वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w11 ३/१५ पृ. ८-१२
  • जगाचा नव्हे, देवाचा आत्मा मिळवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगाचा नव्हे, देवाचा आत्मा मिळवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जगाचा आत्मा—इतका व्यापक का आहे?
  • जगाचा आत्मा तुमच्यावर प्रभाव पाडत आहे का?
  • येशूच्या उदाहरणावरून शिका
  • आपण जगाला जिंकू शकतो
  • ‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तुम्ही जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करीत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार का चालावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
w11 ३/१५ पृ. ८-१२

जगाचा नव्हे, देवाचा आत्मा मिळवा

“आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे; ह्‍यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.” —१ करिंथ. २:१२.

१, २. (क) खरे ख्रिस्ती कोणत्या अर्थाने युद्ध लढत आहेत? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांना एक युद्ध लढावे लागत आहे! आपला शत्रू शक्‍तिशाली, धूर्त, आणि युद्धखोर आहे. त्याच्याकडे असे एक प्रभावी शस्त्र आहे ज्याला मानवजातीपैकी पुष्कळ लोक बळी पडले आहेत. पण, त्याच्यापुढे आपण शक्‍तीहीन किंवा आशाहीन आहोत असे वाटण्याचे कारण नाही. (यश. ४१:१०) आपल्याजवळदेखील असे एक शस्त्र आहे जे अभेद्य आहे व ज्याच्या तोडीचे दुसरे कोणतेच शस्त्र नाही.

२ आपण जे युद्ध लढत आहोत ते खरोखरचे युद्ध नाही; ते आध्यात्मिक युद्ध आहे. आपला शत्रू सैतान आहे आणि तो ज्या शस्त्राचा वापर करतो ते आहे या “जगाचा आत्मा.” (१ करिंथ. २:१२) सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याजवळ एक शक्‍तिशाली हत्यार आहे. ते म्हणजे देवाचा आत्मा. या युद्धातून बचावण्यासाठी आणि देवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी, देवाच्या आत्म्याकरता प्रार्थना करण्याची आणि आपल्या जीवनात त्या आत्म्याचे फळ दाखवण्याची गरज आहे. (गलती. ५:२२, २३) पण, जगाचा आत्मा काय आहे, आणि तो कशा प्रकारे इतका शक्‍तिशाली बनला? जगाच्या आत्म्याचा आपल्यावर प्रभाव पडत आहे की नाही हे आपण कसे सांगू शकतो? आणि देवाचा आत्मा मिळवण्याबद्दल आणि या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करण्याबद्दल आपण येशूकडून काय शिकू शकतो?

जगाचा आत्मा—इतका व्यापक का आहे?

३. जगाचा आत्मा काय आहे?

३ जगाच्या आत्म्याचा उगम “ह्‍या जगाचा अधिकारी” म्हणजे सैतान आहे आणि त्यामुळे जगाचा आत्मा देवाच्या पवित्र आत्म्याच्या विरोधात आहे. (योहा. १२:३१; १४:३०; १ योहा. ५:१९) जगाचा आत्मा या जगातील सर्वाधिक प्रबळ प्रवृत्ती असून ही प्रवृत्ती लोकांना कृती करण्यास भाग पाडते. ही प्रेरक शक्‍ती मानवसमाजाला देवाच्या इच्छेचा आणि त्याच्या उद्देशाचा विरोध करण्यास प्रवृत्त करते.

४, ५. सैतान ज्या आत्म्याला चालना देतो तो आज इतका व्यापक कसा बनला?

४ सैतान ज्या आत्म्याला चालना देतो तो इतका व्यापक कसा बनला? सैतानाने सर्वात आधी, एदेन बागेत हव्वेला फसवले. त्याने तिची खातरी पटवून दिली की देवापासून स्वतंत्र झाल्यास तिचे जीवन सुधारेल. (उत्प. ३:१३) तो किती लबाड होता! (योहा. ८:४४) नंतर, स्त्रीच्या द्वारे सैतानाने कावेबाजपणे यहोवाप्रती असलेली आदामाची एकनिष्ठा भंग केली. आदामाच्या या निवडीमुळे मानवजात पापाचे गुलाम बनली, आणि अशा प्रकारे मानवजातीने सैतानाच्या अवज्ञाकारी आत्म्याने प्रभावित होण्याची प्रवृत्ती वारशाने प्राप्त केली.—इफिसकर २:१-३ वाचा.

५ सैतानाने बऱ्‍याचशा देवदूतांवरही आपला प्रभाव टाकला. हे देवदूत नंतर दुष्टात्मे बनले. (प्रकटी. १२:३, ४) देवदूतांनी केलेला देवाचा हा विश्‍वासघात नोहाच्या दिवसांतील जलप्रलयाच्या आधी कधीतरी घडला. त्या देवदूतांना असे वाटले, की त्यांनी स्वर्गातील आपले नेमलेले स्थान सोडून पृथ्वीवर येऊन आपल्या अनैसर्गिक वासना तृप्त केल्यास त्यांचे भले होईल. (यहू. ६) अदृश्‍य क्षेत्रातील या दुष्टात्म्यांच्या मदतीने, सैतान ‘सर्व जगाला ठकवित’ आहे. (प्रकटी. १२:९) दुःखाची गोष्ट म्हणजे, दुष्टात्म्यांच्या या प्रभावाबद्दल जगातील बरेच लोक अजाण आहेत.—२ करिंथ. ४:४.

जगाचा आत्मा तुमच्यावर प्रभाव पाडत आहे का?

६. जगाचा आत्मा केवळ कशा प्रकारे आपल्यावर प्रभाव पाडू शकतो?

६ आज पुष्कळ लोक सैतानाच्या प्रभावाबद्दल अजाण असले, तरी खऱ्‍या ख्रिश्‍चनांना त्याच्या कुयुक्त्यांसंबंधी अजाण राहण्याची गरज नाही. (२ करिंथ. २:११) खरेतर, या जगाच्या आत्म्याचा आपण आपल्यावर प्रभाव पडू दिला नाही, तर तो आपल्यावर प्रभाव पाडूच शकत नाही. तर मग, आपण कोणत्या आत्म्याला आपल्यावर प्रभाव पाडू देतो—जगाच्या की देवाच्या—हे पाहण्यासाठी आपण चार प्रश्‍नांचे परीक्षण करू या.

७. सैतान कोणत्या एका मार्गाने आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो?

७ मी ज्या प्रकारच्या मनोरंजनाची निवड करतो त्यातून माझ्याबद्दल काय दिसून येते? (याकोब ३:१४-१८ वाचा.) आपल्या मनात हिंसक गोष्टींबद्दल प्रेम वाढवण्याद्वारे सैतान आपल्याला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना हिंसक गोष्टींबद्दल प्रेम वाटते अशा लोकांचा यहोवा द्वेष करतो हे दियाबलाला माहीत आहे. (स्तो. ११:५) म्हणूनच, आपल्या शारीरिक इच्छांना जागृत करण्यासाठी साहित्य, चित्रपट, संगीत, आणि इलेक्ट्रॉनिक गेम्स यांचा वापर करण्याचा सैतान प्रयत्न करतो. यांपैकी काही इलेक्ट्रॉनिक गेम्स तर खेळाडूंना घोर अनैतिक कृत्ये व क्रूर कामे करण्याचे उत्तेजन देतात. सैतान ज्या वाईट गोष्टींना चालना देतो त्यांच्यावर आपण प्रेम करत असलो आणि त्याच वेळी ज्या गोष्टी योग्य आहेत त्यांच्यावरदेखील प्रेम करत असलो तरी सैतानाला आनंदच होतो.—स्तो. ९७:१०.

८, ९. मनोरंजनाच्या बाबतीत आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

८ दुसरीकडे पाहता, ज्यांना देवाचा आत्मा प्राप्त होतो त्यांना तो पवित्र, शांतीपूर्ण, आणि दयाळू असण्यास प्रेरित करतो. म्हणून, आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘मी ज्या प्रकारच्या मनोरंजनाची निवड करतो त्यामुळे मला चांगले गुण विकसित करण्याचे प्रोत्साहन मिळते का?’ वरून येणारे ज्ञान हे “निर्दंभ” असते. तेव्हा, जे देवाच्या आत्म्याने प्रभावित असतात ते आपल्या शेजाऱ्‍यांना पवित्रता व शांतीचा संदेश सांगून, स्वतः गुप्तपणे क्रूर हिंसेचा व अनैतिकतेचा आनंद घेत नाहीत.

९ आपण एकनिष्ठपणे केवळ यहोवाचीच उपासना करावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. पण, सैतान मात्र आपल्याकडून उपासनेच्या केवळ एका कृतीची अपेक्षा करतो. अशी अपेक्षा त्याने येशूकडूनसुद्धा केली होती. (लूक ४:७, ८) आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘मी ज्या प्रकारच्या मनोरंजनाची निवड करतो त्यामुळे मला यहोवाची एकनिष्ठपणे उपासना करणे शक्य होते का? माझ्या निवडीमुळे या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करणे मला कठीण जाते की सोपे? भविष्यात मी जे मनोरंजन निवडेन त्यात मला बदल करण्याची गरज आहे का?’

१०, ११. (क) भौतिक गोष्टींच्या बाबतीत, या जगाचा आत्मा कोणत्या मनोवृत्तीला उत्तेजन देतो? (ख) देवाच्या आत्म्याने प्रेरित असलेले त्याचे वचन कोणत्या मनोवृत्तीला उत्तेजन देते?

१० भौतिक गोष्टी बाळगण्याबद्दल माझी मनोवृत्ती कशी आहे? (लूक १८:२४-३० वाचा.) या जगाचा आत्मा लोभ आणि भौतिकवाद यांसारख्या गोष्टींना चालना देण्याद्वारे ‘डोळ्यांच्या वासनेला’ उत्तेजन देतो. (१ योहा. २:१६) त्याने कित्येक लोकांच्या मनात श्रीमंत होण्याची इच्छा विकसित केली आहे. (१ तीम. ६:९, १०) पुष्कळ भौतिक गोष्टी जमवल्याने आपण सुरक्षित राहू असा विश्‍वास बाळगण्यास तो आत्मा आपल्याला प्रवृत्त करू शकतो. (नीति. १८:११) पण, आपण देवापेक्षा पैशावर जास्त प्रेम केले, तर सैतानाने आपल्यावर विजय मिळवलाच असेल. म्हणून आपण स्वतःला विचारले पाहिजे: ‘भौतिक वस्तू आणि ऐशआरामाच्या गोष्टी मिळवणे हेच माझ्या जीवनाचे मुख्य लक्ष्य बनले आहे का?’

११ याउलट, देवाच्या आत्म्याने प्रेरित असलेले त्याचे वचन आपल्याला पैशाबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगण्याचे आणि आपल्या व आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा पुरवण्यासाठी मेहनत करण्याचे प्रोत्साहन देते. (१ तीम. ५:८) ज्यांना देवाचा आत्मा मिळाला आहे त्यांना तो यहोवाच्या उदार व्यक्‍तिमत्त्वाचे अनुकरण करण्यास मदत करतो. असे लोक इतरांकडून घेणारे म्हणून नव्हे, तर इतरांना देणारे म्हणून ओळखले जातात. ते भौतिक गोष्टींपेक्षा लोकांना जास्त महत्त्व देतात आणि त्यांची ऐपत असते तेव्हा, त्यांच्याजवळ जे काही आहे ते आनंदाने इतरांसोबत वाटून घेतात. (नीति. ३:२७, २८) आणि ते कधीही पैशाला देवाच्या सेवेपेक्षा जास्त महत्त्व देत नाहीत.

१२, १३. या जगाच्या आत्म्याच्या अगदी उलट, देवाचा आत्मा आपल्यावर सकारात्मक प्रभाव कसा पाडू शकतो?

१२ माझ्या व्यक्‍तिमत्त्वातून कोणता आत्मा दिसून येतो? (कलस्सैकर ३:८-१०, १३ वाचा.) या जगाचा आत्मा शारीरिक कार्यांना चालना देतो. (गलती. ५:१९-२१) आपल्यावर कोणता आत्मा प्रभाव पाडतो याची खरी परीक्षा जीवनात सर्व काही सुरळीत चाललेले असते तेव्हा नव्हे, तर आपल्या जीवनात चढ-उतार येतात तेव्हा होते. जसे की, आपला एखादा बांधव किंवा बहीण आपल्याकडे दुर्लक्ष करते, आपले मन दुखावते, किंवा आपल्याविरुद्ध पापदेखील करते अशा वेळी आपली खरी परीक्षा होते. याशिवाय आपल्यावर, या जगाचा आत्मा प्रभाव पाडत आहे की देवाचा आत्मा, हे आपण एकटे असतो तेव्हादेखील स्पष्टपणे दिसून येते. अशा वेळी स्वतःचे परीक्षण करणे गरजेचे ठरेल. स्वतःला विचारा: ‘गेल्या सहा महिन्यांत, माझे व्यक्‍तिमत्त्व आणखी जास्त ख्रिस्ताच्या व्यक्‍तिमत्त्वासारखे बनले आहे का, की बोलण्याच्या व आचरणाच्या ज्या वाईट सवयी मी सोडून दिल्या होत्या त्या मला पुन्हा लागल्या आहेत?’

१३ देवाचा आत्मा आपल्याला ‘जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकून नवा मनुष्य’ धारण करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे आपल्याला आणखी जास्त प्रेमळ आणि दयाळू बनण्यास साहाय्य मिळेल. तक्रार करण्याचे एखादे उचित कारण असले, तरी आपण मोकळेपणाने एकमेकांना क्षमा करण्यास प्रवृत्त होऊ. आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटून आपण “कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा” यांद्वारे आपला राग व्यक्‍त करणार नाही. त्याऐवजी, आपण “कनवाळू” बनण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू.—इफिस. ४:३१, ३२.

१४. आज जगातील अनेक लोक देवाच्या वचनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात?

१४ मला बायबलमधील नैतिक स्तरांबद्दल आदर व प्रेम वाटते का? (नीतिसूत्रे ३:५, ६ वाचा.) या जगाचा आत्मा देवाच्या वचनाविरुद्ध बंड करत असल्याचे दिसून येते. या जगाच्या आत्म्याने प्रभावित झालेल्या लोकांना बायबलमधील काही भाग सोयीचे वाटत नाहीत; त्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याऐवजी मानवी परंपरा आणि तत्त्वज्ञान यांच्यानुसार चालणे पसंत करतात. (२ तीम. ४:३, ४) काही लोक तर देवाच्या संपूर्ण वचनाचाच अवमान करतात. अशा लोकांना बायबल समयोचित वाटत नाही व ते बायबलच्या खरेपणावर प्रश्‍न उपस्थित करतात, आणि अशा प्रकारे ते स्वतःच्याच नजरेत बुद्धिमान बनण्याचा प्रयत्न करतात. ते व्यभिचार, समलैंगिकता, आणि घटस्फोट यांबद्दल बायबलमधील शुद्ध स्तरांना तुच्छ लेखतात. ते “वाइटाला बरे व बऱ्‍याला वाईट” मानून तशी शिकवण देतात. (यश. ५:२०) अशा आत्म्याचा आपल्यावर प्रभाव पडला आहे का? समस्यांना तोंड देताना, आपण मानवी बुद्धीवर व आपल्या स्वतःच्या मतांवर अवलंबून असतो का? की आपण बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतो?

१५. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहण्याऐवजी आपण काय केले पाहिजे?

१५ देवाचा आत्मा आपल्या मनात बायबलबद्दल आदर उत्पन्‍न करतो. स्तोत्रकर्त्याप्रमाणे, देवाचे वचन आपल्या पावलांकरता दिव्यासारखे व आपल्या मार्गाकरता प्रकाशासारखे आहे या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहतो. (स्तो. ११९:१०५) चांगले काय व वाईट काय हे ठरवण्यासाठी आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहण्याऐवजी, आपण पूर्ण भरवशाने देवाच्या वचनावर अवलंबून राहतो. आपण केवळ बायबलचा आदर करण्यास शिकत नाही, तर देवाच्या वचनावर प्रेम करण्यासही शिकतो.—स्तो. ११९:९७.

येशूच्या उदाहरणावरून शिका

१६. “ख्रिस्ताचे मन” विकसित करण्यात कशाचा समावेश होतो?

१६ देवाचा आत्मा मिळवण्यासाठी, आपण आपल्यामध्ये “ख्रिस्ताचे मन” विकसित केले पाहिजे. (१ करिंथ. २:१६) ‘ख्रिस्त येशूप्रमाणे एकचित्त होण्यासाठी,’ त्याने ज्या प्रकारे विचार केला आणि कार्य केले ते जाणून आपण त्याचे अनुकरण केले पाहिजे. (रोम. १५:५; १ पेत्र २:२१) आपण हे कोणत्या काही मार्गांनी करू शकतो ते पाहा.

१७, १८. (क) प्रार्थनेबद्दल आपण येशूकडून काय शिकतो? (ख) आपण का ‘मागत’ राहिले पाहिजे?

१७ देवाच्या आत्म्याकरता प्रार्थना करा. परीक्षांचा सामना करण्याआधी येशूने देवाच्या आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना केली. (लूक २२:४०, ४१) आपणही देवाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणे अत्यंत गरजेचे आहे. जे पूर्ण भरवशाने यहोवाकडे पवित्र आत्मा मागतात त्यांना तो उदारतेने आपला आत्मा देतो. (लूक ११:१३) येशूने म्हटले: “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल; कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल.”—मत्त. ७:७, ८.

१८ यहोवाच्या आत्म्याकरता व मदतीकरता प्रार्थना करताना ताबडतोब उत्तर मिळाले नाही, तर आत्म्याकरता प्रार्थना करण्याचे लगेच थांबवू नका. कदाचित आपल्याला वारंवार प्रार्थना करावी लागेल आणि प्रार्थनेत जास्त वेळ घालवावा लागेल. कधीकधी, यहोवा प्रार्थनांचे उत्तर देण्याआधी, आपल्या सेवकांना त्यांच्या समस्येबद्दल किती चिंता वाटते आणि त्याच्यावर त्यांचा किती विश्‍वास आहे हे प्रदर्शित करण्याची संधी देतो.a

१९. येशूने नेहमी काय केले, आणि आपण त्याचे अनुकरण का केले पाहिजे?

१९ मनापासून यहोवाच्या आज्ञांचे पालन करा. येशूने नेहमी आपल्या पित्याला आनंदित करणाऱ्‍या गोष्टी केल्या. कमीत कमी एका प्रसंगी, एका परिस्थितीचा सामना येशूने ज्या प्रकारे करावा अशी पित्याची इच्छा होती, त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे येशू त्या परिस्थितीचा सामना करू इच्छित होता. तरीसुद्धा, तो पूर्ण भरवशाने आपल्या पित्याला म्हणाला: “माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” (लूक २२:४२) स्वतःला विचारा: ‘देवाच्या आज्ञांचे पालन करणे सोपे नसते तेव्हासुद्धा मी त्यांचे पालन करतो का?’ देवाच्या आज्ञांचे पालन करणे आपल्या जीवनाकरता आवश्‍यक आहे. तो आपला निर्माणकर्ता, आपल्या जीवनाचा स्रोत आणि आपला सांभाळ करणारा असल्यामुळे आपण त्याच्या आज्ञांचे मनापासून पालन केले पाहिजे. (स्तो. ९५:६, ७) आज्ञापालनाला पर्याय नाही. त्याच्याशिवाय आपण देवाची कृपापसंती प्राप्त करूच शकत नाही.

२०. येशूचे जीवन कोणत्या गोष्टीवर केंद्रित होते, आणि आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो?

२० बायबलचे ज्ञान घ्या. सैतानाने येशूच्या विश्‍वासावर प्रत्यक्ष प्रहार केला, तेव्हा येशूने शास्त्रवचनांचा उल्लेख केला. (लूक ४:१-१३) आपल्या धार्मिक विरोधकांना उत्तर देताना येशूने देवाच्या वचनाचा अधिकार म्हणून उपयोग केला. (मत्त. १५:३-६) येशूचे संपूर्ण जीवन देवाचे नियमशास्त्र जाणून घेण्यावर आणि ते पूर्ण करण्यावर केंद्रित होते. (मत्त. ५:१७) आपलीसुद्धा तीच इच्छा असली पाहिजे. आपणही आपला विश्‍वास बळकट करणाऱ्‍या देवाच्या वचनाचे शिक्षण घेत राहिले पाहिजे व त्यावर मनन करत राहिले पाहिजे. (फिलिप्पै. ४:८, ९) आपल्यापैकी काहींना वैयक्‍तिक व कौटुंबिक अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नसेल. तसे असल्यास, या गोष्टींसाठी आपण जाणीवपूर्वक वेळ काढला पाहिजे.—इफिस. ५:१५-१७.

२१. देवाचे वचन आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आणि ते आपल्या जीवनात लागू करण्यासाठी आपण कोणत्या व्यवस्थेचा उपयोग करू शकतो?

२१ ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ आपल्याकरता प्रत्येक आठवडी कौटुंबिक उपासनेच्या संध्येची व्यवस्था करण्याद्वारे वैयक्‍तिक व कौटुंबिक अभ्यासासाठी वेळ काढण्यास आपल्याला मदत केली आहे. (मत्त. २४:४५) या व्यवस्थेचा तुम्ही सुज्ञपणे उपयोग करत आहात का? ख्रिस्ताचे मन विकसित करण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून तुम्ही आपल्या अभ्यास सत्रात, तुमच्या आवडीच्या विषयांवर येशूने जे शिकवले आहे त्याची पद्धतशीर चर्चा करू शकता का? तुम्हाला आवडणाऱ्‍या विषयांबद्दल जास्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स याचा उपयोग करू शकता. उदाहरणार्थ, २००८ ते २०१० या काळात या नियतकालिकाच्या सार्वजनिक आवृत्तीमध्ये “येशू काय शिकवतो?” या सदरात ७ लेख प्रकाशित झाले होते. तुमच्या अभ्यासाचा आधार म्हणून तुम्ही या लेखांचा उपयोग करू शकता. २००६-०७ या वर्षांत सावध राहा! नियतकालिकात “उत्तर द्या पाहू” हे सदर आले होते. या सदराची रचना, देवाच्या वचनाबद्दलचे तुमचे ज्ञान व समज वाढवण्यासाठी करण्यात आली होती. आपल्या कौटुंबिक उपासनेत तुम्ही वेळोवेळी अशा सदरांचा उपयोग करू शकता का?

आपण जगाला जिंकू शकतो

२२, २३. जगाला जिंकण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

२२ देवाच्या आत्म्याद्वारे चालण्यासाठी आपण या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार केला पाहिजे. असे करणे सोपे नाही. आपल्या विश्‍वासाचे समर्थन करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, फार झटावे लागेल. (यहू. ३) पण आपण हा लढा जिंकू शकतो! येशूने आपल्या शिष्यांना असे म्हटले: “जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”—योहा. १६:३३.

२३ आपण या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार केला आणि देवाचा आत्मा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला, तर आपणही जगाला जिंकू शकतो. खरेच, “देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?” (रोम. ८:३१) देवाचा आत्मा मिळवल्याने आणि बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या आत्म्याच्या निर्देशनानुसार चालल्याने, आज आपल्याला जीवनात समाधान, शांती आणि आनंद मिळेल; आणि त्यासोबतच, अनंतकाळच्या जीवनाचे आश्‍वासनही मिळेल.

[तळटीप]

a अधिक माहितीकरता बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे १७०-१७३ पाहा.

तुम्हाला आठवते का?

• जगाचा आत्मा इतका व्यापक का आहे?

• आपण स्वतःला कोणते चार प्रश्‍न विचारले पाहिजेत?

• देवाचा आत्मा मिळवण्याबद्दल आपण येशूकडून कोणत्या तीन गोष्टी शिकू शकतो?

[८ पानांवरील चित्र]

काही देवदूत कशा प्रकारे दुरात्मे बनले?

[१० पानांवरील चित्र]

लोकांवर नियंत्रण करण्यासाठी सैतान या जगाच्या आत्म्याचा उपयोग करतो, पण आपण या आत्म्याच्या प्रभावातून मुक्‍त होऊ शकतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा