त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा
ती समंजसपणे वागली
अबीगईलने त्या तरुणाच्या डोळ्यात भीती पाहिली. तो भेदरलेला वाटत होता. घाबरण्याचे तसे कारणच होते. काहीतरी भयानक घडणार होते. अबीगईलचा पती नाबाल याच्या घराण्यातल्या सर्व पुरुषांची कत्तल करण्यासाठी सुमारे ४०० योद्धे मार्गस्थ झाले होते. पण का?
नाबालामुळे हे सर्व सुरु झाले होते. तो नेहमीप्रमाणे अतिशय क्रूर व गर्विष्ठपणे वागला होता. आणि ह्या वेळी मात्र त्याने अशा एका माणसाचा अपमान केला होता जो साधासुधा नव्हता. एका एकनिष्ठ व पटाईत योद्ध्यांच्या अगदी आवडत्या सैन्य प्रमुखाचा त्याने अपमान केला होता. आता, नाबालाच्या घराण्यात काम करणारा एक गडी, जो कदाचित एक मेंढपाळ असावा. तो अबीगईलकडे येतो या आशेने की ती त्यांना वाचवण्यासाठी काही मार्ग काढू शकेल. पण एवढ्या मोठ्या सैन्यापुढे एका स्त्रीचे काही चालेल का?
सर्वात आधी आपण या उल्लेखनीय स्त्रीविषयी थोडी माहिती घेऊ या. अबीगईल कोण होती? आणीबाणीचा हा प्रसंग का निर्माण झाला होता? आणि तिने दाखवलेल्या विश्वासाचे आपण अनुकरण कसे करू शकतो?
“बुद्धिमती व रूपवती”
अबीगईल व नाबालाची जोडी तशी विजोडच होती. नाबालाला अबीगईलपेक्षा चांगली बायको शोधूनही सापडली नसती. दुसरीकडे पाहता अबीगईलला असा पती मिळाला होता ज्याच्याइतका वाईट माणूस शोधूनही सापडला नसता. नाबालाकडे भरपूर पैसा होता हे निश्चित. त्यामुळे तो स्वतःला जास्त शहाणा समजत असावा. पण लोकांचे त्याच्याविषयी काय मत होते? बायबलमध्ये कोणाविषयी इतक्या कठोर शब्दात वर्णन केलेले क्वचितच सापडते. नाबालाच्या नावाचाच अर्थ, “मूर्ख” अथवा “अक्कलशून्य” असा होतो. त्याच्या आईवडिलांनी त्याचे हे नाव ठेवले असावे का, की त्याच्या नावाला हे लेबल नंतर लागले असावे? काहीही असो, तो आपल्या नावाप्रमाणेच वागला. तो “कठोर व वाईट चालीचा होता.” तो गुंड व दारूडा असल्यामुळे सर्व लोक त्याला घाबरत व कोणीच त्याला पसंत करीत नसे.—१ शमुवेल २५:२, ३, १७, २१, २५.
अबीगईल नाबालाच्या अगदी उलट होती. तिच्या नावाचा अर्थच, “माझ्यामुळे माझा पिता आनंदी झाला आहे,” असा होता. अनेक पित्यांना, आपल्या देखण्या मुलीचा अभिमान वाटतो, पण आपल्या लेकराचे आंतरिक सौंदर्य पाहून एका सुज्ञ बापाचा आनंद गगनात मावेनासा होतो. बहुतेकदा असे होते, की सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीला, समंजसपणा, बुद्धी, धैर्य आणि विश्वास यांसारखे गुण विकसित करण्याची गरज वाटत नाही. अबीगईलच्या बाबतीत असे नव्हते. बायबल तिच्याविषयी म्हणते, की ती “बुद्धिमती व रूपवती होती.”—१ शमुवेल २५:३.
पण मग इतक्या बुद्धिमान तरुण स्त्रीने अशा निर्बुद्ध माणसाबरोबर कसे काय लग्न केले, असा कदाचित काहींच्या मनात प्रश्न येईल. बायबल लिहिले त्या काळात, बहुतेक विवाह ठरवले जायचे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवू या. आणि विवाह ठरवून झाला नसला तरी, आईवडिलांचे मत घेतलेच जायचे. अबीगईलच्या आईवडिलांनी कदाचित, नाबालाची संपत्ती व प्रतिष्ठा पाहून भारावून गेल्यामुळे हे स्थळ निवडले असावे का, की त्यांनी स्वतःच हे लग्न जुळवले असावे? किंवा मग, गरिबीमुळे त्यांनी या स्थळाला होकार दिला असावा का? काहीही असो, नाबालाकडे अमाप संपत्ती असली तरी तो एक चांगला पती नव्हता, हे नक्की.
सुज्ञ आईवडील अगदी काळजीपूर्वक, आपल्या मुलांना विवाहाबद्दल आदरणीय दृष्टिकोन बाळगण्यास शिकवतात. पैशासाठी लग्न करण्यास ते त्यांच्या मागे लागत नाहीत किंवा मुले अद्याप लहान असतानाच त्यांच्यावर, मुला-मुलींमध्ये होणाऱ्या भेटी (डेटिंग) करण्याचा दबाव आणून प्रौढांच्या भूमिका व जबाबदाऱ्या घेण्यास भाग पाडत नाहीत. (१ करिंथकर ७:३६) पण अबीगईलला या सर्व गोष्टींचा विचार करायला वेळच उरला नसावा. नाबालबरोबर तिचे लग्न झाले. आपल्या नवीन कठीण परिस्थितीत आपण होता होईल तितके चांगले करण्याचा प्रयत्न करू या, असे तिने ठामपणे ठरवले असावे.
“तो त्यांच्या अंगावर ओरडला”
नाबालाने अबीगईलची परिस्थिती आणखीनच कठीण केली होती. त्याने ज्याचा अपमान केला होता तो दुसरा-तिसरा कोणी नसून दावीद होता. दावीद यहोवाचा विश्वासू सेवक होता. शौलानंतर राजा होण्याकरता यहोवाने संदेष्टा शमुवेलाला दाविदाचा अभिषेक करण्यास सांगितले होते. (१ शमुवेल १६:१, २, ११-१३) पण राजा शौल दाविदाचा द्वेष करत होता आणि त्याने त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला होता. म्हणून त्याच्यापासून वाचण्यासाठी दावीद आपल्या ६०० एकनिष्ठ योद्ध्यांबरोबर रानात राहात होता.
नाबाल मावोन येथे राहात होता व तो जवळच्या कर्मेल येथे काम करत असावा आणि कदाचित तेथे त्याची जमीनही असावी.a या शहरांमध्ये हिरवीगार पठारे होती. मेंढ्या चारण्यासाठी ही ठिकाणे अगदी उचित होती. नाबालाकडे ३,००० मेंढ्या होत्या. आणि या शहरांच्या आजूबाजूला जंगल होते. दक्षिणेकडे पारानचे खूप मोठे जंगल होते. पूर्वेकडे असलेल्या क्षार समुद्राकडील भाग पडीक होता ज्यात अनेक दऱ्या व गुहा होत्या. या भागात दावीद आणि त्याचे लोक जगण्यासाठी धडपडत होते. अन्नासाठी त्यांना कदाचित प्राण्यांची शिकार करावी लागत असावी. सुखसंपन्न नाबालाच्या मेंढ्या चारण्यासाठी घेऊन येणारे तरुण मेंढपाळ त्यांना अधूनमधून भेटायचे.
दाविदाचे कष्टाळू सैनिक या मेंढपाळांशी कसे वागायचे? ते अगदी सहजरीत्या अधूनमधून एखादे मेंढरू चोरून घेऊ शकत होते. पण त्यांनी तसे काहीही केले नाही. उलट, ते नाबालाच्या मेंढ्यांचे व मेंढपाळांचे संरक्षण करायचे. (१ शमुवेल २५:१५, १६) मेंढ्या पळवणाऱ्यांची तिथे कमी नव्हती. शिवाय मेंढपाळांचा जीवही धोक्यात असायचा. इस्राएलची दक्षिणी सरहद्द तिथून जवळच असल्यामुळे, अनेकदा लुटमार करणारे विदेशी दरोडेखोर व चोर दरोडा टाकायचे.b
जंगलात सैन्यातील सर्वांच्या अन्नाची सोय करणे सोपे नसावे. त्यामुळे एकदा दावीद आपल्या दहा लोकांना अन्नसामग्री आणण्यासाठी नाबालाकडे पाठवतो. दावीद अगदी विचारपूर्वक ही वेळ निवडतो. तेव्हा लोकर कातरण्याचा उत्सव चाललेला असतो. या वेळी लोक सहसा उदार असतात आणि त्यांच्या मेजवान्या चाललेल्या असतात. नाबालाशी बोलताना कोणते आदरार्थी शब्द वापरायचे यांचीही तो काळजीपूर्वक निवड करतो. नाबाल आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे ही जाणीव ठेवून तो स्वतःला “आपला पुत्र दावीद” असेही संबोधतो. पण नाबाल त्याच्याशी कसे वागतो?—१ शमुवेल २५:५-८.
दाविदाचे नाव ऐकताच तो रागाने लालबुंद होतो! लेखाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, तो तरुण मेंढपाळ अबीगईलला झालेल्या घटनेचे वर्णन देताना म्हणतो, की नाबाल दाविदाच्या लोकांच्या “अंगावर ओरडला.” कंजूस नाबालाने, आपली भाकरी, पाणी आणि मारलेल्या पशूंचे मांस देण्यास साफ नकार दिला. त्याने दाविदाला क्षुल्लक लेखून त्याची थट्टा केली आणि पळून जाणाऱ्या दासाशी त्याची तुलना केली. शौलाप्रमाणेच नाबालसुद्धा दाविदाकडे कलुषित नजरेने पाहत होता. शौल दाविदाचा द्वेष करायचा. या दोघांनीही दाविदाला यहोवाच्या नजरेतून पाहिले नाही. परंतु यहोवाचे दाविदावर प्रेम होते. त्याने त्याला बंडखोर दास नव्हे तर इस्राएलचा भावी राजा म्हणून पाहिले.—१ शमुवेल २५:१०, ११, १४.
दाविदाच्या दूतांनी घडलेला प्रकार त्याला सांगितला तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. “आपल्या तरवारी आपल्या कंबरास बांधा,” अशी त्याने आपल्या सैन्याला आज्ञा दिली. स्वतःही हातात तलवार घेऊन तो आपल्या ४०० सैनिकांबरोबर हल्ला करायला निघाला. नाबालाच्या घराण्यातल्या सर्व पुरुषांची कत्तल करण्याची त्याने शपथ घेतली. (१ शमुवेल २५:१२, १३, २१, २२) दाविदाचा राग समजण्याजोगा होता पण राग व्यक्त करण्याची त्याची पद्धत चुकीची होती. “माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही,” असे बायबलमध्ये म्हटले आहे. (याकोब १:२०) पण अबीगईलने आपल्या घराण्याचे संरक्षण कसे केले?
“धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची!”
एका अर्थाने आपण अबीगईलला, ही भयंकर चूक सुधारण्याकरता पहिले पाऊल उचलताना पाहिले आहे. ती ऐकण्यास तयार होती. ती आपला पती नाबाल याच्याप्रमाणे नव्हती. तो तरुण दास नाबालाविषयी असे म्हणाला: “धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही.”c (१ शमुवेल २५:१७) नाबाल स्वतःला अतिशहाणा समजत असल्यामुळे तो ऐकून घेण्यास तयार नव्हता. अशा प्रकारचा घमेंडीपणा आजही सर्रासपणे पाहायला मिळतो. पण अबीगईल नाबालापेक्षा वेगळी आहे, हे त्या तरुण मेंढपाळाला देखील माहीत होते. म्हणूनच तो तिच्याकडे निसंकोचपणे गेला.
अबीगईलने दासाचे बोलणे ऐकले, त्यावर विचार केला आणि लगेच कार्य केले. “अबीगईल हिने त्वरेने” कार्य केले असे बायबलमध्ये सांगितले आहे. या अहवालात अबीगईलने कसे तत्परतेने कार्य केले त्याचे वर्णन करणारे क्रियापद चारदा वापरण्यात आले आहे. ती दावीद आणि त्याच्या लोकांसाठी भरपूर अन्नसामग्री घेते. ती त्यांच्यासाठी भाकरी, द्राक्षारस, मेंढीचे मांस, हुरडा, खिसमिसाचे घड व अंजिराच्या ढेपा घेते. घरात काय काय आहे हे अबीगईलला चांगल्याप्रकारे माहीत होते आणि नीतिसूत्राच्या पुस्तकात नंतर वर्णन केलेल्या सद्गुणी स्त्रीप्रमाणे घरातल्या कामकाजावरही तिचा पूर्ण ताबा होता. (नीतिसूत्रे ३१:१०-३१) तिने तिच्या काही सेवकांबरोबर ही सर्व अन्नसामग्री पुढे पाठवली आणि नंतर ती स्वतः एकटी निघाली. पण “याविषयी तिने आपला नवरा नाबाल यास काही सांगितले नाही,” असे अहवालात म्हटले आहे.—१ शमुवेल २५:१८, १९.
याचा अर्थ ती तिच्या नवऱ्याच्या मस्तकपदाच्या विरोधात बंड करत होती का? बिलकुल नाही. नाबाल खरे तर यहोवाच्या एका अभिषिक्त सेवकाविरुद्ध अतिशय दुष्टपणे वागला होता. त्याच्या या वागण्यामुळे त्याच्या घराण्यातल्या अनेक निरपराध सदस्यांचा हकनाक मृत्यू झाला असता. अबीगईलने काही पाऊल उचलले नसते तर कदाचित तीही तिच्या नवऱ्याच्या पापात सामील झाली असती, नाही का? खरे तर, तिने पतीला अधीनता दाखवण्याआधी देवाला अधीनता दाखवली.
अबीगईल शेवटी दावीद आणि त्याच्या सैन्याला वाटेतच भेटते. येथेही ती झटकन गाढवावरून उतरते आणि दाविदापुढे दंडवत घालते. (१ शमुवेल २५:२०, २३) तिला खूप दिवसानंतर आपले मन मोकळे करायची संधी मिळते. ती दाविदाला आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते. आपल्या नवऱ्याला व घराण्याला क्षमा करावी म्हणून त्याच्याकडे दयेची भीक मागते. पण तिचे बोलणे कशामुळे प्रभावी ठरते?
ती स्वतःवर दोष घेते आणि आपल्याला क्षमा करावी अशी दाविदाला विनंती करते. नावाप्रमाणेच आपला पती निर्बुद्ध आहे ही वस्तुस्थिती ती मान्य करते आणि अशा निर्बुद्ध माणसाला धडा शिकवण्याच्या नादी लागणे हे दावीदासाठी कमीपणाचे ठरेल असे त्याला सुचवते. दावीद यहोवाचा प्रतिनिधी आहे यावर ती आपला भरवसा व्यक्त करते आणि तो “परमेश्वराच्या लढाया लढत” आहे हे कबूल करते. दाविदाविषयी व त्याला मिळणाऱ्या राज्यपदाविषयी यहोवाने दिलेले वचन मला माहीत आहे असे ती सांगते. ती म्हणते, यहोवा ‘तुम्हाला इस्राएलाचा अधिपती नेमेल.’ आणि नंतर ती दाविदाला अशी विनंती करते, की त्याने असे काहीही करू नये की ज्यामुळे त्याच्यावर रक्तदोष येईल किंवा नंतर त्याला “पस्तावा” होईल अर्थात त्याचा विवेक त्याला बोचत राहील. (१ शमुवेल २५:२४-३१) तिचे बोलणे खरोखरच खूप दयाळूपणाचे व हृदयस्पर्शी होते.
दाविदाची प्रतिक्रिया काय होती? अबीगईलने जे आणले होते ते त्याने स्वीकारले व तो तिला म्हणाला: “ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठविले तो इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य! धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वतः धन्य! तू आज मला आपल्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगविण्यापासून आवरिले आहे.” आपल्याला निर्भयतेने व तातडीने भेटायला आल्याबद्दल दाविदाने तिची स्तुती केली व आपल्याला रक्तदोषी होण्यापासून वाचवल्याचे कबूल केले. “आपल्या घरी सुखाने जा; पाहा, मी तुझा शब्द ऐकला आहे,” असे शेवटी तो नम्रपणे तिला म्हणाला.—१ शमुवेल २५:३२-३५.
‘आपली दासी सिद्ध आहे’
घरी आल्यावरही अबीगईल दाविदाबरोबर झालेल्या भेटीबद्दल विचार करत असावी. दावीद किती विश्वासू व दयाळू आहे आणि तिचा पती नाबाल किती निर्दयी आहे हा फरक तिला जाणवला असावा. पण या विचारांना तिने मनात रेंगाळत ठेवले नाही. “मग अबीगईल नाबालाकडे गेली,” असे अहवालात म्हटले आहे. पत्नी या नात्याने आपली भूमिका शक्य तितक्या चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा ठाम निश्चय करून ती पुन्हा आपल्या पतीकडे गेली. दावीद आणि त्याच्या लोकांसाठी तिने नेलेल्या वस्तुंबद्दल तिला तिच्या नवऱ्याला सांगायचे होते. तिच्या नवऱ्याला या सर्व गोष्टी माहीत असायलाच हव्यात. त्यांच्यावर येणारे मोठे संकट कसे टळले होते याविषयी तिला त्याला सांगायचे होते. आणि आपल्या पत्नीऐवजी कोणा तिऱ्हाईताकडून त्याला हे समजले असते तर ती त्याच्यासाठी अतिशय लज्जास्पद गोष्ट ठरली असती. पण ती त्याला आता सांगू शकत नव्हती. कारण तो एका राजासारखा मेजवानी करत होता आणि दारू पिऊन झिंगला होता.—१ शमुवेल २५:३६.
पुन्हा एकदा तिने धैर्य व समंजसपणा दाखवला. आपल्या नवऱ्याची नशा उतरेपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत ती थांबून राहिली. नशा उतरल्यानंतर तो कदाचित ऐकण्याच्या मनःस्थितीत असेल व तिचे बोलणे समजून घेईल. पण, तो माथेफिरू होता. त्यामुळे हे सर्व ऐकल्यावर त्याने तिचे बरेवाईट करायलाही मागेपुढे पाहिले नसते. तरीपण ती त्याच्याकडे जाते व त्याला सर्व हकिकत सांगते. तो रागाने लालबुंद होईल, कदाचित आपल्यावर हातही उगारेल अशी तिने अपेक्षा केली होती. पण असे काहीही घडले नाही. तो एकाच जागी निश्चल बसून राहिला.—१ शमुवेल २५:३७.
तो इतका थंड का पडला होता? “त्याचे हृदय मृतवत झाले, तो पाषाणासारखा झाला,” असे बायबलमध्ये म्हटले आहे. कदाचित त्याला पक्षघाताचा झटका आला असावा. आणि दहा दिवसातच त्याचा मृत्यू होतो. त्याचा मृत्यू कोणत्याही आजारामुळे झाला नव्हता. तर, “परमेश्वराकडून नाबालास असा तडाका मिळाला की तो मृत्यू पावला.” (१ शमुवेल २५:३८) या धार्मिक न्यायदंडामुळे अबीगईलची सरतेशेवटी एका वाईट माणसापासून सुटका झाली. आज यहोवा अशा प्रकारे चमत्कारिकपणे आपल्या सेवकांची सुटका करत नसला तरी, या अहवालावरून आपल्याला स्पष्टपणे कळते, की कुटुंबात चालणारा हिंसाचार किंवा गैरवागणूक त्याच्या नजरेतून सुटत नाही. तो आपल्या ठरलेल्या वेळी आपल्या सेवकांना जरूर न्याय देईल.
अबीगईलची फक्त एका विजोड विवाहातून सुटका झाली नाही तर तिला आणखी एक आशीर्वाद मिळणार होता. दाविदाला जेव्हा नाबालाच्या मृत्यूची बातमी कळते तेव्हा तो तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी आपल्या लोकांना पाठवतो. तेव्हा ती त्यांना म्हणते: “आपली दासी माझ्या स्वामींच्या दासांचे चरण धुणारी दासी होण्यास सिद्ध आहे.” दाविदाची पत्नी बनण्याचा सुहक्क मिळाल्यानंतर ती गर्विष्ठ बनली नाही. उलट ती तर दाविदाच्या दासांची दासी बनण्यास तयार होती. आपण पुन्हा एकदा, तिने तातडीने कार्य केल्याबद्दलचा अहवाल वाचतो. ह्यावेळेला ती दाविदाकडे जाण्याची तयारी करते.—१ शमुवेल २५:३९-४२.
दाविदाबरोबर लग्न झाल्यानंतर तिचे जीवन सुरळीत चालणार नव्हते. दाविदाचे आधीच अहीनवाम नावाच्या स्त्रीबरोबर लग्न झाले होते. त्या काळच्या विश्वासू स्त्रियांना बहुपत्नीकत्वामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. शिवाय दावीद अद्याप राजा झाला नव्हता. राजा या नात्याने यहोवाची सेवा करण्याआधी त्यांना अनेक अडथळ्यांचा व हालअपेष्टांचा सामना करावा लागणार होता. पण जीवनाच्या खडतर मार्गावर अबीगईलने दाविदाला साथ दिली व खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. पुढे त्यांना एक मुलगा झाला. तिचा नवरा तिची किंमत करतो आणि तिचे संरक्षण करतो, याची तिला जाणीव झाली. एके प्रसंगी तर त्याने तिला अपहरण करणाऱ्यांपासून सोडवून आणले होते. (१ शमुवेल ३०:१-१९) अशा प्रकारे दाविदाने, समंजस, धैर्यशील व विश्वासू स्त्रियांवर प्रेम करणाऱ्या व त्यांना मोलाचे समजणाऱ्या यहोवा देवाचे अनुकरण केले. (w०९ ०७/०१)
[तळटीपा]
a हा सर्वांच्या परिचयाचा उत्तरेकडील कर्मेल पर्वत नव्हता तर ते दक्षिणेकडील पारान जंगलाच्या सीमेवरील एक शहर होते.
b स्थानीय सावकारांचे व त्यांच्या गुरा-ढोरांचे संरक्षण करणे यहोवा देवाची सेवा केल्यासारखे आहे, असे दाविदाला वाटायचे. त्या काळात, अब्राहामाच्या, इसहाकाच्या व याकोबाच्या वंशजांनी त्या देशात राहावे, असा यहोवाचा उद्देश होता. तेव्हा, विदेशी आक्रमणांपासून व दरोडेखोरांपासून त्यांचे संरक्षण करणे, ही एक प्रकारे पवित्र सेवाच होती.
c अबीगईलशी बोलताना त्या तरुण मेंढपाळाने जो शब्द वापरला होता त्याचा अक्षरशः अर्थ “कुचकामी (निरुपयोगी)” असा होतो. इतर बायबल अनुवादांमधील या वाक्याच्या भाषांतरात नाबालाचे वर्णन, “कोणाचेही ऐकून न घेणारा मनुष्य” असे करण्यात आले आहे व यामुळे “त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही,” असेही पुढे म्हटले आहे.
[१५ पानांवरील चित्र]
अबीगईल तिच्या नवऱ्यासारखी नव्हती. ती नीट लक्ष देऊन ऐकणारी होती
[१६ पानांवरील चित्र]
दाविदाशी बोलताना अबीगईलने नम्रपणा, धैर्य व समंजसपणा दाखवला