येशू काय शिकवतो
देवाच्या राज्याविषयी
देवाचे राज्य काय आहे?
देवाचे राज्य हे एक सरकार असून ते सबंध पृथ्वीवर राज्य करेल. येशूने म्हटले: “ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: . . . ‘तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.’”—मत्तय ६:९, १०; दानीएल २:४४.
देवाच्या राज्यात कोण राज्य करतील?
येशू, देवाच्या राज्याचा राजा असेल हे त्याच्या जन्माआधीच सांगण्यात आले होते. एका देवदूताने येशूच्या आईला असे सांगितले: “प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो . . . राज्य करील.” (लूक १:३०-३३) याशिवाय, येशूने आपल्या अनुयायांपैकी काहींना आपल्यासोबत राज्य करण्याकरता निवडले. त्याने आपल्या प्रेषितांना म्हटले: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो.” (लूक २२:२८, २९; दानीएल ७:२७) येशूच्या अनुयायांपैकी एकूण १,४४,००० जण त्याच्यासोबत राज्य करतील.—प्रकटीकरण ५:९, १०; १४:१.
हे सरकार कोठून राज्य करेल?
देवाचे राज्य स्वर्गातून राज्य करेल. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “मी जाऊन तुम्हासाठी [स्वर्गात] जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीहि असावे. . . . मी पित्याकडे जातो.”—योहान १४:२, ३, १२; दानीएल ७:१३, १४.
देवाचे राज्य दुष्टाईविरुद्ध कोणती कारवाई करेल?
येशू या पृथ्वीवरून दुष्टांचे नामोनिशाण मिटवून टाकेल. त्याने स्वतःच असे म्हटले होते: “जेव्हा मनुष्याचा पुत्र [येशू] आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि . . . तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील, ते [दुष्ट जन] तर सार्वकालिक नाशाकरता जातील; आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.”—मत्तय २५:३१-३४, ४६, NW.
देवाच्या राज्याची प्रजा या नात्याने पृथ्वीवर कोण राहतील?
येशूने म्हटले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्तय ५:५; स्तोत्र ३७:२९; ७२:८) जे एकमेकांवर प्रेम करायला शिकतात अशा लोकांनी पृथ्वी भरून जाईल. येशूने आपल्या अनुयायांना म्हटले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३४, ३५.
देवाच्या राज्याद्वारे मानवजातीला कोणते आशीर्वाद मिळतील?
येशू मानवजातीला रोगमुक्त करेल. पृथ्वीवर असताना येशूने लोकसमुदायांना “देवाच्या राज्याविषयी” सांगितले व ‘ज्यांना बरे होण्याची जरूरी होती त्यांना त्याने बरे केले.’ (लूक ९:११) पुनरुत्थान झालेल्या येशूला एका दृष्टान्तात पाहिल्यावर प्रेषित योहानाने म्हटले: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली . . . मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: ‘पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, . . . तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्यापुढे मरण नाही.’”—प्रकटीकरण २१:१-४.
देवाचे राज्य पृथ्वीचे एका नंदनवनात रूपांतर करेल. एक अपराधी, ज्याला येशूसोबतच मरणदंड देण्यात आला होता, तो येशूला म्हणाला: “अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” तेव्हा येशूने त्याला म्हटले: “आज मी तुला खचित सांगतो, तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील.”—लूक २३:४२, ४३, NW; यशया ११:४-९. (w०८ ५/१)
अधिक माहितीकरता, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील ८ वा अध्याय पाहावा.a
[तळटीप]
a यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.