वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 १/१५ पृ. १३-१७
  • ख्रिस्ताचा स्मारकविधी आपण का साजरा करतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ताचा स्मारकविधी आपण का साजरा करतो?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण स्मारकविधी का साजरा करतो?
  • भाकरी आणि द्राक्षारस यांचा अर्थ
  • तयारी करण्याचे काही मार्ग
  • भाकरी आणि द्राक्षारस कोण खाऊ व पिऊ शकतात?
  • बायबलवर आधारित असलेल्या तुमच्या आशेची कदर करा
  • तुम्हीसुद्धा याल का?
  • प्रभूच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • प्रभूचे सांज भोजन कसे साजरे करतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • प्रभूचे सांजभोजन तुम्हासाठी अर्थपूर्ण का आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का पाळावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 १/१५ पृ. १३-१७
येशू व त्याचे शिष्य वरच्या खोलीत वल्हांडणाचा सण साजरा करत आहेत आणि पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडला आहे

ख्रिस्ताचा स्मारकविधी आपण का साजरा करतो?

“माझ्या स्मरणार्थ हे करा.”—१ करिंथ. ११:२४.

तुमचं उत्तर काय असेल?

  • प्रभूच्या सांजभोजनाचा विधी आपण का साजरा केला पाहिजे?

  • स्मारकविधीच्या वेळी कोणती प्रतीके वापरली जातात आणि त्यांचा काय अर्थ होतो?

  • देवानं दिलेल्या आशेबद्दल त्याच्या उपासकांच्या भावना काय आहेत?

१, २. इ.स. ३३ च्या निसान १४ रोजी येशूनं काय केलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

रात्रीची वेळ आहे. पण, संपूर्ण जेरूसलेम शहरात पौर्णिमेच्या चंद्राचा मंद प्रकाश पसरलेला आहे. इ.स. ३३ सालच्या निसान १४ ची ती रात्र आहे. जवळजवळ १,५०० वर्षांआधी इस्राएली लोकांची इजिप्तमधून जी सुटका झाली होती, त्या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी यहुदी लोक वल्हांडणाचा सण पाळायचे. त्यानुसार येशूही आपल्या प्रेषितांसोबत वल्हांडणाचा हा सण साजरा करतो. त्यानंतर आपल्या ११ विश्‍वासू प्रेषितांसोबत असताना, तो भोजनाचा एक खास विधी स्थापन करतो. निसान १४ चा तो दिवस संपण्याआधी येशूचा मृत्यू होणार आहे.a त्याच्या मृत्यूची आठवण म्हणून त्याच्या अनुयायांनी पुढेही हा खास विधी पाळत राहावा अशी तो त्यांना आज्ञा देतो.—मत्त. २६:१, २.

२ येशू प्रार्थना करतो आणि बेखमीर भाकरी घेऊन ती आपल्या शिष्यांना खायला देतो. मग द्राक्षारसाचा प्याला घेऊन तो पुन्हा प्रार्थना करतो आणि म्हणतो: “तुम्ही सर्व यातून प्या.” (मत्त. २६:२६, २७) येशूनं त्यानंतर इतर कोणतेही खाद्यपदार्थ शिष्यांना दिले नाहीत. पण त्या खास प्रसंगी त्यानं आपल्या विश्‍वासू शिष्यांना आणखी बरीच महत्त्वाची माहिती दिली.

३. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

३ आपल्या मृत्यूचा स्मारकविधी दरवर्षी साजरा केला जावा अशी येशूची इच्छा होती. या विधीला “प्रभूचे सांजभोजन” असंही म्हणण्यात आलं आहे. (१ करिंथ. ११:२०, NW) पण, काही जण कदाचित म्हणतील: येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याची काय गरज आहे? भाकरी आणि द्राक्षारस यांचा काय अर्थ होतो? आपण स्मारकविधीची तयारी कशी करू शकतो? भाकरी आणि द्राक्षारस कोण खाऊ व पिऊ शकतात? आणि स्वर्गातील व पृथ्वीवरील जीवनाच्या आशेबद्दल बायबलमध्ये जे सांगण्यात आलं आहे, त्याविषयी यहोवाच्या उपासकांच्या भावना काय आहेत?

आपण स्मारकविधी का साजरा करतो?

४. येशूच्या मृत्यूमुळे आपल्यासाठी काय शक्य झालं आहे?

४ आपण सर्व जण आदामापासून आलेलो असल्यामुळे, पाप व मृत्यू हे आपल्याला वारशानेच मिळाले आहेत. (रोम. ५:१२) पापापासून व मृत्यूपासून स्वतःला किंवा दुसऱ्‍याला सोडवण्यासाठी कोणीही मानव देवाला खंडणी देऊ शकत नाही; कारण सर्व मानव अपरिपूर्ण आहेत. (स्तो. ४९:६-९) पण येशू परिपूर्ण होता. त्यामुळे फक्‍त त्याच्याच परिपूर्ण बलिदानानं मानवांची पाप व मृत्यू यांपासून सुटका होणं शक्य होतं. मृत्यूला सामोरं जाऊन येशूनं आपल्यासाठी हे बलिदान दिलं. त्याचं परिपूर्ण शरीर व रक्‍त अर्पण करून त्यानं खंडणीची किंमत देवासमोर सादर केली. येशूनं दिलेल्या या खंडणीमुळेच आपल्याला पाप व मृत्यू यांपासून मुक्‍त होऊन सार्वकालिक जीवनाची देणगी मिळवणं शक्य झालं आहे.—रोम. ६:२३; १ करिंथ. १५:२१, २२.

५. (क) देवाचं आणि ख्रिस्ताचं मानवांवर प्रेम आहे हे कशावरून दिसून येतं? (ख) आपण स्मारकविधीला का उपस्थित राहिलं पाहिजे?

५ देवानं खंडणीची व्यवस्था केली, यावरून त्याचं सर्व मानवांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. (योहा. ३:१६) तसंच, येशूनं दिलेल्या बलिदानावरून त्याचंही आपल्यावर प्रेम असल्याचं दिसून येतं. खरंतर, पृथ्वीवर येण्याआधी तो देवाचा “कुशल कारागीर” म्हणून कार्य करत होता, तेव्हापासूनच त्याचं मानवांवर मनापासून प्रेम होतं. तो “मनुष्यजातीच्या ठायी . . . आनंद पावे” असं बायबल आपल्याला सांगतं. (नीति. ८:३०, ३१) खरोखर, देवानं व त्याच्या पुत्रानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपण किती आभारी आहोत! या प्रेमाबद्दल आभार व्यक्‍त करण्यासाठीच आपण येशूच्या स्मारकविधीला उपस्थित राहिलं पाहिजे. असं करण्याद्वारे “माझ्या स्मरणार्थ हे करा,” या येशूच्या आज्ञेचं आपण पालन करत असतो.—१ करिंथ. ११:२३-२५.

भाकरी आणि द्राक्षारस यांचा अर्थ

६. स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस यांचा काय अर्थ होतो?

६ प्रेषितांसोबत शेवटच्या वेळी भोजन करताना येशूनं चमत्कार करून भाकरी आणि द्राक्षारस यांचं खरोखरच्या मांसात व रक्‍तात रूपांतर केलं नाही. उलट, मूळ भाषेतील अहवालानुसार शिष्यांना भाकरी देताना तो म्हणाला: “ही माझ्या शरीराला सूचित करते.” तसंच द्राक्षारसाविषयी तो म्हणाला: “हा ‘नवीन करार’ प्रस्थापित करणाऱ्‍या माझ्या रक्‍ताला सूचित करतो, जे पुष्कळांकरता ओतले जात आहे.” (मार्क १४:२२-२४, NW) याचा अर्थ, भाकरी आणि द्राक्षारस ही केवळ प्रतीके किंवा चिन्हे होती.

७. स्मारकविधीसाठी वापरली जाणारी भाकरी कशास सूचित करते?

७ इ.स. ३३ च्या त्या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी, येशूनं वल्हांडणाच्या भोजनासाठी जी बेखमीर भाकरी वापरण्यात आली होती, तिचाच वापर केला. (निर्ग. १२:८) बायबलमध्ये काही ठिकाणी अशुद्धता व पाप खमिरासारखं आहे असं म्हणण्यात आलं आहे. (मत्त. १६:६, ११, १२; लूक १२:१) त्यामुळे, येशूनं बेखमीर भाकरीचा उपयोग केला ही गोष्ट लक्ष देण्याजोगी आहे. येशूचं शरीर निर्दोष होतं, त्यात पापाचा अंशही नव्हता असं त्यावरून सूचित झालं. (इब्री ७:२६) आजही स्मारकविधीसाठी जी भाकरी वापरली जाते तिच्यात कोणत्याही प्रकारचं खमीर घातलं जात नाही.

८. स्मारकविधीसाठी वापरला जाणारा द्राक्षारस कोणत्या गोष्टीला सूचित करतो?

८ इ.स. ३३ च्या निसान १४ रोजी येशूनं जो द्राक्षारस वापरला, तो त्याच्या रक्‍ताला सूचित करत होता. आजही स्मारकविधीच्या वेळी वापरला जाणारा द्राक्षारस (वाईन) त्याच्या रक्‍ताला सूचित करतो. जेरूसलेम शहराच्या बाहेर काही अंतरावर असलेल्या गुलगुथा या ठिकाणी येशूला जिवे मारण्यात आलं आणि अशा रीतीनं “पापांची क्षमा होण्यासाठी” त्याचं रक्‍त सांडण्यात आलं. (मत्त. २६:२८; २७:३३) या अमूल्य बलिदानाची आपण सर्व जण मनापासून कदर करतो! ही कदर व्यक्‍त करण्यासाठी, दरवर्षी होणाऱ्‍या स्मारकविधीची आपल्यापैकी प्रत्येकानं तयारी केली पाहिजे. आपल्याला हे कसं करता येईल?

तयारी करण्याचे काही मार्ग

९. (क) स्मारकविधीसाठी सुचवलेलं बायबल वाचन आपण का केलं पाहिजे? (ख) खंडणी एक अमूल्य देणगी आहे असं तुम्हाला का वाटतं?

९ दैनिक वचनांच्या पुस्तकात स्मारकविधीच्या काळात वाचण्यासाठी बायबलची जी वचनं सुचवलेली असतात, ती आपण त्या त्या दिवशी आठवणीनं वाचली पाहिजेत. असं केल्यामुळे, येशूनं त्याच्या मृत्यूच्या काही काळाआधी कायकाय केलं होतं, यावर विचार करायला आपल्याला मदत मिळेल. आणि यामुळे स्मारकविधीला उपस्थित राहताना आपली योग्य मनोवृत्ती असेल.b एका बहिणीनं असं लिहिलं, “दरवर्षी आम्ही स्मारकविधीची वाट पाहतो. आणि दरवर्षी तो पूर्वीपेक्षा जास्त अर्थपूर्ण वाटतो. मला आठवतं, माझ्या बाबांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी मी सुन्‍न होऊन नुसतीच बाबांकडे पाहत उभी होते. आणि त्या क्षणी मला अगदी मनापासून खंडणीचा खरा अर्थ समजला. . . . पूर्वीसुद्धा, खंडणीविषयीची सगळी वचनं मला माहीत होती; दुसऱ्‍यांना समजावूनही सांगता येत होती. पण, मृत्यूसमोर आपण किती असहाय असतो हे जेव्हा मी स्वतः अनुभवलं, त्या क्षणी मला खंडणीची खरी किंमत कळली. खंडणीमुळे आपल्याला किती अद्‌भुत आशीर्वाद मिळणार आहेत या विचारानं त्या दुःखाच्या क्षणीही माझं मन आनंदानं भरून आलं.” या बहिणीप्रमाणेच, येशूच्या बलिदानामुळे आपल्या स्वतःला कोणता फायदा होतो यावर आपण खोलवर विचार केला पाहिजे. स्मारकविधीची तयारी करण्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.

येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटच्या आठवड्यात जे घडले त्याविषयी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्सच्या सुधारित आवृत्तीतील परिशिष्टात दिलेल्या माहितीवर मनन करत असताना एक यहोवाचा साक्षीदार

स्मारकविधीसाठी दिलेलं बायबल वाचन केल्यामुळे आपल्याला या खास प्रसंगासाठी तयारी करायला मदत मिळेल (परिच्छेद ९ पाहा)

१०. स्मारकविधीसाठी आपण आणखी कोणत्या मार्गानं तयारी करू शकतो?

१० स्मारकविधीसाठी तयारी करताना आपण जास्त प्रमाणात सेवाकार्य करण्याची योजनादेखील करू शकतो. उदाहरणार्थ, आपण सहायक पायनियरिंग करू शकतो. बायबल अभ्यास करणाऱ्‍यांना आणि इतरांना स्मारकविधीचं आमंत्रण देताना जेव्हा आपण त्यांच्याशी देवाबद्दल, त्याच्या पुत्राबद्दल आणि आज्ञाधारक मानवांना मिळणार असलेल्या आशीर्वादांबद्दल बोलू तेव्हा आपल्याला नक्कीच खूप आनंद मिळेल.—स्तो. १४८:१२, १३.

११. करिंथ मंडळीतले काही ख्रिस्ती अयोग्य प्रकारे भाकर खात होते व द्राक्षारस पीत होते असं पौलानं का म्हटलं?

११ स्मारकविधीची तयारी करताना, पौलानं करिंथ मंडळीला जे लिहिलं त्यावर मनन करा. (१ करिंथकर ११:२७-३४ वाचा.) जो कोणी अयोग्य प्रकारे भाकरी खाईल अथवा द्राक्षारस पिईल तो “प्रभूचे शरीर व रक्‍त यांसंबधाने दोषी ठरेल” असं पौल म्हणाला. म्हणजेच, जर एखादी अभिषिक्‍त व्यक्‍ती अयोग्य प्रकारे वागली आणि त्यानंतर जर ती स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेण्यात सहभागी झाली तर ती स्वतःवर “दंड” ओढवून घेईल. पौलाच्या काळात करिंथ मंडळीतले अनेक ख्रिस्ती स्मारकविधीच्या संबंधानं अयोग्य प्रकारे वागत होते. कदाचित, त्यांच्यापैकी काही जण स्मारकविधी साजरा करण्याआधी किंवा स्मारकविधीच्या वेळी प्रमाणाबाहेर खातपीत असतील. यामुळे, स्मारकविधीला आल्यावर कार्यक्रमाकडे लक्ष देण्याच्या किंवा आध्यात्मिक रीत्या त्यापासून फायदा उठवण्याच्या स्थितीत ते नसायचे. असं वागल्यामुळे या प्रसंगाबद्दल मुळीच आदर नसल्याचं ते दाखवत होते. म्हणूनच, स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेण्यात त्यांचं सहभागी होणं यहोवाच्या नजरेत योग्य नव्हतं.

१२. (क) पौलानं स्मारकविधीची तुलना कशाशी केली, आणि सहभागी होणाऱ्‍यांना त्यानं कोणता इशारा दिला? (ख) सहभागी होणाऱ्‍या व्यक्‍तीनं गंभीर पाप केलं असल्यास तिनं काय केलं पाहिजे?

१२ पौलानं स्मारकविधीची तुलना भोजनाशी केली आणि या भोजनात सहभागी होणाऱ्‍यांना त्यानं असा इशारा दिला: “तुम्ही देवाचा आणि भुतांचासुद्धा असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भुतांच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही.” (१ करिंथ. १०:१६-२१, ईझी-टू-रीड व्हर्शन) स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेण्यात सहभागी होणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीनं काही गंभीर पाप केलं असेल, तर तिनं वडिलांची मदत घेतली पाहिजे. (याकोब ५:१४-१६ वाचा.) जर तिनं मनापासून पश्‍चात्ताप केला आणि हे आपल्या कार्यांवरून दाखवून दिलं, तर मात्र भाकरी व द्राक्षारस घेण्याद्वारे ती येशूच्या बलिदानाप्रती अनादर दाखवणार नाही.—लूक ३:८.

१३. देवानं आपल्याला जी आशा दिली आहे तिच्याविषयी प्रार्थनापूर्वक मनन करणं महत्त्वाचं का आहे?

१३ स्मारकविधीची तयारी करत असताना, प्रत्येक जण देवानं आपल्याला दिलेल्या आशेबद्दल प्रार्थनापूर्वक मनन करू शकतो; मग ही स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची. येशूच्या बलिदानाचा अनादर करण्याची नक्कीच आपल्यापैकी कोणाचीही इच्छा नाही. त्यामुळे, आपण अभिषिक्‍त जनांपैकी आहोत याची पूर्ण खात्री असल्याशिवाय स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेण्यात आपण सहभागी होऊ नये. मग, भाकरी व द्राक्षारस कोण घेऊ शकतात?

भाकरी आणि द्राक्षारस कोण खाऊ व पिऊ शकतात?

१४. भाकरी व द्राक्षारस घेण्यात सहभागी होण्याशी नव्या कराराचा काय संबंध आहे?

१४ आपण नव्या कराराचे भागीदार आहोत याची ज्यांना पक्की खात्री आहे, केवळ त्यांनीच स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेण्यात सहभागी होणं योग्य ठरेल. द्राक्षारसाच्या संदर्भात येशूनं म्हटलं: “हा प्याला माझ्या रक्‍ताने झालेला नवा करार आहे.” (१ करिंथ. ११:२५) यहोवानं पूर्वी इस्राएली लोकांसोबत नियमशास्त्राचा करार केला होता. पण, नंतर त्यानं या कराराऐवजी एक नवा करार करणार असल्याचं सांगितलं. (यिर्मया ३१:३१-३४ वाचा.) देवानं हा नवा करार अभिषिक्‍त जनांसोबत केला आहे. (गलती. ६:१५, १६) येशूच्या मृत्यूमुळे हा करार अंमलात आला. (लूक २२:२०) त्यामुळे, येशू या नव्या कराराचा मध्यस्थ आहे आणि जे विश्‍वासू अभिषिक्‍त जन या नव्या कराराचे भागीदार आहेत त्यांना स्वर्गात सार्वकालिक जीवन मिळण्याची आशा आहे.—इब्री ८:६; ९:१५.

१५. राज्याच्या करारात कोणाला भागीदार करण्यात आलं आहे, आणि विश्‍वासू राहिल्यास त्यांना कोणता आशीर्वाद मिळेल?

१५ स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेण्यात सहभागी होणाऱ्‍यांना, आपण राज्याच्या कराराचे भागीदार आहोत याचीही खात्री असते. (लूक १२:३२ वाचा.) हा करार येशू व त्याच्या दुःखांत सहभागी झालेल्या त्याच्या विश्‍वासू अभिषिक्‍त अनुयायांमध्ये करण्यात आला होता. (फिलिप्पै. ३:१०) राज्याच्या करारात भागीदार असल्यामुळे विश्‍वासू अभिषिक्‍त जन स्वर्गात ख्रिस्तासोबत सर्वकाळ राज्य करतील. (प्रकटी. २२:५) या अभिषिक्‍त जनांनाच स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेण्यात सहभागी होण्याचा हक्क आहे.

१६. रोमकर ८:१५-१७ यांतील शब्दांचा अर्थ थोडक्यात सांगा.

१६ आपण देवाची मुलं आहोत आणि म्हणून आपण भाकरी व द्राक्षारस घेण्यात सहभागी होऊ शकतो याची अभिषिक्‍त जनांना पूर्ण खात्री असते. (रोमकर ८:१५-१७ वाचा.) पौलानं सांगितलं की ते देवाला “अब्बा, बापा” अशी हाक मारतात. “अब्बा” हा अरामी भाषेतला शब्द आहे. या शब्दात “बाबा” या शब्दातली आपुलकी, तसंच “वडील” या शब्दातला आदरही येतो. या शब्दातून अभिषिक्‍त जनांचा देवासोबत असलेला खास नातेसंबंध व्यक्‍त होतो. अभिषिक्‍त जनांना देवाची मुलं या नात्यानं “दत्तकपणाचा आत्मा” मिळाला आहे. आपण देवाची अभिषिक्‍त मुलं आहोत याविषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नसते. कारण देवाचा आत्मा त्यांना अशी “साक्ष देतो.” त्यामुळे, आपल्याला पृथ्वीवर जगण्याची इच्छा नाही म्हणून आपण अभिषिक्‍तांपैकी एक आहोत असा एखाद्यानं विचार करू नये. देवाच्या आत्म्यानं दिलेल्या साक्षीमुळे अभिषिक्‍त जनांना याची पूर्ण खात्री असते की शेवटपर्यंत विश्‍वासू राहिल्यास ते स्वर्गात येशूचे सहवारस बनतील. तसंच, “जो पवित्र” आहे त्यानं म्हणजेच यहोवानं त्यांना अभिषिक्‍त केलं आहे हेही त्यांना माहीत असतं. आज, येशूच्या १,४४,००० विश्‍वासू अनुयायांपैकी फक्‍त काही जण पृथ्वीवर उरले आहेत. (१ योहा. २:२०; प्रकटी. १४:१) यहोवासोबत त्यांचं इतकं जवळचं नातं आहे की ते “अब्बा, बापा” म्हणून त्याला हाक मारतात.

बायबलवर आधारित असलेल्या तुमच्या आशेची कदर करा

१७. अभिषिक्‍त जनांना कोणती आशा आहे, आणि ते अभिषिक्‍त असल्याचं त्यांना कसं कळतं?

१७ जर तुम्ही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपैकी एक असाल, तर तुमच्या वैयक्‍तिक प्रार्थनांमध्ये स्वर्गीय जीवनाच्या तुमच्या आशेबद्दल तुम्ही नेहमी उल्लेख कराल. तसंच, बायबलमध्ये दिलेल्या माहितीचा तुमच्यासाठी खास अर्थ असेल. उदाहरणार्थ, येशू व त्याची “वधू” यांच्या स्वर्गात होणाऱ्‍या लग्नाबद्दल बायबल सांगतं, तेव्हा ही माहिती तुमच्याबद्दल आहे हे तुम्ही ओळखता आणि या घटनेची तुम्ही वाट पाहता. (२ करिंथ. ११:२; योहा. ३:२७-२९; प्रकटी. २१:२, ९-१४) तसंच, अभिषिक्‍त जनांबद्दल देवाला असलेल्या प्रेमाविषयी जेव्हा बायबल सांगतं, तेव्हा देव जणू तुमच्याशीच बोलत आहे असं तुम्हाला वाटतं. आणि देवाच्या वचनात अभिषिक्‍त जनांसाठी दिलेल्या खास सूचना जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला त्यांचं पालन करण्याची प्रेरणा देतो. अशा रीतीनं, तुम्हाला स्वर्गीय जीवनाची आशा असल्याची पवित्र आत्मा तुम्हाला “साक्ष देतो.”

१८. दुसऱ्‍या मेंढरांना कोणती आशा आहे, आणि या आशेबद्दल तुमच्या भावना काय आहेत?

१८ जर तुम्ही दुसऱ्‍या मेंढरांच्या मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य असाल, तर देवानं तुम्हाला पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा दिली आहे. (प्रकटी. ७:९; योहा. १०:१६) तुमच्या या आशेबद्दल तुम्हाला कसं वाटतं? जेव्हा तुम्ही नंदनवनाबद्दल सांगणारी बायबलमधली वचनं वाचता, तेव्हा तुमच्या मनात एक प्रकारची उत्सुकता निर्माण होत नाही का? त्या नंदनवनात आपल्या कुटुंबासोबत व प्रिय मित्रांसोबत शांतीपूर्ण परिस्थितीत राहण्यासाठी तुम्ही नक्कीच आतुर होत असाल. आजच्या जगात दिसणारी गरिबी, दुःख, रोगराई आणि मृत्यू यांसारख्या गोष्टी केव्हा एकदाच्या नाहीशा होतील असं तुम्हाला वाटत असेल. (स्तो. ३७:१०, ११, २९; ६७:६; ७२:७, १६; यश. ३३:२४) तसंच, पुनरुत्थानात तुमच्या प्रिय जनांना पुन्हा पाहण्यासाठीही तुम्ही आतुर होत असाल, नाही का? (योहा. ५:२८, २९) खरोखर, नंदनवनाच्या अद्‌भुत आशेबद्दल तुम्ही विचार करता, तेव्हा तुम्हाला यहोवाचे मनापासून आभार मानावेसे वाटत असतील! म्हणूनच, स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस जरी तुम्ही घेत नसला, तरीही येशूच्या खंडणी बलिदानाविषयी कदर व्यक्‍त करण्यासाठी तुम्ही स्मारकविधीला उपस्थित राहता.

तुम्हीसुद्धा याल का?

१९, २०. (क) तुमची आशा पूर्ण होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? (ख) तुम्हाला स्मारकविधीला का उपस्थित राहायचं आहे?

१९ तुमची आशा, मग ती पृथ्वीवर राहण्याची आशा असो किंवा स्वर्गात, ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही यहोवावर, येशू ख्रिस्तावर आणि खंडणी बलिदानावर विश्‍वास दाखवणं गरजेचं आहे. स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे तुम्हाला आपल्या आशेबद्दल आणि येशूचं बलिदान किती मौल्यवान आहे याबद्दल विचार करण्याची संधी मिळेल. शुक्रवार, ३ एप्रिल २०१५ या दिवशी सूर्यास्तानंतर जगभरातल्या अनेक राज्य सभागृहांत व इतर ठिकाणी लाखो लोक येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी एकत्र येणार आहेत. तुम्हीसुद्धा या महत्त्वाच्या सभेला उपस्थित राहाल का?

२० स्मारकविधीला योग्य मनोवृत्तीनं उपस्थित राहण्यासाठी तयारी केल्यास, येशूचं खंडणी बलिदान ही किती मौल्यवान देणगी आहे याची आपल्याला जाणीव होईल. स्मारकविधीचं भाषण लक्ष देऊन ऐकल्यामुळे तुम्हाला इतरांनाही यहोवाच्या प्रेमाबद्दल आणि आपल्या सर्वांकरता असलेल्या त्याच्या उद्देशाबद्दल सांगण्याची प्रेरणा मिळेल. (मत्त. २२:३४-४०) तेव्हा, स्मारकविधीला उपस्थित राहण्याचा पक्का निर्धार करा.

a यहुदी लोकांचा दिवस एका सूर्यास्तापासून दुसऱ्‍या सूर्यास्तापर्यंत असायचा.

b देवाच्या वचनाच्या अभ्यासाकरता मार्गदर्शिका यातील १६ वा भाग पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा