यहोवावर भरवसा ठेवा —अंत जवळ आहे
“परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा.”—यश. २६:४.
१. देवाच्या सेवकांमध्ये आणि जगातील लोकांमध्ये कोणता फरक आहे?
आपण अशा एका जगात राहत आहोत जेथे कोणावर किंवा कशावर भरवसा ठेवावा हे अनेकांना समजत नाही. कदाचित अनेकदा त्यांचे मन दुखावले गेले आहे किंवा त्यांची निराशा झाली आहे. पण, यहोवाचे सेवक किती वेगळे आहेत! त्यांना देवाच्या ज्ञानाचे मार्गदर्शन असल्यामुळे, या जगावर किंवा जगातील “अधिपतींवर” भरवसा ठेवण्यात काहीच अर्थ नाही हे ते चांगले ओळखतात. (स्तो. १४६:३) या उलट, ते आपले जीवन व आपले भविष्य यहोवाच्या हातात सोपवून देतात. कारण त्यांना माहीत आहे, की तो त्यांच्यावर प्रेम करतो व दिलेला शब्द नेहमी पाळतो.—रोम. ३:४; ८:३८, ३९.
२. देव भरवशालायक आहे याची ग्वाही यहोशवाने कशी दिली?
२ देव भरवशालायक आहे याची ग्वाही प्राचीन काळच्या यहोशवाने दिली. आपल्या जीवनाच्या अखेरीस त्याने आपल्या इस्राएली बांधवांना असे म्हटले: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या.”—यहो. २३:१४.
३. देवाचे नाव त्याच्याबद्दल काय प्रकट करते?
३ यहोवाचे आपल्या सेवकांवर प्रेम आहे; पण, केवळ या एका कारणामुळेच तो आपली अभिवचने पूर्ण करतो असे नाही. तर विशेषकरून, तो आपल्या नावाखातर आपली अभिवचने पूर्ण करतो. (निर्ग. ३:१४; १ शमु. १२:२२) देवाच्या नावाविषयी, जे. बी. रॉदरहॅम यांच्या दी एम्फसाइझ्ड बायबल याच्या प्रस्तावनेत असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे: ‘देवाच्या नावाचा असा अर्थ होतो, की आपली अभिवचने पूर्ण करण्यासाठी तो कोणतीही भूमिका घेऊ शकतो. आपण त्याचे नाव ऐकतो तेव्हा, त्याने दिलेला प्रत्येक शब्द तो हमखास पाळतो याचे आपल्याला स्मरण होते. कोणत्याही समयी व कोणत्याही ठिकाणी त्याला जे काही करायचे असते ते तो करू शकतो. त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही. देव नेहमीच आपल्या नावाला जागतो.’
४. (क) यशया २६:४ आपल्याला काय करण्याचे प्रोत्साहन देते? (ख) या लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?
४ स्वतःला विचारा: ‘यहोवावर पूर्ण भरवसा ठेवण्याइतपत मी त्याला ओळखतो का? सर्वकाही देवाच्या नियंत्रणात आहे या जाणिवेने मी आत्मविश्वासाने भविष्याकडे पाहतो का?’ यशया २६:४ म्हणते: “परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभु परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे.” हे मान्य आहे, की बायबलच्या काळात देवाने काही प्रसंगी चमत्कारिक रीत्या लोकांच्या जीवनात हस्तक्षेप केला होता. पण आज तो तसे करत नाही. तरीसुद्धा, तो एक “सनातन आश्रयदुर्ग” असल्यामुळे आपण त्याच्यावर “सर्व काळ” भरवसा ठेवू शकतो. आपला भरवशालायक देव आज कशा प्रकारे आपल्या उपासकांना साहाय्य करतो? याचे तीन मार्ग आपण पाहू या: प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी आपण त्याच्याजवळ मदत मागतो तेव्हा तो आपल्याला बळ देतो, आपल्याला क्षेत्रातील लोकांच्या थंड प्रतिसादाचा किंवा उघड विरोधाचा सामना करावा लागतो तेव्हा तो आपल्याला आधार देतो आणि दररोजच्या चिंता-विवंचनांमुळे आपण अगदी गळून जातो तेव्हा तो आपल्याला उचलून धरतो. या तीन मार्गांचे परीक्षण करताना यहोवावरील तुमचा भरवसा तुम्ही आणखी मजबूत कसा करू शकता यावर आवर्जून मनन करा.
वाईट गोष्टी करण्याचा मोह होतो तेव्हा देवावर भरवसा ठेवा
५. देवावर भरवसा ठेवणे आपल्याला केव्हा कठीण जाऊ शकते?
५ यहोवाने नंदनवनाविषयी व पुनरुत्थानाविषयी दिलेल्या अभिवचनांचा प्रश्न येतो तेव्हा त्याच्यावर भरवसा ठेवणे आपल्याला सोपे जाते. कारण या अभिवचनांची आपण मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहोत. पण, नैतिक गोष्टींच्या बाबतीत यहोवावर भरवसा ठेवण्याचा प्रश्न येतो तेव्हा काय? तेव्हा मात्र यहोवाच्या मार्गांनुसार व स्तरांनुसार जीवन व्यतीत करणे सुज्ञतेचे आहे आणि त्यामुळे शेवटी आपल्याला अपार आनंद होईल याची मनापासून पक्की खातरी बाळगून त्याच्यावर भरवसा ठेवणे कदाचित आपल्याला कठीण जाऊ शकते. शलमोन राजाने असा सल्ला दिला: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीति. ३:५, ६) या ठिकाणी “सर्व मार्गांत” असे म्हटले आहे याकडे लक्ष द्या. होय, केवळ आपल्या ख्रिस्ती आशेतूनच नव्हे, तर आपल्या संपूर्ण जीवनक्रमातून हे दिसून आले पाहिजे, की आपण देवावर भरवसा ठेवतो. आपल्यासमोर प्रलोभने येतात तेव्हा आपण त्याच्यावर भरवसा ठेवतो हे आपण कसे दाखवू शकतो?
६. मनातून वाईट विचार हद्दपार करण्याचा आपला निश्चय आपण आणखी दृढ कसा करू शकतो?
६ वाईट गोष्टींचा उगम मनातून होत असल्यामुळे, वाइटापासून दूर जाण्यासाठी आपण प्रथम आपल्या विचारांकडे लक्ष दिले पाहिजे. (रोमकर ८:५; इफिसकर २:३ वाचा.) तर मग, मनातून चुकीचे विचार हद्दपार करण्याचा तुमचा निश्चय तुम्ही आणखी दृढ कसा करू शकता? पुढील पाच मार्ग विचारात घ्या: १. प्रार्थनेद्वारे देवाला मदत मागा. (मत्त. ६:९, १३) २. ज्यांनी देवाचे ऐकले आणि ज्यांनी ऐकले नाही अशा लोकांविषयी बायबलमध्ये दिलेल्या उदाहरणांवर मनन करा. मग, देवाचे ऐकल्याचा व न ऐकल्याचा काय परिणाम झाला त्याचा विचार करा.a (१ करिंथ. १०:८-११) ३. तुमच्या गंभीर पापामुळे तुम्हाला स्वतःला व तुमच्या प्रियजनांना किती मानसिक व भावनिक वेदना होतील याचा विचार करा. ४. देवाच्या एखाद्या सेवकाने गंभीर पाप केल्यास देवाला कसे वाटेल याचा विचार करा. (स्तोत्र ७८:४०, ४१ वाचा.) ५. यहोवाचा एखादा निष्ठावान उपासक चार लोकांत किंवा खासगी जीवनात वाइटाचा प्रतिकार करून योग्य ते करतो तेव्हा देवाचे मन किती आनंदित होते याची कल्पना करा. (स्तो. १५:१, २; नीति. २७:११) तुम्हीसुद्धा जीवनात योग्य ते करून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचे दाखवू शकता.
लोक थंड प्रतिसाद देतात व विरोध करतात तेव्हा देवावर भरवसा ठेवा
७. यिर्मयाने कोणत्या परीक्षांना तोंड दिले, आणि त्याला काही वेळा कसे वाटले?
७ आपले अनेक बंधुभगिनी अतिशय कठीण क्षेत्रात सेवाकार्य करतात. यिर्मया संदेष्ट्याने अशाच वातावरणात म्हणजे यहूदा राज्याच्या शेवटीशेवटी, प्रचंड उलथापालथीच्या काळात सेवा केली होती. तो आज्ञाधारकपणे देवाच्या न्यायदंडाचा संदेश घोषित करत असल्यामुळे, दररोज त्याच्या विश्वासाची परीक्षा होत होती. एके प्रसंगी, तर त्याचा निष्ठावान सचिव बारूख यानेदेखील अतिशय थकून गेल्याची तक्रार केली. (यिर्म. ४५:२, ३) यामुळे यिर्मया खचून गेला का? अर्थात, काही वेळा त्याला निराश वाटले. त्याने असे उद्गार काढले: “मी जन्मलो तो दिवस शापित असो; . . . मी कष्ट व क्लेश भोगावे व माझे दिवस अप्रतिष्ठेत घालवावे याकरिताच मी गर्भाशयातून बाहेर निघालो काय?”—यिर्म. २०:१४, १५, १८.
८, ९. यिर्मया १७:७, ८ व स्तोत्र १:१-३ या वचनांनुसार, उत्तम फळ देत राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
८ पण, यिर्मयाने हार मानली नाही. त्याने यहोवावरील आपला भरवसा टिकवून ठेवला. परिणामस्वरूप, या विश्वासू संदेष्ट्याने यिर्मया १७:७, ८ मध्ये नमूद असलेल्या यहोवाच्या स्वतःच्या शब्दांची पूर्णता अनुभवली: “जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य! तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदी किनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.”
९ “जलाशयाजवळ लाविलेल्या” किंवा भरपूर पाणी असलेल्या फळबागेत लावलेल्या हिरव्यागार वृक्षाप्रमाणे यिर्मयाने केव्हाही ‘फळे देण्याचे सोडले नाही.’ त्याने त्याच्या सभोवताली असलेल्या दुष्ट थट्टेखोरांचा स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. उलट, तो जीवनदायी ‘पाण्याच्या’ स्रोताला जडून राहिला आणि यहोवाने त्याला सांगितलेला शब्द न् शब्द त्याने मनापासून पाळला. (स्तोत्र १:१-३ वाचा; यिर्म. २०:९) आपल्या सर्वांसाठी आणि खासकरून अतिशय कठीण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी यिर्मया किती उत्तम उदाहरण आहे! तुम्हीदेखील कठीण क्षेत्रात कार्य करत असाल, तर यहोवावर पूर्णपणे विसंबून राहा. त्याच्या नावाची सार्वजनिक रीत्या घोषणा करण्यासाठी आवश्यक असलेला धीर तो अवश्य तुम्हाला देईल.—इब्री १३:१५.
१०. देवाने आपल्याकरता कोणत्या तरतुदी केल्या आहेत, आणि आपण स्वतःला काय विचारले पाहिजे?
१० या शेवटल्या काळात, जीवनातील समस्यांचा सामना करण्यास आपल्याला मदत करण्यासाठी यहोवाने आपल्याकरता अनेक तरतुदी केल्या आहेत. त्यांपैकी एक आहे त्याचे संपूर्ण वचन बायबल, ज्याचे अधिकाधिक भाषांमध्ये अचूक भाषांतर केले जात आहे. तसेच, यहोवाने विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाद्वारे उचित समयी मुबलक आध्यात्मिक अन्न पुरवले आहे. याशिवाय, त्याने सभा व संमेलने यांद्वारे आपल्याला सहविश्वासू बांधवांच्या मोठ्या समूहाचा सहवास व आधार दिला आहे. या सर्व तरतुदींचा तुम्ही पुरेपूर फायदा घेता का? जे यांचा लाभ घेतात ते सर्व “हर्षित चित्ताने जयजयकार करितील.” पण, जे देवाच्या आज्ञा मानत नाही ते ‘खिन्न चित्ताने ओरडतील व भग्नहृदय होऊन आकांत करतील.’—यश. ६५:१३, १४.
तुम्ही चिंता-विवंचनांचा सामना करता तेव्हा देवावर भरवसा ठेवा
११, १२. जगातील समस्या विचारात घेता कोणता मार्ग अवलंबणे खऱ्या अर्थाने बुद्धिमानीचे ठरेल?
११ बायबलमध्ये भाकीत केल्याप्रमाणे आज मानवजातीवर वाढत्या समस्यांचा महापूर आला आहे. (मत्त. २४:६-८; प्रकटी. १२:१२) खरोखरचा पूर येतो तेव्हा लोक सुरक्षेसाठी सहसा उंच ठिकाणी किंवा इमारतीच्या छतावर जातात. त्याचप्रमाणे, जगातील समस्या दिवसेंदिवस वाढत असताना लाखो लोक आश्रयासाठी वरवर उंच वाटणाऱ्या आर्थिक, राजनैतिक किंवा धार्मिक संस्थांकडे, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान यांकडे वळतात. पण, यांपैकी कोठेही त्यांना खरी सुरक्षा मिळू शकत नाही. (यिर्म. १७:५, ६) दुसरीकडे पाहता, यहोवाच्या लोकांचे एक खातरीलायक सुरक्षा स्थान—“सनातन आश्रयदुर्ग” आहे. (यश. २६:४) स्तोत्रकर्त्याने यहोवाबद्दल म्हटले: “तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे.” (स्तोत्र ६२:६-९ वाचा.) तर मग, आपण यहोवाला आपला आश्रयदुर्ग कसे बनवू शकतो?
१२ आपण देवाच्या वचनाचे पालन करतो तेव्हा आपण यहोवाला जडून राहतो. कारण देवाच्या वचनातील बुद्धी सहसा मानवी बुद्धीच्या विपरित असते. (स्तो. ७३:२३, २४) उदाहरणार्थ, मानवी बुद्धीने चालणारे लोक कदाचित म्हणतील: ‘जीवन एकदाच मिळतं, तेव्हा जीवनाची मजा लुटा.’ ‘चांगलं करिअर बनवा.’ ‘बक्कळ पैसा कमवा.’ ‘खूप खूप खरेदी करा.’ ‘भरपूर प्रवास करा; जगभर फिरा.’ दुसरीकडे पाहता, देवाच्या बुद्धीने चालणारे लोक पुढील सल्ल्याचे पालन करतात: “जे ह्या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे; कारण ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे.” (१ करिंथ. ७:३१) त्याचप्रमाणे, येशूदेखील आपल्याला असा सल्ला देतो, की आपण नेहमी राज्याशी संबंधित कार्यांना आपल्या जीवनात प्राधान्य दिले पाहिजे, आणि असे करण्याद्वारे आपण “स्वर्गांत आपल्यासाठी संपत्ति” साठवली पाहिजे, जेथे ती पूर्णपणे सुरक्षित राहील.—मत्त. ६:१९, २०.
१३. आपण १ योहान २:१५-१७ हे वचन विचारात घेऊन स्वतःला कोणता प्रश्न विचारला पाहिजे?
१३ ‘जगाप्रती’ व ‘जगातल्या गोष्टींप्रती’ तुमची जी मनोवृत्ती आहे त्यावरून तुम्ही पूर्णपणे देवावर भरवसा ठेवत असल्याचे दिसून येते का? (१ योहा. २:१५-१७) हे जग तुम्हाला जे काही देऊ करते त्याच्यापुढे आध्यात्मिक धन व सेवेचे विशेषाधिकार तुम्हाला अधिक हवेहवेसे व महत्त्वपूर्ण वाटतात का? (फिलिप्पै. ३:८) तुम्ही आपला “डोळा निर्दोष” ठेवण्याचा प्रयत्न करता का? (मत्त. ६:२२) अर्थात, तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्यास तुम्ही अविचारीपणे किंवा बेजबाबदारपणे वागावे अशी अपेक्षा देव तुमच्याकडून करत नाही. (१ तीम. ५:८) पण देवाच्या सेवकांनी, नाशाच्या मार्गावर असलेल्या सैतानाच्या या जगावर नव्हे, तर देवावर आपला पूर्ण भरवसा ठेवावा अशी अपेक्षा तो नक्कीच करतो.—इब्री १३:५.
१४-१६. आपला “डोळा निर्दोष” ठेवल्यामुळे व जीवनात राज्याशी संबंधित कार्यांना प्राधान्य दिल्यामुळे काहींना कशा प्रकारे फायदा झाला आहे?
१४ रिचर्ड आणि रूथ या जोडप्याचे उदाहरण विचारात घ्या. त्यांना तीन लहान मुले आहेत. रिचर्ड म्हणतात: “मी खरंतर यहोवाच्या सेवेत आणखी जास्त करू शकतो असं माझं मन मला सांगत होतं. मी एक आरामदायी जीवन जगत होतो. पण, देवाला जणू मी फक्त उरलंसुरलं देत आहे असं मला वाटलं. याविषयी प्रार्थना केल्यानंतर आणि सर्व गोष्टी विचारात घेतल्यानंतर मी आणि रूथनं असं ठरवलं की मी माझ्या कामाचे दिवस कमी करण्याविषयी म्हणजे आठवड्यातून चार दिवस काम करण्याविषयी माझ्या सुपरवाइझरशी बोलावं. देशात आर्थिक संकट असूनही आम्ही हा निर्णय घेतला. सुपरवाइझरनं माझी विनंती मान्य केली आणि एका महिन्यातच मी नव्या वेळापत्रकानुसार काम करू लागलो.” याबद्दल रिचर्डला आज कसे वाटते?
१५ रिचर्ड म्हणतात: “मला आता पूर्वीपेक्षा २० टक्के कमी पगार मिळतो. पण, माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि मुलांना तालीम देण्यासाठी मला वर्षभरात ५० दिवस जास्त मिळतात. यामुळे मी क्षेत्र सेवेत खर्च करत असलेला वेळ दुपटीनं वाढवणं मला शक्य झालं आहे, माझे बायबल अभ्यास तिपटीनं वाढले आहेत आणि मंडळीत अधिकाधिक पुढाकार घेणं मला शक्य झालं आहे. मुलांची देखभाल करण्यासाठी माझ्याजवळ अधिक वेळ असल्यामुळे, रूथला वेळोवेळी साहाय्यक पायनियर सेवा करणं शक्य झालं आहे. मला जमेल तोपर्यंत मी याच वेळापत्रकानुसार काम करण्याचा निर्धार केला आहे.”
१६ रॉय आणि पेटिना यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी अजूनही त्यांच्यासोबतच राहते. पूर्ण वेळच्या सेवाकार्यात सहभाग घेता यावा म्हणून रॉय व पेटिना यांनी आपले कामाचे दिवस कमी केले आहेत. रॉय म्हणतात: “मी आठवड्यातून तीन दिवस काम करतो आणि पेटिना आठवड्यातून दोन दिवस काम करते. तसंच, आम्ही एका मोठ्या घरातून लहानशा घरात राहायला गेलो. त्यामुळे घराची देखभाल करणं सोपं झालं आहे. आम्हाला मुलं होण्याआधी आम्ही दोघं पायनियर सेवा करत होतो; आणि पायनियर सेवा करण्याची आमची इच्छा कधीच नष्ट झाली नाही. त्यामुळे, मुलं मोठी झाल्यावर आम्ही पूर्ण वेळची सेवा पुन्हा सुरू केली. या सेवेत जे आशीर्वाद आम्हाला लाभले त्यांची तुलना पैशाशी करणं शक्य नाही.”
“देवाने दिलेली शांति” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
१७. जीवनातील अनिश्चितता लक्षात घेता, तुम्हाला शास्त्रवचनांतून कसे सांत्वन मिळाले आहे?
१७ आपल्या सर्वांनाच “समय व प्रसंग” घडतात. तेव्हा, उद्या काय होईल हे आपल्यापैकी कोणीही सांगू शकत नाही. (उप. ९:११, पं.र.भा.) देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध नसलेल्या लोकांना, उद्या काय होईल या चिंतेमुळे सहसा फार असुरक्षित वाटते व ते आपली मनःशांती गमावून बसतात. पण, उद्याच्या चिंतेमुळे आज आपल्याला आपली मनःशांती गमावण्याची गरज नाही. (मत्त. ६:३४) प्रेषित पौलाने लिहिले: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पै. ४:६, ७.
१८, १९. देव कशा प्रकारे आपले सांत्वन करतो? उदाहरण द्या.
१८ खडतर परिस्थितीत अनेक बंधुभगिनींनी यहोवाकडून मिळणारी ही आंतरिक शांती अनुभवली आहे. एक बहीण म्हणते: “मी रक्त घ्यावं म्हणून एका डॉक्टरनं माझ्यावर दबाव आणण्याचा वारंवार प्रयत्न केला. तो मला भेटायला यायचा तेव्हा त्याच्या तोंडून सर्वप्रथम हे शब्द निघायचे: ‘रक्त घेणार नाही! हा काय मूर्खपणा आहे?’ या आणि इतर अनेक वेळी मी मनोमन यहोवाला प्रार्थना केली व त्याच्याकडून मिळणारी शांती अनुभवली आणि मला खडकासारखं मजबूत वाटलं. शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे मी अशक्त झाले होते. तरीसुद्धा, माझ्या निर्णयाबद्दल मी त्यांना बायबलच्या आधारे स्पष्टीकरण देऊ शकले.”
१९ देव काही वेळा एखाद्या सहानुभूतीशील बंधू किंवा बहिणीद्वारे अथवा योग्य वेळी आध्यात्मिक अन्न पुरवण्याद्वारे आपल्याला आवश्यक आधार देऊ शकतो. तुम्ही अनेकदा एखाद्या बंधू किंवा बहिणीला असे म्हणताना ऐकले असेल: “मला ज्याची गरज होती तेच या लेखात दिलं आहे. असं वाटतं जणू हा लेख माझ्यासाठीच लिहिलेला आहे!” होय, आपली परिस्थिती किंवा गरज काहीही असो, आपण यहोवावर भरवसा ठेवला, तर तो आपल्यावरील त्याचे प्रेम दाखवून देईल. शेवटी, आपण सर्व त्याची “मेंढरे” आहोत आणि त्याने आपल्याला त्याचे नाव दिले आहे.—स्तो. १००:३; योहा. १०:१६; प्रे. कृत्ये १५:१४, १७.
२०. सैतानाच्या जगाचा अंत होईल तेव्हा यहोवाचे सेवक सुरक्षित का असतील?
२० वेगाने येणाऱ्या यहोवाच्या क्रोधाच्या दिवसादरम्यान, सैतानाचे जग ज्या कशावर भरवसा ठेवते ते सर्व कोलमडून पडेल. सोने, चांदी, आणि इतर मौल्यवान वस्तू कोणत्याही प्रकारे संरक्षण देऊ शकणार नाहीत. (सफ. १:१८; नीति. ११:४) त्या वेळी केवळ आपला “सनातन आश्रयदुर्ग” आपला सुरक्षा देऊ शकेल. (यश. २६:४) तेव्हा, आता यहोवाच्या नीतिमान मार्गांवर आज्ञाधारकपणे वाटचाल करण्याद्वारे, क्षेत्रातील लोक थंड प्रतिसाद देत असले किंवा आपला विरोध करत असले, तरी त्याच्या राज्याचा संदेश घोषित करण्याद्वारे आणि आपल्या सर्व चिंतांचा भार त्याच्यावर टाकण्याद्वारे त्याच्यावर आपला पूर्ण भरवसा असल्याचे आपण दाखवू या. असे केल्यास आपण ‘सुरक्षित राहू आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असू.’—नीति. १:३३.
[तळटीप]
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
पुढील बाबतींत आपण देवावर भरवसा कसा ठेवू शकतो?
• वाईट गोष्टी करण्याचा मोह होतो तेव्हा . . .
• लोक थंड प्रतिसाद देतात किंवा विरोध करतात तेव्हा . . .
• आपल्याला चिंता-विवंचनांचा सामना करावा लागतो तेव्हा . . .
[१३ पानांवरील चित्र]
देवाच्या स्तरांचे पालन केल्याने आपल्याला आनंद मिळतो
[१५ पानांवरील चित्र]
यहोवाच आपला “सनातन आश्रयदुर्ग आहे”