त्यांनी यहोवाची इच्छा पूर्ण केली
धाडसाने बोलणारी एक लहान मुलगी
सा. यु. पू. दहाव्या शतकादरम्यान इस्राएल व सीरिया यांच्यातील संबंध बिघडलेले होते. एकाएकी युद्ध सूरू होणे इतके सामान्य बनले होते, की हिंसाचाराविना तीन वर्षे लोटल्यावर ही बाब इतिहासात नोंदण्याजोगी बनली.—१ राजे २२:१.
त्याकाळी, अचानक धाड घालणाऱ्या सीरियाच्या टोळ्या मुख्यतः भीतिदायक असून काही टोळ्यांमध्ये तर हजारो सैनिक असत. हे योद्धे इस्राएलांवर अकस्मात छापा घालून त्यांना लुटत असत व पुष्कळांचे अपहरण करून अनेकांना—चक्क मुलांना देखील दास्यत्वात नेत असत.
अशाच एका छाप्यादरम्यान, ‘एका लहान मुलीला’ तिच्या देवभिरू कुटुंबापासून दूर करण्यात आले होते. (२ राजे ५:२) सीरियामध्ये नेल्यावर तिला कदाचित भीतिदायक वाटणाऱ्या व अनोळखी वाटणाऱ्या लोकांमध्ये—सूर्य, चंद्र, तारे, वृक्ष, रोपटे, व पाषाणाचीही उपासना करणाऱ्यांमध्ये राहणे भाग होते. एकच सत्य देव यहोवा याची उपासना करणाऱ्या तिच्या कुटुंबापेक्षा व स्नेह्यांपेक्षा ते लोक किती भिन्न होते! तथापि, अशा या अपरिचित स्थितीतही ह्या मुलीने यहोवाच्या उपासनेसंबंधी लक्षणीय धाडस प्रदर्शित केले. परिणामतः, तिने सीरियाच्या राजाच्या हाताखाली सेवा करणाऱ्या एका प्रमुख अधिकाऱ्याच्या जीवनाचे परिवर्तन केले. हे कसे, ते आपण पाहू या.
न कचरता बोलण्याचे धाडस
बायबलच्या अहवालात मात्र या लहान मुलीचे नाव प्रकट केलेले नाही. राजा बेन-हादाद दुसरा, याचा पराक्रमी सेनापती नामान याच्या पत्नीची ती दासी बनली. (२ राजे ५:१) नामान अत्यंत प्रतिष्ठित होता पण त्याला कोड हा किळसवाणा रोग जडला होता.
कदाचित, त्या मुलीच्या आदरयुक्त स्वभावानेच नामानाच्या पत्नीस तिच्यावर विश्वास ठेवून आपल्या गुप्त गोष्टी सांगण्यास प्रवृत्त केले असावे. ‘इस्राएलात कोडी लोकांवर कोणता उपचार केला जातो?,’ असे त्या स्त्रीने या मुलीला विचारले असावे. या इस्राएली मुलीला धाडसाने असे म्हणावयास लाज वाटली नाही: “शोमरोनातल्या संदेष्ट्यांशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.”—२ राजे ५:३.
एक पोरकट कल्पना समजून त्या मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले नाहीत. तर उलट, राजा बेन-हादादला ते कळवण्यात आले ज्याने नामान व इतर जणांना १५० किलोमीटर दूर असणाऱ्या शोमरोनामध्ये या संदेष्ट्याच्या शोधात पाठवले.—२ राजे ५:४, ५.
नामानास बरे करणे
नामान व त्याची माणसे, बेन-हादादकडून एक परिचयपत्र व मोठे सांपत्तिक बक्षिस घेऊन इस्राएलाचा राजा यहोराम याच्याकडे गेले. वासराची उपासना करणाऱ्या राजा यहोरामाने, त्या दास असलेल्या मुलीने प्रदर्शित केला तसा विश्वास देवाच्या संदेष्ट्यावर प्रदर्शित केला नाही, यात काहीएक नवल नाही. त्याऐवजी, नामान आपल्याकडे भांडण करण्याचे काहीतरी निमित्त काढण्यासाठी आला आहे असे त्याला वाटले. देवाचा संदेष्टा अलीशा याने यहोरामाच्या भयभीत स्थितीबद्दल ऐकले तेव्हा त्याने त्वरित संदेश पाठवून नामानास त्याच्या घरी पाठवून देण्याची राजाला विनंती केली.—२ राजे ५:६-८.
नामान त्याच्या घरापाशी येऊन पोहंचल्यावर अलीशाने एका जासूदास बाहेर पाठवले व त्याने म्हटले: “यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.” (२ राजे ५:९, १०) त्यामुळे नामानाच्या रागाचा पारा चढला. आपला रोग बरा करण्यासंबंधाने चमत्कारिक व भपकेबाज प्रदर्शनाची अपेक्षा केली असल्यामुळे त्याने विचारले: “दिमिष्कातल्या नद्या अबाना व परपर ह्या इस्राएलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यांत स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय?” क्रोधाविष्ट होऊन नामान अलीशाच्या घरापासून चालता झाला. पण मग नामानाच्या सेवकांनी त्याची समजूत घातल्यावर त्याने शेवटी तसे करण्याचे मान्य केले. सात वेळा यार्देन नदीत स्नान केल्यानंतर, “त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.”—२ राजे ५:११-१४.
अलीशाकडे परत येऊन नामानाने म्हटले: “अखिल पृथ्वीत इस्राएलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. . . . यापुढे परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही,” अशी शपथ नामानाने वाहिली.—२ राजे ५:१५-१७.
आपल्यासाठी धडे
एक लहान दास असलेली मुलगी धाडसाने बोलली नसती तर नामान, संदेष्टा अलीशाकडे गेलाच नसता. आज अनेक युवक अशाचप्रकारे वागत आहेत. शाळेत त्यांच्या सभोवताली, देवाची सेवा करण्यात काहीही रस न बाळगणारे विद्यार्थी असतील. तरीसुद्धा, त्यांच्या विश्वासाबद्दल ते न कचरता बोलतात. यांच्यातील काही तर अत्यंत लहान वयातच तसे करण्यास सुरवात करतात.
ऑस्ट्रेलियामधील ॲलिगझॅन्ड्रा नामक एका पाच वर्षांच्या मुलीचा विचार करा. ती शाळेत जाऊ लागली तेव्हा तिच्या आईने शिक्षिकेबरोबर, यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासांबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी वेळ नियोजित केली. पण ॲलिगझॅन्ड्राची आई मात्र थक्क झाली. “मी तुमच्या अनेक विश्वासांशी व त्याचप्रमाणे शाळेमध्ये ॲलिगझॅन्ड्रा कोणत्या गोष्टींत भाग घेईल व कोणत्या गोष्टींत भाग घेणार नाही यांविषयी आधीपासूनच परिचित आहे,” असे शिक्षिकेने म्हटले. ॲलिगझॅन्ड्राची आई चाट झाली कारण शाळेत तिच्याखेरीज आणखी कोणतीही साक्षीदार मुले नव्हती. “ॲलिगझॅन्ड्राने आम्हाला याबद्दल सर्व माहिती दिली आहे,” असे स्पष्टीकरण शिक्षिकेने दिले. होय, ह्या लहान मुलीने आधीच तिच्या शिक्षिकेबरोबर व्यवहारचातुर्याने चर्चा केली होती.
अशी ही लहान मुले न कचरता धाडसाने बोलतात. त्यामुळे ती स्तोत्रसंहिता १४८:१२, १३ च्या सुसंगतेत वागत असतात, जे म्हणते: “कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे.”