जीवन कथा
यहोवाची इच्छा असेल तिथं सेवा करायला तयार
माझ्या पायनियर सेवेच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांची गोष्ट आहे. मी पूर्वी कधीच एकट्यानं प्रचार कार्य केलं नव्हतं. त्यामुळं प्रत्येक वेळी प्रचाराला जाताना माझ्या पोटात गोळा यायचा आणि हातपाय गार पडायचे. त्यातल्या त्यात क्षेत्रातले लोक दारातसुद्धा उभं करायला तयार नसायचे. काही जण तर उघडउघड विरोध करायचे आणि मारहाण करण्याची धमकी द्यायचे. त्यामुळं पायनियर सेवेच्या पहिल्या महिन्यात मी फक्त एकच पुस्तिका देऊ शकलो.—मार्कुस.
ही १९४९ ची, म्हणजे जवळजवळ ६० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पण, त्याआधीच्या माझ्या आयुष्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझे वडील हेन्ड्रिक, डोन्डेरनमध्ये बुटं तयार करण्याचं व माळ्याचं काम करायचे. डोन्डेरन हे नेदरलँड्सच्या ड्रेन्ट राज्यातल्या उत्तर भागात असलेलं एक छोटंसं गाव होतं. इथंच १९२७ साली माझा जन्म झाला. सात भावंडांत मी चौथा. त्या वेळी आमचं घर ग्रामीण भागात एका कच्च्या रस्त्यावर होतं. आमच्या शेजारीपाजारी राहणारे बहुतेक लोक शेतीवाडी करायचे. शेतमळ्यावरचं जीवन मला खूप आवडायचं. १९४७ साली, मी १९ वर्षांचा होतो तेव्हा ट्योनस बेन नावाच्या एका शेजाऱ्याकडून मला सत्य मिळालं. मला आठवतं, त्यापूर्वी मला ट्योनस मुळीच आवडत नव्हता. पण, दुसऱ्या महायुद्धानंतर तो एक यहोवाचा साक्षीदार बनला आणि तो पूर्वीपेक्षा खूप प्रेमळ बनल्याचं मला जाणवलं. कशामुळं त्याच्यात इतका बदल झाला असेल हे जाणून घेण्यास मी फार उत्सुक होतो. त्यामुळं, पृथ्वीवर नंदनवन आणण्याच्या देवाच्या अभिवचनाविषयी तो मला सांगू लागला तेव्हा मी आस्थेनं ऐकू लागलो. त्यानं जे सांगितलं ते मला लगेच पटलं. आणि आम्ही दोघं जिवाभावाचे मित्र बनलो.a
सन १९४८ च्या मे महिन्यात मी प्रचार कार्य करायला सुरुवात केली आणि त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे २० जूनला, युट्रेक्ट या शहरात भरलेल्या एका अधिवेशनात माझा बाप्तिस्मा झाला. मग १ जानेवारी १९४९ रोजी मी पायनियर सेवा सुरू केली आणि मला पूर्व नेदरलँड्समध्ये असलेल्या बारकुलो या ठिकाणी पाठवण्यात आलं. त्या वेळी बारकुलोमध्ये एक लहानशी मंडळी होती. १३० किलोमीटरचा तो प्रवास मी सायकलवरून करण्याचं ठरवलं. तिथं पोचण्यासाठी काही ६ तास लागतील असं मला वाटलं होतं. पण, मुसळधार पावसामुळं आणि विरुद्ध दिशेनं वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळं तिथं पोहचण्यासाठी मला चक्क १२ तास लागले! शेवटचा ९० किलोमीटरचा प्रवास ट्रेननं करूनसुद्धा मला इतके तास लागले. तिथं पोचता पोचता रात्र झाली होती. पण, शेवटी एकदाचा मी तिथं पोचलो. त्या भागात पायनियर सेवा करताना तिथल्या एका साक्षीदार कुटुंबासोबत मी राहिलो.
युद्धानंतरच्या त्या काळात लोकांकडे फारशा वस्तू नसायच्या. माझ्याजवळसुद्धा फक्त एक सूट आणि दोन पँट होत्या. त्यातपण सूट मोठा तर पँट छोट्या! मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे, बारकुलोमधला माझा पहिला महिना खूप कठीण होता. पण, यहोवाच्या आशीर्वादानं मी अनेकांसोबत बायबल अभ्यास चालवला. पुढे नऊ महिन्यांनंतर मला ॲम्स्टरडॅममध्ये सेवा करण्यासाठी पाठवण्यात आलं.
खेडेगावातून शहरात
मी शेतीवाडी करणाऱ्या ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालो होतो, आणि आता अचानक नेदरलँड्सच्या सगळ्यात मोठ्या शहरात अर्थात ॲम्स्टरडॅममध्ये आलो होतो. इथं सेवाकार्य खूप छान व्हायचं. गेल्या नऊ महिन्यांत मी दिलं नसेल इतकं साहित्य मी पहिल्याच महिन्यात देऊ शकलो. मी आठ-आठ बायबल अभ्यास चालवत होतो. मंडळीचा सेवक (वडीलवर्गाचे संयोजक) म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली तेव्हा पहिल्यांदाच मला जाहीर भाषण द्यायला सांगितलं गेलं. माझ्यासाठी हे फार अवघड काम होतं. पण, भाषण द्यायच्या काही दिवसांआधीच मला दुसऱ्या एका मंडळीत पाठवण्यात आलं तेव्हा मी सुटकेचा निःश्वास सोडला. पण, नंतरच्या वर्षांत आपल्याला ५,००० हून अधिक भाषणं द्यावी लागतील असं तेव्हा मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं!
वर: १९५० साली ॲमस्टरडॅमजवळ रस्त्यावरचं साक्षकार्य करताना मार्कुस (अगदी उजवीकडे)
सन १९५० च्या मे महिन्यात मला हार्लेम या शहरात पाठवण्यात आलं. तिथं गेल्यानंतर मला विभागीय कार्य करण्याचं आमंत्रण मिळालं. त्यानंतर तीन दिवस माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. शाखा कार्यालयात काम करणाऱ्या रॉबर्ट विंक्लर या बांधवाला मी म्हटलं, ‘मला नाही वाटत की मी हे कार्य करण्यास योग्य आहे.’ त्यावर ते म्हणाले: “काही काळजी करू नकोस. अर्ज भरून दे. तू शिकशीलच.” त्यानंतर काही काळातच मला एक महिन्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि मी विभागीय सेवक (पर्यवेक्षक) म्हणून सेवा करू लागलो. असंच एकदा एका मंडळीला भेट देत असताना यॉनी टॉटकेन या तरुण उत्साही पायनियर बहिणीशी माझी ओळख झाली. निःस्वार्थ वृत्तीच्या या बहिणीचं यहोवावर अपार प्रेम असल्याचं मला जाणवलं. आणि १९५५ मध्ये आम्ही लग्न केलं. पण, पुढं काय झालं हे सांगण्याआधी, यॉनी एक पायनियर कशी बनली आणि आम्ही एकमेकांना कसे भेटलो ते आता तीच तुम्हाला सांगेल.
जोडीनं सेवा करू लागलो
यॉनी: मी ११ वर्षांची असताना १९४५ साली आई एक यहोवाची साक्षीदार बनली. आपल्या तीन मुलांना बायबलचं शिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे हे तिनं लगेच ओळखलं. पण, याला बाबांचा विरोध होता. त्यामुळं ते घरी नसायचे तेव्हा ती आम्हा मुलांना बायबलचं शिक्षण द्यायची.
मी उपस्थित राहिलेली सगळ्यात पहिली सभा म्हणजे १९५० साली द हेग या शहरात झालेलं अधिवेशन. त्याच्या पुढच्याच आठवडी ऑसेन (ड्रेन्ट राज्य) शहरातल्या एका राज्य सभागृहात मी पहिल्यांदा सभेला गेले. बाबांना हे समजलं तेव्हा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी मला घराबाहेर काढलं. आई मला म्हणाली: “तुला माहीतंय ना कुठं जायचं.” मला माहीत होतं, की आई माझ्या आध्यात्मिक बंधुभगिनींचाच उल्लेख करत आहे. आधी मी आमच्या घराजवळच राहणाऱ्या एक साक्षीदार कुटुंबासोबत राहायला गेले. पण, बाबा मला त्रास देतच होते, त्यामुळं ९५ किलोमीटर दूर असलेल्या डॉवन्टर शहरातल्या (ओव्हरायसेल राज्य) एका मंडळीसोबत मी सहवास करू लागले. पण, मी अल्पवयीन असूनही बाबांनी मला घराबाहेर काढलं याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना सवाल केला तेव्हा बाबांनी मला पुन्हा घरी बोलवलं. बाबांनी कधीच सत्य स्वीकारलं नाही. पण, नंतर नंतर ते मला सभांना आणि प्रचार कार्याला जाऊ देऊ लागले.
खाली: १९५२ साली सुटीच्या दिवसांत पायनियर सेवा करताना यॉनी (अगदी उजवीकडे)
मी घरी आल्यानंतर काही दिवसांनी आई खूप आजारी पडली आणि घरची सगळी कामं मला करावी लागली. पण तरीसुद्धा मी आध्यात्मिक रीत्या प्रगती करत राहिले आणि १९५१ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला. १९५२ मध्ये आई बरी झाल्यानंतर मी तीन पायनियर बहिणींसोबत सुटीच्या दिवसांत दोन महिने (सहायक) पायनियर सेवा केली. आम्ही एका हाऊसबोटवर राहायचो आणि ड्रेन्टमधल्या दोन शहरांत प्रचार करायचो. १९५३ साली मी सामान्य पायनियर बनले. त्याच्या एक वर्षानंतर एक तरुण विभागीय पर्यवेक्षक आमच्या मंडळीला भेट द्यायला आला. तो होता मार्कुस. आम्ही जोडीनं यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो असं आम्हाला वाटलं आणि १९५५ च्या मे महिन्यात आम्ही लग्न केलं.—उप. ४:९-१२.
उजवीकडे: १९५५ मध्ये आमच्या लग्नाच्या दिवशी
मार्कुस: आमच्या लग्नानंतर प्रथम आम्हाला वेन्डाम शहरात (ग्रोनिंगेन राज्य) पायनियर सेवा करण्यासाठी पाठवण्यात आलं. तिथं आम्ही एका अतिशय लहानशा, म्हणजे जेमतेम सात-बाय-दहाच्या खोलीत राहत होतो. पण, त्या लहानशा घरालाही यॉनीनं घरपण आणलं. रोज रात्री, भिंतीला लावलेली खाट टाकण्यासाठी आम्हाला खोलीतलं टेबल आणि दोन लहान खुर्च्या बाजूला काढून ठेवाव्या लागायच्या.
सहा महिन्यांनंतर आम्हाला प्रवासी कार्य करण्यासाठी बेल्जियमला पाठवण्यात आलं. १९५५ मध्ये, त्या देशात सुमारे ४,००० प्रचारक होते. आता त्यांची संख्या सहापट वाढली आहे. उत्तर बेल्जियमच्या फ्लॉन्डर्स राज्यातले लोक आणि नेदरलँड्सचे लोक एकच भाषा बोलत असले तरी बेल्जियमच्या लोकांची बोलण्याची पद्धत फार वेगळी आहे. त्यामुळं सुरुवातीला आम्हाला त्रास झाला.
यॉनी: प्रवासी कार्य करण्यासाठी निःस्वार्थ मनोवृत्तीची खूप गरज असते. मंडळ्यांना भेटी देताना आम्ही सायकलवरून प्रवास करायचो आणि बंधुभगिनींच्या घरी राहायचो. आम्हाला आमचं स्वतःचं असं घर नसल्यामुळं आम्ही सहसा सोमवारपर्यंत बांधवांच्या घरी राहायचो आणि मंगळवारी सकाळी पुढच्या मंडळीला भेट द्यायला निघायचो. सेवेचा हा विशेषाधिकार यहोवाकडून मिळालेला एक आशीर्वाद आहे असंच आम्ही नेहमी मानायचो.
मार्कुस: मंडळीतल्या या बंधुभगिनींना आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो; पण तरीसुद्धा ते खूप प्रेमळ आणि पाहुणचार करणारे आहेत हे आम्हाला जाणवलं. (इब्री १३:२) पुढील काही वर्षांत बेल्जियममधल्या सर्व डच-भाषक मंडळ्यांना आम्ही कितीतरी वेळा भेटी दिल्या. यामुळं आम्हाला अनेक आशीर्वाद मिळाले. उदाहरणार्थ, डच प्रांतातल्या जवळजवळ सर्वच बंधुभगिनींशी आमची चांगली ओळख झाली आणि त्यामुळं आमच्यात जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. मंडळीतल्या शेकडो मुलांना लहानाचं मोठं होताना आणि आध्यात्मिक रीत्या प्रौढ होताना आम्ही पाहिलं; त्यांनी देवाच्या राज्याला आपल्या जीवनात पहिलं स्थान दिलं. त्यांच्यापैकी कित्येक जण विश्वासूपणे यहोवाची पूर्णवेळ सेवा करताहेत हे पाहून खूप आनंद होतो. (३ योहा. ४) अशा उत्तेजनदायक गोष्टींमुळं, आम्हाला आमच्या सेवेत टिकून राहणं सोपं गेलं.—रोम. १:१२.
एक मोठं आव्हान, तरी भरपूर आशीर्वाद
मार्कुस: आमचं लग्न झालं त्या दिवसापासून आम्ही गिलियड प्रशालेला जायचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी आम्ही दररोज कमीतकमी एक तास इंग्रजी भाषेचा अभ्यास करायचो. पण, पुस्तकांतून इंग्रजी शिकणं सोपं नव्हतं. त्यामुळं इंग्रजीचा सराव करण्यासाठी सुटीच्या दिवसांत इंग्लंडला जाऊन प्रचार करायचं आम्ही ठरवलं. शेवटी १९६३ मध्ये, ब्रुकलिन इथं असलेल्या जागतिक मुख्यालयातून आम्हाला एक लिफाफा मिळाला. त्यात दोन पत्रं होती, एक माझ्यासाठी आणि एक यॉनीसाठी. माझ्यासाठी जे पत्र होतं त्यात मला दहा महिन्यांच्या खास गिलियड वर्गासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. हा अभ्यासक्रम, खासकरून बांधवांना प्रशिक्षण देण्यावर आणि त्यांना संघटनेसंबंधी शिक्षण देण्यावर केंद्रित होता. त्यामुळं, या प्रशालेला आमंत्रित केलेल्या १०० विद्यार्थ्यांपैकी ८२ जण बांधव होते.
यॉनी: खरं सांगू, मला जे पत्र मिळालं होतं ते पाहून सुरुवातीला मी खूप निराश झाले. कारण, मार्कुस गिलियडला गेल्यानंतर मी बेल्जियममध्येच राहून सेवा करू शकेन का याचा प्रार्थनापूर्वक विचार करण्यास मला सांगण्यात आलं होतं. मला असं वाटलं जणू गिलियडला जाण्यासाठी मी जे काही प्रयत्न केले होते त्यांवर यहोवाचा आशीर्वाद नव्हता. पण, गिलियड प्रशालेचा नेमका उद्देश काय याची मी स्वतःला आठवण करून दिली. तो म्हणजे, त्या प्रशालेला उपस्थित राहिलेल्यांना जगभरात प्रचाराचं कार्य करण्यास मदत करणं. त्यामुळं मी बेल्जियममध्येच राहण्याचा निर्णय घेतला आणि मला गेंट शहरात खास पायनियर म्हणून ॲना आणि मारिया कोलपर्ट या दोन अनुभवी खास पायनियर बहिणींसोबत सेवा करण्यास नेमण्यात आलं.
मार्कुस: माझी इंग्रजी सुधारण्यासाठी मला गिलियड प्रशालेच्या पाच महिन्यांआधी ब्रुकलिनला बोलवण्यात आलं. तिथं मी साहित्य पाठवण्याच्या विभागात आणि सेवा विभागात काम केलं. मुख्यालयात काम करत असल्यामुळं आणि आशिया, युरोप व दक्षिण अमेरिकेला साहित्य पाठवत असल्यामुळं आपल्या आंतरराष्ट्रीय बंधुत्वाची मला अधिक जाणीव झाली. मला खासकरून, बंधू रस्सलच्या काळात पिलग्रिम (प्रवासी पर्यवेक्षक) कार्य करणाऱ्या बंधू ए. एच. मॅक्मिलन यांची आठवण येते. तोपर्यंत बंधू मॅक्मिलन यांचं वय झालं होतं आणि त्यांना फारसं ऐकूही येत नव्हतं. तरीसुद्धा, ते न चुकता मंडळीच्या हरएक सभेला उपस्थित राहायचे. याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यावरून मी एक गोष्ट शिकलो; ती म्हणजे आपण आपल्या ख्रिस्ती सहवासाला कधीच कमी लेखू नये.—इब्री १०:२४, २५.
यॉनी: मी आणि मार्कुस आठवड्यातून कितीतरी वेळा एकमेकांना पत्र लिहायचो. आम्हाला एकमेकांची खूप आठवण यायची. पण, गिलियड प्रशालेत मिळत असलेल्या प्रशिक्षणाबद्दल मार्कुस खूप खूश होता आणि सेवाकार्य करण्यात मला खूप आनंद मिळत होता. मार्कुस अमेरिकेहून परतला तोपर्यंत मी १७ बायबल अभ्यास चालवत होते! १५ महिने एकमेकांपासून दूर राहणं खरंच खूप कठीण होतं. पण, आम्ही जे काही त्याग केले त्यांबद्दल यहोवानं आम्हाला आशीर्वाद दिल्याचं मी अनुभवलं. मार्कुस घरी येणार होता त्या दिवशी त्याचं विमान खूप उशिरा पोचलं. त्यामुळं तो शेवटी पोचला तेव्हा आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारून खूप रडलो. त्यानंतर पुन्हा कधीच आम्ही एकमेकांना सोडून राहिलो नाही.
सेवेच्या प्रत्येक विशेषाधिकाराबद्दल आभारी
मार्कुस: डिसेंबर १९६४ मध्ये मी गिलियडहून परतलो तेव्हा आम्हाला बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं. अर्थात, ही आमची कायमची नेमणूक असणार नाही हे आम्हाला आधी माहीत नव्हतं. बेथेलमध्ये केवळ तीन महिने सेवा केल्यानंतर आम्हाला प्रांतीय कार्य करण्यासाठी फ्लॉन्डर्स राज्यात पाठवण्यात आलं. ऑल्झेन आणि एल्स वीकरस्मा यांना मिशनरी म्हणून बेल्जियमला पाठवण्यात आलं तेव्हा त्यांना प्रांतीय कार्य करण्यासाठी नेमण्यात आलं आणि मग आम्ही पुन्हा बेथेलमध्ये गेलो. बेथेलमध्ये मी सेवा विभागात काम केलं. १९६८ ते १९८० या काळादरम्यान, कधी बेथेल सेवा तर कधी प्रवासी कार्य अशा प्रकारे कितीतरी वेळा आमच्या नेमणुका बदलल्या. शेवटी, १९८० ते २००५ पर्यंत, मी पुन्हा प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा केली.
आमच्या नेमणुका सतत बदलत असल्या तरी यहोवाची जिवेभावे सेवा करण्यासाठीच आम्ही आमचं जीवन वाहून घेतलं होतं याचा आम्ही स्वतःला कधीच विसर पडू दिला नाही. सेवेतील बदल राज्याचे कार्य वाढीस लावण्यासाठीच असतात ही खातरी असल्यामुळं आम्ही प्रत्येक नेमणूक आनंदानं पार पाडली.
यॉनी: शाखा समितीचा सदस्य या नात्यानं अतिरिक्त प्रशिक्षणासाठी मार्कुसला १९७७ साली ब्रुकलिनला आणि १९९७ साली पॅटरसनला बोलावण्यात आलं, तेव्हा मलाही त्याच्यासोबत जाण्याची संधी मिळाली याचा मला विशेष आनंद झाला.
यहोवाला आपल्या गरजा माहीत असतात
मार्कुस: सन १९८२ मध्ये यॉनीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यातून ती बरी झाली. याच्या तीन वर्षांनंतर, लूवेन शहरातील मंडळीनं मोठ्या प्रेमानं राज्य सभागृहाच्या वर असलेल्या घरात आमच्या राहण्याची सोय केली. तीस वर्षांत पहिल्यांदाच, स्वतःचं म्हणावं असं घर आमच्याकडे होतं. दर मंगळवारी मंडळ्यांना भेट देण्यासाठी आम्ही सामानाची बांधाबांध करायचो तेव्हा सामान खाली नेण्यासाठी मला ५४ पायऱ्यांवरून कितीतरी वेळा वर-खाली करावं लागायचं. पण, २००२ मध्ये आमच्या राहण्याची सोय तळमजल्यावर करण्यात आली ते खूप बरं झालं. मी ७८ वर्षांचा असताना आम्हाला खास पायनियर म्हणून लोकरन या छोट्याशा शहरात पाठवण्यात आलं. या वयातसुद्धा आम्ही पायनियर म्हणून सेवा करू शकतो आणि दररोज सेवाकार्यात जाऊ शकतो याचा आम्हाला खूप आनंद होतो.
“आम्हाला ठामपणे वाटतं की आपण कुठं सेवा करतो किंवा काय म्हणून सेवा करतो यापेक्षा आपण कोणासाठी सेवा करतो हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं”
यॉनी: आम्ही दोघांनी मिळून १२० हून अधिक वर्षं पूर्णवेळची सेवा केली! यहोवा आपल्याला “सोडून जाणार नाही” व आपल्याला “टाकणार नाही” आणि आपण जर विश्वासूपणे त्याची सेवा केली, तर आपल्याला “कशाचीही वाण” पडणार नाही हे आम्ही दोघांनी प्रत्यक्ष अनुभवलंय.—इब्री १३:५; अनु. २:७.
मार्कुस: आम्ही तरुण होतो तेव्हा आम्ही यहोवाला आमचं जीवन समर्पित केलं. आयुष्यात स्वतःसाठी खूप काही करावं असं कधीच आम्हाला वाटलं नाही. आम्हाला दिलेली प्रत्येक नेमणूक आम्ही आनंदानं स्वीकारली. कारण आम्हाला ठामपणे वाटतं की आपण कुठं सेवा करतो किंवा काय म्हणून सेवा करतो यापेक्षा आपण कोणासाठी सेवा करतो हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं.
a पुढं माझे आई-वडील, मोठी बहीण आणि दोन लहान भाऊसुद्धा यहोवाचे साक्षीदार बनले.