त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
एक बुद्धिमान स्त्री अरिष्ट टाळते
बुद्धिमान बायकोचा कुचकामी नवरा—अबीगईल आणि नाबालची ही गत होती. अबीगईल “बुद्धिमती व रुपवती होती.” तर, नाबाल “कठोर व वाईट चालीचा होता.” (१ शमुवेल २५:३) या विजोड दांपत्याच्या जीवनात घडलेल्या घटनांमुळे बायबल इतिहासात त्यांच्या नावांनी कायमचा ठसा उमटवला. कसे काय ते पाहू या.
उपकाराला क्षुल्लक समजले गेले
ते सा.यु.पू. ११ वे शतक होते. दाविदाला इस्राएलचा भावी राजा म्हणून अभिषिक्त करण्यात आले होते खरे, पण शासन करण्याऐवजी तो पलायन करीत होता. राज्य करणाऱ्या राजा शौलाने त्याला ठार मारण्याचा चंग बांधला होता. यामुळे दाविदाला परागंदा झालेला म्हणून जीवन जगणे भाग पडले. सरतेशेवटी त्याला आणि त्याच्या ६०० सवंगड्यांना, यहुदाच्या दक्षिणेकडे व सीनाय रानाच्या बाजूने असलेल्या पारानाच्या अरण्यात आश्रय मिळाला.—१ शमुवेल २३:१३; २५:१.
तेथे राहत असताना, नाबाल नामक एका मनुष्याच्या धनगरांशी त्यांची ओळख झाली. कालेब वंशातील या धनाढ्य मनुष्याकडे ३,००० मेंढरे व १,००० बकऱ्या होत्या; शिवाय, हेब्रोनच्या दक्षिणेकडे असलेल्या व कदाचित पारानपासून केवळ ४० किलोमीटर दूर असलेल्या कर्मेल शहरात तो मेंढ्यांची लोकर कातरीत असे.a दावीद आणि त्याच्या लोकांनी, नाबालाच्या धनगरांना रानात हिंडणाऱ्या चोरांपासून आपला कळप वाचवण्यास मदत केली.—१ शमुवेल २५:१४-१६.
तोपर्यंत, कर्मेलात लोकर कातरण्याचे काम सुरू झाले होते. कापणीचा हंगाम जसा शेतकऱ्यांसाठी सणासारखा होता तसा हाही प्रसंग सणासारखाच होता. शिवाय अशावेळी मेंढपाळ, त्यांच्याकरता काम केलेल्यांना सढळ हाताने मदत करीत असत. म्हणून दाविदाने, नाबालाच्या कळपासाठी त्याने केलेल्या सेवेच्या मोबदल्यात अन्नासाठी आपल्या दहा माणसांना अकारणच त्याच्याकडे कर्मेल शहरी पाठवले नव्हते.—१ शमुवेल २५:४-९.
नाबालाने उदारता दाखवणे तर दूरच राहिले. उलट, “दावीद कोण?” असे थट्टेने त्याने विचारले. दावीद आणि त्याचे लोक निव्वळ पळपुटे दास आहेत असे सुचवून तो म्हणाला: “माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणाऱ्यांसाठी मारिलेल्या पशूंचे मांस जे कोण, कोठले, हे मला ठाऊक नाही असल्या लोकांस मी देऊ काय?” दाविदाने हे ऐकल्यावर तो आपल्या लोकांस म्हणाला: “आपल्या तरवारी आपल्या कंबरास बांधा!” सुमारे ४०० लोक लढाईकरता सज्ज झाले.—१ शमुवेल २५:१०-१३.
अबीगईलचा सुज्ञपणा
नाबालाची ही अपमानास्पद भाषा त्याच्या पत्नीच्या कानी पडली. कदाचित, नाबालाकरता मध्यस्थी करण्याची व समेट घडवण्याची ही तिची पहिली वेळ नसावी. काहीही असो, तिने त्वरित पावले उचलली. नाबालाला न सांगताच तिने सर्व जिन्नस तसेच पाच मेंढरे व भरपूर अन्न गोळा केले व दाविदाला भेटायला अरण्यात गेली.—१ शमुवेल २५:१८-२०.
अबीगईलने दाविदाला पाहता क्षणी त्याला दंडवत केले. “माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काही एक मनात आणू नये,” अशी तिने त्याला विनंती केली. “मी आपल्या दासीने आपल्या स्वामींकडे जी ही भेट आणिली आहे ती माझ्या स्वामींबरोबरच्या तरुणांना द्यावी.” ती पुढे म्हणाली: ‘नाबालाच्या या कृत्यामुळे आपण पस्तावा करून घेऊ नये किंवा माझ्या स्वामींच्या मनाला खेद होऊ देऊ नये.’ “पस्तावा” असे भाषांतरीत केलेला इब्री शब्द विवेकाचा अस्वस्थपणा सूचित करतो. म्हणूनच, अबीगईलने दाविदाला नंतर पस्तावा होईल असे उतावीळपणे पाऊल उचलण्याबद्दल इशारा दिला.—१ शमुवेल २५:२३-३१.
दाविदाने अबीगईलचे ऐकले. तो तिला म्हणाला: “धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वतः धन्य! तू आज मला आपल्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगविण्यापासून आवरिले आहे; . . . तू मला तातडीने भेटावयास आली नसतीस तर खरोखर सकाळी उजाडेपर्यंत नाबालाचा एक पुरुषहिb जिवंत राहिला नसता.”—१ शमुवेल २५:३२-३४.
आपल्यासाठी धडे
ईश्वरी स्त्रीला गरज भासल्यास उचित पुढाकार घेण्यात काहीही गैर नाही हेच हा बायबल वृत्तान्त दाखवून देतो. अबीगईलने आपल्या पतीच्या, नाबालाच्या मर्जीविरूद्ध कार्य केले पण याबद्दल बायबल तिच्यावर आक्षेप घेत नाही. उलट, चाणाक्षपणा व सुज्ञता दाखवणारी स्त्री म्हणून तिची ते प्रशंसा करते. या कठीण परिस्थितीत पुढाकार घेऊन अबीगईलने अनेकांचे प्राण वाचवले.
सामान्यतः पत्नीने ईश्वरी अधीनतेचा आत्मा प्रदर्शित केला पाहिजे, पण उचित तत्त्वे धोक्यात असतात तेव्हा ती आपल्या पतीशी योग्यपणे असहमत होऊ शकते. अर्थातच, तिने “सौम्य व शांत आत्मा” टिकवून ठेवला पाहिजे व मत्सर, गर्व किंवा बंडखोर होऊन स्वतंत्रपणे वागण्याचा तिने प्रयत्न करू नये. (१ पेत्र ३:४) परंतु, एका ईश्वरी पत्नीला, एखादे कृत्य अगदीच असुज्ञतेचे किंवा बायबल तत्त्वांचा भंग करणारे आहे, असे वाटत असल्यास तिने दबावाखाली ते कृत्य मुळीच आचरू नये. होय अबीगईलचा वृत्तान्त, बायबल स्त्रियांचे वर्णन गुलाम आहेत असे करते असा अट्टहास करणाऱ्यांविरुद्ध ठोस युक्तीवाद सादर करते.
हा वृत्तान्त आपल्याला आत्मसंयमाबद्दलही शिकवतो. कधीकधी, दाविदाने पूर्ण प्रमाणात हा गुण दाखवला. उदाहरणार्थ, भरपूर संधी असतानासुद्धा त्याने खुनशी राजा शौलाला ठार मारले नाही कारण शौल मेल्यावर त्याला शांती मिळाली असती. (१ शमुवेल २४:२-७) परंतु याच्या विपरीत, नाबालाने जेव्हा दाविदाला तिरस्काराने लाथाडले तेव्हा, दाविदाला धक्काच बसला व त्याने सूड घेण्याची शपथ खाल्ली. ‘वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड न करण्यास’ झटत असलेल्या ख्रिश्चनांकरता हा स्पष्ट इशारा आहे. सर्व प्रसंगी त्यांनी पौलाच्या या उपदेशाचे पालन करावे: ‘शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो सूड उगवू नका, तर क्रोधाला वाट द्या.’—रोमकर १२:१७-१९.
[तळटीपा]
a पारानचे अरण्य, उत्तरेकडील बैर-शेबापर्यंत होते असे मानले जाते. या भागात भले मोठे कुरण होते.
b नवीन जग भाषांतर येथे “भिंतीवर लघूशंका करणारा,” अशी संज्ञा वापरते. ही एक इब्री म्हण होती जी पुरुषांना लागू होते व स्पष्टपणे ती एक अपमानास्पद संज्ञा होती.—पडताळा १ राजे १४:१०.
[१५ पानांवरील चित्र]
अबीगईल दाविदासाठी देणग्या आणते