वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 ७/१ पृ. २०-२१
  • तिची मदत करायची इच्छा होती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तिची मदत करायची इच्छा होती
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • योद्धा आणि एक लहान मुलगी
    बायबलमधून शिकू या!
  • तो हट्टी होता पण शेवटी त्याने ऐकले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • मुलगी बलवान माणसाला मदत करते
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • धाडसाने बोलणारी एक लहान मुलगी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 ७/१ पृ. २०-२१

आपल्या मुलांना शिकवा

तिची मदत करायची इच्छा होती

तुम्ही कधी खूप आजारी असलेल्या एखाद्या व्यक्‍तीला भेटलात का?— तुम्हाला तिला मदत होईल असे काहीतरी करावेसे वाटले का?— पण, ती व्यक्‍ती दुसऱ्‍या देशातील किंवा वेगळ्या धर्माची असती तर? तरीसुद्धा तुम्ही तिला मदत केली असती का?— सुमारे ३,००० वर्षांपूर्वी इस्राएलातील एका बालिकेने असेच केले. त्यावेळी काय घडले हे पाहू या.

प्राचीन इस्राएल व शेजारचे अराम यांच्यात नेहमीच लढाया होत असत. (१ राजे २२:१) एके दिवशी, अरामी लोकांनी इस्राएलवर चढाई केली आणि एका बालिकेला धरून अरामास नेले. तेथे ती नामान नावाच्या अरामी सेनापतीच्या बायकोची सेवा करू लागली. नामानाला कुष्टरोग झाला होता. या भयंकर रोगामुळे शरीरावरील मांस झडू शकते.

ती बालिका आपल्या मालकिणीला तिच्या नवऱ्‍याचा रोग बरा होऊ शकेल असे सांगते. ती म्हणते: ‘नामान शोमरोनात गेले, तर यहोवाचा संदेष्टा अलीशा त्यांचा कुष्टरोग बरा करेल.’ अलीशाबद्दल त्या बालिकेने सांगितलेल्या माहितीवरून, हा संदेष्टा खरोखरच आपल्याला बरे करू शकतो यावर नामानाला विश्‍वास बसतो. त्यामुळे, अरामाचा राजा बेनहदाद याची परवानगी मिळवून नामान व काही सेवक अलीशाला भेटण्याकरता सुमारे दीडशे किलोमीटरच्या प्रवासाला निघतात.

सर्वप्रथम, ते इस्राएलाचा राजा यहोराम याच्याकडे येतात. त्याला ते राजा बेनहदाद याने पाठवलेले, नामानाला मदत करण्याची विनंती करणारे पत्र देतात. पण यहोरामाचा ना यहोवावर विश्‍वास आहे ना संदेष्टा अलीशावर. त्याला वाटते की बेनहदाद मुद्दाम आपल्याशी भांडण उकरून काढत आहे. पण अलीशाला याविषयी कळते तेव्हा तो राजा यहोराम यास म्हणतो: “त्याने मजकडे यावे.” देवाजवळ नामानाचा भयंकर रोग बरा करण्याची ताकद आहे हे अलीशा नामानाला दाखवू इच्छितो.—२ राजे ५:१-८.

नामान आपले घोडे व रथ घेऊन अलीशाच्या घरी पोचतो तेव्हा अलीशा एका निरोप्याला असे सांगून पाठवतो, की ‘जाऊन यार्देन नदीत सात वेळा स्नान कर, म्हणजे तू बरा होशील.’ नामानाला हे ऐकून खूप राग येतो. अलीशा स्वतः बाहेर येईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून आपल्याला बरे करेल असे त्याला वाटले होते. पण, अलीशा फक्‍त या निरोप्याला पाठवतो! म्हणून नामान क्रोधित होऊन परत जायला निघतो.—२ राजे ५:९-१२.

तुम्ही नामानाच्या सेवकांपैकी एक असता, तर तुम्ही काय केले असते?— त्याचे सेवक त्याला विचारतात: ‘अलीशाने एखादी कठीण गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली नसती का? तर मग स्नान करून शुद्ध हो, एवढेच त्याने सांगितले आहे, तेव्हा तसे करण्यास काय हरकत आहे?’ नामान आपल्या सेवकांचे ऐकतो. तो ‘यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारतो तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध होतो.’

नामान अलीशाकडे परत येऊन त्याला म्हणतो: “इस्राएलात जो देव आहे त्याच्याशिवाय दुसरा देव सर्व पृथ्वीत नाही असे मला कळले.” तो अलीशाला वचन देतो की मी ‘यापुढे दुसऱ्‍या देवांना होमार्पण किंवा यज्ञ अर्पण करणार नाही, यहोवाला मात्र अर्पण करीन.’—२ राजे ५:१३-१७, पं.र.भा.

त्या बालिकेप्रमाणे, यहोवाबद्दल व तो काय काय करू शकतो याबद्दल जाणून घ्यायला आपणही कोणालातरी मदत करावी, असे तुम्हाला वाटते का?— येशू पृथ्वीवर असताना एका कुष्टरोग्याने त्याच्यावर विश्‍वास ठेवला व त्याला म्हटले: ‘तुमची खरोखर इच्छा असेल तर तुम्ही मला मदत करू शकता.’ येशूने, त्याला काय उत्तर दिले तुम्हाला माहीत आहे का?— “माझी इच्छा आहे.” असे म्हणून, यहोवाने ज्याप्रमाणे नामानाला बरे केले होते, त्याचप्रमाणे येशूनेही त्या कुष्टरोग्याला बरे केले.—मत्तय ८:२, ३.

यहोवा लवकरच एक नवे जग निर्माण करणार आहे आणि त्या नव्या जगात सर्व लोक निरोगी असतील व सर्वकाळ जगतील हे तुम्हाला माहीत आहे का?— (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) तर मग, नक्कीच तुम्हाला या अतिशय आनंददायक गोष्टी इतरांना सांगाव्याशा वाटत असतील. (w०८ ६/१)

प्रश्‍न:

○ नामानाच्या माणसांनी धरून आणलेल्या एका बालिकेने त्याला कशा प्रकारे मदत केली?

○ नामान सुरुवातीला अलीशाच्या सांगण्याप्रमाणे का वागू इच्छित नव्हता, पण नंतर त्याचा विचार का बरे बदलला?

○ त्या बालिकेचे अनुकरण करायचे असेल, तर तुम्हाला काय करण्याची मनापासून इच्छा असायला हवी?

○ येशूला काय करण्याची इच्छा होती आणि देवाच्या नव्या जगातील जीवन अतिशय आनंददायक का असेल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा