वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w01 ११/१ पृ. १९-२४
  • यहोवाच्या सेवेतील समृद्ध जीवन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या सेवेतील समृद्ध जीवन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मोक्याच्या ठिकाणी असलेलं आमचं घर
  • पूर्ण वेळेच्या सेवेत पदार्पण
  • बेथेलमधील सेवा आणि सहवास
  • बायबलचे आवेशी विद्यार्थी
  • आध्यात्मिक वारशाबद्दल कृतज्ञ
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
  • पूर्णवेळेच्या सेवेमुळे अनेक आशीर्वाद मिळाले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
w01 ११/१ पृ. १९-२४

जीवन कथा

यहोवाच्या सेवेतील समृद्ध जीवन

रस्सल करझन यांच्याद्वारे कथित

सप्टेंबर २२, १९०७ रोजी मी या जगात प्रवेश केला. माझ्या जन्माच्या सात वर्षांनंतर जगातल्या सर्वात उल्लेखनीय कालखंडाची सुरवात झाली; पहिल्या महायुद्धाची सुरवात. आमचं कुटुंब एका महत्त्वपूर्ण अर्थानं श्रीमंत होतं. माझ्या कुटुंबाचा इतिहास ऐकल्यावर तुम्हाला माझं बोलणं नक्कीच पटेल.

माझ्या आजीला (बाबांच्या आईला) लहानपणापासूनच देवाविषयीचं सत्य जाणून घ्यायची ओढ होती. किशोरावस्थेत यायच्या आधीच तिनं, स्वीत्झर्लंडमधील स्पिट्‌स या तिच्या निसर्गरम्य गावातील विविध चर्च पालथे घातले. तिच्या लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे १८८७ मध्ये करझन कुटुंबानं, स्थलांतर करणाऱ्‍या इतर कुटुंबांबरोबर अमेरिकेत स्थलांतर केलं.

करझन कुटुंब ओहायोत राहायला गेलं; तिथंच, आजी ज्या धनाच्या शोधात होती ते १९०० साली तिला मिळालं. वेळ जवळ आली आहे या चार्ल्स टेझ रस्सल यांच्या, जर्मन भाषेत अनुवादित करण्यात आलेल्या पुस्तकातून तिला ही धनप्राप्ती झाली होती. हे पुस्तक वाचल्यावर तिची लगेच खात्री पटली की हेच बायबलमधील सत्य आहे. आजीला इतकं इंग्रजी वाचता येत नव्हतं तरीसुद्धा तिनं इंग्रजी भाषेत टेहळणी बुरूज मासिकाची वर्गणी केली. अशाप्रकारे ती आणखी बायबल सत्य शिकू शकली आणि त्याचबरोबर तिची इंग्रजी भाषाही सुधरली. आजीला जशी आध्यात्मिक गोष्टींत आवड होती, तशी आजोबांना मुळीच नव्हती.

आजीला ११ मुलं झाली. त्यांपैकी तिच्या २ मुलांनी, जॉन आणि अडॉल्फ यांनी तिच्याप्रमाणेच आध्यात्मिक गोष्टींत आवड दाखवली. जॉन माझे बाबा. मिसूरीमधील सेंट लुई येथे १९०४ साली झालेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या अर्थात यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनात बाबांचा बाप्तिस्मा झाला. बहुतेक बायबल विद्यार्थ्यांची बेताचीच परिस्थिती असल्यामुळे, हे अधिवेशन सेंट लुई येथे भरवल्या जात असलेल्या एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीच्या वेळेसच आयोजित करण्यात आले कारण या प्रदर्शनीच्या निमित्ताने ट्रेनच्या भाड्यात खास कपात करण्यात आल्यामुळे बहुतेक बंधूभगिनींना या सवलतीचा फायदा घेता येणार होता. नंतर, १९०७ मध्ये माझे चुलते अडॉल्फ यांचा न्यूयॉर्क येथील नायगरा फॉल्स येथे भरलेल्या अधिवेशनात बाप्तिस्मा झाला. बाबा आणि माझे चुलते या दोघांनी, बायबलमधून शिकलेल्या गोष्टी इतरांना आवेशानं सांगितल्या व कालांतराने ते दोघंही पूर्णवेळेचे सेवक (आता ज्यांना पायनियर म्हटले जाते) बनले.

१९०७ मध्ये माझा जन्म झाला तेव्हा माझं कुटुंब आधीच आध्यात्मिक अर्थानं श्रीमंत होतं. (नीतिसूत्रे १०:२२) १९०८ साली, ओहायो मधील पुट-इन-बे येथील “विजयाकडे वाटचाल” या अधिवेशनाला माझ्या आईबाबांनी (जॉन व आयडा) मला नेलं. मी तेव्हा बाळच होतो. तेथे, तेव्हा प्रवासी पर्यवेक्षक असलेले बंधू जोसफ एफ. रदरफोर्ड अधिवेशन अध्यक्ष होते. अधिवेशनाच्या काही आठवड्याआधी ते ओहायोतील डॉल्टन शहरात आले होते तेव्हा त्यांनी आमच्या घरी भेट दिली व स्थानीय बायबल विद्यार्थ्यांसाठी भाषणेही दिली.

अर्थात, यांपैकी मला स्वतःला एकही घटना आठवत नाही; पण १९११ साली मेरीलँड येथे मॉऊन्ट लेक पार्क इथं झालेलं अधिवेशन मात्र मला आठवतं. इथं, मी आणि माझी धाकटी बहीण एस्तर बंधू चार्ल्स टेझ रस्सल यांना भेटलो होतो. बंधू चार्ल्स बायबल विद्यार्थ्यांच्या जागतिक प्रचार कार्यावर देखरेख करायचे.

जून २८, १९१४ रोजी, ऑस्ट्रियन साम्राज्याचा युवराज फर्डिनंड आणि त्याची पत्नी यांचा सारायेवोत खून झाला तेव्हा संपूर्ण जगात युद्ध भडकले; पण त्याच वेळी मी घरातील सर्वांबरोबर ओहायोच्या कोलंबस येथील एका अधिवेशनात शांतीने बसलो होतो. बालपणापासूनच मला यहोवाच्या लोकांच्या अनेक अधिवेशनांना उपस्थित राहण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे. काही मेळाव्यात फक्‍त शंभरएक लोक होते. तर काही अधिवेशने जगातील काही सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये भरवण्यात आली.

मोक्याच्या ठिकाणी असलेलं आमचं घर

१९०८ पासून १९१८ पर्यंत, पेनसिल्व्हानियाच्या पिट्‌सबर्ग आणि ओहायोच्या क्ल्विलँड यांच्या मध्ये असलेल्या डॉल्टन इथं आमच्या घरी बायबल विद्यार्थ्यांच्या एका लहानशा मंडळीच्या सभा भरायच्या. आमचं घर अनेक प्रवासी वक्‍त्‌यांसाठी जणू एक आदरातिथ्याचं केंद्रच बनलं होतं. घराच्या मागच्या परड्यात ते आपले घोडे आणि बग्गी बांधायचे आणि घरात आलेल्या सर्वांना आपले मनोरंजक अनुभव आणि इतर मौल्यवान आध्यात्मिक गोष्टी सांगायचे. तो काळ खरंच खूप उत्तेजन देणारा होता!

बाबा, शाळेत शिक्षक होते. पण त्यांना सर्वात महान शैक्षणिक कार्याची, म्हणजे ख्रिस्ती सेवेची ओढ होती. आपल्या कुटुंबाला न चुकता, ते यहोवाविषयी शिकवायचे आणि दररोज संध्याकाळी आम्ही कुटुंब मिळून प्रार्थना करायचो. १९१९ सालच्या वसंत ऋतूत बाबांनी आमचा घोडा आणि बग्गी विकली आणि १७५ डॉलरला १९१४ फोर्ड विकत घेतली ज्यामुळे ते प्रचार कार्यात होता होईल तितक्या अधिक लोकांप्रत पोहंचू शकतील. १९१९ व १९२२ सालांदरम्यान याच कारनं आम्ही ओहायोच्या सीडर पॉईन्ट येथे बायबल विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय अधिवेशनांना उपस्थित राहिलो.

आमचं संपूर्ण कुटुंब—आई, बाबा, एस्तर, माझा धाकटा भाऊ जॉन आणि मी—प्रचार कार्यात भाग घ्यायचो. मला आठवतं, पहिल्यांदा मला एका घरमालकानं बायबलवर एक प्रश्‍न विचारला होता. मी तेव्हा सात वर्षांचा होतो. त्यानं विचारलं: “बाळा, हर्मगिदोन म्हणजे काय?” तेव्हा बाबांच्या मदतीनं मी त्याला त्याच्या या प्रश्‍नाचं उत्तर देऊ शकलो.

पूर्ण वेळेच्या सेवेत पदार्पण

१९३१ साली, आमचं पूर्ण कुटुंब ओहायोच्या कोलंबस इथं झालेल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलं. या अधिवेशनात आम्ही यहोवाचे साक्षीदार हे नवीन नाव धारण केलं तेव्हा आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला होता. जॉनला तर इतका आनंद झाला की त्यानं ठरवून टाकलं, की त्यानं आणि मी पायनियर कार्य सुरू करावं.a पायनियरींग आम्ही दोघांनी तर सुरू केलीच, पण आमच्याबरोबर आई, बाबा आणि एस्तरनं देखील सुरू केली. देव राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्यात आमच्या अख्ख्या कुटुंबानं ऐक्यानं सेवा करणं हा आमच्यासाठी एक अनमोल ठेवा होता! हा अनमोल ठेवा दिल्याबद्दल मी यहोवाला आजवर धन्यवाद देतो. आमच्या कुटुंबानं खूप सुख उपभोगलं होतं, नव्हे अजून उपभोगणार होतं.

१९३४ सालच्या फेब्रुवारी महिन्यात मी न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात (बेथेल) सेवा करू लागलो. काही आठवड्यांनंतर जॉनही आला. १९५३ साली जॉनचं लग्न, जेसीबरोबर होईपर्यंत आम्ही दोघंही एकाच खोलीत राहत होतो.

जॉन आणि मी बेथेलला गेल्यावर आईबाबांनी देशांतील विविध भागांत पायनियर नेमणूक स्वीकारली होती आणि त्यांच्याबरोबर एस्तर व तिचा नवरा जॉर्ज रीड देखील होते. आईबाबांनी, १९६३ साली त्यांची पार्थिव सेवा समाप्त होईपर्यंत पायनियरींग केली. एस्तर आणि तिच्या नवऱ्‍याला पुढं मुलं झाली; मला अनेक भाचे, भाच्या मिळाल्या; मला या सर्वांवर मनापासून प्रेम आहे.

बेथेलमधील सेवा आणि सहवास

जॉनला बेथेलमध्ये आपल्या तांत्रिक कौशल्यांचा उपयोग झाला. बेथेलमधील बांधवांबरोबर त्यानं पोर्टेबल फोनोग्राफ तयार करणं, यासारखी कामं केली. हजारो यहोवाच्या साक्षीदारांनी घरोघरच्या कार्यात या फोनोग्राफचा उपयोग केला. जॉननं, मासिकांच्या वर्गणीदारांना पाठवली जाणारी मासिकं गुंडाळून त्यांच्यावर नावाचं लेबल चिटकवण्याची मशीनसुद्धा तयार करण्यास हातभार लावला.

पुस्तकांचं बाईन्डींग केल्या जाणाऱ्‍या विभागातून माझी बेथेल सेवा सुरू झाली. त्या वेळी बेथेलमधील फॅक्टरीत विश्‍वासूपणे सेवा करणारे इतर तरुण बंधू अजूनही सेवा करत आहेत. कॅरी बार्बर, रॉर्बट हॅट्‌सफिल्ड त्यांपैकी आहेत. माझ्या लक्षात काहींची नावं चांगली राहिली आहेत: नेथन नॉर, कार्ल क्लाईन, लायमन स्वींगल, क्लॉस जेन्सन, ग्रान्ट सूटर, जॉर्ज गँगस, ओरीन हिब्बर्ड, जॉन सिओर्स, रॉबर्ट पेन, चार्ल्स फेकल, बेनो बुरचिक, जॉन पेरी; हे सर्व आता हयात नाहीत. पण या सर्वांनी वर्षानुवर्षे विश्‍वासूपणे सेवा केली; यांपैकी कोणीही कुरकूर केली नाही किंवा “बढतीची” अपेक्षा केली नाही. पण, संघटना जसजशी वाढत गेली तसतसे या एकनिष्ठ, आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्या ख्रिस्ती बांधवांवरील जबाबदाऱ्‍या वाढत गेल्या. काहींनी तर यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळातही कार्य केले.

या आत्म-त्यागी बांधवांबरोबर काम केल्यानं मी एक महत्त्वपूर्ण धडा शिकलो. नोकरी करणाऱ्‍या कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून पगार दिला जातो. ते त्यांचं प्रतिफळ आहे. बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍यांना समृद्ध आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात; आणि फक्‍त आध्यात्मिक मनोवृत्तीच्या बंधूभगिनींना या प्रतिफळांची किंमत समजते व ते त्याबद्दल कृतज्ञ असतात.—१ करिंथकर २:६-१६.

१९२३ साली अगदी किशोरावस्थेत असतानाच बंधू नेथन नॉर बेथेलला आले होते; १९३० च्या दशकात त्यांनी फॅक्टरी पर्यवेक्षक म्हणून कार्य केले. ते दररोज फॅक्टरीत फेरी मारायचे आणि काम करणाऱ्‍या प्रत्येकाशी बोलायचे. माझ्यासारख्या बेथेलला नवीन आलेल्या लोकांना, त्यांचा हा स्वभाव खूप आवडायचा. १९३६ मध्ये आम्हाला जर्मनीहून एक नवीन छपाईयंत्र मिळाले तेव्हा, ते यंत्र जुळवताना काही तरुण बांधवांना खरंच खूप त्रास झाला. तेव्हा, बंधू नॉरनं डांगरी घालून ते मशीन चालू करून देईपर्यंत म्हणजे जवळजवळ एक महिनाभर त्यांच्याबरोबर काम केलं.

बंधू नॉर अतिशय कष्टाळू होते. आमच्यातील बहुतेक जण त्यांच्याइतकं काम करू शकत नव्हते. पण त्यांना मनोरंजनही आवडायचे. १९४२ सालच्या जानेवारी महिन्यात त्यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त प्रचार कार्यावर देखरेख करायचं काम मिळालं तेव्हाही ते अधूनमधून बेथेल कुटुंबातील काही सदस्यांबरोबर व न्यूयॉर्कच्या लॅन्सींगच्या परिसरातील गिलियड मिशनरी प्रशालेच्या विद्यार्थ्यांबरोबर बेसबॉल खेळायचे.

१९५० सालच्या एप्रिल महिन्यात, बेथेल परिवार न्यूयॉर्क, ब्रुकलिनमध्ये १२४ कोलंबिया हाईट्‌स येथील नव्याने बांधलेल्या आमच्या दहा मजली इमारतींमध्ये राहायला गेला. नवीन भोजनगृहामुळे आम्ही सर्वजण भोजनासाठी एकत्र बसू शकत होतो. या इमारतीचे बांधकाम करायला जवळजवळ तीन वर्षे लागली; या कालावधीत आमचा सकाळचा उपासना कार्यक्रम झाला नाही. तो पुन्हा सुरू करण्यात आला तेव्हा आम्हाला किती आनंद झाला! बंधू नॉरना, बेथेल परिवारांतील नवीन लोकांची नावं आठवून देण्याकरता त्यांनी मला त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसायला नेमलं. ५० वर्ष मी याच जागेवर सकाळचा उपासना कार्यक्रम आणि नाश्त्यासाठी बसायचो. मग, ऑगस्ट ४, २००० पासून ते भोजनगृह बंद करण्यात आल्यामुळे, पूर्वी टॉवर्स हॉटेल असलेल्या इमारतीतील सुधारणा केलेल्या एका भोजनगृहात मला जागा देण्यात आली.

१९५० च्या दशकात, काही दिवसांसाठी मी फॅक्टरीत लिनोटाईप मशीनवर काम केलं; प्रिटिंग प्लेट्‌स बनवण्याच्या प्रकियेत, एकेका मुद्रापट्टीला जुळवून एक पान तयार केले जायचे. तर ही मुद्रापट्टी तयार करण्याचं माझं काम होतं. मला हे काम इतकं आवडत नव्हतं; पण सर्व मशीन्सची देखरेख करणारे बंधू विल्यम पीटरसन माझ्याबरोबर प्रेमानं वागायचे त्यामुळे मी तिथं रुळलो. मग १९६० साली, १०७ कोलंबिया हाईट्‌स येथे नवीनच बांधलेल्या इमारतीची रंगरंगोटी करण्यासाठी स्वयंसेवकांची आवश्‍यकता होती. आमच्या वाढत्या बेथेल परिवारासाठी या नवीन इमारतीला तयार करण्यात माझाही हातभार लागावा म्हणून मी अगदी आनंदानं माझं नाव दिलं.

१०७ कोलंबिया हाईट्‌स इमारतीची रंगरंगोटी करून झाल्यावर काही दिवसांनी मला बेथेलला भेट देणाऱ्‍यांचे स्वागत करण्याचं काम देण्यात आलं. ही नेमणूक मिळाली तेव्हा मला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला! रिसेपशनिस्ट म्हणून घालवलेली गेली ४० वर्ष, बेथेलमध्ये मी घालवलेल्या वर्षांइतकीच आल्हाददायक होती. बाहेरचे लोक असोत किंवा बेथेल परिवाराचेच नवे सदस्य असोत, सर्वांना प्रवेशद्वारातून आता येताना पाहून मी नेहमी या गोष्टीचा विचार करतो, की राज्याच्या वाढीमुळेच इतके नवीन लोक येत आहेत आणि या वाढीला बेथेलमध्ये आम्ही सर्व मिळून करत असलेल्या कामाचा या नाही तर त्याप्रकारे हातभार होत आहे.

बायबलचे आवेशी विद्यार्थी

आमचं बेथेल कुटुंब आध्यात्मिक अर्थानं समृद्ध आहे; कारण यांतील सदस्य बायबलवर प्रेम करतात. मी बेथेलला नवीन आलो होतो तेव्हा, प्रूफरिडर म्हणून काम करणाऱ्‍या एमा हॅमिलटन नावाच्या एका भगिनीला मी विचारलं, की तिनं बायबल किती वेळा वाचलं. ती म्हणाली: “३५ पर्यंत मी मोजू शकले, त्यानंतर मला आठवत नाही.” एमा इतक्याच वर्षांपासून बेथेलमध्ये काम करणारे ॲन्टन कोरबर नावाचे आणखी एक विश्‍वासू बांधव म्हणायचे: “बायबल सतत हाताशी ठेवा.”

१९१६ साली बंधू रस्सल यांच्या मृत्यूनंतर जोसफ एफ. रदरफोर्डनी बंधू रस्सल यांनी सांभाळलेल्या संघटनेच्या जबाबदाऱ्‍या स्वीकारल्या. बंधू रदरफोर्ड यांचं व्यक्‍तिमत्त्व अतिशय भारदस्त होतं आणि ते अनुभवी वक्‍ता देखील होते. ते वकील असल्यामुळे अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात यहोवाच्या साक्षीदारांच्या वतीने खटले लढायचे. १९४२ साली, बंधू रदरफोर्ड यांच्या मृत्यूनंतर बंधू नॉर यांनी त्यांची जागा घेतली व वक्‍ता होण्यासाठी त्यांनी आपली कौशल्ये पणाला लावली. मी बंधू नॉर यांच्या शेजारच्याच खोलीत राहत असल्यामुळे ते त्यांच्या भाषणाचा सराव वारंवार करत असताना मला सर्व ऐकू यायचं. त्यांच्या मेहनतीचं सार्थक झालं, ते पुढे उत्तम वक्‍ता बनले.

१९४२ सालच्या फेब्रुवारी महिन्यात, बंधू नॉर यांनी, बेथेलमधील बांधवांना त्यांच्या शिकवण्याच्या व बोलण्याच्या कलांत सुधारणा करण्याकरता एक खास कार्यक्रमाची सुरवात केली. या प्रशालेत बायबलवर संशोधन आणि जाहीर भाषणे यांवर अधिक भर दिला जायचा. प्रशालेच्या सुरवातीला, आम्हाला प्रत्येकाला बायबलमधील एखाद्या पात्रावर छोटंसं भाषण देण्यास सांगितलं जायचं. माझं पहिलं भाषण मोशेवर होतं. १९४३ पासून काहीशी अशीच प्रशाला यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये सुरू झाली जी आजवर चालली आहे. बेथेलमध्ये अजूनही बायबलचं ज्ञान घेणं आणि शिकवण्याच्या प्रभावशाली पद्धती विकसित करणं यांवर जोर दिला जातो.

फेब्रुवारी १९४३ मध्ये गिलियड मिशनरीचा पहिला वर्ग झाला. अलीकडेच, गिलियडचा १११ वा वर्ग पदवीधर झाला! ५८ वर्षांच्या कारकीर्दीत या प्रशाळेनं ७,००० पेक्षा अधिक लोकांना संपूर्ण जगात मिशनरी म्हणून सेवा करायला प्रशिक्षित केले आहे. एक खास गोष्ट अशी, की १९४३ साली जेव्हा या प्रशालेची सुरवात झाली होती तेव्हा संपूर्ण जगात फक्‍त १,००,००० यहोवाचे साक्षीदार होते. आणि आता, देवाच्या राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारात ६० लाखापेक्षा अधिक जण भाग घेत आहेत!

आध्यात्मिक वारशाबद्दल कृतज्ञ

गिलियडची स्थापना व्हायच्या काही दिवस आधी, बेथेलमधील आम्हा तीन जणांना संपूर्ण अमेरिकेतील मंडळ्यांना भेटी देण्यासाठी नेमण्यात आलं. या मंडळ्यांना आध्यात्मिकरीत्या मजबूत करण्याकरता आम्ही कधीकधी एक दिवस, काही दिवस किंवा कधीकधी एक एक आठवडा त्यांच्यासोबत राहत होतो. आम्हाला तेव्हा, बांधवांचे सेवक (सर्व्हंट्‌स टू द ब्रेदरन) असं संबोधलं जायचं; नंतर त्यांना सर्किट सर्व्हंट किंवा विभागीय पर्यवेक्षक म्हटलं जाऊ लागलं. पण, गिलियड प्रशालेची सुरवात झाल्यावर मला लगेच बेथेलला पुन्हा बोलवण्यात आलं आणि काही पाठ शिकवण्यास सांगण्यात आलं. २ ते ५ वर्गांसाठी मी शिक्षक म्हणून काम केलं आणि नेहमीच्या शिक्षकांच्या ऐवजी देखील मला काम करायला सांगण्यात आलं तेव्हा मी १४ व्या वर्गाचा शिक्षक म्हणून काम केलं. विद्यार्थ्यांबरोबर, यहोवाच्या संघटनेच्या आधुनिक दिवसांतील इतिहासाच्या उल्लेखनीय घटनांची (यांतील अनेक घटना मी माझ्या स्वतःच्या अनुभवातूनसुद्धा सांगू शकलो) उजळणी करताना मला, मला मिळालेल्या आध्यात्मिक वारशाबद्दल अधिकच कृतज्ञ वाटायचं.

आणखी एक विशेषाधिकार जो मला इतक्या वर्षांत मिळाला तो म्हणजे यहोवाच्या लोकांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांना उपस्थित राहण्याचा योग. १९६३ साली मी ५०० पेक्षा अधिक प्रतिनिधींबरोबर जगातील बहुतेक देशांत प्रवास करून “सार्वकालिक सुवार्ता” या अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो. मला उपस्थित राहता आले अशी ऐतिहासिक ठरलेली अधिवेशनं म्हणजे: १९८९ सालचे पोलंडमधील वॉरसॉ येथील अधिवेशन; मग, १९९० साली जर्मनीतील बर्लिन येथे आणि १९९३ साली रशियातील मॉस्कोतील अधिवेशन. प्रत्येक अधिवेशनात मला आपल्या अशा प्रिय बंधू व भगिनींना भेटायची संधी मिळाली ज्यांनी नात्सी, कम्युनिस्ट किंवा दोन्ही राजवटीत शतकानुशतके विश्‍वासूपणे छळाचा सामना केला होता. त्यांचे हे अनुभव खरोखरच आपला विश्‍वास मजबूत करणारे आहेत!

यहोवाच्या सेवेतील माझं जीवन खरोखरच समृद्ध जीवन ठरलं आहे! आध्यात्मिक आशीर्वादांचा साठा कधी संपतच नाही. आणि आध्यात्मिक धनसंपत्तीतील मौल्यवान गोष्टी आपण इतरांना जितक्या अधिक सांगत राहू तितकी अधिक आपली संपत्ती वाढत राहते; भौतिक संपत्तीच्या बाबतीत ही गोष्ट खरी नाही. मी कधीकधी काहींच्या तोंडून असे ऐकतो, की आम्ही लहानपणापासून यहोवाचे साक्षीदार नसायला हवं होतं. देवाच्या संस्थेच्या बाहेर राहण्याचा थोडासा अनुभव घेतल्यावर मग सत्य मिळालं असतं तर आम्हाला सत्याची किंमत समजली असती, असं त्यांचं म्हणणं आहे.

तरुणांच्या तोंडून जेव्हा मी असं बोलणं ऐकतो तेव्हा मला खूप वाईट वाटतं, कारण त्यांच्या या बोलण्याचा असा अर्थ होतो, की लहानपणापासून एखाद्याला यहोवाच्या मार्गांचे प्रशिक्षण मिळणं हे उचित नाही. परंतु, जरा विचार करा की एखाद्या व्यक्‍तीला मोठं झाल्यावर बायबलमधील सत्य कळतं तेव्हा त्याला कितीतरी वाईट सवयी आणि वाईट विचारसरणी आधी सोडाव्या लागतात आणि मग सत्य स्वीकारावं लागतं. माझ्या आईबाबांनी आम्हा तिन्ही मुलांना धार्मिक मार्गाचं प्रशिक्षण दिल्याबद्दल मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानले व अजूनही मानतो. १९८० सालच्या जुलै महिन्यात जॉनचा मृत्यू झाला; त्याच्या मृत्यूपर्यंत तो यहोवाचा विश्‍वासू सेवक राहिला आणि एस्तरही एक विश्‍वासू साक्षीदार आहे.

मला एक गोष्ट नेहमी आठवते, की मला अनेक विश्‍वासू ख्रिस्ती बंधू व भगिनींबरोबर मैत्री करता आली. बेथेलमध्ये माझी आतापर्यंत ६७ वर्षांची आनंदी सेवा झाली आहे. मी लग्न केलं नाही तरी मला अनेक आध्यात्मिक मुलं/मुली आणि नातवंडं आहेत. शिवाय, संपूर्ण जगभरातील आपल्या आध्यात्मिक कुटुंबातील नवीन प्रिय सदस्यांचा देखील मी विचार करतो ज्यांना मला अजून भेटायचं आहे; हे सर्वजण मौल्यवान आहेत. “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो” हे शब्द किती खरे आहेत!—नीतिसूत्रे १०:२२.

[तळटीप]

a मार्च ८, १९३२ साली माझा बाप्तिस्मा झाला. म्हणजे, मी पायनियर व्हायचं की नाही हे ठरल्यानंतर खरं तर माझा बाप्तिस्मा झाला.

[२० पानांवरील चित्र]

डावीकडून उजवीकडे: बाबा, त्यांच्या मांडीवर माझा भाऊ जॉन, एस्तर, मी आणि आई

[२३ पानांवरील चित्रे]

१९४५ साली एका गिलियड वर्गात शिकवत असताना

वर उजवीकडे: एडवॉरदो केलर, फ्रेड फ्रान्झ, मी आणि अल्बर्ट श्रोडर - सर्व गिलियडचे शिक्षक

[२४ पानांवरील चित्र]

यहोवाच्या सेवेतील माझ्या समृद्ध जीवनावर विचार करताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा