योग्य मार्ग आपल्याला कोण दाखवू शकतो?
आज योग्य सल्ला आणि मदत मिळवण्याकरता लोक पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहेत. मानसिक आरोग्य तज्ज्ञ हिन्ट्स लेहमन याचे कारण सांगतात: “[आजच्या समाजात] पुष्कळ कमतरता आहेत. पहिल्या सारखी संस्कृती आता नाही. पहिल्यासारखा आज लोकांचा धर्मावर विश्वास राहिला नाही. पूर्वीसारखी स्थिर कुटुंबे नाहीत. . . . त्यामुळे समस्या वाढतच चालल्या आहेत, त्यावरील उपाय हाती लागत नाही.” एरिक मायसल नावाचा एक लेखक म्हणतो: “पूर्वी लोक, त्यांच्या मानसिक व शारीरिक समस्या घेऊन भगत, साधूसंत, पाळक किंवा फॅमिली डॉक्टरकडे जायचे. पण आता स्वतःहून उपाय शोधता येतील असा दावा करणाऱ्या पुस्तकांचा ते आधार घेऊ लागले आहेत.”
अमेरिकन सायकालॉजिकल असोशिएशनच्या मते, अशी पुस्तके “काही प्रमाणात चांगला सल्ला देत असली तरी, . . . जाहिरातींमध्ये मात्र त्यांच्याबद्दल फारच अतिरेक करून सांगितले जाते.” टोरोन्टो स्टार नावाच्या बातमीपत्रात एका लेखकाने म्हटले: “धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांचा फायदा घेणाऱ्या अशा सेल्फ हेल्प पुस्तकांपासून, कॅसेट्सपासून व चर्चासत्रांपासून सावध राहा. कारण या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी कमी वेळात आणि ते सुद्धा फारशी मेहनत न घेता उत्तम परिणाम मिळतील असा दावा करतात.” हे खरे आहे की काही सज्जन लोक खरोखरच गरजू लोकांची मदत करू इच्छितात. पण काही भामटे आणि बेईमान लोक गैरफायदा उचलतात हे ही विसरून चालणार नाही. असे लोक गरजवंताना मदतीचा हात देण्याऐवजी त्यांना धुडकावतात.
मग आपण मदतीसाठी कोणावर भरवसा ठेवू शकतो? आणि प्रत्येक वेळा कामी येणारा सल्ला व मदत आपल्याला कोठे मिळू शकेल?
प्रत्येक वेळा कामी येणारे मार्गदर्शन
हेन्री वॉर्ड बीचर नावाच्या एका १९ व्या शतकातील प्रचारकाने म्हटले: “आपल्या मार्गदर्शनासाठी देवाने एक नकाशा दिला आहे. आणि तो म्हणजे त्याचे वचन बायबल. याच्या साहाय्याने आपण योग्य मार्गाक्रमण करू शकतो. आणि आपल्या इष्ट ठिकाणी पोहंचताना वाटेत येणाऱ्या हरएक अडखळणावर मात करण्यास हा नकाशाच आपली मदत करू शकतो.” आणखी एका प्रचारकाने बायबलविषयी असे म्हटले: “बायबलपेक्षा चांगला सल्ला आजपर्यंत कोणीही देऊ शकले नाही. आणि बायबलचा अभ्यास आपण जसजसा करत जातो तसतसे आपल्याला कळते, की बायबल बुद्धी व ज्ञानाचे भांडार आहे!” मग यातील सल्ल्याकडे आपण गंभीरतेने लक्ष का दिले पाहिजे?
बायबल स्वतःच याचे उत्तर देते. ते म्हणते: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७) बायबलमध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्याला जीवन देणाऱ्या यहोवा देवाकडून आहेत. (स्तोत्र ३६:९) स्तोत्र १०३:१४ येथे म्हटले आहे की, “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” होय, यहोवा देव आपल्याला चांगल्याप्रकारे ओळखतो. म्हणूनच बायबलद्वारे तो जो काही सल्ला आपल्याला देतो तो आपल्या भल्याकरताच असणार असा पूर्ण भरवसा आपण ठेवू शकतो.
कोणत्याही परिस्थितीत आपण बायबलमधील तत्त्व आणि मार्गदर्शन यानुसार वागलो तर आपला फायदाच होतो. बायबलद्वारे यहोवा आपल्याला म्हणतो: “हाच मार्ग आहे; याने चला.” (यशया ३०:२१) पण बायबल आजच्या काळात आपल्या समस्यांचे निरसन करू शकते का? पाहू या.
बायबल . . .
चिंतांवर मात करायला आपली मदत करते. ते म्हणते: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) पैशाची तंगी, लैंगिक किंवा शाब्दिक दुर्व्यवहार अथवा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू यांमुळे आपण दुःखी किंवा चिंतेत असतो तेव्हा प्रार्थना आपली मदत करू शकते का? पुढील अनुभवांवर विचार करा.
आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचे जॅकीला कळाले तेव्हा तिच्यावर जणू आभाळच कोसळले. ती म्हणते: “मी माझ्या मुलीला या संकटातून वाचवू शकले नाही ही भावना मला सतत सतावत होती; मला काय वाटतं होतं ते मला शब्दात सांगता येणार नाही. पण मी स्वतःला दोषी समजू लागले, मला स्वतःचा राग येऊ लागला. या भावना माझ्या सुखी संसारात जणू विष कालवत होत्या. मला यहोवाच्या मदतीची अत्यंत गरज होती.” जॅकीनं फिलिप्पैकर ४:६, ७ वचने अनेकदा वाचली आणि त्यातील सल्ला लागू केला. ती म्हणते: “मी यहोवाला रोज प्रार्थना करू लागले, की ‘यहोवा मला साहाय्य कर, माझ्या मनात सारख्या घोळत राहणाऱ्या या भावना काढून टाकण्यासाठी माझी मदत कर.’ आणि यहोवानं खरंच माझी मदत केली. प्रार्थनेमुळे मी हळूहळू स्वतःला सावरू शकले. आता मी माझं मन शांत ठेवू शकते.”
कधीकधी, काही समस्यांमुळे तुम्हाला वाटले असेल की तुमची परिस्थिती सुधरण्यापलिकडची आहे. आणि यामुळे तुम्ही खूपच निराश झाला असाल. अशावेळी प्रार्थना करण्याबद्दलच्या बायबलमधील सल्ल्यामुळे तुम्हाला मदत मिळू शकते. हेच तर स्तोत्रकर्ता आपल्याला सांगतो: “आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धि करील.”—स्तोत्र ३७:५.
आपले मनोधैर्य वाढवते. कृतज्ञ होऊन स्तोत्रकर्त्याने म्हटले: “हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे; जनसभांत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन.” (स्तोत्र २६:८, १२) यहोवाची उपासना करण्याकरता आपण नियमितरीत्या एकत्र आले पाहिजे असे बायबल सांगते. पण ख्रिस्ती बंधूभगिनींच्या अशा एकत्र येण्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? याबद्दल इतरांचा काय अनुभव आहे?
बेकी म्हणते: “माझे आईवडील सत्यात नाहीत. त्यामुळे मी जेव्हा सभांना जाते किंवा सेवेला जाते तेव्हा ते मला खूप त्रास देतात. मी मोठ्या मुश्कीलीनं सभांना उपस्थित राहते.” पण नियमित सभांना आल्यामुळे तिला खूप आशीर्वाद मिळाले आहेत असे ती म्हणते. याविषयी ती म्हणते: “सभांमुळे माझा विश्वास मजबूत होतो. त्यामुळेच मी शाळेत, घरात आणि बाहेर यहोवाची सेवा करत असताना येणाऱ्या समस्यांना धैर्याने तोंड देऊ शकते. राज्य सभागृहातील भाऊबहिणी शाळेतल्या माझ्या मित्रांपेक्षा किती वेगळे आहेत! ते मला खूप मदत करतात आणि त्यांच्याशी बोलताना मला नेहमी प्रोत्साहन मिळतं. हेच माझे खरे मित्र आहेत!”
सभांना नियमितरीत्या जाण्याविषयी बायबलमधील सल्ला आपण ऐकला तर यहोवा आपल्याला निश्चितच उत्तेजन देतो. “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो,” हे स्तोत्रकर्त्याचे शब्द किती खरे आहेत यांचा अनुभव आपल्याला या सभांमध्येच येतो.—स्तोत्र ४६:१.
आपल्याला समाधानकारक व फायदेकारक काम देते. बायबल म्हणते: “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.” (१ करिंथकर १५:५८) ‘प्रभूचे काम’ खरोखरच समाधानकारक आहे का? ख्रिस्ती सेवेद्वारे खरोखरच आपण लाभदायक असे काही साध्य करू शकतो का?
अमिल्याला काय वाटते ते पाहा. ती म्हणते: “मी अशा एका जोडप्याबरोबर बायबल अभ्यास केला ज्यांच्या कौटुंबिक जीवनात खूपच समस्या होत्या. तसेच, मी अशाही एका स्त्रीबरोबर बायबल अभ्यास केला जिच्या मुलीचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला होता. मेल्यानंतर माणसांचे काय होते हा प्रश्न तिला भेडसावत होता. आणि त्याबद्दल तिला जाणून घ्यायचे होते. या दोन्ही बाबतीत, बायबल तत्त्वांचे पालन केल्याने त्यांच्या जीवनाला उद्देश मिळाला. आणि त्यांना मदत करण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप आनंद व समाधान मिळालं.” स्कॉट म्हणतो: “तुम्हाला क्षेत्र सेवेत एखादा चांगला अनुभव आला असेल किंवा तुम्ही एक नवीन बायबल अभ्यास सुरू केला असेल किंवा अनौपचारिक साक्ष देण्यात तुम्हाला यश मिळाले असेल तर ते तुम्ही सहजासहजी विसरून जात नाही. कित्येक वर्षांनंतरही तुम्हाला या सर्व गोष्टी आठवतात. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या आठवतात तेव्हा तेव्हा तुम्हाला पहिल्या सारखाच आनंद होतो. सेवेतून मिळणारा आनंद अतुलनीय व कायम टिकणारा असतो.”
सेवेमध्ये सक्रिय होण्याविषयी बायबलमधला सल्ला ज्या सर्व लोकांनी अनुसरला त्यांना समाधानकारक व लाभदायक काम मिळाले. तुम्हालाही आम्ही या कामात सहभाग घेण्याचे उत्तेजन देतो. याद्वारे तुम्ही इतरांना देवाच्या मार्गांचे, त्याच्या तत्त्वांचे शिक्षण देऊ शकता. याचा फायदा तुम्हाला आणि तुमचे ऐकणाऱ्यांनाही होईल.—यशया ४८:१७; मत्तय २८:१९, २०.
देवाच्या वचनातून लाभ मिळवणे
आजच्या जगात कामी येणारे भरवसालायक मार्गदर्शन केवळ बायबलमध्येच मिळते यात काही शंका नाही. याचा लाभ मिळवण्याकरता आपल्याला रोज बायबल वाचावे लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातील गोष्टींवर मनन करावे लागेल. पौलाने म्हटले: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यात गढून जा.” (१ तीमथ्य ४:१५; अनुवाद ११:१८-२१) बायबलमधील सल्ला तुम्ही लागू केला तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल याची यहोवा देव स्वतः खातरी देतो. तो म्हणतो: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, . . . तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६.
[३१ पानांवरील चित्रे]
बायबलमधील सल्ला लागू केल्याने जीवनाला उद्देश तर मिळतोच पण त्यामुळे समाधानही लाभते