आपल्या मुलांना शिकवा
सेवा करण्यास तयार असलेला—तीमथ्य
“तुम्ही तयार आहात का?” असा प्रश्न तुम्हाला कधी कोणी विचारला का?— प्रश्न विचारणाऱ्याला कदाचित असे म्हणायचे असेल, की ‘तुमच्याकडं अभ्यासाची पुस्तकं आहेत का? तुम्ही अभ्यास केला का?’ या लेखात आपण, तीमथ्य कसा तयार होता याविषयी पाहणार आहोत.
तीमथ्याला जेव्हा देवाची सेवा करण्यास बोलवण्यात आले तेव्हा त्याने देवाच्या आणखी एका सेवकाप्रमाणे मनोवृत्ती दाखवली. देवाच्या या सेवकाने असे म्हटले होते: “हा मी आहे, मला पाठीव.” (यशया ६:८) तीमथ्य सेवा करण्यास तयार होता त्यामुळे त्याचं जीवन आनंदी होतं. त्याच्या जीवनाविषयी तुम्हाला आणखी ऐकायचं आहे का?—
जेरुसलेमहून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या लुस्रमध्ये तीमथ्याचा जन्म झाला होता. त्याची आजी लोईस व आई युनीके ह्या दोघी शास्त्रवचनांचा अगदी मनापासून अभ्यास करीत असत. या दोघींनी तीमथ्याला बालपणापासूनच देवाच्या वचनातील गोष्टी शिकवायला सुरुवात केली होती.—२ तीमथ्य १:५; ३:१५.
प्रेषित पौलाने बर्णबाबरोबर आपल्या पहिल्या लांबच्या प्रचाराच्या दौऱ्यादरम्यान लुस्रला भेट दिली तेव्हा कदाचित तीमथ्य किशोरवयीन असावा. आणि कदाचित याच वेळेस, तीमथ्याची आई व त्याची आजी ख्रिस्ती बनल्या. पौल आणि बर्णबाला तिथं कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले माहीत आहे?— ज्या लोकांना ख्रिस्ती लोक आवडत नव्हते त्या लोकांनी पौलाला दगडमार करून त्याला जखमी केलं आणि मग शहराच्या बाहेर फरफटत नेलं. तो मेला असं समजून त्यांनी त्याला तिथचं सोडलं.
पण पौल ज्या गोष्टी सांगत होता त्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे जेव्हा त्याच्या भोवती जमा झाले तेव्हा तो उठून बसला. दुसऱ्या दिवशी पौल आणि बर्णबा तिथून निघाले. पण त्यानंतर काही दिवसांतच ते पुन्हा लुस्र येथे गेले. तिथं गेल्यावर पौलानं एक भाषण दिलं आणि शिष्यांना सांगितलं: “आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.” (प्रेषितांची कृत्ये १४:८-२२) पौलाच्या या बोलण्याचा काय अर्थ होता?— त्याला म्हणायचं होतं, की जगातील लोक देवाची सेवा करणाऱ्यांना त्रास देतील. पौलाने नंतर तीमथ्याला असं लिहिलं: “सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.”—२ तीमथ्य ३:१२; योहान १५:२०.
लुस्रहून पौल आणि बर्णबा आपल्या घरी गेले. काही महिन्यांनंतर, पौलाने सीलाला त्याच्या सोबत येण्याकरता निवडले आणि ते दोघं, पौलाने आधी जिथं जिथं भेट दिली होती तिथं गेले व जे नवीन शिष्य बनले होते त्यांना उत्तेजन दिलं. लुस्रमध्ये गेल्यावर पौलाला पुन्हा भेटून तीमथ्याला किती आनंद झाला असेल, नाही का? आणि पौलाने जेव्हा तीमथ्याला त्याच्यासोबत व सीलासोबत प्रवासाला येण्याचे आमंत्रण दिले तेव्हा तर तीमथ्याला खूपच आनंद झाला असेल. तीमथ्याने नाही म्हटले नाही. तो लगेच त्यांच्याबरोबर जायला तयार झाला.—प्रेषितांची कृत्ये १५:४०-१६:५.
हे तिघंही मग शेकडो किलोमीटर चालत गेले आणि मग ते एका नावेतून प्रवासाला निघाले. समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहंचल्यावर त्यांनी ग्रीसमधील थेस्सलोनीका शहरापर्यंत पायी प्रवास केला. इथं खूप लोक ख्रिश्चन बनले. पण काही जण त्यांच्यावर चिडले आणि त्यांनी इतर लोकांना जमवलं. तेव्हा पौल, सीला आणि तीमथ्य यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते तिथून बिरुयाला गेले.—प्रेषितांची कृत्ये १७:१-१०.
थेस्सलोनीकामध्ये नवीन शिष्य बनलेल्या लोकांची पौलाला काळजी वाटत असल्यामुळे त्याने तीमथ्याला त्यांच्याकडे पुन्हा पाठवलं. कशासाठी पाठवलं माहीत आहे?— त्यांना ‘स्थिर करण्याकरता व कोणी घाबरू नये म्हणून त्यांना उत्तेजन’ देण्याकरता तीमथ्याला त्यांच्याकडे पाठवण्यात आलं, असं थेस्सलोनीकामधील ख्रिश्चनांना पौलाने नंतर समजावून सांगितलं. पण या कठीण कामगिरीसाठी पौलाने तीमथ्याला का पाठवलं माहीत आहे?— कारण, विरोध करणारे तीमथ्याला ओळखत नव्हते व स्वतः तीमथ्यही तिथं जायला तयार होता. तीमथ्यानं किती धाडस दाखवलं, नाही का? या भेटीत तीमथ्याला काय दिसलं? थेस्सलोनीकर बांधव विश्वासात किती दृढ होते हे तीमथ्याने आल्यानंतर पौलाला सांगितलं. हे ऐकून पौलाने थेस्सलोनीमधील बांधवांना असं लिहिलं: “आम्हाला . . . तुम्हाविषयी समाधान मिळाले.”—१ थेस्सलनीकाकर ३:२-७.
पुढच्या दहा वर्षांपर्यंत तीमथ्याने पौलाबरोबर काम केलं. मग पौलाला जेव्हा रोममध्ये बंदिवासात टाकण्यात आलं तेव्हा नुकताच तुरुंगातून सुटून आलेला तीमथ्य त्याच्याकडे गेला. बंदिवासात असताना पौलाने फिलिप्पैकरांना एक पत्र लिहिलं. त्याने कदाचित तीमथ्याकडूनच हे पत्र लिहून घेतलं असावं. त्यात पौलानं असं लिहिलं: ‘तीमथ्याला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन, कारण तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा त्याच्यासारखा दुसरा कोणी विश्वासू जण माझ्याजवळ नाही.’—फिलिप्पैकर २:१९-२२; इब्री लोकांस १३:२३.
पौलाने तीमथ्याविषयी जे काही म्हटले ते ऐकल्यानंतर त्याला किती आनंद झाला असेल! तीमथ्य पौलाचा लाडका बनला कारण तीमथ्य सेवा करण्यास तयार होता. तुम्हीही तयार व्हाल अशी आम्ही आशा करतो. (w०८ ४/१)
प्रश्न:
○ तीमथ्य लहानाचा मोठा कुठे झाला, आणि पौलाने जेव्हा लुस्रला पहिल्यांदा भेट दिली तेव्हा काय झालं?
○ पौल आणि सीला यांच्याबरोबर प्रवासाला जाण्याकरता तीमथ्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने काय केले?
○ तीमथ्याने धाडस कसे दाखवले आणि तीमथ्य पौलाचा लाडका का बनला?
[१८ पानांवरील चित्र]
काय झालं आहे?