एका तत्त्वासाठी त्याने आपला प्राण दिला
“यहोवाचा साक्षीदार असलेल्या ऑगस्ट डिकमनच्या (जन्म १९१०) स्मरणार्थ.” हे शब्द भिंतीत बसवलेल्या एका फलकावरील आहेत. चित्रात दाखवल्याप्रमाणे हा फलक सॅक्सेनहाउसन येथे पूर्वी असलेल्या छळछावणीत आहे. अलिकडेच, या फलकाचे अनावरण करण्यात आले. पण यहोवाच्या या साक्षीदाराला हा बहुमान कसा काय मिळाला? फलकावरील पुढील शब्द आपल्याला याचे उत्तर देतील. “धार्मिक कारणांवरून त्याने लष्करी सेवा नाकारल्यामुळे सप्टेंबर १५, १९३९ रोजी एसएस [गाड्र्सनी] सर्वांसमक्ष गोळ्या झाडून [त्याला] ठार मारले.”
ऑगस्ट डिकमनला १९३७ साली सॅक्सेनहाउसन येथील छळछावणीत पाठवण्यात आले होते. सन १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि तीन दिवसांनी ऑगस्टला, लष्करी सेवेत भरती होण्याच्या कागदावर सही करायची आज्ञा देण्यात आली. त्याने नकार देताच, छावणीच्या कमांडरने एसएस (शुट्सस्टॉफल, हिटलरचे निवडक रक्षक) यांचा प्रमुख, हेन्रीक हिमलर याच्याशी संपर्क साधून डिकमनवर छावणीतील इतर सर्व कैद्यांसमक्ष गोळ्या झाडण्याची परवानगी मागितली. जर्मनीतील द न्यू यॉर्क टाईम्सने सप्टेंबर १७, १९३९ रोजी ही बातमी छापली: “२९ वर्षीय ऑगस्ट डिकमनला फायरींग स्कॉडने गोळ्या झाडून ठार मारले.” डिकमन हा धार्मिक कारणामुळे लष्करी सेवेत भरती होण्यास नकार देणारा पहिला जर्मन होता, अशी बातमी त्या बातमीपत्रकाने दिली.
साठ वर्षांनंतर म्हणजे सप्टेंबर १८, १९९९ रोजी, ब्रॅन्डनबर्ग मेमोरियल फाऊन्डेशनने डिकमनच्या मृत्यूचा स्मृतिदिन साजरा केला. हा स्मारक फलक, लोकांना डिकमनच्या धैर्याची व मजबूत विश्वासाची साक्ष देतो. छावणीबाहेरच्या भिंतीवरील दुसरा फलक, डिकमन आपल्या विश्वासांमुळे सॅक्सेनहाउसन येथे छळ सहन करणाऱ्या सुमारे ९०० यहोवाच्या साक्षीदारांपैकी केवळ एक होता याची साक्ष देतो. इतर छावण्यांतही पुष्कळ साक्षीदारांचा अमानुष छळ करण्यात आला. छळछावण्यांतील या भयाण परिस्थितीतही अनेकजण ईश्वरी तत्त्वांना विश्वासूपणे जडून राहिले.
“वरिष्ठ [सरकारी] अधिकाऱ्यांच्या अधीन” असणे हे एक ख्रिस्ती कर्तव्य आहे असे प्रत्येक यहोवाचा साक्षीदार मानतो. (रोमकर १३:१) परंतु सरकार जेव्हा त्यांना देवाच्या नियमांचे उल्लंघन करायला सांगते तेव्हा मात्र ते ख्रिस्ताच्या प्रेषितांचे अनुकरण करतात ज्यांनी म्हटले होते, की “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रेषितांची कृत्ये ५:२९) म्हणूनच, जातीधर्माच्या झगड्यांमुळे मानवतेला काळीमा फासणारी कृत्ये घडत असणाऱ्या या जगात राहत असताना, संपूर्ण विश्वभरातील यहोवाचे साक्षीदार मात्र, ऑगस्ट डिकमनप्रमाणे शांतीने राहतात. “वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाइटाला जिंक,” या बायबलच्या सल्ल्याचे ते अनुकरण करतात.—रोमकर १२:२१.