वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w03 ३/१५ पृ. १०-१४
  • माझ्या मुलाने शाळेत जावे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माझ्या मुलाने शाळेत जावे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • साक्षरतेची बायबलमधील उदाहरणे
  • ख्रिश्‍चनांकरता शिक्षण महत्त्वाचे
  • मंडळीत विशेषाधिकार
  • दारिद्र्‌य आणि अंधश्रद्धा
  • शिक्षण केवळ नोकरीसाठी आवश्‍यक नाही
  • मुलींनाही शिक्षित करायचे?
  • साक्षरतेचे वर्ग पुरेसे आहेत का?
  • पालकांची जबाबदारी
  • उद्देशयुक्‍त शिक्षण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • शिक्षण—यहोवाची स्तुती करण्यासाठी त्याचा वापर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • शिक्षणासंबंधी बायबल नापसंती दर्शवते का?
    सावध राहा!—१९९८
  • आणखी शिक्षण घेण्याबाबतीत योग्य निर्णय कसा घेता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
w03 ३/१५ पृ. १०-१४

माझ्या मुलाने शाळेत जावे का?

या पानावरील शब्द तुम्हाला वाचता आले नसते तर? तुमच्या देशाची राष्ट्रीय भाषा तुम्हाला बोलता आली नसती तर? समजा तुम्हाला जगाच्या नकाशावर तुमचा मायदेश कोठे आहे ते दाखवता आले नसते तर? पण असंख्य मुले अशाच स्थितीत वाढतील. तुमच्या मुलाविषयी काय?

तुमच्या मुलाने शाळेत जावे का? अनेक देशांमध्ये, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अनिवार्य असते आणि सहसा ते मोफतही असते. बालकांच्या हक्कांच्या ठरावानुसार (कन्व्हेन्शन ऑन द राईट्‌स ऑफ द चाइल्ड) शालेय शिक्षण एक मूलभूत हक्क मानला जातो. मानवी हक्कांच्या आंतरराष्ट्रीय ठरावानुसारही (युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्‍यूमन राइट्‌स) असे मानले जाते. परंतु काही देशांमध्ये शालेय शिक्षण मोफत नसते आणि याचा पालकांवर आर्थिक बोजा बनतो. या गोष्टीकडे आपण ख्रिस्ती पालकांच्या नजरेतून पाहू या ज्यांना आपल्या मुलांना शालेय शिक्षण देऊन किंवा इतर मार्गाने साक्षर करायचे आहे.

साक्षरतेची बायबलमधील उदाहरणे

बायबलमध्ये उल्लेख केलेल्या बहुतांश सेवकांना लिहिता-वाचता येत होते. येशूचे प्रेषित, पेत्र आणि योहान यहुदी कोळी होते तरीपण त्यांनी त्यांच्या गालीली पोटभाषेतa नव्हे तर ग्रीकमध्ये बायबलच्या पुस्तकांचे लिखाण केले. स्पष्टतः, त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना मूलभूत शिक्षण मिळण्याची खात्री केली होती. असेच इतरही बायबल लेखक होते; जसे की, मेंढपाळ दावीद, शेतकरी आमोस आणि येशूचा सावत्र भाऊ यहूदा जो कदाचित सुतार होता.

ईयोबाला लिहिता-वाचता येत होते आणि बायबलमधील त्याच्या नावाच्या पुस्तकातून हे समजते की, त्याला विज्ञानाची थोडीफार माहिती होती. कदाचित त्याला साहित्यिक क्षमता देखील असावी कारण ईयोबाच्या पुस्तकातील त्याची विधाने काव्य स्वरूपात आहेत. त्याचप्रमाणे, प्रारंभिक ख्रिस्ती देखील साक्षर असल्याचे आपल्याला माहीत आहे कारण त्यांच्या कदाचित सभेच्या टिपा मातीच्या खापरांवर, मडक्याच्या तुकड्यांवर लिहिलेल्या सापडल्या आहेत.

ख्रिश्‍चनांकरता शिक्षण महत्त्वाचे

देवाला संतुष्ट करण्यासाठी सर्व ख्रिश्‍चनांना बायबलच्या ज्ञानात प्रगती करत राहणे अगत्याचे आहे. (फिलिप्पैकर १:९-११; १ थेस्सलनीकाकर ४:१) शास्त्रवचनांचा आणि बायबल आधारित अभ्यासाच्या साहित्यांचा गंभीरतेने उपयोग केल्याने आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. देवाने आपल्याला त्याचे लिखित वचन दिल्यामुळे त्याच्या उपासकांना होता होईल तितके चांगले लिहिता-वाचता यावे अशी तो अपेक्षा करतो. बायबल वाचताना त्याचा अर्थ समजून घेतल्याने त्यातील सल्ला लागू करण्यास अधिक सोपे जाते. अर्थात, त्यातील मुद्दे समजण्यासाठी आणि त्यांच्यावर मनन करता येण्यासाठी आपल्याला कदाचित काही भाग अधिक वेळा वाचावे लागतील.—स्तोत्र ११९:१०४; १४३:५; नीतिसूत्रे ४:७.

दरवर्षी, यहोवाच्या लोकांना ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ मार्गदर्शनाखाली तयार होणारे हजारो पानांचे उपयुक्‍त लिखित साहित्य मिळत असते. (मत्तय २४:४५-४७) या साहित्यात कौटुंबिक जीवन, परंपरा, धर्म, विज्ञान आणि इतर अनेक विषयांवर चर्चा केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यामध्ये आध्यात्मिक बाबींबद्दल शास्त्रवचनीय सल्ला दिला जातो. तुमच्या मुलांना लिहिता-वाचता येत नसेल तर त्यांना ही सगळी महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त होणार नाही.

मानवजातीच्या इतिहासाविषयी शिकणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे देवाच्या राज्याची गरज का आहे हे समजण्यास आपल्याला मदत मिळते. भूगोलाची साधारण माहिती देखील उपयुक्‍त ठरते. बायबलमध्ये इस्राएल, ईजिप्त, ग्रीससारख्या अनेक ठिकाणांविषयी सांगितले आहे. तुमच्या मुलाला नकाशावर ही ठिकाणे दाखवता येतात का? त्याला स्वतःचा देश दाखवता येतो का? एखाद्या व्यक्‍तीला नकाशा समजत नसेल तर एखाद्या नेमलेल्या क्षेत्रात सेवाकार्य पूर्ण करणे देखील तिला कठीण जाईल.—२ तीमथ्य ४:५.

मंडळीत विशेषाधिकार

ख्रिस्ती वडील आणि सेवा सेवकांना मिळणाऱ्‍या अनेक जबाबदाऱ्‍यांमध्ये वाचन सामील असते. जसे की, मंडळीच्या सभांच्या भागांची तयारी करावी लागते. साहित्याचा साठा आणि अनुदान यांचा हिशेब ठेवावा लागतो. मूलभूत शिक्षण नसल्यास, या जबाबदाऱ्‍या चांगल्यारितीने पार पाडायला कठीण जाऊ शकते.

संपूर्ण जगभरातील बेथेल गृहांमध्ये स्वयंसेवक काम करतात. या स्वयंसेवकांना चांगला सुसंवाद करता यावा आणि भाषांतर करणे, यंत्रे दुरुस्त करणे यांसारखी कामे पार पाडता यावीत म्हणून त्यांच्या राहत्या देशाच्या अधिकृत भाषेत लिहिता-वाचता येणे गरजेचे आहे. तुमच्या मुलांना पुढे असे विशेषाधिकार प्राप्त होणार असतील तर त्यांना मूलभूत शिक्षण मिळणे आवश्‍यक आहे. तुमच्या मुलाने शाळेत जाण्याची आणखी काही व्यावहारिक कारणे कोणती आहेत?

दारिद्र्‌य आणि अंधश्रद्धा

दारिद्र्‌यात असलेले लोक विशिष्ट परिस्थितींमध्ये अगदीच असहाय असतील. परंतु, माफक प्रमाणात शिक्षण असल्यास आपल्याला आणि आपल्या मुलांना अनावश्‍यकपणे हलाखीत दिवस काढावे लागणार नाहीत. बहुतेक अडाणी लोकांना जगणे मुश्‍किल होऊन बसते. काही वेळा, कमी पगारात वैद्यकीय मदत प्राप्त करणे शक्य नसल्यामुळे मुले आणि पालकही मरतात. कमी शिक्षण किंवा काहीच शिक्षण न मिळणारे लोक सहसा कुपोषित असतात आणि त्यांना निकृष्ट परिस्थितींमध्ये राहावे लागते. अशा वेळी, शिक्षण किंवा थोडेफार लिहिता-वाचता येत असल्यास काही मदत होऊ शकते.

साक्षरतेने अंधश्रद्धांवर विश्‍वास ठेवण्याची प्रवृत्तीही कमी होते. अर्थात, अंधश्रद्धा शिक्षित तसेच अशिक्षित लोकांमध्येही सर्वसामान्यपणे पाहायला मिळतात. पण, अडाणी लोकांना सहजपणे फसवले जाऊ शकते किंवा त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो कारण अशा फसव्या युक्‍त्‌यांना उघड करणारे साहित्य त्यांना वाचता येत नसते. त्यामुळे, ते अंधश्रद्धांवर अधिक विश्‍वास ठेवू लागतात आणि असे मानू लागतात की, एखादा मांत्रिक चमत्कार करून त्यांना बरे करू शकतो.—अनुवाद १८:१०-१२; प्रकटीकरण २१:८.

शिक्षण केवळ नोकरीसाठी आवश्‍यक नाही

पुष्कळांना वाटते की, शिक्षणाचा मुख्य उद्देश पैसे कमावणे हा आहे. पण, काही शिक्षित लोकही बेरोजगार आहेत किंवा त्यांना इतका कमी पगार मिळतो की ते स्वतःच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे काही पालकांना असे वाटू लागेल की, आपल्या मुलाला शाळेत पाठवून काही फायदा नाही. तथापि, शालेय शिक्षण केवळ पैसे कमावण्यासाठी फायदेकारक नसते; त्याने मुलांना सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी सज्ज केले जाते. (उपदेशक ७:१२) एखाद्याला राहत्या देशाची अधिकृत भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येत असेल तर वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांसोबत, परिसरातील अधिकाऱ्‍यांशी किंवा बँकेतील कर्मचाऱ्‍यांशी व्यवहार करणे सोपे जाते, इतकेच नव्हे तर त्यांच्याशी व्यवहार करण्याची भीती वाटण्याऐवजी ही एक सामान्य गोष्ट बनते.

काही ठिकाणी, शिक्षण नसलेल्या मुलांना बिगारकाम, मच्छीमारी, शिलाई किंवा इतर काम शिकण्यासाठी दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या हाताखाली काम करण्यासाठी पाठवले जाते. एखादे काम शिकणे ही चांगली गोष्ट आहे पण ही मुले कधी शाळेत गेलीच नाहीत तर त्यांना नीट लिहायला-वाचायला येणार नाही. त्यांनी प्रथम मूलभूत शिक्षण प्राप्त केले आणि नंतर एखादे काम शिकले तर निश्‍चितच त्यांचे शोषण होणार नाही आणि त्यांना अधिक समाधानकारक जीवन जगता येईल.

नासरेथचा येशू एक सुतार होता आणि निश्‍चितच त्यालाही आपला दत्तक पिता, योसेफ याच्याकडून थोडेफार प्रशिक्षण प्राप्त झाले असणार. (मत्तय १३:५५; मार्क ६:३) येशू देखील शिक्षित होता कारण १२ वर्षांचा असताना तो मंदिरातील शिक्षित पुरुषांसोबत अर्थपूर्ण चर्चा करू शकला. (लूक २:४६, ४७) येशूच्या बाबतीत पाहिल्यास, त्याचे काम त्याच्या शिक्षणाच्या आड आले नाही.

मुलींनाही शिक्षित करायचे?

काही वेळा पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात आणि मुलींना पाठवत नाहीत. काही पालकांना असे वाटते की, मुलींना शाळेत पाठवणे परवडण्यासारखे नाही; त्याऐवजी त्या घरी राहून आईची मदत करू शकतील. परंतु, निरक्षरता एखाद्या मुलीला असहाय करू शकते. संयुक्‍त राष्ट्रसंघ बालक निधी (युनिसेफ) याच्या एका प्रकाशनात म्हटले आहे: “अनेक अभ्यासांतून हे निष्पन्‍न झाले आहे की, मुलींना शिक्षण देणे हा दारिद्र्‌यातून सुटका मिळवण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे.” (दारिद्र्‌य आणि मुले: सर्वात कमी विकसित देशांकरता ९० च्या दशकातील धडे) शिक्षित मुली जीवनाकरता सज्ज असतात आणि अधिक सुज्ञ निर्णय घेतात ज्यामुळे कुटुंबातल्या सर्वांना फायदा होतो.

पश्‍चिम आफ्रिकेतील बेनिनमध्ये बालमृत्यूसंबंधीच्या एका अभ्यासात दिसून आले की, सामूहिकपणे निरक्षर मातांची बालके प्रती १,००० मधील १६७ या दराने मृत्यूमुखी पडतात तर दुसऱ्‍या बाजूला पाहता माध्यमिक शालेय शिक्षण प्राप्त केलेल्या स्त्रियांची केवळ ३८ बालके मृत्यूमुखी पडतात. युनिसेफचा असा निष्कर्ष आहे: “यास्तव, शिक्षणाचे प्रमाण बेनिनमधील तसेच संपूर्ण जगभरातील बालमृत्यूचे प्रमाण ठरवण्यातील महत्त्वाचा घटक आहे.” तर मग, तुमच्या मुलींना शिक्षण देण्याचे अनेक फायदे होऊ शकतील.

साक्षरतेचे वर्ग पुरेसे आहेत का?

आवश्‍यक तेथे, यहोवाचे साक्षीदार वाचन करता न येणाऱ्‍या मंडळीच्या सदस्यांकरता साक्षरतेचे वर्ग घेतात.b या फायदेकारक व्यवस्थेमुळे लोकांना स्वतःच्या स्थानीय भाषेत लिहायला-वाचायला शिकण्यास मदत होते. शालेय शिक्षणाला हा योग्य पर्याय आहे असे म्हणता येईल का? सामान्य शाळा असताना तुमच्या मुलांना शिक्षण देण्याची मंडळीकडून अपेक्षा केली जावी का?

साक्षरतेचे वर्ग हे यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांनी केलेली दयाळु व्यवस्था असली तरी ही व्यवस्था शाळेला कधीही जाऊ न शकलेल्या प्रौढांकरता आहे. कदाचित त्या लोकांच्या पालकांना साक्षरतेचे महत्त्व माहीत नव्हते किंवा त्यांच्या परिसरात शाळा नव्हत्या. अशा व्यक्‍तींना मंडळ्यांमध्ये भरवल्या जाणाऱ्‍या साक्षरतेच्या वर्गांनी मदत मिळू शकते. पण हे वर्ग सर्वसाधारण शालेय शिक्षणाला पर्याय नाहीत आणि प्राथमिक शिक्षण देण्यासाठी ते बनवलेले नाहीत. या साक्षरतेच्या वर्गांमध्ये विज्ञान, गणित, इतिहास यांसारखे विषय शिकवले जात नाहीत. पण, सर्वसाधारण शालेय शिक्षणात ते विषय शिकवले जातात.

आफ्रिकेत, साक्षरतेचे वर्ग एका देशाच्या अधिकृत भाषेत कमी पण बहुतेककरून जमातीय भाषांमध्ये चालवले जातात. परंतु, शालेय शिक्षण सहसा अधिकृत भाषेत दिले जाते. यामुळे मुलांना अधिक फायदा होतो कारण अधिकृत भाषेत जास्त पुस्तके आणि विविध इतर प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध असते. मंडळीचे साक्षरतेचे वर्ग एखाद्या मुलाच्या शालेय शिक्षणात भर टाकू शकतात पण त्याची जागा घेऊ शकत नाहीत. तर मग, व्यावहारिकदृष्ट्या पाहिल्यास, मुलांना शालेय शिक्षण दिले जाऊ नये का?

पालकांची जबाबदारी

मंडळीच्या आध्यात्मिक गरजांची देखभाल करण्यात पुढाकार घेणाऱ्‍या पुरुषांना आदर्श ख्रिस्ती असण्याची गरज आहे. ते आपल्या घरची आणि मुलाबाळांची व्यवस्था “चांगली ठेवणारे” असावेत. (१ तीमथ्य ३:४, १२) व्यवस्था “चांगली ठेवणारे” यामध्ये आपल्या मुलांना ज्यामुळे भविष्यात अडथळा निर्माण होईल अशा सर्व गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करण्यास मदत करणे समाविष्ट आहे.

देवाने ख्रिस्ती पालकांना एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांनी आपल्या वचनानुसार आपल्या मुलांचे संगोपन करावे आणि “शिक्षण प्रिय” बनण्यास त्यांची मदत करावी. (नीतिसूत्रे १२:१; २२:६; इफिसकर ६:४) प्रेषित पौलाने लिहिले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) आपल्या मुलांकरता अचूक शिक्षण देण्याचीही गरज आहे.

काही वेळा एखादी शालेय यंत्रणा, जास्त मुले, अपुरा निधी किंवा नाखूष व कमी पगार दिले जाणारे शिक्षक असल्यामुळे उत्तम शिक्षण देण्यास उणी पडते. त्यामुळे, पालकांनी मुले शाळेत शिकत असलेल्या गोष्टींमध्ये रस घ्यावा हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरवातीला शिक्षकांशी परिचय करून घेणे उत्तम आहे. मुलांनी चांगले विद्यार्थी होण्यासाठी काय करावे याविषयीही ते शिक्षकांचा सल्ला घेऊ शकतात. यामुळे शिक्षकांनाही वाटेल की, त्यांची कदर केली जाते आणि ते मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यास प्रेरित होतील.

मुलांच्या विकासात शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. नीतिसूत्रे १०:१४ म्हणते, “शहाणे जन ज्ञानसंग्रह करितात.” हे खासकरून बायबलच्या ज्ञानाविषयी खरे आहे. यहोवाच्या लोकांनी—लहान तसेच मोठ्यांनी—होता होईल तितके ज्ञान घेणे आवश्‍यक आहे जेणेकरून ते इतरांना आध्यात्मिकरित्या मदत करू शकतील आणि “सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, [असे] स्वतःला सादर” करू शकतील. (२ तीमथ्य २:१५; १ तीमथ्य ४:१५) तेव्हा, तुमच्या मुलांनी शाळेत जावे का? निश्‍चित तुमचे उत्तर होकारार्थी असेल. अर्थात, तुमच्या देशातील परिस्थितीवर हे अवलंबून असेल. परंतु, ख्रिस्ती पालकांनी आणखी एका महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचे उत्तर देण्याची गरज आहे, ‘माझ्या मुलांनी शिक्षित असावे का?’ तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्‍यात राहत असला तरी या प्रश्‍नाचेही होकारार्थी उत्तर असावे असे तुम्हाला आर्वजून वाटत नाही का?

[तळटीपा]

a त्यांची मातृभाषा कदाचित गालीलमध्ये बोलली जाणारी अरेमिकची पोटभाषा असावी किंवा इब्री पोटभाषेचा एक प्रकार असावा. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड १, पृष्ठे १४४-६ पाहा.

b पाहा सावध राहा!, (इंग्रजी) डिसेंबर २२, २०००, पृष्ठे ८ आणि ९.

[१२, १३ पानांवरील चौकट/चित्र]

शाळेत जाणे अशक्य असल्यास

काही परिस्थितींमध्ये शाळेला जाणे अशक्य असते. उदाहरणार्थ, रेफ्यूजीझ या पत्रिकेत सांगितल्याप्रमाणे निर्वासितांच्या छावणीत ५ पैकी केवळ १ लायक मुलाला शाळेत जाता येते. काही वेळा, संपांमुळे शाळा अनिश्‍चित कालावधीसाठी बंद असतात. काही भागांमध्ये शाळा फार दूर असतील किंवा शाळाच नसतील. ख्रिश्‍चनांचा छळ होत असल्यामुळे देखील मुलांना शाळेतून बाहेर काढले जाऊ शकते.

अशा परिस्थितींमध्ये तुम्ही आपल्या मुलांची मदत कशी करू शकाल? तुम्हाला अनेक मुले असली आणि तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जेथे खर्चामुळे सर्वांना शाळेत पाठवणे परवडण्यासारखे नसेल तर तुम्हाला काय करता येईल? तुम्हाला निदान एक किंवा दोन मुलांना शाळेत पाठवता येईल का? तसेच त्यांना आध्यात्मिक धोक्यात न घालता शाळेत पाठवू शकाल का? असे असल्यास, ते घरी आल्यावर तुमच्या इतर मुलांना शाळेत शिकलेल्या गोष्टी शिकवू शकतील.

काही देशांमध्ये घरच्या घरी शिक्षण देण्याची प्रथा आहे.c या पद्धतीत, सहसा एखादा पालक दररोज आपल्या मुलाला काही तास शिक्षण देतो. प्राचीन काळात, पालक आपल्या मुलांना यशस्वीपणे शिक्षण देत होते. पालकांच्या उत्तम शिक्षणामुळेच याकोबाचा पुत्र योसेफ तरुण वयातच इतरांवर देखरेख करण्यास समर्थ होता.

निर्वासितांच्या छावणीसारख्या ठिकाणी औपचारिक शिक्षण किंवा शिक्षण कार्यक्रम प्राप्त करणे कठीण असू शकते परंतु यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या साहित्याच्या आधारे पालक शिक्षण देऊ शकतात. उदाहरणार्थ, लहान मुलांना शिकवण्याकरता बायबल कथांचं माझं पुस्तक हे उपयुक्‍त ठरू शकेल. सावध राहा! या मासिकात विविध विषयांवर लेख छापले जातात. जीवन—कसे अस्तित्वात आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) या पुस्तकाच्या द्वारे वैज्ञानिक विषय शिकवले जाऊ शकतात. यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिकपुस्तक (इंग्रजी) यात एक लहानसा नकाशा असून विविध देशांतील जीवनाविषयी आणि प्रचाराच्या कार्याविषयी त्यात माहिती दिली आहे.

योग्यरीतीने तयार केलेल्या आणि मुलाच्या समजशक्‍तीनुसार निवडलेल्या शिक्षणाने बरेच काही साध्य करता येऊ शकते. मुलांनी लिहिणे-वाचणे चालू ठेवल्यास सर्वसाधारण शालेय व्यवस्था उपलब्ध झाल्यावर त्यांना जुळवून घ्यायला सोपे जाईल. पुढाकार आणि मेहनत घेऊन तुम्ही आपल्या मुलांना चांगले शिक्षित करू शकाल आणि याचा खूप फायदा होईल!

[तळटीप]

c सावध राहा! (इंग्रजी), एप्रिल ८, १९९३, पृष्ठे ९-१२ वरील “घरच्या घरी शिक्षण—तुमच्याकरता आहे का?” हा लेख पाहा.

[१३ पानांवरील चित्र]

तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी तुमची मुले शाळेत जाऊ शकत नसल्यास काय केले जाऊ शकते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा