यहोवाच्या दिवसासाठी तुम्ही सिद्ध आहात का?
“परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.”—सफन्या १:१४.
१-३. (क) यहोवाच्या दिवसाविषयी बायबल काय म्हणते? (ख) आपल्यासमोर यहोवाचा कोणता “दिवस” आहे?
यहोवाचा दिवस हा २४ तासांच्या अवधीचा नव्हे तर दीर्घ अवधीचा आहे. या काळादरम्यान देव दुष्ट लोकांवर आपला न्यायदंड बजावेल. जे लोक देवाची सेवा करत नाहीत त्यांना, अंधकाराच्या, तीव्र क्रोधाच्या, रोषाच्या, संतापाच्या व दुःखाच्या या दिवसाची भीती वाटण्याचे कारण आहे. (यशया १३:९; आमोस ५:१८-२०; सफन्या १:१५) योएलच्या भविष्यवाणीत असे म्हटले आहे: “त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.” (योएल १:१५) परंतु त्या महान दिवशी देव ‘सरळ मनाच्या लोकांचे’ तारण करेल.—स्तोत्र ७:१०.
२ ‘परमेश्वराचा दिवस’ ही संज्ञा, देवाने विविध काळांत दुष्टांवर आणलेल्या न्यायदंडास लागू होते. जसे की, सा.यु.पू. ६०७ मध्ये जेरूसलेमच्या रहिवाशांवर बॅबिलोन्यांकरवी ‘परमेश्वराचा दिवस’ आला. (सफन्या १:४-७) सा.यु. ७० मध्ये सुद्धा देवाचा न्यायदंड बजावण्यात आला होता. यावेळी, यहोवाने रोमनांकरवी, आपल्या पुत्राला नाकारणाऱ्या यहुदी राष्ट्रावर न्यायदंड बजावला होता. (दानीएल ९:२३-२७; योहान १९:१५) बायबल आणखी एका, ‘परमेश्वराच्या दिवसाविषयी’ भाकीत करते; या दिवशी यहोवा ‘सर्व राष्ट्रांबरोबर युद्ध’ करील. (जखऱ्या १४:१-३) पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन, प्रेषित पौलाने या दिवसाचा संबंध येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीशी असल्याचे सांगितले. १९१४ मध्ये येशू स्वर्गीय राजा म्हणून सिंहासनाधिष्ठित झाला, तेव्हापासून त्याची उपस्थिती सुरू झाली. (२ थेस्सलनीकाकर २:१, २) यहोवाचा दिवस खरोखरच वेगाने येत असल्याची चिन्हे इतकी स्पष्ट दिसत असताना, यहोवाच्या साक्षीदारांचे २००७ सालचे वचन अगदी उचित आहे. ते सफन्या १:१४ (पं.र.भा.) मधून घेण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे: “यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे.”
३ देवाचा महान दिवस जवळ असल्यामुळे, तुम्ही या दिवसासाठी तयार आहात हे सिद्ध करण्याची आता वेळ आहे. या दिवसासाठी तुम्ही स्वतःला कशाप्रकारे तयार करू शकता? यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध असण्यासाठी तुम्हाला आणखी काय काय करण्याची गरज आहे?
सिद्ध असा
४. येशूने कोणत्या मोठ्या परिक्षेसाठी स्वतःला सिद्ध केले होते?
४ युगाच्या समाप्तीविषयी भविष्यवाणी करताना येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना असे म्हटले: “तुम्हीहि सिद्ध असा.” (मत्तय २४:४४) येशूने जेव्हा असे म्हटले तेव्हा तो स्वतः एका मोठ्या परिक्षेसाठी तयार होता म्हणजेच, खंडणी बलिदानासाठी आपले जीवन अर्पण करण्यास तयार होता. (मत्तय २०:२८) येशूने ज्याप्रकारे स्वतःला तयार केले त्यावरून आपण काय शिकतो?
५, ६. (क) देव आणि लोक यांच्यावरील प्रेम, यहोवाच्या दिवसासाठी सिद्ध असण्यास आपल्याला कशाप्रकारे मदत करते? (ख) शेजाऱ्यांवर प्रेम दाखवण्याच्या बाबतीत येशूने आपल्यापुढे कोणते उदाहरण मांडले?
५ येशूचे, यहोवावर आणि त्याच्या धार्मिक दर्जांवर मनापासून प्रेम होते. येशूविषयी इब्री लोकांस १:९ मध्ये असे म्हटले आहे: “तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.” येशूचे आपल्या स्वर्गीय पित्यावर प्रेम असल्यामुळेच तो त्याच्याशी एकनिष्ठ राहू शकला. जर येशूप्रमाणे आपले देखील देवावर प्रेम असेल आणि आपण त्याच्या अपेक्षांनुसार जगलो तर देव आपले देखील संरक्षण करील. (स्तोत्र ३१:२३) अशाप्रकारचे प्रेम आपल्याला यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध असण्यास मदत करेल.
६ येशूच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लोकांवरही प्रेम होते. “लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) म्हणूनच येशूने लोकांना सुवार्ता सांगितली. आपण देखील प्रेमाने प्रवृत्त होऊन आपल्या शेजाऱ्यांना राज्याचा संदेश सांगतो. देव आणि शेजाऱ्यांबद्दलचे प्रेम आपल्याला, ख्रिस्ती सेवक म्हणून सक्रिय ठेवते व अशाप्रकारे यहोवाच्या महान दिवसासाठी सिद्ध असण्यास मदत करते.—मत्तय २२:३७-३९.
७. यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण आनंदित का होऊ शकतो?
७ येशूला यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात आनंद मिळत होता. (स्तोत्र ४०:८) येशूसारखी आपली देखील मनोवृत्ती असेल तर देवाची सेवा करण्यात आपल्यालाही आनंद मिळेल. येशूप्रमाणे आपणही उदार बनू व त्यामुळे आपल्याला निश्चितच आनंद मिळेल. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) होय, “परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच [आपला] आश्रयदुर्ग होय.” या आनंदामुळे आपण देवाच्या महान दिवसासाठी सिद्ध होऊ.—नहेम्या ८:१०.
८. आपण प्रार्थनेद्वारे यहोवाच्या जवळ का गेले पाहिजे?
८ येशूने देवाला कळकळीने प्रार्थना केली त्यामुळे तो विश्वासाच्या परिक्षांना तोंड देण्यास सिद्ध होता. योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला तेव्हा येशू प्रार्थना करीत होता. येशूने आपले प्रेषित निवडण्याआधी एक संपूर्ण रात्र प्रार्थनेत घालवली होती. (लूक ६:१२-१६) आणि येशूने त्याच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री जी कळकळीची प्रार्थना केली ती वाचून कोण प्रभावित होत नाही? (मार्क १४:३२-४२; योहान १७:१-२६) येशूप्रमाणे तुम्हीसुद्धा सतत प्रार्थना करता का? प्रार्थनेत यहोवाशी अनेकदा बोला. प्रार्थना संपवण्याची घाई करू नका. त्याच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळण्यास प्रार्थना करा आणि ते मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे असे दिसताच लगेच त्याचा स्वीकार करा. देवाचा महान दिवस तेजीने जवळ येत असल्यामुळे, आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर जवळचा नातेसंबंध जोडणे अतिशय महत्त्वाचे आहे. तेव्हा, प्रार्थनेद्वारे यहोवाच्या होता होईल तितके जवळ जा.—याकोब ४:८.
९. आपल्याला यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणाची काळजी असणे किती महत्त्वाचे आहे?
९ येशूला यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणाचीसुद्धा काळजी होती त्यामुळे तो त्याच्यासमोर आलेल्या परिक्षांना तोंड द्यायला सिद्ध झाला. खरे तर, त्याने आपल्या अनुयायांना, देवाला प्रार्थना करताना अशी विनंती करण्यास शिकवले: “तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) यहोवाचे नाव पवित्र व्हावे किंवा मानले जावे असे जर आपल्याला अगदी मनापासून वाटत असेल तर आपण असे काहीही करणार नाही ज्यामुळे त्या नावावर कलंक लागेल. असे जर आपण केले तरच आपण यहोवाच्या महान दिवसासाठी सिद्ध असू शकू.
तुम्हाला बदल करण्याची गरज आहे का?
१०. आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करून पाहणे का उचित आहे?
१० यहोवाचा दिवस जर उद्या आला तर तुम्ही त्याला सामोरे जायला तयार असाल का? प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनाचे परीक्षण करून, आपल्या कार्यांत अथवा मनोवृत्तीत बदल करण्याची गरज आहे किंवा नाही, हे पाहिले पाहिजे. माणसाचे सद्याचे जीवन किती अल्प व अनिश्चित आहे. तेव्हा आपण सर्वांनी दररोज आध्यात्मिकरीत्या सतर्क असले पाहिजे. (उपदेशक ९:११, १२; याकोब ४:१३-१५) आपल्या जीवनात कोणत्या बाबतीत आपण लक्ष देण्याची गरज आहे ते आपण पाहू या.
११. बायबल वाचनाच्या संबंधाने तुमचे ध्येय काय आहे?
११ एक महत्त्वाची गोष्ट जी आपण गांभीर्याने घेतली पाहिजे, ती म्हणजे दररोज बायबलचे वाचन करण्याविषयी ‘विश्वासू दास’ आपल्याला देत असलेला सल्ला. (मत्तय २४:४५) वर्षातून एकदा उत्पत्तिपासून प्रकटीकरणापर्यंत संपूर्ण शास्त्रवचने मननपूर्वक वाचून काढण्याचे तुम्ही ध्येय ठेवू शकता. दररोज चार अध्याय वाचण्याद्वारे तुम्ही एका वर्षांत बायबलचे १,१८९ अध्याय वाचून काढू शकता. इस्राएलच्या प्रत्येक राजाला यहोवाच्या नियमशास्त्राचे “जन्मभर अध्ययन” करायचे होते. यहोशवाने असे केले. (अनुवाद १७:१४-२०; यहोशवा १:७, ८) मंडळीतल्या वडिलांनी देवाच्या वचनाचे दररोज वाचन करणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे त्यांना ‘सुशिक्षण’ देण्यास मदत मिळते!—तीत २:१.
१२. यहोवाचा दिवस जवळ आला आहे, म्हणून तुम्ही काय करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे?
१२ यहोवाचा दिवस जवळ आला आहे, म्हणून तुम्ही ख्रिस्ती सभांना नियमितरीत्या उपस्थित राहण्यास आणि होता होईल तितका सभांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त झाले पाहिजे. (इब्री लोकांस १०:२४, २५) यामुळे, सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी योग्य असलेल्या लोकांना शोधून त्यांना मदत करणारा राज्य उद्घोषक म्हणून असलेली तुमची कौशल्ये सुधारतील. (प्रेषितांची कृत्ये १३:४८) तुम्ही कदाचित इतर मार्गांनी देखील जसे की, वृद्ध बंधूभगिनींना मदत करून व तरुणांना उत्तेजन देऊन मंडळीत अधिक सक्रिय बनू शकता. अशा कार्यांमध्ये भाग घेतल्याने तुम्हाला खूप समाधान मिळू शकेल!
इतरांबरोबर तुमचा नातेसंबंध
१३. नवा मनुष्य धारण करण्याविषयी आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो?
१३ यहोवाचा दिवस जवळ येऊन ठेपल्यामुळे तुम्हाला, “नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” करण्यास बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत का? (इफिसकर ४:२०-२४) तुम्ही जेव्हा देवासारखे गुण दाखवता तेव्हा तुम्ही खरोखरच देवाच्या “आत्म्याच्या प्रेरणेने” चालत आहात व आत्म्याचे फळ प्रदर्शित करत आहात हे लोकांना दिसून येईल. (गलतीकर ५:१६, २२-२५) तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने खरोखरच “नवा मनुष्य धारण” केला आहे हे दाखवणारी काही विशिष्ट कार्ये तुम्ही सांगू शकता का? (कलस्सैकर ३:९, १०) उदाहरणार्थ, तुम्ही सहविश्वासू बंधूभगिनींना व इतरांना दया दाखवता, अशी तुमची ओळख आहे का? (गलतीकर ६:१०) शास्त्रवचनांचा नियमित अभ्यास केल्याने तुम्हाला देवासारखे गुण विकसित करण्यास मदत होईल जेणेकरून तुम्ही यहोवाच्या दिवसासाठी सिद्ध असाल.
१४. आत्म-संयम विकसित करत असताना पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना का केली पाहिजे?
१४ तुम्हाला जर खूप लवकर राग येत असेल आणि तुम्हाला आत्म-संयम बाळगण्याची खूप गरज आहे असे तुम्हाला वाटत असेल तर? आत्म-संयम, देवाच्या पवित्र आत्म्याचे एक फळ आहे जे तुम्ही विकसित करू शकता. तेव्हा, येशूने जे म्हटले त्याच्या अनुषंगाने पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा: “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. . . . तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”—लूक ११:९-१३.
१५. तुमच्यामध्ये व एखाद्या बांधवामध्ये काही बिनसले असेल तर काय करण्याची गरज आहे?
१५ समजा, तुमच्यामध्ये व एखाद्या बांधवामध्ये काहीतरी बिनसले आहे. अशावेळी तुमच्यातील बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रत्येक प्रयत्न करा; अशाने मंडळीत शांती व एकता टिकून राहील. (स्तोत्र १३३:१-३) मत्तय ५:२३, २४ किंवा मत्तय १८:१५-१७ मधील येशूने दिलेल्या सल्ल्याचे पालन करा. तुमच्या मनात राग असताना सूर्य मावळू देत असाल तर, जो काही वाद असेल तो मिटवून टाका. बहुतेकदा, क्षमा करण्यासाठी तयार असल्यामुळेच आपसातील वाद मिटतात. पौलाने लिहिले: “एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.”—इफिसकर ४:२५, २६, ३२.
१६. वैवाहिक जीवनात पतीपत्नीने कनवाळुपणा कोणकोणत्या मार्गांनी दाखवला पाहिजे?
१६ वैवाहिक नातेसंबंधात, दोघा पतीपत्नीने एकमेकांना कोमल दया दाखवली पाहिजे व क्षमा केली पाहिजे. तुम्हाला जर स्वतःत बदल करून, आपण आपल्या विवाहसोबत्याशी आणखी प्रेमळपणे व दयाळुपणे वागले पाहिजे, असे जाणवत असेल तर देव आणि त्याच्या वचनाच्या मदतीने तसे करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनातील तणाव कमी करण्यासाठी व एकमेकांचा विश्वासघात करण्याचे टाळण्यासाठी १ करिंथकर ७:१-५ यानुसार वागण्याकरता तुम्हाला तुमच्यावतीने काही बदल करण्याची गरज आहे का? वैवाहिक जीवनात पतीपत्नीतील हा एक अगदी नाजूक पैलू आहे ज्यात पतीपत्नीने एकमेकांशी ‘कनवाळुपणे’ वागले पाहिजे.
१७. एखाद्याच्या हातून गंभीर पाप घडले असेल तर त्याने कोणती पावले उचलणे आवश्यक आहे?
१७ तुमच्या हातून एखादे गंभीर पाप घडले आहे का? लवकरात लवकर उपायकारक पावले उचला. ख्रिस्ती वडिलांची मदत विनासंकोच घ्या. त्यांच्या प्रार्थनांमुळे व सल्ल्यामुळे तुम्हाला तुमचे आध्यात्मिक आरोग्य पुन्हा लाभू शकेल. (याकोब ५:१३-१६) पश्चात्तापी मनोवृत्तीने यहोवास प्रार्थना करा. असे केले नाही तर तुमच्या मनात अपराधीपणाच्या भावना राहतील आणि तुमचा विवेक तुम्हाला सतत बोचत राहील. दाविदाच्या बाबतीत असेच झाले. पण, यहोवासमोर जेव्हा त्याने आपले पाप कबूल केले तेव्हा त्याला किती बरे वाटले! दाविदाने असे लिहिले: “ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य! ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावीत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!” (स्तोत्र ३२:१-५) ज्यांच्या हातून पाप घडले आहे परंतु जे मनापासून पश्चात्ताप करतात अशांना यहोवा क्षमा करतो!—स्तोत्र १०३:८-१४; नीतिसूत्रे २८:१३.
जगाचा भाग होऊ नका
१८. जगाविषयी तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे?
१८ आपल्या स्वर्गीय पित्याने वचन दिलेल्या त्या अद्भुत नवीन जगाची तुम्ही देखील निश्चितच वाट पाहात आहात. मग, देवापासून दूर गेलेल्या अधार्मिक मानवी समाजाविषयी तुमचा काय दृष्टिकोन आहे? “ह्या जगाचा अधिकारी” सैतान, येशू ख्रिस्तावर कब्जा करू शकला नाही. (योहान १२:३१; १४:३०) दियाबलाने आणि त्याच्या जगाने तुमच्यावर कब्जा करावा असे तुम्हाला कधीच वाटणार नाही. तेव्हा, प्रेषित योहानाच्या शब्दांकडे कान द्या: “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीति करू नका.” यातच शहाणपण आहे कारण, “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१५-१७.
१९. ख्रिस्ती युवकांना कोणत्या प्रकारची ध्येये ठेवण्यास आर्जवले जात आहे?
१९ तुम्ही आपल्या मुलांना “जगापासून निष्कलंक” राहण्यास मदत करीत आहात का? (याकोब १:२७) एक मनुष्य जसा गळाला लागलेला मासा हळूहळू त्याच्याजवळ ओढत राहतो तसे सैतान तुमच्या मुलांना हळूहळू त्याच्याजवळ ओढण्याचा प्रयत्न करतो. आपणही सैतानाच्या जगाचे भाग आहोत असे तरुणांना वाटावे म्हणून, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्लब आणि इतर संघटना बनवण्यात आल्या आहेत. परंतु यहोवाचे सेवक तर आधीच एका संघटनेचा भाग आहेत जी या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतापासून वाचणार आहे. यास्तव ख्रिस्ती युवकांना “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” होण्याचे उत्तेजन दिले पाहिजे. (१ करिंथकर १५:५८) देवाला भिऊन वागणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांना अशी ध्येये ठेवण्यास मदत केली पाहिजे ज्यांमुळे त्यांना त्यांचे जीवन आनंदी व प्रतिफलदायी होईल, देवाचा आदर होईल आणि यहोवाच्या दिवसासाठी त्यांना सिद्ध करेल.
यहोवाच्या महान दिवसाच्या पलिकडे पाहा
२०. आपण सार्वकालिक जीवन आपल्या दृष्टीसमोर का ठेवले पाहिजे?
२० तुम्ही जर सार्वकालिक जीवन तुमच्या दृष्टीसमोर ठेवले तर तुम्ही यहोवाच्या दिवसाची अगदी शांतचित्ताने वाट पाहाल. (यहुदा २०, २१) नंदनवनातील अनंतकालिक जीवनाची तुम्ही वाट पाहात आहात. तरुणपणातील जोम पुन्हा प्राप्त करण्याची व हितकारक ध्येये पूर्ण करण्यासाठी तसेच यहोवाविषयी आणखी शिकत राहण्यासाठी अमर्यादित वेळ मिळण्याची तुम्ही आशा बाळगता. तुम्ही देवाविषयीचे ज्ञान घेण्याचे केव्हाही संपवू शकणार नाही कारण मानवाला आता देवाविषयी जे माहीत आहे ते “त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत.” (ईयोब २६:१४) किती रोमांचक आशा आहे आपल्यापुढे!
२१, २२. तुमच्यामध्ये व पुनरुत्थित लोकांमध्ये कोणते संभाषण होईल?
२१ आपण नंदनवनात पुनरुत्थित लोकांना भेटू. ते आपल्याला, गतकाळाविषयी आपल्याला जी माहिती नाही ती सांगतील. हनोख आपल्याला, अभक्त लोकांना यहोवाचा संदेश सांगण्यासाठी लागणारे धैर्य त्याला कसे मिळाले हे सांगेल. (यहुदा १४, १५) नोहा आपल्याला, त्याने ते विशाल जहाज कसे बांधले ते सांगेल. ऊर देशांतील ऐशआरामाचे जीवन सोडून तंबूंत राहताना त्यांना कसे वाटले हे अब्राहाम आणि सारा आपल्याला सांगू शकतील. एस्तेर आपल्याला, आपल्या लोकांच्या बाजूने ती कशी उभी राहिली आणि हामानाचा कट तिने कसा उधळून लावला याची सविस्तर माहिती सांगेल. (एस्तेर ७:१-६) कल्पना करा, योना आपल्याला, मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस असण्याचा अनुभव कसा होता ते सांगतो; किंवा मग, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला येशूला बाप्तिस्मा देताना कसे वाटले होते, ते तो आपल्याला सांगेल. (लूक ३:२१, २२; ७:२८) किती मनोरंजक गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत!
२२ येशूच्या हजार वर्षांच्या राजवटीत तुम्हाला पुनरुत्थित लोकांना “देवाविषयीचे ज्ञान” घेण्यास मदत करण्याची संधी मिळेल. (नीतिसूत्रे २:१-६) आज, लोकांना जेव्हा आपण, यहोवा देवाचे ज्ञान घेऊन त्याचा आपल्या जीवनात अवलंब करताना पाहतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो! पण, भविष्यातील त्या काळाची कल्पना करा जेव्हा, कैक शतकांआधी जिवंत असलेल्या लोकांना तुम्ही यहोवा देवाविषयी शिकवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा यहोवा तुमच्या प्रयत्नांना आशीर्वाद देईल आणि ते लोकही कृतज्ञ अंतःकरणाने ते स्वीकारतील; तेव्हा तुम्हाला किती आनंद होईल!
२३. आपण काय करण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे?
२३ यहोवाचे लोक म्हणून आता आपण ज्या लाभांचा उपभोग घेत आहोत त्यांचा अंदाज लावणे आपल्या अपरिपूर्ण प्रयत्नांच्या शक्तीपलिकडे आहे. (स्तोत्र ४०:५) आपण खासकरून देवाने आपल्यासाठी केलेल्या आध्यात्मिक तरतुदींबद्दल त्याला कृतज्ञ आहोत. (यशया ४८:१७, १८) मग, आपली परिस्थिती काहीही असो, यहोवाच्या महान दिवसाची वाट पाहत असताना आपण पूर्ण मनाने त्याची पवित्र सेवा करीत राहू या.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• ‘परमेश्वराचा दिवस’ काय आहे?
• यहोवाच्या दिवसासाठी तुम्ही स्वतःला सिद्ध कसे करू शकता?
• देवाचा महान दिवस जवळ येऊन ठेपला आहे तर आपण स्वतःत कोणते बदल करण्याची गरज आहे?
• यहोवाचा दिवस येऊन गेल्यानंतर, काय करण्याची तुमची इच्छा आहे?
[१४ पानांवरील चित्र]
येशूने स्वतःला परिक्षांचा सामना करण्यासाठी सिद्ध केले
[१७ पानांवरील चित्र]
पुनरुत्थित लोकांना यहोवाचे ज्ञान घेण्यास मदत करणे हा किती मोठा सुहक्क असेल!