वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 १/१५ पृ. १८-२२
  • तुमचं वैवाहिक नातं मजबूत आणि आनंदी बनवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचं वैवाहिक नातं मजबूत आणि आनंदी बनवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विवाहात यहोवाला स्थान द्या
  • प्रेमळ कुटुंबप्रमुख
  • नम्रतेनं अधीन राहणाऱ्‍या पत्नी
  • एकमेकांना मनापासून क्षमा करा
  • सुवर्ण नियमाचं पालन करा
  • खरं प्रेम दाखवा
  • ख्रिस्ती विवाह यशस्वी कसा बनवाल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुमच्या विवाहास टिकाऊ बंधन बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • तुमच्या विवाहाची “तीनपदरी दोरी” जपा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • टिकाऊ विवाहाकरता दोन गुरुकिल्ल्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 १/१५ पृ. १८-२२
१. एकमेकांसोबत बोलताना एक आनंदी जोडपं; २. तेच जोडपं कामावरील समस्या, मुलांचा सांभाळ आणि आजारी कुटुंबीयांची काळजी यांसारख्या दररोजच्या जीवनातल्या समस्यांचा सामना करताना

तुमचं वैवाहिक नातं मजबूत आणि आनंदी बनवा

“परमेश्‍वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्‍याचे श्रम व्यर्थ आहेत.”—स्तो. १२७:१अ.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

  • पती-पत्नींना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?

  • पती-पत्नी यहोवाला आपल्या विवाहात कशा प्रकारे स्थान देऊ शकतात?

  • पती-पत्नी सुवर्ण नियमाचं पालन कसं करू शकतात?

१-३. विवाहात कोणकोणत्या कारणांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

अडतीस वर्षांपासून आनंदी वैवाहिक जीवन जगत असलेल्या एका पतीनं म्हटलं: “तुमचं वैवाहिक जीवन सुखीसमाधानी व्हावं असं तुम्हाला खरंच वाटत असेल, आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न करायला तुम्ही तयार असाल, तर यहोवा तुमच्या प्रयत्नांवर नक्कीच आशीर्वाद देईल.” तेव्हा, सुखदुःखात एकमेकांना साथ देणं आणि आनंदी जीवन जगणं प्रत्येक पती-पत्नीला नक्कीच शक्य आहे.—नीति. १८:२२.

२ वैवाहिक जीवनात समस्या या येतीलच. पती-पत्नींना “संसारात हालअपेष्टा भोगाव्या” लागतील असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (१ करिंथ. ७:२८) पण, असं कशामुळे होतं? दररोजच्या जीवनातल्या चिंतांमुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. तसंच, अपरिपूर्ण स्वभावामुळे पती-पत्नी काही वेळा अविचारीपणे एकमेकांना काहीतरी बोलून जातात. यामुळे, त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि गैरसमजही होऊ शकतात. एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्‍या पती-पत्नींमध्येही असं घडू शकतं. (याको. ३:२, ५, ८) बऱ्‍याच जोडप्यांना नोकरीच्या ठिकाणी जास्त वेळ काम करावं लागतं आणि त्यामुळे आपल्या मुलांकडे लक्ष देणं त्यांना कठीण जातं. वैवाहिक बंधन मजबूत करण्यासाठी सोबत वेळ घालवून एकमेकांशी बोलणं महत्त्वाचं असतं; पण, तणावामुळे आणि पार थकून गेल्यामुळे काही जोडप्यांना असं करणं शक्य होत नाही. तसंच, आर्थिक अडचणी, आजारपण, किंवा इतर समस्यांमुळे पती-पत्नीचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम आणि आदर हळूहळू कमी होऊ लागतो. शिवाय, वरवर सगळं व्यवस्थित चाललं आहे असं भासत असलं तरी अनैतिकता, वाईट वर्तन, द्वेष, भांडखोरपणा, ईर्ष्या, राग आणि मतभेद यांसारख्या गोष्टींमुळे विवाहात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. बायबलमध्ये या गोष्टींना “देहाची कर्मे” म्हटलं आहे.—गलती. ५:१९-२१.

३ त्यातल्या त्यात आज आपण ‘शेवटल्या काळात’ राहत आहोत. त्यामुळे आज बरेच लोक स्वार्थी झाले आहेत, त्यांना देवाची भीती राहिलेली नाही. अशा प्रवृत्तींमुळेही वैवाहिक जीवनात अनेक बिकट समस्या निर्माण होऊ शकतात. (२ तीम. ३:१-४) या सर्व समस्यांसोबतच, विवाहात फूट पाडणाऱ्‍या एका क्रूर शत्रूचाही जोडप्यांना सामना करावा लागतो. प्रेषित पेत्र त्याच्याविषयी म्हणतो: “तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.”—१ पेत्र ५:८; प्रकटी. १२:१२.

४. विवाह मजबूत करणं व तो टिकवून ठेवणं कशामुळे शक्य आहे?

४ जपानमध्ये राहणारे एक पती सांगतात: “पैशांच्या समस्येमुळे मी खूप वैतागलो होतो. आणि बायकोला काही सांगत नसल्यामुळे तिचीही खूप चिडचिड व्हायची. त्यात अलीकडेच तिची तब्येतही खूप बिघडली होती. कधीकधी या सर्व कारणांमुळे आमच्यात वाद व्हायचे.” वैवाहिक जीवनात येणाऱ्‍या काही समस्या टाळता येत नाहीत हे खरं आहे, पण त्यांचा सामना करणं शक्य आहे. यहोवाच्या मदतीनं पती-पत्नी आपल्या विवाहाला मजबूत करू शकतात आणि आनंदी जीवन जगू शकतात. (स्तोत्र १२७:१ वाचा.) आता आपण बायबलमधून अशा पाच गोष्टींवर चर्चा करू या ज्यांमुळे विवाह मजबूत करण्यास व तो टिकवून ठेवण्यास मदत मिळते. त्यासोबतच विवाहाला मजबूत करण्यासाठी प्रेम इतकं महत्त्वाचं का आहे तेही आपण पाहू या.

विवाहात यहोवाला स्थान द्या

५, ६. यहोवाला आपल्या विवाहात स्थान द्यायचं असेल तर पती-पत्नीनं काय केलं पाहिजे?

५ विवाह टिकवून ठेवण्यासाठी यहोवाचा मनापासून आदर करणं आणि त्याच्या आज्ञा पाळण्याद्वारे त्याला विश्‍वासू राहणं खूप महत्त्वाचं आहे. खरंतर हाच यशस्वी विवाहाचा पाया आहे. (उपदेशक ४:१२ वाचा.) पती-पत्नी यहोवाचं प्रेमळ मार्गदर्शन स्वीकारतात, तेव्हा ते आपल्या जीवनात यहोवाला स्थान देत असतात. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.” (यश. ३०:२०, २१) आजच्या काळात, पती-पत्नी जेव्हा सोबत मिळून बायबल वाचतात तेव्हा एक प्रकारे ते यहोवाची वाणी ऐकतात. (स्तो. १:१-३) तसंच, कौटुंबिक उपासनेमुळेही त्यांना मदत होते. कौटुंबिक उपासना आनंददायक आणि प्रोत्साहन देणारी असेल, तर त्यांना एकमेकांच्या आणखी जवळ येण्यास मदत मिळते. आणि जेव्हा पती-पत्नी दररोज सोबत मिळून प्रार्थना करतात, तेव्हा सैतानाच्या दुष्ट जगाद्वारे त्यांच्या विवाहात येणाऱ्‍या समस्यांना तोंड देणं त्यांना शक्य होतं.

कौटुंबिक उपासना करण्याआधी पती आपल्या पत्नीसोबत प्रार्थना करताना

सोबत मिळून यहोवाची सेवा केल्यानं पती-पत्नी एकमेकांच्या आणि देवाच्या जवळ येतात (परिच्छेद ५, ६ पाहा)

६ जर्मनीत राहणारे गेरहार्ट म्हणतात: “आमच्यात जेव्हाजेव्हा गैरसमज किंवा समस्या निर्माण झाल्या, तेव्हातेव्हा बायबलच्या सल्ल्यामुळे सहनशीलता दाखवण्यास आणि एकमेकांना क्षमा करण्यास आम्हाला मदत मिळाली. यामुळे कुटुंबातलं वातावरण पुन्हा आनंदी बनवणं आम्हाला शक्य झालं. खरोखर, सुखी वैवाहिक जीवनाकरता सहनशील असणं आणि क्षमा करणं खूप गरजेचं आहे.” पती-पत्नी जेव्हा आध्यात्मिक कार्यांत सोबत मिळून सहभागी होतात, तेव्हा यहोवाला आपल्या विवाहात स्थान देण्याचा ते मनापासून प्रयत्न करत असतात. असं केल्यामुळे ते देवाच्या आणि एकमेकांच्या आणखी जवळ येतात.

प्रेमळ कुटुंबप्रमुख

७. पतीनं आपल्या पत्नीशी कशा प्रकारे वागलं पाहिजे?

७ कुटुंबप्रमुख या नात्याने पतींनी आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडल्यास वैवाहिक जीवन आनंदी होण्यास मदत मिळते. बायबल म्हणते, “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे.” (१ करिंथ. ११:३) या वचनाचा काय अर्थ होतो? येशू त्याच्या शिष्यांशी जसं वागला तसंच पतींनी आपल्या पत्नीशी वागलं पाहिजे, असा या वचनाचा अर्थ होतो. येशू त्यांच्याशी कधीही कठोरतेनं किंवा निर्दयतेनं वागला नाही. उलट, तो नेहमी प्रेमळपणे, दयाळूपणे, समजूतदारपणे, सौम्यपणे आणि नम्रपणे त्यांच्याशी वागला.—मत्त. ११:२८-३०.

८. ख्रिस्ती पती आपल्या पत्नीचा आदर आणि प्रेम कसं मिळवू शकतो?

८ पत्नीनं आपला आदर केला पाहिजे, असं ख्रिस्ती पती वारंवार बोलून दाखवत नाहीत. याऐवजी ते तिच्याशी “सुज्ञतेने” वागतात आणि तिला समजून घेतात. ती “अधिक नाजूक व्यक्‍ती” आहे हे लक्षात ठेवून ते आपल्या पत्नीशी आदरानं वागतात. (१ पेत्र ३:७) पती फक्‍त चारचौघांतच नाही तर घरात असतानाही आपल्या पत्नीला मान देतात. पत्नीशी आदरानं बोलण्याद्वारे आणि विचारशीलपणे वागण्याद्वारे पती हे दाखवतात की त्यांची पत्नी त्यांच्याकरता खूप मौल्यवान आहे. (नीति. ३१:२८) अशा रीतीनं जेव्हा पती आपल्या पत्नीशी प्रेमळपणे वागतात तेव्हा पत्नीही त्यांच्यावर प्रेम करते आणि त्यांचा आदर करते. इतकंच नाही, तर देवाचा आशीर्वादही त्यांच्या कुटुंबावर असतो.

नम्रतेनं अधीन राहणाऱ्‍या पत्नी

९. पत्नी आपल्या पतीच्या अधीन असल्याचं कसं दाखवू शकते?

९ यहोवावर आपलं मनापासून प्रेम असेल आणि हे प्रेम त्याच्या तत्त्वांवर आधारित असेल, तर आपल्याला त्याच्या आज्ञांचं पालन करण्यास मदत होईल. (१ पेत्र ५:६) पत्नी जेव्हा आपल्या पतीच्या अधीन राहून त्याला नेहमी साथ देते, तेव्हा ती खरंतर यहोवाच्या अधिकाराबद्दल आदर दाखवत असते. बायबल म्हणते: “स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा.” (कलस्सै. ३:१८) खरंतर, पतीनं घेतलेले सर्व निर्णय पत्नीला मान्य असतीलच असं नाही. पण, पतीचा निर्णय देवाच्या नियमांच्या विरोधात नसल्यास पत्नी तो मान्य करेल आणि अशा रीतीनं त्याच्या अधीन असल्याचं दाखवेल.—१ पेत्र ३:१,२.

१०. प्रेमळपणे पतीच्या अधीन राहणं महत्त्वाचं का आहे?

१० यहोवानं पत्नीला कुटुंबात आदराचं स्थान दिलं आहे. बायबल तिला पतीची “सहकारिणी” म्हणते. (मला. २:१४) पती-पत्नींना कुटुंबासाठी एखादा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा पत्नी आपल्या मनातले विचार व भावना आदरपूर्वक आपल्या पतीला सांगते; पण, शेवटी पती जो काही निर्णय घेईल तो ती नम्रपणे स्वीकारते. देवाच्या तत्त्वांनुसार वागणारा पती आपल्या पत्नीचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेतो. (नीति. ३१:१०-३१) प्रेमळपणे पतीच्या अधीन राहिल्यामुळे कुटुंबात आनंद, शांती आणि एकता राहते. शिवाय, असं करण्याद्वारे आपण देवाचं मन आनंदित करत आहोत याचंही पती-पत्नीला समाधान मिळतं.—इफिस. ५:२२.

एकमेकांना मनापासून क्षमा करा

११. क्षमा करणं महत्त्वाचं का आहे?

११ विवाह टिकवून ठेवायचा असेल तर पती-पत्नीनं एकमेकांना क्षमा करण्याचं शिकून घेतलं पाहिजे. पती-पत्नी जेव्हा “एकमेकांचे सहन” करतात आणि “आपसात क्षमा” करतात तेव्हा त्यांचं नातं आणखी मजबूत होतं. (कलस्सै. ३:१३) पण, जेव्हा पती-पत्नी एकमेकांना क्षमा करत नाहीत आणि झालेल्या चुका लक्षात ठेवून त्यांचा पुन्हापुन्हा उल्लेख करतात तेव्हा कुटुंबात समस्या वाढतात. भिंतींना पडलेल्या भेगांमुळे घराचं बांधकाम जसं कमजोर होतं, तसंच झालेल्या चुका लक्षात ठेवल्यानं आणि मनात राग बाळगल्यानं पती-पत्नीचा नातेसंबंध कमजोर होतो; त्यांना एकमेकांना क्षमा करणं आणि एकमेकांना सहकार्य करणं कठीण जातं. पण, यहोवा ज्या प्रकारे आपल्याला क्षमा करतो त्या प्रकारे पती-पत्नीनं एकमेकांना क्षमा केल्यास त्यांचं वैवाहिक जीवन आणखी आनंदी बनेल.—मीखा ७:१८, १९.

१२. प्रेम कशा प्रकारे “पापांची रास झाकून टाकते”?

१२ खरं प्रेम असेल तर एक व्यक्‍ती दुसऱ्‍यांच्या चुका लक्षात ठेवणार नाही. खरंतर, “प्रीती पापांची रास झाकून टाकते.” (१ करिंथ. १३:४, ५; १ पेत्र ४:८ वाचा.) आपलं इतरांवर प्रेम असेल तर आपण त्यांना नेहमी क्षमा करू. मी फक्‍त इतक्याच वेळा क्षमा करू शकतो, असं आपण म्हणणार नाही. एखाद्याला किती वेळा क्षमा करावी, असं जेव्हा प्रेषित पेत्रानं येशूला विचारलं तेव्हा तो म्हणाला: “साताच्या सत्तर वेळा.” (मत्त. १८:२१, २२) येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? ख्रिश्‍चनांनी इतरांना किती वेळा क्षमा केली पाहिजे याला खरंतर सीमाच नाही असं येशूला सांगायचं होतं.—नीति. १०:१२.a

१३. क्षमा करण्याची वृत्ती दाखवण्यास आपल्याला कशामुळे मदत होईल?

१३ ॲनेट म्हणते: “पती-पत्नी एकमेकांना क्षमा करायला तयार नसतात तेव्हा त्यांच्यात राग आणि अविश्‍वासाची भावना वाढते. ही गोष्ट विवाहात विषासारखं काम करते. पण, क्षमा केल्यानं पती-पत्नी एकमेकांच्या आणखी जवळ येतात आणि त्यांचा विवाह मजबूत होतो.” क्षमा करण्याची वृत्ती उत्पन्‍न करण्यासाठी नेहमी एकमेकांचे आभार माना आणि एकमेकांची मनापासून प्रशंसा करा. (कलस्सै. ३:१५) असं केल्यानं कुटुंबात शांती आणि एकता राहील. तसंच, क्षमा करण्याची वृत्ती दाखवल्यास यहोवासुद्धा तुम्हाला अनेक आशीर्वाद देईल.—रोम. १४:१९.

सुवर्ण नियमाचं पालन करा

१४, १५. सुवर्ण नियम काय आहे, आणि पती-पत्नी त्याचं पालन कसं करू शकतात?

१४ इतरांनी आपल्याशी आदरानं वागावं असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. जेव्हा लोक आपलं ऐकून घेतात आणि आपल्या भावनांची कदर करतात तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं. पण, “तो माझ्याशी जसं वागला तसंच मीही त्याच्याशी वागेन,” असं कोणाला म्हणताना तुम्ही ऐकलं आहे का? कधीकधी अशी प्रतिक्रिया साहजिक असेल, पण बायबल सांगते, “मी जशास तसे करेन, . . . असे म्हणू नको.” (नीति. २४:२९) खरंतर, अशा परिस्थितीत कसं वागायचं याविषयी येशूनं खूप चांगला सल्ला दिला आहे. त्यालाच सुवर्ण नियम असं म्हणतात. येशूनं म्हटलं: “लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा.” (लूक ६:३१) येशूच्या या शब्दांचा असा अर्थ होता, की लोक आपल्याशी जसं वागतात तसं आपण त्यांच्याशी वागू नये. तर, आपण त्यांच्याकडून जशा वागणुकीची अपेक्षा करतो, तसं आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे. वैवाहिक जीवनातही हेच तत्त्व लागू करता येईल. आपल्या जोडीदाराकडून आपल्याला जी अपेक्षा आहे तसंच आपण त्याच्याशी वागलं पाहिजे.

१५ पती-पत्नी जेव्हा एकमेकांच्या भावनांची कदर करतात, तेव्हा त्यांचं आपसांतील नातं आणखी मजबूत होतं. दक्षिण आफ्रिकेत राहणारे एक पती म्हणतात: “सुवर्ण नियमाचं पालन करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. आम्हाला राग येत नाही असं नाही. पण, समोरच्यानं आपल्याशी आदरानं वागावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे आम्हीही एकमेकांशी नेहमी आदरानं वागण्याचा जमेल तितका प्रयत्न करतो.”

१६. पती-पत्नीनं एकमेकांशी कशा प्रकारे वागू नये?

१६ आपल्या जोडीदाराच्या कमतरतांविषयी इतरांना सांगू नका किंवा मस्करी करत असला तरीही त्याच्या वाईट सवयींचा सतत उल्लेख करू नका. पती-पत्नीपैकी, कोणाजवळ जास्त ताकद आहे, कोण जास्त आवाज चढवू शकतो किंवा कोण जास्त टोचून बोलू शकतो हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. कारण, सर्वांमध्ये काही ना काही कमतरता असतातच आणि कधीकधी आपण इतरांना दुखावतोही. पण असं असलं, तरी पती-पत्नींनी कधीही एकमेकांना टाकून बोलू नये आणि आपल्या जोडीदारावर हात उचलण्याचा तर विचारही करू नये.—नीतिसूत्रे १७:२७; ३१:२६ वाचा.

१७. पती कशा प्रकारे सुवर्ण नियमाचं पालन करू शकतात?

१७ काही संस्कृतींत पुरुष आपल्या पत्नीला धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही तर पत्नीला मारहाणही करतात. सहसा ते आपली ताकद दाखवण्यासाठी असं करत असतात. पण, बायबल म्हणते: “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ होय.” (नीति. १६:३२) येशू ख्रिस्त हा आजपर्यंत होऊन गेलेला सर्वात श्रेष्ठ पुरुष होता. जो पती येशूचं अनुकरण करतो आणि स्वतःवर ताबा ठेवतो तो खरा ताकदवान आहे असं म्हणता येईल. पण जो आपल्या पत्नीला घालूनपाडून बोलतो किंवा तिला मारहाण करतो, तो खरंतर कमजोर असतो; आणि अशा प्रकारे वागणारा यहोवासोबतचा आपला नातेसंबंधही गमावून बसतो. शक्‍तिशाली आणि धैर्यवान असलेल्या दाविदानं असं लिहिलं: “तुम्ही रागवा, पण पाप करू नका. तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.”—स्तो. ४:४, ईझी-टू-रीड व्हर्शन.

खरं प्रेम दाखवा

१८. खरं प्रेम दाखवत राहणं इतकं महत्त्वाचं का आहे?

१८ पहिले करिंथकर १३:४-७ वाचा. वैवाहिक जीवन सुखी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे प्रेम. बायबल सांगते, “तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा.” (कलस्सै. ३:१२, १४) स्वार्थत्यागी मनोवृत्ती आणि ख्रिस्तासारखं प्रेम दाखवल्यानं विवाह आणखी मजबूत होतो. असं प्रेम असल्यास जोडीदाराचे दुर्गुण, गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या समस्या, आर्थिक समस्या किंवा सासरच्या लोकांशी मतभेद या प्रकारच्या समस्या असूनही पती-पत्नीचा नातेसंबंध टिकून राहील.

१९, २०. (क) पती-पत्नी कशा प्रकारे त्यांच्या विवाहाला मजबूत आणि आनंदी बनवू शकतात? (ख) पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

१९ विवाह टिकवून ठेवण्यासाठी प्रेमाची, एकनिष्ठतेची आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांची गरज असते. जेव्हा समस्या येतात तेव्हा एकमेकांना सोडून देण्याऐवजी पती-पत्नीनं कोणत्याही परिस्थितीत आपलं नातं तुटू द्यायचं नाही असा निश्‍चय केला पाहिजे. ज्या जोडप्यांचं यहोवावर आणि एकमेकांवर प्रेम आहे ते आपल्या समस्या सोडवण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करतात. कारण, “प्रीती कधी अंतर देत नाही.”—१ करिंथ. १३:८; मत्त. १९:५, ६; इब्री १३:४.

२० आपण शेवटल्या काळात जगत असल्यामुळे विवाहाला मजबूत आणि आनंदी बनवणं काही वेळा खूप कठीण जातं. (२ तीम. ३:१) पण, यहोवाच्या मदतीनं असं करणं नक्कीच शक्य आहे. जोडप्यांना आणखी एका समस्येचा सामना करावा लागतो, ती म्हणजे जगात सर्वत्र पसरलेलं अनैतिक वातावरण. पती-पत्नी त्यांच्या विवाहाला या समस्येपासून कसं सुरक्षित ठेवू शकतात याविषयी पुढच्या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

a पती-पत्नी एकमेकांना क्षमा करतात आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण, जेव्हा पती-पत्नीपैकी एक जण व्यभिचार करतो तेव्हा ज्यानं चूक केली आहे त्याला क्षमा करावी की घटस्फोट द्यावा हे ठरवण्याचा हक्क बायबल निर्दोष जोडीदाराला देते. (मत्त. १९:९) देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे २५१ वरील “घटस्फोट आणि विभक्‍ती याविषयी बायबलचा दृष्टिकोन” या लेखातील परिच्छेद २ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा