राज्य घोषकांचा वृत्तान्त
सुखी कुटुंबामुळे लोक खऱ्या देवाकडे आकर्षित होतात
यहोवाने योसेफाला अफाट ज्ञान व समजबुद्धी दिली. (प्रेषितांची कृत्ये ७:१०) यामुळे, योसेफाने दूरदृष्टी बाळगून केलेले कार्य “फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले.”—उत्पत्ति ४१:३७.
अशाचरितीने, यहोवा आजही बायबलचा अभ्यास करणाऱ्या आपल्या लोकांना दूरदृष्टी व समजबुद्धी देतो. (२ तीमथ्य ३:१६, १७) बायबलमधील सल्ल्याचे पालन केल्यामुळे ज्ञान आणि समजबुद्धीची चांगली फळे उत्पन्न होतात. त्यांचे आचरण ‘लोकांना पटते.’ झिंबाब्वे येथील पुढील अनुभव हेच दाखवतात.
• एका स्त्रीचे शेजारी यहोवाचे साक्षीदार होते. तिला यहोवाचे साक्षीदार आवडत नसत, पण त्यांचं आचरण, विशेषकरून त्यांच्या घरातील वातावरण पाहून तिला त्यांचं कौतुक वाटायचं. त्या कुटुंबातले पतिपत्नी नेहमी खूष असायचे आणि त्यांची मुलं त्यांच्या आज्ञेत राहायची. तो पती आपल्या पत्नीवर किती प्रेम करतो ही गोष्ट तिनं विशेष पाहिली.
एखादा पती आपल्या पत्नीवर प्रेम करत असला तर, पत्नीने नक्कीच त्याला आपल्या “मुठीत” ठेवण्याकरता त्याच्यावर काही जादू केली असेल, असे काही आफ्रिकन संस्कृतींमध्ये मानले जाते. त्यामुळे ती स्त्री, साक्षीदार बहिणीकडे आली आणि तिनं तिला विचारलं: “तू आपल्या नवऱ्यावर काय जादू केलीस? ती मलाही सांगशील का? म्हणजे तुझा नवरा तुझ्यावर जसं प्रेम करतो तसं माझाही नवरा माझ्यावर प्रेम करील.” आपली बहीण म्हणाली: “हो, नक्की. उद्या दुपारी मी तुझ्या घरी येऊन तुला ती ‘जादू’ देईन.”
दुसऱ्या दिवशी साक्षीदार बहीण तिच्याकडे ती “जादू” घेऊन गेली. ती जादू काय असेल बरं? तिनं एक बायबल आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक नेलं. ज्ञान पुस्तकातून साक्षीदार बहिणीनं तिला “देवाला सन्मान देणारे कुटुंब उभारणे” हा अध्याय दाखवला आणि तिला म्हणाली: “माझा नवरा आणि मी एकमेकांना ‘मुठीत’ ठेवायला या ‘जादूचा’ उपयोग करतो. म्हणूनच आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.” अशाप्रकारे त्या स्त्रीबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला. तिनेही ती ‘जादू’ शिकून घेतली आणि पाण्याने बाप्तिस्मा घेण्याद्वारे तिने यहोवाला आपले जीवन समर्पित केले.
• झिंबाब्वे आणि मोझांबिकच्या ईशान्येजवळील एका लहानशा मंडळीतील दोन खास पायनियर, दोन आठवडे घरोघरच्या कार्याला गेले नाहीत. कारण लोकच त्यांच्या घरी येत होते. एक पायनियर बांधव त्याविषयी सांगतो: “आम्ही एका आस्थेवाईक मनुष्याचा आठवड्याचा बायबल अभ्यास घ्यायला जायचो. हा प्रवास १५ किलोमीटरचा होता आणि खूप खडतर होता. आम्हाला चिखलातून जावं लागायचं, गळ्यापर्यंत खोल पाणी असलेल्या नद्या पार कराव्या लागायच्या. आम्ही आमचे कपडे आणि बूट डोक्यावर घेऊन नदी पार करायचो आणि मग कपडे बदलायचो.
“आमची चिकाटी आणि आवेश पाहून त्या आस्थेवाईक मनुष्याचे शेजारी खूप प्रभावित झाले. एका स्थानिक धार्मिक संघटनेचा गुरूसुद्धा प्रभावीत झाला होता. तो त्याच्या अनुयायांना म्हणाला: ‘तुम्हाला त्या दोन तरुण यहोवाच्या साक्षीदारांसारखं व्हावसं वाटत नाही का?’ दुसऱ्याच दिवशी, त्या गुरूचे पुष्कळ अनुयायी आमच्या घरी आले. त्यांच्या मनात पुष्कळ प्रश्न होते. दोन आठवड्यांपर्यंत आमच्याकडे इतके लोक येत राहिले, की आम्हाला स्वयंपाक करायलाही वेळ मिळत नव्हता!”
तो गुरूसुद्धा या पायनियर बांधवांच्या घरी आला. तो बायबल अभ्यास करायला तयार झाला तेव्हा त्या दोन पायनियर बांधवांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा!