यहोवाच्या नावाला गौरव आणणारे आनंदी विवाहसोहळे
दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात १९८५ साली वेल्श आणि एल्थीचा विवाह झाला. कधीकधी ते झिंझी या त्यांच्या मुलीबरोबर आपल्या लग्नाचा आल्बम पाहतात तेव्हा त्या आनंदी दिवसाचे चित्र त्यांच्या डोळ्यापुढे उभे राहते. लग्नाला आलेले पाहुणे आणि नटलेल्या आपल्या आईला पाहून झिंझी किती खूष होते.
सोवेटोच्या एका सामाजिक सभागृहात हा विवाहसोहळा पार पडला होता. सुरवातीला लग्नाचे भाषण देण्यात आले. भाषणानंतर ख्रिस्ती युवकांच्या एका गटाने आपल्या मधुर आवाजात राज्यगीते गायिली. नंतर, लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांनी भोजनाचा स्वाद घेतला. भोजनाच्या वेळी राज्य गीतांची कॅसेट मंद आवाजात वाजत होती. तेथे कोणालाही ड्रिंक्स देण्यात आले नव्हते. मोठ्याने संगीत लावले नव्हते किंवा कोणी बेहोष होऊन नाचत नव्हते. उलट, लग्नाला आलेले सर्व पाहुणे एकमेकांबरोबर गप्पागोष्टी करण्यात गुंतले होते. लग्नाला आलेल्या सर्वांनी नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यक्रम तीन तासांत उरकला. ख्रिस्ती मंडळीतले वडील बंधू रेमण्ड म्हणाले: “तुमचा लग्नाचा दिवस मला अजूनही आठवतो. खूप छान झालं होतं तुमचं लग्न.”
वेल्श आणि एल्थिया हे दोघेही लग्नाआधी दक्षिण आफ्रिकेतील वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या शाखा दफ्तरात स्वयंसेवक म्हणून सेवा करत होते. त्यामुळे त्यांचा विवाहसोहळा अगदी साधासुधाच होता. काही ख्रिश्चनांनी, भपकेदार विवाहसोहळा करता यावा म्हणून पूर्ण वेळेची सेवा सोडली आणि बाहेर नोकरी करून लग्नासाठी पैसे जमवले. पण आपले लग्न अगदी साध्यासुध्या पद्धतीने पार पडले याची वेल्शला आणि एल्थियाला कोणत्याही प्रकारची खंत नाही. लग्नात अवाढव्य खर्च न केल्यामुळेच त्या दोघांना त्यांच्या पहिल्या मुलीचा, झिंझीचा जन्म होईपर्यंत पूर्ण वेळेची सेवा करता आली.
परंतु समजा, एखाद्या जोडप्याला लग्नात पिक्चरची किंवा इतर गाणी लावायची असतील किंवा नाचण्याचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर? लग्नाला आलेल्या पाहुण्यांना ड्रिंक्स द्यायची इच्छा असेल तर? विवाहसोहळा अगदी थाटामाटात करायचा असेल तर? हा सोहळा, देवाच्या उपासकांना शोभेल असा एक आनंदी सोहळा असेल याची खात्री ते कशी करू शकतील? हे प्रश्न विचारात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण बायबलमध्ये आपल्या सर्वांना अशी आज्ञा देण्यात आली आहे की, “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१.
रंगेलपणा टाळा
विवाहसोहळ्याच्या वेळी वातावरण किती आनंदी असते. त्या प्रसंगी कोणीही गंभीर किंवा उदास नसते. पण, अति तेथे माती असे म्हणतात त्यानुसार विवाहसोहळ्यातील आनंदाच्या उधाणावर नियंत्रण नसल्यास तेथे अनैतिक काम घडण्याची दाट शक्यता असते. साक्षीदार नसलेल्या लोकांमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांत देवाचा अनादर करणाऱ्या गोष्टी सर्रासपणे घडतात. जसे की, अगदी तर्र होईपर्यंत दारू पिणे ही तर सर्वसामान्य गोष्ट मानली जाते. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे काही साक्षीदारांच्या विवाह सोहळ्यादरम्यानही अशा गोष्टी घडल्या आहेत.
“मद्य गलबला करणारे आहे,” असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. (नीतिसूत्रे २०:१) “गलबला” असे भाषांतर केलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ “गोंधळ” असा होतो. दारू पिऊन तर्र झालेली व्यक्ती किती गोंधळ माजवते हे आपल्याला माहीतच आहे, तर मग अनेक लोक दारू पिऊन बेभान झाल्यानंतर काय होईल याची फक्त कल्पनाच केलेली बरी! अशावेळी ‘दारूबाजी, रंगेलपणा आणि इतर’ गोष्टींशिवाय आणि काय घडणार? या गोष्टींना बायबलमध्ये “देहाची कर्मे” असे म्हटले आहे. अशी कामे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात सार्वकालिक जीवन मिळणार नाही.—गलतीकर ५:१९-२१.
“रंगेलपणा” यासाठी वापरण्यात आलेला ग्रीक शब्द, रस्त्यावरून दारूच्या नशेत धुंद होऊन धांगडधिंगा करत जाणाऱ्या तरुणांचे वर्णन करण्याकरता वापरण्यात आला होता. एखाद्या विवाहसोहळ्यात दारूचा अतिरेक होत असल्यास, लाऊडस्पीकर्स जोरजोराने किंचाळत असल्यास आणि कानात वारे शिरल्याप्रमाणे लोक नाचत असल्यास त्याठिकाणी अनैतिक कार्य घडण्याची शक्यता आहे. आणि अशातच, जर कोणी आध्यात्मिकरीत्या दुर्बळ असेल तर तो अगदी सहजपणे ‘जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा [किंवा क्रोधिष्ट होणे]’ यांसारखी देहाची कर्मे करण्यास प्रवृत्त होईल. ख्रिस्ती विवाहांतील आनंद हिरावून घेणारे हे प्रकार टाळण्याकरता काय केले जाऊ शकते? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर बायबल एका विवाहसोहळ्याविषयी काय सांगते त्याचा आपण विचार करू या.
येशू एका विवाहसोहळ्याला जातो
एकदा, गालील येथील काना शहरात एका विवाहसोहळ्याचे येशूला आणि त्याच्या शिष्यांना आमंत्रण मिळते. आमंत्रणाचा स्वीकार करून येशू आणि त्याचे शिष्य त्या लग्नाला जातात. या लग्नसमारंभाच्या वेळी द्राक्षारस कमी पडतो तेव्हा येशू चमत्कार करून उत्तम प्रतीचा द्राक्षारस तयार करतो. हा द्राक्षारस खूप उरतो. लग्नाच्या कार्यक्रमानंतर कितीतरी दिवस वराच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या तो नक्कीच कामी आला असेल आणि त्याबद्दल त्यांनी येशूचे वारंवार आभारही मानले असतील.—योहान २:३-११.
या विवाहसोहळ्यातून आपण पुष्कळ काही शिकू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे, येशू आणि त्याचे शिष्य या विवाहसोहळ्याला अचानक जाऊन थडकले नाहीत. बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे, की त्यांना आमंत्रण मिळाले होते. (योहान २:१, २) आणि येशूने जे दोन लग्नाच्या मेजवानींचे दृष्टान्त दिले त्यांतही त्याने म्हटले की, पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते.—मत्तय २२:२-४, ८, ९; लूक १४:८-१०.
काही देशांतील समाजांमध्ये अशी प्रथा आहे, की त्यांच्यात कोणाचाही विवाहसोहळा असला तरी समाजातील सर्वजण, मग त्यांना आमंत्रण मिळो अगर न मिळो, लग्नाला जाऊ शकतात. परंतु यामुळे ज्याचा विवाह होत असतो त्यावर कंगाल व्हायची पाळी येते. ज्या दांपत्याचा विवाह होणार आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यास, आलेल्या सर्व पाहुण्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागेल. यामुळे आपल्याला लग्नाची पत्रिका न मिळाल्यास आपण वाईट वाटून घेऊ नये, तर विवाह करू इच्छिणाऱ्या दांपत्याच्या परिस्थितीचा विचार करावा, त्यांच्या निर्णयाचा आदर करावा. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथील एक मनुष्य त्याच्या लग्नाच्यावेळी काय घडले त्याविषयी सागंतो. त्याने फक्त २०० लोकांनाच लग्नाचे आमंत्रण दिले होते. पण, २०० लोकांऐवजी ६०० लोक आले आणि त्यामुळे बहुतेकांना जेवण मिळाले नाही. अचानक येऊन थडकलेली ही पाहुणे मंडळी, त्या आठवडी केप टाऊनमध्ये फिरायला आली होती. ते लोक ज्या बसने आले होते त्या बसचा कंडक्टर म्हणे, वधूचा दूरचा नातेवाईक होता. त्याला वाटले, की मुलगी आपलीच नातेवाईक आहे तर तिच्या लग्नाला आमंत्रण कशाला पाहिजे. म्हणून तो आपल्यासोबत बसमधील सर्वांनाच त्या लग्नाला घेऊन आला, आणि तेसुद्धा वधू किंवा वराला काहीही सूचना न देता!
लग्नाला सर्व जण येऊ शकतात असे जोपर्यंत स्पष्टपणे सांगितले जात नाही तोपर्यंत तरी, येशूचा जो खरोखर अनुयायी आहे तो आमंत्रणावाचून लग्नाला अचानक जाऊन थडकणार नाही व तेथील पाहुणचार घेणार नाही. ज्यांना अचानक किंवा आमंत्रण नसतानाही लग्नाला जावेसे वाटते त्यांनी स्वतःला विचारावे: ‘मी जर असं अचानक गेलो तर, माझ्या या वागण्यावरून नवदांपत्याबद्दल मला प्रेम आहे हे दिसेल का? यामुळे, त्यांच्या आनंदावर विरजण तर पडणार नाही?’ आपल्याला लग्नाचे आमंत्रण मिळाले नाही म्हणून फुगून बसण्यापेक्षा एक समजदार ख्रिस्ती प्रेमळपणे नवदांपत्याला एखादे कार्ड पाठवू शकतो, यहोवाच्या आशीर्वादांच्या शुभेच्छा देऊ शकतो. इतकेच काय तर नवदांपत्याला आनंदाचा सुखद धक्का देण्यासाठी त्यांना एखादे बक्षीस देखील पाठवू शकतो.—उपदेशक ७:९; इफिसकर ४:२८.
कोण जबाबदार आहे?
भारताप्रमाणे आफ्रिकेच्याही काही भागांमध्ये, घरातील किंवा नातेवाईकांतील वडीलमंडळी लग्नाची सर्व तयारी करतात. लग्न करणारे दांपत्य याबद्दल त्यांचे आभारही मानतील. कारण यामुळे त्यांना खर्चाची काळजी करावी लागत नाही. आणि जे काही होईल त्यासाठी आपण जबाबदार नाही असेही त्यांना वाटेल. पण, सदिच्छा बाळगणाऱ्या या नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारची मदत स्वीकारायच्या आधी, विवाह करणाऱ्या जोडप्याने याची खात्री करून घ्यावी, की विवाह सोहळ्यादरम्यान जे काही होईल त्याचा अंतिम निर्णय त्यांनीच घेतलेला असेल.
येशू “स्वर्गातून” आलेला देवाचा पुत्र असला तरी, काना येथील विवाह प्रसंगी त्याने सर्व गोष्टींचा ताबा स्वतःकडे घेतल्याचा उल्लेख आपल्याला कोठेही आढळत नाही. (योहान ६:४१) उलट, बायबल अहवाल आपल्याला सांगतो, की तेथे एक ‘भोजनकारभारी’ होता. (योहान २:८) आणि या भोजन कारभाऱ्याला, नवीन कुटुंबप्रमुखाला म्हणजेच वराला सर्व गोष्टींचा हिशेब द्यायचा होता.—योहान २:९, १०.
यहोवा देवाने पतीला कुटुंबाचा प्रमुख म्हटले आहे; तेव्हा, ख्रिस्ती नातेवाईकांनी नवीन कुटुंबप्रमुखाचा मान राखला पाहिजे. (कलस्सैकर ३:१८-२०) यामुळे त्याच्या लग्नाच्या वेळी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीस तो जबाबदार असेल. अर्थात, कोणताही निर्णय घेताना त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीच्या, आपल्या आईवडिलांच्या आणि सासूसासऱ्यांच्या इच्छेलाही मान दिला पाहिजे. तरीपण जर नातेवाईकांनी नवदांपत्याच्या मर्जीच्या विरुद्ध जाऊन स्वतःच सर्व गोष्टी आपल्या हातात देण्याची गळ घातली तर नवदांपत्याने नम्रपणे त्यांना नकार द्यावा व आपल्या साध्यासुध्या परंतु सभ्य विवाहाचा खर्च स्वतःच उचलावा. यामुळे शेवटपर्यंत खंत वाटत राहील असे काहीही अनुचित तेथे घडणार नाही. उदाहरणार्थ, आफ्रिकेत एका ख्रिस्ती व्यक्तीच्या विवाहाच्या वेळी, सत्यात नसलेल्या एका नातेवाईकाने भोजनसमारंभाची सुरवात करण्याआधी सर्वांपुढे जाऊन मृत पूर्वजांच्या नावाने पाहुण्यांना ड्रिंक्स दिले!
कधीकधी असे होते, की नवदांपत्य त्यांच्या विवाहाचा कार्यक्रम पूर्णपणे संपायच्या आधीच मधूचंद्रासाठी निघून जातात. अशावेळी, कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत बायबलच्या तत्त्वांचे पालन होईल व कार्यक्रम उचित वेळी समाप्त होईल याची खात्री करून घेणाऱ्या कोणा जबाबदार व्यक्तीची व्यवस्था करावी.
काळजीपूर्वक आयोजन व संतुलन
येशू ज्या लग्नाला गेला होता तेथे मेजवानी देण्यात आली होती असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे त्यामुळे लग्नात भरपूर खाण्याचे पदार्थ, पक्वान्ने देण्यात आली असतील. आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे तेथे पुष्कळ द्राक्षारस देखील होता. यात काही संशय नाही की तेथे उचित व सभ्य नाचगाणेही झाले असावे; कारण यहुदी समाजात नाचगाणे ही सर्वसामान्य गोष्ट मानली जायची. येशूने उधळ्या पुत्राचा जो दृष्टान्त दिला त्यात या गोष्टीचा उल्लेख आहे. आपला पश्चात्तापी मुलगा पुन्हा घरी आल्यानंतर त्याच्या वडिलांना इतका आनंद झाला की ते म्हणाले: “आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू.” येशूने म्हटले की त्या आनंदोत्सवात “गायनवादन व नृत्य” यांचाही समावेश होता.—लूक १५:२३, २५.
परंतु, काना येथील विवाह सोहळ्यादरम्यान नाचगाणे होते याविषयी बायबलमध्ये स्पष्ट उल्लेख नाही. खरे तर बायबलमध्ये, कोणत्याही लग्नाच्या वृत्तान्तात नाचगाणे झाल्याचा उल्लेख आढळत नाही. असे दिसते, की प्राचीन काळांतील देवाच्या विश्वासू सेवकांमध्ये नाचणे, हे प्रसंगानुसार असायचे. लग्न म्हणजे नाचगाणे असलेच पाहिजे असे नव्हते. तेव्हा, यावरून आपल्याला काही शिकायला मिळते का?
आफ्रिकेतील यहोवाच्या साक्षीदारांच्या काही विवाहप्रसंगी लाऊडस्पीकर मोठ्या आवाजात लावलेले असतात. तेथे इतका गोंगाट असतो की पाहुण्यांना एकमेकांबरोबर ओरडूनच बोलावे लागते. एखादवेळी भोजन कमी पडेल पण नाचण्याला मात्र ऊत आलेला असतो. यामुळे असे प्रसंग विवाहसोहळ्यापेक्षा नाचगाण्याच्या पार्ट्याच वाटू लागतात. आणि जोराने लावलेल्या संगीतामुळे टवाळखोर किंवा अनोळखी लोक आकर्षित होतात. त्यांना यायला आमंत्रण लागत नाही.
बायबल काळांतील विवाहांच्या अहवालांत नाचगाण्यावर जास्त जोर दिलेला नाही. यावरून, यहोवाचा सन्मान होईल असा विवाह करू इच्छिणाऱ्या नवदांपत्याला काही मार्गदर्शन मिळते. अलीकडे, दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अनेक विवाहसोहळ्यांची तयारी करताना असे दिसून आले, की विवाहाच्या पार्टीची योजना करण्यासाठी ज्या ख्रिस्ती युवकांना निवडण्यात आले होते त्यांनी अतिशय अवघड अशा नृत्य चालींची तालीम करण्यात कितीतरी वेळ घालवला होता. कित्येक महिने त्यांच्या या तालमी चालल्या होत्या. परंतु ख्रिश्चनांनी, “जे श्रेष्ठ [जास्त महत्त्वाचे]” आहे त्यासाठी, अर्थात सुवार्तेचा प्रचार, व्यक्तिगत अभ्यास आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे यांसारख्या गोष्टींसाठी “वेळेचा सदुपयोग” करू नये का?—इफिसकर ५:१६; फिलिप्पैकर १:१०.
काना येथील विवाहसोहळ्याच्या वेळी येशूने ज्या प्रमाणात द्राक्षारस बनवला होता त्यावरून असे दिसते की तो विवाहसोहळा मोठा व थाटामाटाचा होता. पण आपण याची खात्री बाळगू शकतो की त्या विवाहसोहळ्यात गलबला किंवा गोंधळ मुळीच नव्हता आणि तेथील पाहुण्यांनी देखील यहुद्यांच्या काही विवाहसोहळ्यांप्रमाणे दारू पिऊन गोंधळ घातला नाही. (योहान २:१०) कशावरून आपण असे म्हणू शकतो? कारण त्या लग्नाला खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आला होता. ‘मद्यपी लोकांच्या वाऱ्यांस बसू नको,’ या वाईट संगतीविषयी देवाने दिलेल्या आज्ञेचे पालन येशूने नक्कीच केले असावे.—नीतिसूत्रे २३:२०.
यास्तव, एखाद्या दांपत्याला त्यांच्या विवाहसमारंभात लोकांना ड्रिंक्स देण्याची इच्छा असल्यास, त्यांनी कोणा जबाबदार व्यक्तीला या कामासाठी नेमावे. पार्टीदरम्यान त्यांना संगीत हवे असल्यास, त्यांनी उचित संगीत निवडावे आणि संगीताचा आवाज किती असावा याची माहिती एखाद्या जबाबदार व्यक्तीला आधीच द्यावी. ही जबाबदारीची कामे बेजबाबदार पाहुण्यांना न दिल्यास उत्तम; नाहीतर ते, पार्टीदरम्यान ख्रिश्चनांना न शोभणारे संगीत लावतील, किंवा गोंधळ होईल इतक्या मोठ्या आवाजात संगीत लावतील. पार्टीत नाचण्याची काही योजना केली असल्यास नृत्यातील सभ्यतेकडे जास्त लक्ष द्यावे. सत्यात नसलेले नातेवाईक किंवा प्रौढ नसलेले ख्रिस्ती असभ्य किंवा कामोत्तेजक हालचाली करत असल्यास, ज्याचा विवाह आहे त्या बांधवाला अशा लोकांचे नाचजाणे थांबवावे लागेल. त्याने असे न केल्यास तेथे गोंधळ माजू शकतो आणि आध्यात्मिकरीत्या दुर्बळ असलेल्यांसाठी एक अडखळण होऊ शकते.—रोमकर १४:२१.
म्हणूनच अनेक ख्रिस्ती बांधवांनी आपल्या विवाह सोहळ्यादरम्यान नृत्य, संगीत किंवा मोठ्या प्रमाणात ड्रिंक्स न देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही लोकांनी त्यांना टोमणेसुद्धा मारले. उलट, देवाच्या पवित्र नावाला कोणत्याही प्रकारचा बट्टा लागू नये म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे. काही बंधू आपल्या विवाहाच्या वेळी उचित संगीत निवडतात, नृत्याची व उचित प्रमाणात ड्रिंक्स देण्याची योजना करतात. एक गोष्ट मात्र खरी आहे, आणि ती म्हणजे विवाह करणारा बांधव त्याच्या विवाहाच्या वेळी सर्व गोष्टींसाठी जबाबदार असतो.
आफ्रिकेत अनेक ख्रिस्ती लोकांनी अशाप्रकारे सभ्यपणे विवाह केला तेव्हा काही असमंजस लोकांनी त्यांची थट्टा करत असे म्हटले, की ‘असं वाटतंय, आपण लग्नाला नव्हे कोणाच्या तरी अंत्यसंस्काराला आलोय.’ पण हा दृष्टिकोन उचित नाही. पापी देहाच्या कर्मांमुळे मिळणारा आनंद क्षणभंगूर असतो; या कर्मांमुळे त्यांचा विवेक त्यांना सतत बोचत राहतो व अशा कामांमुळे देवाच्या नावाला कलंक लागतो. (रोमकर २:२४) परंतु, देवाच्या पवित्र आत्म्यामुळे खरा आनंद मिळतो. (गलतीकर ५:२२) पुष्कळ ख्रिस्ती लोकांना त्यांच्या लग्नाच्या दिवसाची आठवण होते तेव्हा अभिमान वाटतो कारण तो दिवस “अडखळण्यास कारण” ठरणारा नव्हे तर सर्वांसाठी आनंदाचा दिवस होता.—२ करिंथकर ६:३.
वेल्श आणि एल्थिया यांना, त्यांच्या लग्नाला आलेल्या सत्यात नसलेल्या नातेवाईकांनी काढलेले प्रशंसोद्गार अजूनही आठवतात. एकाने असे म्हटले होते: “आजकालच्या विवाहसोहळ्यांत नुसता धांगडधिंगा असतो. आम्हाला तर कंटाळा आलाय या सर्वांचा. पण तुमचा विवाहसोहळा मात्र आदर्श होता.”
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विवाहाच्या आनंदाच्या प्रसंगी सभ्यतेकडे विशेष लक्ष दिले जाते तेव्हा विवाहाचा जनक असलेल्या यहोवा देवाचा महिमा होतो.
[२२ पानांवरील चौकट/चित्र]
विवाहसमारंभावेळी लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी
• सत्यात नसलेला एखादा नातेवाईक लग्नसमारंभात लहानसे भाषण देणार असेल तर तो बायबलच्या विरुद्ध असलेल्या प्रथेनुसार काही करणार नाही याची तुम्ही खात्री केली आहे का?
• समारंभादरम्यान तुम्हाला संगीत हवे असल्यास उचित संगीताची तुम्ही निवड केली आहे का?
• संगीताचा आवाज केवढा असेल?
• नृत्याची परवानगी असल्यास, ते सभ्य असेल का?
• ड्रिंक्स प्रमाणाबाहेर दिले जाणार नाही याची तुम्ही खात्री कराल का?
• कोणी जबाबदार बांधव याकडे जातीने लक्ष देईल का?
• विवाहसमारंभ रात्री उशिरापर्यंत तर चालणार नाही ना?
• शेवटपर्यंत सर्वकाही व्यवस्थित चालले आहे याची खात्री करणारे जबाबदार लोक असतील का?