून घेतलं पाहिजे. पती फक्‍त शारीरिक संबंधाच्या वेळीच नव्हे, तर इतर वेळीही आपल्या पत्नीशी प्रेमानं वागल्यास तिला हे संबंध नकोसे वाटणार नाहीत; उलट त्यांतून तिला आनंद मिळेल. जेव्हा पती व पत्नी दोघंही एकमेकांशी विचारशीलपणे वागतात, तेव्हा एकमेकांच्या भावनिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करणं त्यांना शक्य होतं.

१८. पती व पत्नी आपलं वैवाहिक नातं आणखी घट्ट कसं करू शकतात?

१८ जोडीदाराचा विश्‍वासघात करण्यासाठी कोणतंच कारण देता येणार नाही हे तर अगदी खरं आहे; पण, कधीकधी स्वतःच्या जोडीदाराकडून प्रेमळ वागणूक न मिळाल्यामुळेही एका व्यक्‍तीला दुसऱ्‍याशी जवळीक करण्याचा मोह होऊ शकतो. (नीति. ५:१८; उप. ९:९) म्हणूनच बायबल विवाहित जोडप्यांना असा सल्ला देते: “एकमेकाला [वैवाहिक हक्कापासून] वंचित करू नका. . . . एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरता दूर राहा. आणि मग पुन्हा एक व्हा.” त्यांनी असं का केलं पाहिजे? “यासाठी की, सैतानाने तुमच्यात आत्मसंयम नसल्याने [तुम्हाला] मोहात पाडू नये.” (१ करिंथ. ७:५, ईझी-टू-रीड व्हर्शन) “आत्मसंयम नसल्याने” पती किंवा पत्नीला जर सैतानानं व्यभिचार करण्याच्या मोहात पाडलं, तर खरंच ही किती दुःखाची गोष्ट ठरेल! पण जेव्हा पती-पत्नी दोघंही ‘आपलंच हित न पाहता दुसऱ्‍याचंही पाहतात’ तेव्हा ते केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर आनंदानं आणि प्रेमानं आपल्या जोडीदाराला त्याचा वैवाहिक हक्क देतात. असं केल्यामुळे त्यांच्यात प्रेमाचं अतूट नातं निर्माण होतं.—१ करिंथ. १०:२४.

आपल्या वैवाहिक नात्याचं रक्षण करा

१९. आपण काय करण्याचं ठरवलं पाहिजे आणि का?

१९ आपण नीतिमान नव्या जगाच्या अगदी उंबरठ्यावर उभे आहोत. जरा विचार करा, २४,००० इस्राएली पुरुषांनी मवाबात असताना ज्या प्रकारे मोहाला बळी पडून चुकीचं काम केलं, त्या प्रकारे जर आपणही आज मोहाला बळी पडलो तर ती किती दुःखाची गोष्ट ठरेल! इस्राएली लोकांनी केलेल्या त्या लाजिरवाण्या कृतीमुळे खूप दुःखद परिणाम झाले. त्या घटनेविषयी सांगितल्यावर बायबल आपल्याला असा इशारा देतं: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” (१ करिंथ. १०:१२) खरोखर, आज आपल्या स्वर्गातील पित्याला आणि आपल्या विवाह जोडीदाराला विश्‍वासू राहण्याद्वारे आपण आपलं वैवाहिक बंधन मजबूत करणं किती गरजेचं आहे! (मत्त. १९:५, ६) यहोवाच्या “दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले” त्याला दिसावे, म्हणून आपण “होईल तितके प्रयत्न” केले पाहिजे. पूर्वी कधीही नव्हतं, इतकं आज हे महत्त्वाचं आहे!—२ पेत्र ३:१३, १४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा