यहोवासोबत काम करण्याच्या बहुमानाची कदर करा!
“आम्ही देवाचे सहकारी आहो.” —१ करिंथ. ३:९.
१. काम करण्याबद्दल यहोवाला कसे वाटते, आणि यामुळे त्याने काय केले?
यहोवा नेहमीच काम करत राहतो आणि त्यात त्याला आनंद मिळतो. (स्तो. १३५:६; योहा. ५:१७) आपण निर्माण केलेल्या बुद्धिमान प्राण्यांनाही असा आनंद आणि काहीतरी साध्य केल्याची भावना अनुभवता यावी म्हणून यहोवा त्यांना आनंददायक व समाधानकारक काम सोपवतो. उदाहरणार्थ, त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राला निर्मितीच्या कार्यात सहभागी केले. (कलस्सैकर १:१५, १६ वाचा.) बायबलमध्ये असे सांगण्यात आले आहे की पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात देवासोबत एक “कुशल कारागीर” म्हणून काम करत होता.—नीति. ८:३०.
२. पूर्वीपासूनच यहोवाने आत्मिक पुत्रांना महत्त्वाचे आणि समाधानकारक काम दिले आहे हे कशावरून दिसते?
२ यहोवाने पूर्वीपासूनच आपला उद्देश साध्य करण्यासाठी आपल्या आत्मिक पुत्रांचा उपयोग करून घेतला आहे. बायबलमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आदाम आणि हव्वा यांनी पाप केल्यानंतर त्यांना एदेन बागेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर देवाने “जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तरवार ठेवली.” (उत्प. ३:२४) तसेच, प्रकटीकरण २२:६ मध्ये असे सांगण्यात आले आहे की यहोवाने, “ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले.”
मानवांबद्दल काय?
३. पृथ्वीवर असताना येशूने आपल्या पित्याचे अनुकरण कसे केले?
३ पृथ्वीवर एक परिपूर्ण मानव असताना येशूने यहोवाकडून मिळालेले काम आनंदाने पूर्ण केले. आपल्या पित्याच्या उदाहरणाचे अनुकरण करून त्यानेही आपल्या शिष्यांना एक महत्त्वाचे काम दिले. या कामात ते यशस्वी होतील असे आश्वासन देण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येशूने त्यांना म्हटले: “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल, आणि त्यांपेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो.” (योहा. १४:१२) हे काम किती तातडीचे आहे यावर जोर देत येशूने म्हटले: “ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.”—योहा. ९:४.
४-६. (क) नोहाने आणि मोशेने केलेल्या कार्यांमुळे आपल्याला कोणते फायदे झाले आहेत? (ख) देव मानवांना जे काही काम सोपवतो त्यामुळे काय साध्य होते?
४ येशू पृथ्वीवर आला, त्याआधीही मानवांना समाधानकारक काम सोपवण्यात आले होते. आदाम आणि हव्वा यांच्यावर सोपवण्यात आलेले काम त्यांनी पूर्ण केले नाही. असे असले, तरी इतरांनी मात्र देवाच्या सूचनांचे पालन केले. (उत्प. १:२८) उदाहरणार्थ, जलप्रलयातून प्राण्यांचा आणि मानवांचा बचाव करण्यासाठी यहोवाने नोहाला एक तारू बांधण्यासंबंधी काही खास सूचना दिल्या होत्या. यहोवाने त्याला जे काही सांगितले होते ते त्याने प्रामाणिकपणे केले. त्याने असे केल्यामुळेच तर आज आपण अस्तित्वात आहोत!—उत्प. ६:१४-१६, २२; २ पेत्र २:५.
५ मोशेला निवासमंडप बनवण्याचे आणि याजकवर्गाची स्थापना करण्याचे काम देण्यात आले होते. हे काम कसे करायचे याबद्दल त्याला काही खास सूचना देण्यात आल्या आणि त्याने त्यांचे काळजीपूर्वक पालन केले. (निर्ग. ३९:३२; ४०:१२-१६) त्याने विश्वासूपणे जे काम केले त्यामुळे आजदेखील आपल्याला फायदा होतो. तो कसा? प्रेषित पौलाने सांगितले की नियमशास्त्रातील पैलू पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टींची एक झलक होती.—इब्री ९:१-५, ९; १०:१.
६ देवाचा उद्देश क्रमाक्रमाने पूर्ण होत आहे. त्यामुळे सबंध इतिहासात त्याने वेगवेगळ्या काळांत आपल्या सेवकांवर वेगवेगळी कामगिरी सोपवली. असे असले, तरी या प्रत्येक कामगिरीतून नेहमीच यहोवाचे गौरव झाले आहे आणि विश्वासू मानवांना फायदा झाला आहे. येशूने स्वर्गात असताना व पृथ्वीवर आल्यानंतर जे काही साध्य केले त्याच्या बाबतीत हे नक्कीच म्हणता येईल. (योहा. ४:३४; १७:४) त्याचप्रमाणे, आज यहोवा आपल्याला जे काम देतो त्यामुळेही त्याचे गौरव होते. (मत्त. ५:१६; १ करिंथकर १५:५८ वाचा.) आपण असे का म्हणू शकतो?
सकारात्मक दृष्टिकोन बाळगा
७, ८. (क) ख्रिश्चनांना आज कोणकोणत्या प्रकारचे काम करण्याचा बहुमान मिळाला आहे? (ख) यहोवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे?
७ यहोवाने अपरिपूर्ण मानवांना त्याचे सहकारी या नात्याने काम करण्याचा बहुमान दिला आहे. ही गोष्ट खरोखरच किती विशेष आहे! (१ करिंथ. ३:९) जे बांधव संमेलन गृहे, राज्य सभागृहे आणि शाखा कार्यालये यांचे बांधकाम करतात ते नोहा आणि मोशे यांच्याप्रमाणे खरोखरच्या बांधकामात सहभागी होतात. काही बांधव एखाद्या स्थानिक सभागृहाच्या दुरुस्तीचे काम करत असतील. तर काही, न्यूयॉर्कमधील वॉर्विक या ठिकाणी चाललेल्या आपल्या जागतिक मुख्यालयाच्या बांधकाम प्रकल्पात काम करत असतील. (लेखाच्या सुरुवातीला दिलेले वॉर्विक येथील इमारतीचे डिझाईन पाहा.) ते कोठेही काम करत असले तरी ते या बहुमानाची कदर करू शकतात कारण ही एक पवित्र सेवा आहे. पण, आणखी एक महत्त्वाचे काम आहे ज्यात सहभागी होण्याची संधी सर्वच ख्रिश्चनांना आहे. ते म्हणजे आध्यात्मिक बांधकामाचे कार्य. या कामामुळेदेखील यहोवाचे गौरव होते आणि विश्वासू मानवांना फायदा मिळतो. (प्रे. कृत्ये १३:४७-४९) आपल्यावर सोपवण्यात आलेले हे काम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी देवाच्या संघटनेकडून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाते. कधीकधी आपल्याला एखादी नवीन नेमणूकही दिली जाते.
८ यहोवाच्या संघटनेकडून जे मार्गदर्शन दिले जाते त्याच्याप्रती अधीनता दाखवण्यास त्याचे विश्वासू सेवक नेहमीच उत्सुक असतात. (इब्री लोकांस १३:७, १७ वाचा.) आपल्याला सोपवण्यात आलेले काम एखाद्या विशिष्ट प्रकारे का केले जावे यामागचे कारण कदाचित सुरुवातीला आपल्याला पूर्णपणे समजणार नाही. असे असले, तरी यहोवा जे काही फेरबदल करतो ते स्वीकारल्याने चांगलेच परिणाम होतील हे आपल्याला माहीत आहे.
९. ख्रिस्ती वडील मंडळीसमोर कोणते चांगले उदाहरण मांडतात?
९ ख्रिस्ती वडील मंडळीत ज्या प्रकारे पुढाकार घेतात त्यावरून दिसून येते की देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याची त्यांना मनापासून इच्छा आहे. (२ करिंथ. १:२४; १ थेस्सलनी. ५:१२, १३) ते मेहनत घेण्याची आणि परिस्थितीनुसार फेरबदल करण्याची तयारी दाखवतात. स्वर्गात स्थापित झालेल्या देवाच्या राज्याविषयी प्रचार करण्याच्या नवनवीन पद्धती सुचवल्या जातात तेव्हा ते आनंदाने जुळवून घेतात. सुरुवातीला जेव्हा टेलिफोनद्वारे साक्षकार्य किंवा सार्वजनिक साक्षकार्य आयोजित करण्याविषयी सुचवण्यात आले, तेव्हा काही वडिलांनी मागेपुढे पाहिले असेल. पण, लवकरच त्यांना अशा नवीन मार्गांनी साक्षकार्य करण्याचे चांगले परिणाम दिसून आले. उदाहरणार्थ, जर्मनीत राहणाऱ्या चार पायनियरांनी अशा एका व्यापारी क्षेत्रात जाऊन प्रचार करण्याचे ठरवले जेथे खूप वर्षांपासून प्रचार करण्यात आला नव्हता. त्याबद्दल मिखाएल नावाचे वडील असे सांगतात: “आम्ही खूप वर्षांपासून अशा प्रकारे प्रचार केला नव्हता म्हणून आम्हाला थोडीशी भीती वाटत होती. यहोवाला हे नक्कीच माहीत असावं. कारण त्या दिवशी आम्हाला प्रचार कार्यात इतके सुंदर अनुभव आले की आम्ही ते कधीच विसरू शकणार नाही. आपली राज्य सेवा यात जे सांगितलं होतं त्यानुसार केल्यामुळे आणि यहोवावर विसंबून राहिल्यामुळेच आम्हाला हा आनंद अनुभवता आला!” तुमच्या प्रचाराच्या क्षेत्रात ज्या नवनवीन पद्धतींचा उपयोग करण्यात येत आहे त्यांत सहभागी होण्यास तुम्ही उत्सुक आहात का?
१०. अलीकडच्या वर्षांत संघटनेत कोणते फेरबदल करण्यात आले आहेत?
१० कधीकधी संघटनेतही काही फेरबदल करण्याची गरज पडते. अलीकडच्या वर्षांत अनेक शाखा कार्यालयांना दुसऱ्या शाखा कार्यालयांसोबत जोडण्यात आले आहे. यामुळे त्या कार्यालयांत सेवा करणाऱ्या बांधवांना आणि बहिणींना काही फेरबदल करावे लागले. पण, या बदलांमुळे झालेले फायदे लवकरच सर्वांच्या लक्षात आले. (उप. ७:८) यहोवाच्या संघटनेत झालेले हे बदल ऐतिहासिक होते. आणि यहोवाची स्वखुशीने सेवा करणाऱ्या या बांधवांना त्यांत सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांना खूप आनंद होतो.
११-१३. संघटनेत झालेल्या बदलांमुळे काहींना कोणते फेरबदल करावे लागले आहेत?
११ ज्या बांधवांना दुसऱ्या शाखा कार्यालयात जावे लागले त्यांच्याकडून आपण बरेच काही शिकू शकतो. त्यांपैकी काही बांधवांनी त्यांच्या शाखा कार्यालयात अनेक दशके पूर्णवेळेची सेवा केली होती. मध्य अमेरिकेमधील एका लहान बेथेल कुटुंबात सेवा केलेल्या एका जोडप्याला मेक्सिकोतील बेथेलमध्ये जाण्यास सांगण्यात आले. ते सेवा करत असलेल्या बेथेल कुटुंबाच्या तुलनेत मेक्सिकोतील बेथेल कुटुंब ३० पटींनी मोठे होते. रोखेलियो नावाचे बांधव म्हणतात: “नातेवाइकांना आणि मित्रांना सोडून जाणं खूपच कठीण होतं.” ख्वान नावाच्या आणखी एका बांधवाला मेक्सिकोत जाण्यास सांगण्यात आले. ते असे म्हणतात: “आपला पुन्हा एकदा जन्म झाला आहे असं वाटतं. नवीन नाती जोडावी लागतात. तसंच, नव्या चालीरीतींशी आणि विचासरणीशी जुळवून घ्यावं लागतं.”
१२ युरोपमधील इतर काही देशांतून बेथेल कुटुंबातील सदस्यांना जर्मनीतील शाखा कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले. त्यांच्यापुढेही काही समस्या आल्या. काही बांधवांना आल्प्स पर्वतांनी वेढलेले स्वित्झर्लंड सोडून जर्मनीत यावे लागले. ज्या व्यक्तीला डोंगरदऱ्यांतील निसर्गरम्य वातावरण आवडते ती व्यक्ती या बांधवांनी केलेले त्याग समजू शकते. तसेच, ऑस्ट्रियातील आरामदायी जीवनशैलीची सवय असलेल्या बांधवांनाही जर्मनीत आल्यानंतर अनेक फेरबदल करावे लागले.
१३ दुसऱ्या देशातील शाखा कार्यालयात जाऊन सेवा करणाऱ्यांना अनेक नवीन गोष्टींशी जुळवून घ्यावे लागले. उदाहरणार्थ, तेथील राहण्याची व्यवस्था, पूर्वी ओळख नसलेल्या भाऊबहिणींसोबत काम करणे आणि कदाचित वेगळ्या प्रकारचे काम शिकून घेणे. तसेच, त्यांना एका नवीन मंडळीत जावे लागले, नव्या क्षेत्रात आणि काहींना तर वेगळ्या भाषेत प्रचार कार्य करावे लागले. अशा प्रकारचे बदल करणे कठीण जाऊ शकते. पण, असे असूनही बेथेल कुटुंबातील अनेकांनी हे आव्हान स्वीकारले आहे. त्यांनी असे का केले आहे?
१४, १५. (क) अनेकांनी हे कसे दाखवले आहे की त्यांना यहोवासोबत काम करण्याच्या बहुमानाची कदर आहे? (ख) ते आपल्याकरता एक चांगले उदाहरण का आहेत?
१४ दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याविषयी ग्रेटल नावाची एक बहीण असे म्हणते: “मी ते निमंत्रण स्वीकारलं कारण असं केल्यामुळे मी हे दाखवू शकले की माझं यहोवावर प्रेम आहे. त्याच्यावरील माझं प्रेम एखाद्या देशावर, एखाद्या इमारतीवर किंवा एखाद्या विशेषाधिकारावर अवलंबून नाही.” डाईस्का नावाची आणखी एक बहीण असे म्हणते: “हे निमंत्रण मला यहोवाकडून मिळालं आहे यावर जेव्हा मी लक्ष दिलं तेव्हा ते मी आनंदानं स्वीकारलं.” आन्द्रे आणि गाब्रियेला असे म्हणतात: “स्वतःच्या इच्छांना बाजूला सारून यहोवाची सेवा करण्याची ही आणखी एक संधी आहे असं आम्ही मानलं. आम्ही स्वतःला असं सांगितलं की, ‘जेव्हा यहोवा काही फेरबदल करतो तेव्हा त्यांच्या विरोधात जाण्याऐवजी त्यांनुसार केल्यानंच फायदा होतो.’”
यहोवासोबत काम करणे हा आपल्याला मिळालेला सर्वात मोठा बहुमान आहे!
१५ काही शाखा कार्यालयांना दुसऱ्या शाखा कार्यालयांसोबत जोडण्यात आले तेव्हा बेथेल कुटुंबातील काहींना पायनियर म्हणून नियुक्त करण्यात आले. जेव्हा डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन या शाखा कार्यालयांना स्कॅन्डिनेव्हिया शाखा कार्यालयासोबत जोडण्यात आले तेव्हा बेथेल कुटुंबातील अनेकांना ही नवीन नेमणूक मिळाली. फ्लॉरीयान आणि आन्या हे दोघे त्यांच्यापैकी आहेत. ते असे म्हणतात: “नवीन नेमणूक एक रोमांचकारी आव्हान आहे असं आम्ही समजतो. यहोवा आमचा उपयोग करत आहे ही गोष्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, मग आम्ही कुठंही सेवा करत असलो तरी. आम्ही हे मनापासून सांगू शकतो की यहोवानं आम्हाला खरोखरच अनेक आशीर्वाद दिले आहेत!” हे खरे आहे की आपल्यापैकी बहुतेकांना या बांधवांसारखे बदल करावे लागणार नाहीत. पण, राज्याच्या कामाला प्रथम स्थानी ठेवून फेरबदल करण्याची जी तयारी या बांधवांनी आणि बहिणींनी दाखवली आहे तिचे आपण नक्कीच अनुकरण करू शकतो. (यश. ६:८) यहोवासोबत काम करण्याच्या बहुमानाची जे लोक कदर करतात त्यांना तो नेहमीच आशीर्वाद देतो, मग ते कोठेही सेवा करत असले तरी.
तुमच्या बहुमानाची कदर करत राहा
१६. (क) गलतीकर ६:४ हे वचन आपल्याला काय करण्यास सांगते? (ख) मानवांना लाभलेला सर्वात मोठा बहुमान कोणता आहे?
१६ अपरिपूर्ण मानवांमध्ये तुलना करण्याची सवय असते. पण, देवाच्या वचनात असे सांगितले आहे की आपण स्वतः काय करू शकतो यावर लक्ष दिले पाहिजे. (गलतीकर ६:४ वाचा.) आपल्यापैकी अनेकांना मंडळीत काही अधिकाराचे पद नाही. तसेच, सर्वांनाच पायनियर सेवा, मिशनरी सेवा किंवा बेथेल सेवा करणे शक्य नाही. हे विशेष बहुमान आहेत यात शंका नाही. पण, आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की ख्रिस्ती सेवाकार्यात यहोवाचे सहकारी म्हणून कार्य करणे हाच सर्वात मोठा बहुमान आहे. आणि आपल्या सर्वांनाच तो लाभला आहे. या बहुमानाची आपण नक्कीच कदर केली पाहिजे!
१७. सैतानाचे जग अस्तित्वात असेपर्यंत काय शक्य नाही, पण यामुळे आपण निराश का होऊ नये?
१७ सैतानाचे जग अस्तित्वात असेपर्यंत आपल्यापैकी काहींना इच्छा असूनही यहोवाची जास्त प्रमाणात सेवा करणे कदाचित शक्य होणार नाही. आपल्यावर कदाचित आपल्या कुटुंबाची जबाबदारी असेल. आपले आरोग्य चांगले नसेल किंवा इतर परिस्थितींवर आपले नियंत्रण नसेल. पण, यामुळे निराश होऊ नका. यहोवाच्या नावाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल सर्व प्रसंगी इतरांना सांगण्याच्या तुमच्या सुहक्काला कमी लेखू नका. कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार शक्य तितक्या प्रमाणात तुम्ही त्याच्यासोबत काम करत आहात. तसेच, ज्या बांधवांना यहोवाची जास्त प्रमाणात सेवा करणे शक्य आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थनादेखील करता. हे नेहमी लक्षात ठेवा की जी व्यक्ती यहोवाच्या नावाचे गौरव करते ती त्याच्या नजरेत मौल्यवान आहे!
१८. नवीन जग खूप जवळ असल्यामुळे आपण काय केले पाहिजे, आणि का?
१८ आपण अपरिपूर्ण आहोत आणि आपल्यामध्ये अनेक कमतरता आहेत. पण तरी यहोवा आनंदाने आपल्याला त्याचे सहकारी म्हणून काम करण्याची संधी देतो. या शेवटल्या दिवसांत यहोवासोबत काम करण्याच्या आपल्या बहुमानाची आपण नक्कीच कदर करतो. नवीन जग खूप जवळ आले आहे. तेव्हा, आपण सध्याच आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या मागे न लागता भविष्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. नवीन जगात यहोवा आपल्याला एका आनंदी आणि शांतिदायक परिस्थितीत “खरे जीवन” म्हणजेच सदासर्वकाळाचे जीवन देईल.—१ तीम. ६:१८, १९.
यहोवाची सेवा करण्याच्या बहुमानाची तुम्ही कदर करता का? (परिच्छेद १६-१८ पाहा)
१९. यहोवाने आपल्याला कोणते अभिवचन दिले आहे?
१९ प्रतिज्ञा केलेल्या देशात प्रवेश करण्याआधी मोशेने इस्राएली लोकांना सांगितले की यहोवा त्यांच्या सर्व कार्यांत त्यांना समृद्ध करेल. (अनु. ३०:९) आज आपण नवीन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. तेव्हा, मोशेने इस्राएली लोकांना जे सांगितले होते त्यावर आपण विचार केला पाहिजे. या शेवटल्या दिवसांत जे लोक यहोवासोबत काम करण्यात व्यस्त आहेत, त्यांना हर्मगिदोनानंतर देवाच्या अभिवचनानुसार नवीन जगाचे वतन मिळेल. तेव्हा आपल्याला एक नवीन काम सोपवण्यात येईल. ते म्हणजे पृथ्वीचे एका सुंदर नंदनवनात रूपांतर करणे!