वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 १/१५ पृ. २८-३२
  • कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खरं प्रेम नक्कीच शक्य आहे!
  • तू व्यक्‍त केलेलं प्रेम “द्राक्षारसाहून मधुर” आहे
  • “माझी तयारी होईपर्यंत प्रेम जागृत करू नका”
  • माझी वधू “बंद असलेली बाग” आहे
  • गीतरत्न पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • खरे प्रेम विजयी ठरते!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • गीतरत्न रूपरेषा
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीची तुम्ही मनापासून कदर करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 १/१५ पृ. २८-३२
१. एक आनंदी वयस्क जोडपं; २. लग्नाची मागणी घालताना, त्यांच्या लग्नाच्या दिवशी, एका खास क्षणी, उतार वयात एकमेकांचा हात धरून चालताना

कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?

“[प्रेम] परमेशाने प्रदीप्त केलेला . . . अग्नीच आहे.”—गीत. ८:६.

तुमचं उत्तर काय असेल?

  • स्त्री-पुरुष एकमेकांवर खरं प्रेम करू शकतात असं का म्हणता येईल?

  • गीतरत्नातून विवाहित ख्रिस्ती काय शिकू शकतात?

  • भावी जोडीदारासोबत गाठीभेटी करण्याविषयी आणि विवाहाविषयी ख्रिस्ती काय शिकू शकतात?

१, २. गीतरत्न या पुस्तकातील माहितीमुळे कोणाला फायदा होईल आणि का? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

लग्न समारंभ नुकताच पार पडला आहे. नवरा-नवरीची क्षणभर नजरानजर होते. त्यांच्या चेहऱ्‍यावर आज एक वेगळाच आनंद आहे. त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे पाहून सर्वांनाच खूप समाधान वाटतं. फोटो काढण्यासाठी जेव्हा ते प्रेमानं हातात हात घालून उभे राहतात, तेव्हा त्यांच्या लग्नाचं भाषण दिलेल्या बांधवाच्या मनात सहजच एक विचार येऊन जातो: ‘काही वर्षांनंतरही या दोघांचं एकमेकांवर इतकंच प्रेम असेल का? की ते हळूहळू आटत जाईल?’ वैवाहिक जीवनात अनेक कठीण समस्या येऊ शकतात हे खरं आहे. पण, एकमेकांवर खरं प्रेम असल्यास पती-पत्नी आपलं वैवाहिक नातं टिकवून ठेवू शकतात. दुःखाची गोष्ट म्हणजे, बऱ्‍याच जोडप्यांमध्ये नंतर मतभेद होऊ लागतात आणि शेवटी त्यांचा विवाह मोडतो. तर मग, आपल्या मनात कदाचित असा विचार येईल, ‘कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?’

२ खरंतर, शलमोन राजाच्या काळातही खरं प्रेम बघायला मिळणं कठीणच होतं. शलमोनानं त्याच्या काळातील लोकांबद्दल म्हटलं: “मला हजारात एक चांगला माणूस मिळाला. पण मला एकही चांगली स्त्री मिळाली नाही. मी आणखी एक गोष्ट शिकलो. देवाने माणसाला चांगले बनवले. पण माणसांनीच वाईट होण्याचे अनेक मार्ग शोधून काढले.” (उप. ७:२६-२९, ईझी-टू-रीड व्हर्शन) त्या काळात, बआलची उपासना करणाऱ्‍या अनेक विदेशी स्त्रिया इस्राएलमध्ये राहत होत्या. या स्त्रिया व्यभिचारी होत्या आणि त्यांच्या वाईट प्रभावामुळे, इस्राएलमध्ये अनेक स्त्री-पुरुष अनैतिक कामं करू लागले होते.a पण, वरील शब्द लिहिण्याच्या सुमारे २० वर्षांआधी शलमोनानं एक कविता लिहिली होती. एकमेकांवर खरं प्रेम असलेल्या एका जोडप्याबद्दल ही कविता होती. या कवितेलाच आपण गीतरत्न म्हणून ओळखतो. हे पुस्तक विवाहित आणि अविवाहित अशा सर्वांनाच, खरं प्रेम काय असतं आणि ते कसं व्यक्‍त केलं जाऊ शकतं हे समजून घेण्यास मदत करेल.

खरं प्रेम नक्कीच शक्य आहे!

३. स्त्री-पुरुष एकमेकांवर खरं प्रेम करू शकतात असं का म्हणता येईल?

३ गीतरत्न ८:६ वाचा. या वचनात प्रेम, ‘परमेशाने प्रदीप्त केलेला अग्नी आहे’ असं का म्हणण्यात आलं आहे? कारण, प्रेम हा यहोवाचा सर्वात महान गुण आहे. आणि त्यानं मानवांनाही त्याच्यासारखंच प्रेम करण्याची क्षमता दिली आहे. (उत्प. १:२६, २७) यहोवानं आदामाला बनवल्यानंतर त्याची पत्नी होण्याकरता एका सुंदर स्त्रीलाही निर्माण केलं. तिला पाहिल्यानंतर आदामाला इतका आनंद झाला की त्यानं त्याच्या भावना एका कवितेच्या रूपात व्यक्‍त केल्या. हव्वेलाही नक्कीच आदामासोबत अगदी जवळचं नातं असल्यासारखं वाटलं असावं. शेवटी, तिला आदामापासूनच बनवण्यात आलं होतं. (उत्प. २:२१-२३) यावरून हेच कळतं की स्त्री-पुरुष एकमेकांवर खरं प्रेम करू शकतात आणि ते टिकवूनही ठेवू शकतात. कारण, स्वतः यहोवानं या क्षमतेसह त्यांची निर्मिती केली आहे.

४, ५. गीतरत्नात दिलेली गोष्ट थोडक्यात सांगा.

४ गीतरत्न या पुस्तकात खऱ्‍या प्रेमाचं अतिशय सुंदर वर्णन करण्यात आलं आहे. शूनेम (शुलेम) गावात राहणाऱ्‍या एका तरुणीच्या आणि एका मेंढपाळाच्या प्रेमाबद्दल हे गीत आहे. गीतात वर्णन केलेल्या त्यांच्या प्रेमाची गोष्ट अशी: शलमोन राजा आणि त्याच्या सैनिकांनी जिथं तळ दिला होता, तिथंच या मुलीच्या भावांचे द्राक्षांचे मळे होते. ती त्या मळ्यांत काम करायची. शलमोनानं तिला पाहिलं तेव्हा त्याला ती खूप आवडली. म्हणून, तिला छावणीत आणावं अशी आज्ञा त्यानं दिली. तिला शलमोनासमोर आणण्यात आलं तेव्हा त्यानं तिच्या सौंदर्याची खूप प्रशंसा केली आणि तिला बऱ्‍याच भेटवस्तू देण्याचं वचन दिलं. पण, तिचं मात्र एका मेंढपाळावर प्रेम होतं आणि त्याच्याकडे जाण्याची तिला ओढ लागली होती. (गीत. १:४-१४) शेवटी, तो मेंढपाळ तिला शोधत शोधत राजाच्या छावणीत पोचतो. दोघांची भेट होते. आणि ते अतिशय सुंदर शब्दांत एकमेकांबद्दल प्रेम व्यक्‍त करतात.—गीत. १:१५-१७.

५ त्यानंतर, शलमोन यरुशलेमला परततो तेव्हा त्या तरुणीलाही तो आपल्यासोबत आणतो. मेंढपाळही तिच्या मागोमाग तिथं येतो. (गीत. ४:१-५, ८, ९) खूप प्रयत्न करूनही शलमोन त्या तरुणीचं मन जिंकू शकत नाही. (गीत. ६:४-७; ७:१-१०) तेव्हा तो तिला घरी जाऊ देतो. आणि शेवटी, ती तरुणी आपल्या प्रियकराला ‘हरिणासारखं’ धावत तिच्याकडे यायला सांगते.—गीत. ८:१४.

६. गीतरत्नातील प्रत्येक संवाद कोणाचा आहे हे ओळखणं कठीण का आहे?

६ शलमोनानं लिहिलेलं हे गीत इतकं सुंदर आहे की त्याला “गीतरत्न” म्हणण्यात आलं आहे. (गीत. १:१) पण, या कवितेतील प्रत्येक संवाद कोणाचा आहे याचा उल्लेख शलमोनानं केलेला नाही. कवितेचं सौंदर्य टिकवून ठेवण्याकरता शलमोनानं जाणीवपूर्वक या गोष्टी टाळल्या. पण, या गीतात नावं नसली, तरी बोल कोणाचे आहेत हे प्रत्येक पात्राच्या संवादावरून आपल्याला समजतं.

तू व्यक्‍त केलेलं प्रेम “द्राक्षारसाहून मधुर” आहे

७, ८. मेंढपाळानं आणि तरुणीनं एकमेकांप्रती असलेलं प्रेम कसं व्यक्‍त केलं? काही उदाहरणं द्या.

७ या तरुणीनं आणि मेंढपाळानं एकमेकांवरील आपलं प्रेम फार सुंदर शब्दांत व्यक्‍त केलं आहे. त्यांनी केलेलं वर्णन कदाचित आपल्याला विचित्र वाटेल. कारण, हे शब्द ३,००० पेक्षा जास्त वर्षांआधी लिहिण्यात आले होते. तेव्हाची संस्कृती आपल्यापेक्षा खूप वेगळी होती. पण, तरी त्यांच्या एकमेकांप्रती ज्या भावना होत्या त्या आपण समजू शकतो. उदाहरणार्थ, मेंढपाळ आपल्या प्रेयसीच्या सुंदर डोळ्यांची तुलना ‘कपोतांच्या’ म्हणजेच कबुतरांच्या डोळ्यांशी करतो. असं म्हणताना खरंतर तो तिच्या डोळ्यांत झळकणाऱ्‍या कोमल भावनेची प्रशंसा करत होता. (गीत. १:१५) तर तिला मेंढपाळाचे डोळे जणू “होल्यासारखे” किंवा कबुतरासारखे वाटतात. (गीतरत्न ५:१२ वाचा.) त्याचे डोळे पाहून तिला दुधासारख्या फेसाळ पाण्यात डुबकी मारणाऱ्‍या राखाडी कबुतराचे दृश्‍य आठवते.

८ या कवितेत त्यांनी केलेलं एकमेकांचं वर्णन हे केवळ रंगरूपापुरतंच मर्यादित नाही. उदाहरणार्थ, ज्या कोमलतेनं ती इतरांशी बोलते त्याचीही तो प्रशंसा करतो. (गीतरत्न ४:७, ११ वाचा.) “तुझ्या ओठांतून मधू स्रवतो; तुझ्या जिव्हेखाली मधू व दुग्ध ही आहेत.” मेंढपाळाला तिचे शब्द दूध आणि मधासारखे गोड आणि चांगले वाटतात. मेंढपाळानं जेव्हा तिला “तू सर्वांगसुंदर आहेस; तुझ्यात काही व्यंग नाही” असं म्हटलं तेव्हा तो फक्‍त तिच्या सौंदर्याबद्दलच नाही तर तिच्या चांगल्या गुणांबद्दलही बोलत होता.

९. (क) पती-पत्नीमधील प्रेमात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? (ख) पती-पत्नींनी एकमेकांप्रती असलेलं त्यांचं प्रेम व्यक्‍त करणं महत्त्वाचं का आहे?

९ आज यहोवाची उपासना करणाऱ्‍या पती-पत्नींसाठी लग्न केवळ एक कायदेशीर करार नाही. तर त्यांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं आणि हे प्रेम ते व्यक्‍तही करतात. पण, याला कशा प्रकारचं प्रेम म्हणता येईल? इतर लोकांप्रती जे निःस्वार्थ प्रेम दाखवण्यासाठी बायबल सांगते, ते हे प्रेम आहे का? (१ योहा. ४:८) की कुटुंबातल्या सदस्यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमासारखं हे आहे? की त्याची तुलना खऱ्‍या मित्रांमध्ये असलेल्या जिव्हाळ्यासोबत करता येईल? (योहा. ११:३) याला स्त्री-पुरुषांमधील प्रणय भावना म्हणता येईल का? (नीति. ५:१५-२०) खरंतर, जोडप्यांमध्ये असलेल्या प्रेमात वर उल्लेख केलेल्या सर्वच भावनांचा समावेश होतो. म्हणून पती-पत्नी या नात्यानं तुम्ही आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून एकमेकांप्रती आपलं प्रेम व्यक्‍त केलं पाहिजे. असं केल्यानं तुमचं वैवाहिक जीवन आनंदी बनेल. तुम्ही कितीही व्यस्त असला तरी असं करणं खूप महत्त्वाचं आहे. काही संस्कृतींत जिथं आईवडिलांच्या पसंतीनं लग्न केलं जातं तिथं कधीकधी अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत पती-पत्नींना एकमेकांची ओळख नसते. पण, लग्नानंतर ते हळूहळू एकमेकांना जाणू लागतात आणि त्यांच्यातलं प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं. अशा जोडप्यांनीही एकमेकांप्रती आपलं प्रेम शब्दांतून आणि कृतीतून व्यक्‍त करायला शिकून घेतलं पाहिजे. असं केल्यास ती दोघं एकमेकांच्या जवळ येतील आणि त्यांचा विवाह आणखी मजबूत होईल.

१०. एकमेकांप्रती प्रेम व्यक्‍त केल्यानं वैवाहिक नातं कसं मजबूत होतं?

१० पती-पत्नी जेव्हा एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्‍त करतात, तेव्हा त्यांचा विवाह आणखी एका मार्गानं मजबूत होतो. गीतरत्नात शलमोन राजा शुलेमच्या तरुणीला “चांदीचे टिके लावलेले सोन्याचे गोफ” देण्याचे वचन देतो. शिवाय ती “चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ,” आहे असं म्हणून तो तिची प्रशंसाही करतो. (गीत. १:९-११; ६:१०) पण, या तरुणीचं मात्र मेंढपाळावर प्रेम होतं. आपल्या प्रियकराशी एकनिष्ठ राहायला तिला कशामुळे मदत झाली? एकमेकांपासून दूर असतानाही तिला कशामुळे सांत्वन मिळालं? (गीतरत्न १:२, ३ वाचा.) त्यानं शब्दांतून तिच्याबद्दल जे प्रेम व्यक्‍त केलं होतं त्याची तिला आठवण झाली. मूळ भाषेत हेच वचन वाचल्यास, तरुणीला मेंढपाळाचे शब्द “द्राक्षारसाहून मधुर” वाटले असं सांगण्यात आलं आहे. राजमहालात मेंढपाळापासून दूर असताना, त्यानं व्यक्‍त केलेल्या प्रेमाचे बोल तिला डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे आल्हाददायक वाटले. (स्तो. २३:५; १०४:१५) पती-पत्नीनंही एकमेकांप्रती आपलं प्रेम नेहमी व्यक्‍त केलं पाहिजे. कारण, यामुळे त्यांच्यातलं प्रेम वाढतं. तसंच, या प्रेमाच्या आठवणींमुळे त्यांचं नातं घट्ट होऊ शकतं.

“माझी तयारी होईपर्यंत प्रेम जागृत करू नका”

११. शुलेमच्या तरुणीनं जे म्हटलं त्यावरून आपण काय शिकू शकतो?

११ तुमचाही लग्नाचा विचार असेल, तर गीतरत्नातील तरुणीच्या उदाहरणावरून तुम्ही काय शिकू शकता? तिचं शलमोन राजावर मुळीच प्रेम नव्हतं, म्हणून तिथल्या स्त्रियांना तिनं स्पष्टपणे सांगितलं: “माझी तयारी होईपर्यंत प्रेम जागृत करू नका.” (गीत. २:७; ३:५, ईझी-टू-रीड व्हर्शन) तर मग, कोणावरही प्रेम करणं सुज्ञपणाचं ठरेल का? नक्कीच नाही. उलट, जिच्यावर खरं प्रेम करता येईल अशी व्यक्‍ती भेटेपर्यंत थांबून राहणं आणि अशाच व्यक्‍तीसोबत विवाह करणं सुज्ञपणाचं ठरणार नाही का?

१२. तरुणीचं मेंढपाळावर प्रेम का होतं?

१२ शुलेमच्या तरुणीचं मेंढपाळावर प्रेम का होतं? तिला तो “हरणासारखा” देखणा वाटतो. त्याचे बाहू “सुवर्ण दंडासारखे” बांधेसूद व त्याचे पाय “संगमरवरी स्तंभच,” म्हणजे अतिशय आकर्षक आणि सुडौल आहेत असं ती म्हणते. पण, तो केवळ ताकदवान आणि देखणाच नव्हता; तर, त्याचं यहोवावर खूप प्रेम होतं आणि त्याच्यात खूप चांगले गुणही होते हे तिला माहीत होतं. म्हणूनच तर ती त्याची तुलना वनातल्या झाडांपैकी ‘सफरचंदाच्या’ झाडाशी करते.—गीत. २:३, ९; ५:१४, १५, कॉमन लँग्वेज.

१३. मेंढपाळाचं तरुणीवर प्रेम का होतं?

१३ त्या वेळी शलमोन राजाला “साठ राण्या [आणि] ऐंशी उपपत्नी” होत्या; शिवाय “अगणित कुमारी” त्याच्या सेवेला हजर होत्या. इतकं असूनही शुलेमच्या तरुणीवर त्याचं प्रेम जडलं. यावरून कळतं की ती नक्कीच खूप सुंदर होती. पण, मेंढपाळ फक्‍त तिच्या सौंदर्यामुळेच तिच्यावर प्रेम करत होता का? नाही. तिचंदेखील यहोवावर प्रेम होतं आणि तिच्यातही खूप चांगले गुण होते. उदाहरणार्थ, ती इतकी नम्र होती की तिनं “शारोनाचे कुंकुमपुष्प” या साध्या रानफुलाशी स्वतःची तुलना केली. पण, मेंढपाळाच्या नजरेत मात्र ती लाखात एक होती, जणू “काटेरी झुडुपांमध्ये . . . भुईकमळ.”—गीत. २:१, २; ६:८.

१४. मेंढपाळ आणि तरुणीच्या उदाहरणावरून ख्रिस्ती काय शिकू शकतात?

१४ यहोवानं आपल्या सेवकांना “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याची आज्ञा दिली आहे. (१ करिंथ. ७:३९) यामुळे केवळ बाप्तिस्मा झालेल्या व्यक्‍तीसोबतच गाठीभेटी करण्याचा किंवा लग्न करण्याचा आपण विचार करू शकतो. यहोवाच्या या आज्ञेचं पालन केल्यामुळे वैवाहिक जीवनात कसा फायदा होईल? लग्न झाल्यावर पती-पत्नीला दररोज अनेक ताणतणावांचा सामना करावा लागतो. पण, दोघांचाही यहोवासोबत जवळचा नातेसंबंध असल्यामुळे विवाहात शांती आणि आनंद टिकवून ठेवणं शक्य होईल. तेव्हा, तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर गीतरत्नातील मेंढपाळाच्या आणि तरुणीच्या उदाहरणाचे अनुकरण करा. अशा व्यक्‍तीची निवड करा जिच्यामध्ये उत्तम गुण आहेत आणि जिचं यहोवावर मनापासून प्रेम आहे.

सत्यात नसलेल्या एका व्यक्‍तीकडे आकर्षित झालेली एक ख्रिस्ती बहीण

यहोवाचे उपासक विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तीशी जवळीक करण्याचं टाळतात (परिच्छेद १४ पाहा)

माझी वधू “बंद असलेली बाग” आहे

१५. एकनिष्ठ राहण्याबद्दल शुलेमच्या तरुणीकडून आपण काय शिकू शकतो?

१५ गीतरत्न ४:१२ वाचा. शुलेमची तरुणी “बंद असलेली बाग” आहे, असं मेंढपाळानं का म्हटलं? कारण, ज्या बागेचं फाटक बंद असतं ती बाग सर्वांसाठी खुली नसते. त्याचप्रमाणे त्या तरुणीचंदेखील फक्‍त मेंढपाळावर प्रेम होतं. ती त्याच्याशी लग्न करणार होती आणि म्हणून तिच्या प्रेमात पडलेल्या शलमोन राजाकडे तिनं लक्ष दिलं नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम होती. ती सहज उघडता येणाऱ्‍या “वेशीसारखी” म्हणजे दारासारखी नाही, तर एका “तटासारखी” म्हणजेच भिंतीसारखी खंबीर होती. (गीत. ८:८-१०) त्याच प्रकारे, यहोवाच्या उपासकांनी लग्न करायचं ठरवल्यास, त्यांनी एकमेकांना एकनिष्ठ राहिलं पाहिजे; इतर कोणाबद्दल त्यांनी विचार करू नये.

१६. भावी जोडीदारासोबत गाठीभेटी करण्याविषयी गीतरत्नातून तुम्हाला काय शिकता येईल?

१६ मेंढपाळानं जेव्हा त्या तरुणीला आपल्यासोबत रानात फिरायला येण्याविषयी विचारलं, तेव्हा तिच्या भावांनी तिला परवानगी दिली नाही. उलट, त्यांनी त्यांच्या मळ्यांची राखण करायला तिला पाठवलं. तिच्या भावांचा तिच्यावर भरवसा नव्हता का? किंवा त्या दोघांचा काही चुकीचा हेतू आहे, असं तिच्या भावांना वाटलं असावं का? नाही. खरंतर, चुकीचा मोह होईल अशा कोणत्याही परिस्थितीत आपली बहीण सापडू नये, असं त्यांना वाटत होतं. (गीत. १:६; २:१०-१५) तुम्हीही जर आपल्या भावी जोडीदारासोबत गाठीभेटी करत असाल, तर तुमच्या हातूनही काही अनैतिक कृत्य घडू नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घेऊ शकता? आपलं नातं निष्कलंक राहावं म्हणून कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे आधीपासूनच ठरवा. दुसरं कोणीही नसेल, फक्‍त तुम्ही दोघंच असाल अशा ठिकाणी जाऊ नका. एकमेकांप्रती आपलं प्रेम व्यक्‍त करताना यहोवाची शुद्ध नैतिक तत्त्वं विसरू नका.

१७, १८. गीतरत्नाच्या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१७ प्रत्येक विवाह टिकून राहावा आणि पती-पत्नींनी एकमेकांवर मनापासून प्रेम करावं अशी यहोवाची इच्छा आहे. एखाद्या जोडप्याचं नवीन-नवीन लग्न होतं तेव्हा साहजिकच त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. पण, हे प्रेम कधीही आटू नये म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केले पाहिजेत; असं केल्यास त्यांचं वैवाहिक नातं कायम टिकून राहील.—मार्क १०:६-९.

१८ तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल, तर अशीच व्यक्‍ती निवडा जिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करू शकाल. आणि जेव्हा तुमच्या जीवनात अशी व्यक्‍ती येईल, तेव्हा एकमेकांबद्दलचं तुमचं प्रेम दिवसेंदिवस वाढवत राहण्याचा प्रयत्न करा. गीतरत्नाच्या पुस्तकातून आपण पाहिलं की कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे. कारण ते जणू “परमेशाने प्रदीप्त केलेला . . . अग्नीच आहे.”—गीत. ८:६.

a टेहळणी बुरूज १५ जानेवारी २००७ च्या इंग्रजी अंकातील पृष्ठ ३१ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा