“वरील गोष्टींकडे मन लावा”
“वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.” —कलस्सै. ३:२.
१, २. (क) पहिल्या शतकात कलस्सैमधील मंडळीची एकता धोक्यात का होती? (ख) विश्वासात दृढ राहण्यासाठी कलस्सैमधील बांधवांना कोणता सल्ला देण्यात आला?
पहिल्या शतकात कलस्सैमधील ख्रिस्ती मंडळीची एकता धोक्यात होती! काही बांधवांचे असे ठाम मत होते की मोशेचे नियमशास्त्र पाळलेच पाहिजे. इतर काही बांधव खोट्या धर्मातील शिकवणी मंडळीत पसरवत होते. उदाहरणार्थ, आपण जीवनातील सर्व सुखांचा त्याग केला पाहिजे असे ते शिकवत होते. या चुकीच्या शिकवणींपासून बांधवांना सावध करण्यासाठी पौलाने कलस्सै मंडळीला एक उत्तेजन देणारे पत्र लिहिले. त्या पत्रात त्याने म्हटले: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.”—कलस्सै. २:८.
२ त्या अभिषिक्त ख्रिश्चनांनी जर “जगाच्या प्राथमिक” शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले असते, तर ते यहोवाने तारणासाठी केलेल्या तरतुदीला नाकारत आहेत असा याचा अर्थ झाला असता. (कलस्सै. २:२०-२३) या बांधवांना यहोवासोबतचा त्यांचा मौल्यवान नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी पौलाने त्यांना पुढील सल्ला दिला: “वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.” (कलस्सै. ३:२) याचा अर्थ त्यांच्यासाठी ‘स्वर्गात राखून ठेवलेल्या’ अविनाशी जीवनाच्या आशेवर त्यांनी आपले लक्ष केंद्रित करण्याची गरज होती.—कलस्सै. १:३-५.
३. (क) अभिषिक्त ख्रिस्ती कोणत्या आशेवर आपले लक्ष केंद्रित करतात? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
३ आजच्या काळातील अभिषिक्त ख्रिस्तीदेखील देवाच्या स्वर्गातील राज्यावर व “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस” होण्याच्या आशेवर आपले लक्ष केंद्रित करतात. (रोम. ८:१४-१७) पण मग ज्या लोकांना पृथ्वीवर राहण्याची आशा आहे त्यांच्याबद्दल काय? पौलाचा सल्ला त्यांना कोणत्या अर्थाने लागू होतो? “दुसरी मेंढरे” यांतील बांधव “वरील गोष्टींकडे” आपले मन कसे लावू शकतात? (योहा. १०:१६) आणि परीक्षांना सामोरे जात असतानाही वरील गोष्टींवर मन लावणाऱ्या अब्राहाम व मोशे या विश्वासू सेवकांपासून आपण काय शिकू शकतो?
वरील गोष्टींकडे मन लावण्याचा काय अर्थ होतो?
४. दुसऱ्या मेंढरांतील सदस्य आपले मन वरील गोष्टींकडे कसे लावू शकतात?
४ दुसरी मेंढरे यांतील लोकांना स्वर्गातील जीवनाची आशा नसली तरी तेदेखील वरील गोष्टींकडे मन लावू शकतात. ते कसे? यहोवा देवाला आणि राज्याशी संबंधित गोष्टींना आपल्या जीवनात पहिले स्थान देण्याद्वारे. (लूक १०:२५-२७) असे करण्यासाठी आपल्यासमोर ख्रिस्ताचे उत्तम उदाहरण आहे. (१ पेत्र २:२१) पहिल्या शतकातील बांधवांप्रमाणेच आज आपल्यालादेखील सैतानाच्या जगातील चुकीचे विचार, शिकवणी आणि धनसंपत्तीच्या मागे धावण्याची वृत्ती यांचा सामना करावा लागतो. (२ करिंथकर १०:५ वाचा.) अशा वाईट प्रभावांमुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच येशू ख्रिस्ताप्रमाणे आपणदेखील त्यांपासून सावध राहिले पाहिजे.
५. धनसंपत्तीबद्दल आपल्या दृष्टिकोनाविषयी आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो?
५ धनसंपत्तीमागे धावण्याच्या जगातील वृत्तीचा आपल्यावरही प्रभाव पडला आहे का? आपण कोणत्या गोष्टींवर प्रेम करतो हे सहसा आपल्या विचारांतून आणि कार्यांतून दिसून येते. येशूने म्हटले: “जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल.” (मत्त. ६:२१) आपल्या मनाचा कल कोणत्या गोष्टींकडे आहे हे ओळखण्यासाठी आपण वेळोवेळी आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: ‘पैशाविषयी विचार करण्यात मी किती वेळ घालवतो? बिझनेस, पैशाची गुंतवणूक, किंवा अधिकाधिक सुखसोयी मिळवणे यांमध्येच माझा बहुतेक वेळ जातो का? की मी आध्यात्मिक गोष्टींना जीवनात पहिले स्थान देण्याचा प्रयत्न करतो?’ (मत्त. ६:२२) येशूने सांगितले होते की जे लोक ‘पृथ्वीवर संपत्ती साठवण्याचाच’ मुख्यतः प्रयत्न करतात ते स्वतःचे आध्यात्मिक आरोग्य धोक्यात आणतात.—मत्त. ६:१९, २०, २४.
६. शारीरिक इच्छांवर आपण ताबा कसा मिळवू शकतो?
६ आपण अपरिपूर्ण असल्यामुळे चुकीच्या गोष्टी करण्याकडे सहसा आपला कल असतो. (रोमकर ७:२१-२५ वाचा.) आपण आपल्या जीवनात देवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले नाही तर आपल्या हातून “अंधाराची कामे” होण्याची शक्यता आहे. यांत चैनबाजी, अतिमद्यपान, अनैतिक कृत्ये, निर्लज्ज वर्तन यांसारख्या गोष्टी समाविष्ट आहेत. (रोम. १३:१२, १३) शारीरिक इच्छांना चालना देणाऱ्या ‘पृथ्वीवरील गोष्टींपासून’ दूर राहण्यासाठी आपण ‘वरील गोष्टींकडे’ आपले मन लावले पाहिजे. असे करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे प्रेषित पौलाने म्हटले: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो.” (१ करिंथ. ९:२७) वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आपल्यालाही पौलाप्रमाणे स्वतःला शिस्त लावावी लागेल. देवाच्या इच्छेनुसार जगण्यासाठी प्राचीन काळातील दोन विश्वासू सेवकांनी काय केले त्याकडे आता आपण लक्ष देऊ या.—इब्री ११:६.
अब्राहामाने “परमेश्वरावर विश्वास ठेवला”
७, ८. (क) अब्राहाम आणि सारा यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? (ख) अब्राहामाने आपले लक्ष कशावर केंद्रित केले?
७ यहोवाने जेव्हा अब्राहामाला कनान देशात जायला सांगितले, तेव्हा त्याने यहोवाच्या आज्ञेचे पालन केले. अब्राहामाचा देवावरील विश्वास आणि अधीनता यांमुळे यहोवाने त्याच्यासोबत एक करार केला. त्याने अब्राहामाला म्हटले: “मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन; मी तुला आशीर्वाद देईन.” (उत्प. १२:२) पण हा करार केल्यानंतर बरीच वर्षे अब्राहाम आणि सारा यांना मूल झाले नाही. यहोवाने आपल्याला दिलेले वचन तो विसरला आहे असे अब्राहामाला वाटले असावे का? शिवाय, त्या वेळी कनान देशातील त्यांचे जीवनही खूप कठीण होते. अब्राहाम आणि त्याचे घराणे, ऊर या समृद्ध शहरातील आपले घर व नातेवाईक सोडून कनान देशात आले होते. ते १,६०० पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करून आले होते. कनान देशात त्यांना तंबूंत राहावे लागले, दुष्काळाचा सामना करावा लागला आणि लुटारूंपासूनही स्वतःचा बचाव करावा लागला. (उत्प. १२:५, १०; १३:१८; १४:१०-१६) असे असूनही त्यांनी माघारी जाण्याचा विचार कधीच केला नाही.—इब्री लोकांस ११:८-१२, १५ वाचा.
८ “पृथ्वीवरील गोष्टींकडे” मन लावण्याऐवजी अब्राहामाने “परमेश्वरावर विश्वास ठेवला.” (उत्प. १५:६) त्याने ‘वरील गोष्टींवर’ म्हणजेच देवाने दिलेल्या अभिवचनांवर आपले लक्ष केंद्रित केले. अब्राहामाने दाखवलेल्या विश्वासामुळे यहोवाने त्याला आशीर्वादित केले. यहोवाने त्याला म्हटले: “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले तुझी संतती अशीच होईल.” (उत्प. १५:५) या शब्दांमुळे, यहोवाने दिलेले अभिवचन तो नक्की पूर्ण करेल यावर अब्राहामाचा विश्वास किती वाढला असेल! त्यानंतर अब्राहामाने जेव्हाजेव्हा आकाशातील ताऱ्यांकडे पाहिले असेल तेव्हातेव्हा त्याला यहोवाचे अभिवचन आठवले असेल. आणि यहोवाने ठरवलेली वेळ आली तेव्हा अभिवचनानुसार अब्राहामाला एक पुत्र झाला.—उत्प. २१:१, २.
९. देवाच्या सेवेत व्यस्त राहण्यासाठी आपणही अब्राहामाप्रमाणे काय केले पाहिजे?
९ अब्राहामासारखेच आपणही देवाची अभिवचने पूर्ण होण्याची वाट पाहत आहोत. (२ पेत्र ३:१३) आपण ‘वरील गोष्टींकडे’ मन लावले नाही तर देवाची अभिवचने पूर्ण होण्यासाठी विलंब लागत आहे असे आपल्याला वाटू शकते. यामुळे आपण आध्यात्मिक रीत्या मागे पडू शकतो. कदाचित पूर्वी पायनियर सेवा करण्यासाठी किंवा इतर मार्गांनी आपली सेवा वाढवण्यासाठी तुम्ही काही त्याग केले असतील. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण, तुम्ही आजदेखील त्याग करत आहात का? अब्राहामाने नेहमी, “खरा पाया असलेल्या शहरावर” आपले लक्ष केंद्रित केले हे आठवणीत असू द्या. (इब्री ११:१०, NW) त्याने “देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.”—रोम. ४:३.
मोशेने “जो अदृश्य आहे त्याला” पाहिले
१०. तरुणपणी मोशेचे जीवन कसे होते?
१० मोशेनेदेखील ‘वरील गोष्टींकडे’ आपले मन लावले. तरुणपणात त्याला इजिप्तच्या “सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले” होते. हे काही साधारण शिक्षण नव्हते. कारण त्या काळात इजिप्त हे एक शक्तिशाली राष्ट्र होते. तसेच, मोशे हा फारोच्या महालात राहत होता. म्हणून बायबल सांगते की तो “भाषणांत व कृतींत पराक्रमी होता.” (प्रे. कृत्ये ७:२२) त्याच्यापुढे किती चांगल्या संधी असतील याचा विचार करा. पण मोशेने आपले मन वरील गोष्टींवर, म्हणजेच देवाची इच्छा पूर्ण करण्यावर लावले होते.
११, १२. मोशेने कोणत्या शिक्षणाला मौल्यवान लेखले, आणि आपण असे का म्हणू शकतो?
११ मोशे लहान असताना त्याची आई योखबेद, हिने त्याला इब्री लोकांच्या देवाबद्दल नक्कीच शिकवले असेल. मोशेने यहोवाबद्दलच्या ज्ञानाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान लेखले. फारोच्या महालात राहत असल्यामुळे त्याला बरेच अधिकार होते व त्याच्यापुढे मोठमोठ्या संधी होत्या. पण या सर्व गोष्टी त्याने नाकारल्या कारण त्याला यहोवाचे ज्ञान जास्त प्रिय होते. (इब्री लोकांस ११:२४-२७ वाचा.) यहोवाबद्दलच्या ज्ञानामुळे व त्याच्यावरील विश्वासामुळे मोशे ‘वरील गोष्टींकडे’ मन लावण्यास प्रवृत्त झाला.
१२ मोशेला त्या काळातील सर्वात उत्तम असे शिक्षण मिळाले होते. पण त्याने या शिक्षणाचा उपयोग इजिप्तमध्ये एखादे मोठे पद मिळवण्यासाठी, स्वतःचे नाव करण्यासाठी किंवा धनसंपत्ती मिळवण्यासाठी केला का? मुळीच नाही. जर मोशेने असे केले असते तर त्याच्याविषयी बायबलमध्ये पुढील शब्द कधीच लिहिण्यात आले नसते: “त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले; पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले.” यावरून हे स्पष्ट दिसून येते की, मोशेला मिळालेल्या आध्यात्मिक शिक्षणाचा उपयोग त्याने यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेला हातभार लावण्यासाठी केला.
१३, १४. (क) यहोवाच्या लोकांना इजिप्तमधून सोडवण्यासाठी मोशेला कोणते गुण विकसित करण्याची गरज होती? (ख) मोशेसारखेच आपल्यालादेखील काय करण्याची गरज आहे?
१३ मोशेचे यहोवावर व त्याच्या लोकांवर प्रेम होते. तो ४० वर्षांचा असताना त्याला वाटले की इजिप्तच्या दास्यातून देवाच्या लोकांना सोडवण्यास तो तयार आहे. (प्रे. कृत्ये ७:२३-२५) पण या कामासाठी मोशे पूर्णपणे तयार नाही हे यहोवाला माहीत होते. त्याला नम्रता, धीर, सौम्यता आणि आत्मसंयम यांसारखे गुण विकसित करावे लागणार होते. (नीति. १५:३३) भविष्यात येणाऱ्या मोठ्या समस्यांचा सामना करण्यासाठी मोशेला प्रशिक्षणाची गरज होती. ४० वर्षे एक मेंढपाळ म्हणून काम केल्यामुळे तो हे आवश्यक गुण विकसित करू शकला.
१४ मेंढपाळ म्हणून काम केल्यामुळे मोशेला मदत झाली का? नक्कीच झाली. बायबलमध्ये असे सांगितले आहे: “मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गण. १२:३) नम्रतेचा गुण विकसित केल्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी वागताना तो धीर दाखवू शकला. त्यांच्या समस्या सोडवतानादेखील त्याला या गुणामुळे खूप मदत झाली. (निर्ग. १८:२६) मोशेप्रमाणेच आपल्यालादेखील आध्यात्मिक गुण विकसित करण्याची गरज असू शकते. या गुणांमुळे आपल्याला “मोठ्या संकटातून” बाहेर पडून देवाच्या राज्यात जाण्यास मदत होईल. (प्रकटी. ७:१४) आपण सहसा लोकांसोबत जुळवून घेतो का? खासकरून अशा लोकांसोबत जे लवकर दुखावले जातात? याविषयी प्रेषित पौलाने पुढील सल्ला दिला: “सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा.”—१ पेत्र २:१७.
वरील गोष्टींवर मन लावा
१५, १६. (क) योग्य गोष्टींवर मन लावणे इतके महत्त्वाचे का आहे? (ख) ख्रिश्चनांनी चांगले आचरण ठेवणे गरजेचे का आहे?
१५ आपण शेवटल्या काळातील कठीण दिवसांत जगत आहोत. (२ तीम. ३:१) त्यामुळे आध्यात्मिक रीत्या जागृत राहण्यासाठी आपण योग्य गोष्टींवर आपले मन लावणे खूप महत्त्वाचे आहे. (१ थेस्सलनी. ५:६-९) आपण हे कसे करू शकतो ते आता पाहू या.
१६ आपले आचरण: चांगले आचरण किती महत्त्वाचे आहे त्याविषयी पेत्राने असे म्हटले: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की, . . . त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:१२) आपण प्रत्येक प्रसंगी यहोवाच्या नावाला गौरव देण्याचा प्रयत्न करतो. मग आपण घरात असो, कामावर असो, शाळेत असो, मनोरंजन करत असो अथवा सेवाकार्यात असो. हे खरे आहे की, अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्या सर्वांच्या हातून चुका होतात. (रोम. ३:२३) पण आपल्या “विश्वासासंबंधीचे” युद्ध लढत राहिल्यामुळे आपण आपल्या स्वार्थी इच्छांवर मात करू शकू.—१ तीम. ६:१२.
१७. आपण येशू ख्रिस्तासारखी मनोवृत्ती कशी बाळगू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
१७ आपली मनोवृत्ती: योग्य मनोवृत्ती बाळगणे हे चांगले आचरण ठेवण्याशी संबंधित आहे. प्रेषित पौलाने म्हटले: “जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो.” (फिलिप्पै. २:५) येशूची मनोवृत्ती कशी होती? येशू नम्र होता आणि यामुळे तो सेवाकार्यात आत्मत्यागी मनोवृत्ती दाखवू शकला. इतरांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणे हे त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे काम होते. (मार्क १:३८; १३:१०) येशूने जे काही शिकवले ते देवाच्या वचनाच्या आधारावरच शिकवले. (योहा. ७:१६; ८:२८) त्याने शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला होता. म्हणूनच त्यांतील उताऱ्यांचा वापर करणे, त्यांचे समर्थन करणे आणि त्यांचा खुलासा करून सांगणे त्याला शक्य झाले. ख्रिस्तासारखी मनोवृत्ती बाळगण्यासाठी आपणदेखील नम्रता विकसित केली पाहिजे आणि सेवाकार्य व वैयक्तिक बायबल अभ्यास यांबाबतीत आवेशी असले पाहिजे.
देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणे हे येशूच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे काम होते (परिच्छेद १७ पाहा)
१८. यहोवाच्या कार्याला आपण कोणत्या महत्त्वाच्या मार्गाने पाठिंबा देऊ शकतो?
१८ प्रचार कार्याला पाठिंबा: यहोवाची इच्छा आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर “प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा.” (फिलिप्पै. २:९-११) येशूचे इतके उच्च पद असूनही तो आपल्या पित्याच्या अधीन आहे. आणि भविष्यात तो त्याला दिलेला अधिकार पित्याला सोपवेल. आपणदेखील येशूसारखेच यहोवाला अधीन असले पाहिजे. (१ करिंथ. १५:२८) आपण हे कसे करू शकतो? “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” बनवण्याचे जे काम आपल्यावर सोपवण्यात आले आहे त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्याद्वारे. (मत्त. २८:१९) त्यासोबतच आपण आपल्या शेजाऱ्यांना व बांधवांनादेखील मदत केली पाहिजे.—गलती. ६:१०.
१९. आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?
१९ ‘वरील गोष्टींकडे’ मन लावण्याविषयी यहोवा आपल्याला वेळोवेळी आठवण करून देतो, यासाठी आपण त्याचे किती कृतज्ञ आहोत! “आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून” आपण “धीराने” धावले पाहिजे. (इब्री १२:१) तेव्हा, यहोवाची “जिवेभावे” सेवा करण्याचा आपण सर्व जण निर्धार करू या. यहोवा आपल्या प्रयत्नांवर नक्कीच आशीर्वाद देईल!—कलस्सै. ३:२३, २४.