माघार घेऊन स्वतःवर नाश ओढवू नका!
“ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही.”—इब्री लोकांस १०:३९.
१. कोणत्या परिस्थितीमुळे प्रेषित पेत्राला भीती वाटली?
येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना सांगितले, की त्यांची पांगापांग होईल आणि ते सर्व त्याला सोडून जातील, तेव्हा त्यांना धक्काच बसला असेल. आपला परमप्रिय स्वामी येशू, याला आपली इतकी गरज असताना आपण त्याला सोडून जाऊ हे कसे शक्य आहे, असे त्यांना वाटले असेल. म्हणूनच पेत्र आत्मविश्वासाने म्हणाला: “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.” पेत्र तसा धैर्यवान, निर्भीड स्वभावाचा माणूस होता. पण येशूला धरून देण्यात आले तेव्हा खरोखरच सर्व प्रेषित वेगवेगळ्या दिशेला निघून गेले; आणि त्यांच्यात पेत्रही होता. नंतर, मुख्य याजक कैफा याच्या घरात येशूची उलटतपासणी चालली असताना पेत्र अंगणात अस्वस्थपणे घुटमळू लागला. रात्र सरत आली तसतशी त्याला भीती वाटू लागली; येशूला आणि आपण त्याच्यासोबत होतो म्हणून आपल्यालाही मृत्युदंड तर दिला जाणार नाही? तिथे उभे असलेल्या काही लोकांनी, पेत्र येशूचा जवळचा माणूस असल्याचे ओळखले तेव्हा तर त्याची भीतीने गाळण उडाली. येशूशी आपला कोणताही संबंध नाही असे त्याने तीन वेळा शपथेवर सांगितले. किंबहुना, त्याने येशूशी ओळखही असल्याचे नाकारले!—मार्क १४:२७-३१, ६६-७२.
२. (अ) येशूला अटक करण्यात आलेल्या रात्री पेत्राला भीती वाटली तरी तो “माघार घेणाऱ्यांपैकी” का झाला नाही? (ब) आपण कोणता निर्धार केला पाहिजे?
२ ही घटना पेत्राच्या जीवनातली एक कटू आठवण होती; दर वेळी तो क्षण आठवल्यावर त्याला नक्कीच पस्तावा होत असेल. पण त्या रात्री पेत्राने जे केले त्यामुळे तो कायमचाच भित्रा बनला का? प्रेषित पौलाच्या शब्दांत, “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी” तो बनला का? (इब्री लोकांस १०:३९) कोणीही तसे म्हणणार नाही. का? कारण पेत्राला वाटलेली भीती ही त्या क्षणापुरती होती; ती एक लहानशी चूक सोडली, तर त्याच्या सबंध जीवनात त्याने विलक्षण धैर्य आणि दृढ विश्वास दाखवला. त्याचप्रकारे, आपल्यापैकीही बऱ्याच जणांच्या गतजीवनातल्या अशा काही घटना आहेत, ज्यांची आठवण झाली की आपल्यालाच आपली लाज वाटते; असे क्षण, जेव्हा अनपेक्षितपणे परीक्षाप्रसंगात सापडून आपण इच्छा असूनही, सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू शकलो नाही. (पडताळा रोमकर ७:२१-२३.) पण निराश होण्याचे कारण नाही, अशा या क्षणिक चुकांमुळे आपण “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी” होत नाही. अर्थात, पुढेही कधी असे घडू न देण्याचा दृढसंकल्प आपण केला पाहिजे. का? आणि हे आपल्याला कसे करता येईल?
माघार घेऊन स्वतःवर नाश ओढवणे म्हणजे काय?
३. संदेष्टा एलिया व योना यांनी भीतीमुळे काय केले?
३ पौलाने ‘माघार घेणाऱ्यांच्या’ संदर्भात लिहिले तेव्हा तो अशा लोकांविषयी बोलत नव्हता, की जे पुरेसे धैर्य नसल्यामुळे क्षणभर थोडे अस्थिर होतात. पेत्राच्या बाबतीत काय झाले होते याची त्याला निश्चितच कल्पना होती, आणि अशीच इतरही उदाहरणे त्याला माहीत होती. एलिया हा अतिशय धैर्यवान आणि निर्भीड संदेष्टा असूनही, ईजबेल या दुष्ट राणीने त्याला मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा तो इतका घाबरला की आपला जीव वाचवण्यासाठी तो अक्षरशः पळून गेला. (१ राजे १९:१-४) संदेष्टा योना तर त्याच्याही दोन पावले पुढे गेला. यहोवाने त्याला हिंसाचारासाठी अतिशय कुविख्यात असलेल्या निनवे शहरात जाण्यास सांगितले. पण योना लगेच अगदी विरुद्ध दिशेला ३,५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या तार्शिशला जाणाऱ्या जहाजात चढला! (योना १:१-३) तरीसुद्धा या विश्वासू संदेष्ट्यांना किंवा प्रेषित पेत्रालाही, माघार घेणाऱ्यांपैकी समजणे योग्य ठरणार नाही. का नाही?
४, ५. (अ) इब्री लोकांस १०:३९ या वचनात पौलाने “नाश” हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला हे संदर्भावरून आपल्याला कसे कळून येते? (ब) “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही” हे पौलाने कोणत्या अर्थाने म्हटले?
४ पौलाने काय म्हटले याकडे नीट लक्ष द्या: “परंतु, ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही.” (तिरपे वळण आमचे.) “नाश” होईल असे पौलाने कोणत्या अर्थाने म्हटले? त्याने या ठिकाणी वापरलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ काहीवेळा कायमचा विनाश असा होतो आणि पौलाने याआधीच्या काही वचनांत जे म्हटले त्याच्याशी हे सुसंगत आहे. त्याने नुकतीच अशी ताकीद दिली होती की: “सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही; तर न्यायाची व विरोध्यांस गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच.”—इब्री लोकांस १०:२६, २७.
५ त्याअर्थी, “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही” असे पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना म्हटले तेव्हा तो असे म्हणत होता की त्याने आणि त्याचे हे शब्द वाचणाऱ्या विश्वासू ख्रिश्चनांनी देखील यहोवापासून कधीही दूर न जाता शेवटपर्यंत त्याची सेवा करण्याचा निर्धार केला होता. असे न केल्यास कायमचा विनाश निश्चित आहे. मागे हटून स्वतःवर नाश ओढवून घेणाऱ्यांपैकी एक होता यहुदा इस्कर्योत; तसेच, सत्याचा विरोध करणारे इतरही शत्रू होते, ज्यांनी जाणूनबुजून यहोवाच्या आत्म्याविरुद्ध कार्य केले. (योहान १७:१२; २ थेस्सलनीकाकर २:३) हेच ते “भेकड” लोक आहेत, ज्यांचा अग्नीच्या सांकेतिक सरोवरात कायमचा नाश होईल. (प्रकटीकरण २१:८) नाही, अशा लोकांपैकी होण्याची आपल्यापैकी कोणाचीही इच्छा नाही!
६. दियाबल सैतान आपल्याला कोणत्या मार्गाने नेऊ इच्छितो?
६ पण सैतानाची हीच इच्छा आहे की आपण सत्याच्या मार्गातून माघार घेऊन स्वतःवर नाश ओढवावा. “डावपेच” खेळण्यात अतिशय तरबेज असल्यामुळे त्याला माहीत आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरवात होऊन एक व्यक्ती नाशाच्या मार्गाला लागू शकते. (इफिसकर ६:११) त्यामुळे, जर छळ करूनही त्याला खऱ्या ख्रिश्चनांचा विश्वास खचवता आला नाही तर तो दुसऱ्या काही अप्रत्यक्ष मार्गांनी असे करण्याचा प्रयत्न करतो. यहोवाच्या निर्भीड, आवेशी साक्षीदारांचे कसेही करून तोंड बंद करणे हा त्याचा एकच उद्देश आहे. आता आपण हे पाहू या, की पौलाने ज्या इब्री ख्रिश्चनांना पत्र लिहिले होते त्यांच्याविरुद्ध सैतानाने कोणकोणते डावपेच उपयोगात आणले होते.
माघार घेण्याचा दबाव ख्रिश्चनांवर कसा आला
७. (अ) जेरूसलेमच्या मंडळीचा काय इतिहास होता? (ब) पौलाच्या वाचकांपैकी काहींची आध्यात्मिक स्थिती कशी होती?
७ पुराव्यानुसार पौलाने सा.यु. ६१ च्या सुमारास इब्री बांधवांना पत्र लिहिले होते. जेरूसलेममध्ये असलेल्या या मंडळीला बऱ्याच खडतर अनुभवांतून जावे लागले होते. येशूच्या मृत्यूनंतर भयंकर छळाचा डोंब उसळला; बऱ्याच ख्रिश्चनांना शहर सोडून निरनिराळ्या ठिकाणी जावे लागले. यानंतर काही काळ वातावरण शांत राहिले आणि त्यामुळे ख्रिश्चनांच्या संख्येत वाढ होऊ शकली. (प्रेषितांची कृत्ये ८:४; ९:३१) पण यानंतरच्या वर्षांतही अधूनमधून छळ आणि इतर कठीण प्रसंग येतच राहिले. मात्र पौलाने या हिब्रू ख्रिश्चनांना पत्र लिहिले तोपर्यंत पुन्हा एकदा, वातावरण आधीपेक्षा शांत झाले होते. अर्थात, या मंडळीवर वेगळ्या प्रकारचे दबाव येत होते. येशूने जेरूसलेमचा नाश होईल असे भाकीत करून आता तीस वर्षे होऊन गेली होती आणि हा उशीर काहींच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता; येशूची भविष्यवाणी आपल्या जिवंतपणी पूर्ण होणार नाही असे त्यांना वाटू लागले होते. शिवाय काही लोक विश्वासात अगदीच नवखे असल्यामुळे त्यांना भयंकर छळासारख्या कठीण परीक्षांचा अनुभव नव्हता. धीर धरण्याचा प्रसंगच आलेला नसल्यामुळे त्यांना या गुणाचे महत्त्व ठाऊक नव्हते. (इब्री लोकांस १२:४) निश्चितच सैतानाने या सर्व गोष्टींचा फायदा उचलून त्याचे “डावपेच” खेळले असतील. यांपैकी काही “डावपेच” कोणते होते?
८. नव्या, अननुभवी ख्रिस्ती मंडळीविषयी बऱ्याच यहुद्यांची मनोवृत्ती कशी होती?
८ जेरूसलेम आणि यहुदिया येथील यहुदी समाज या नव्या आणि अननुभवी ख्रिस्ती मंडळीला पाण्यात पाहायचा. यहुद्यांचे गर्विष्ठ धर्मपुढारी आणि त्यांचे अनुयायी ख्रिश्चनांना कसे हिणवत असतील याची थोडी कल्पना आपल्याला पौलाच्या पत्रावरून येते. ते कदाचित म्हणत असतील: ‘यहुदी धर्माचा त्याग करणाऱ्या या उपटसुंभ ख्रिश्चन पंथाजवळ आहे तरी काय! आमच्याजवळ पाहा, शतकानुशतके जेरुसलेममध्ये दिमाखाने उभे असलेले भव्य मंदिर आहे, तिथे सेवा करणारा पवित्र महायाजक आहे, त्याच्या हाताखाली काम करणारे याजकही आहेत; आमच्या मंदिरात दररोज यज्ञार्पणे वाहिली जातात. सिनाय पर्वतावर अद्भुत चिन्हे दाखवून खुद्द स्वर्गदूतांनी मोशेला दिलेले नियमशास्त्र आमच्याजवळ आहे. हे ख्रिस्ती आमची काय बरोबरी करणार!’ अशा या उपहासाचा ख्रिश्चनांवर काय परिणाम झाला? काही इब्री ख्रिश्चन या तिरस्कारपूर्ण बोलण्याने हवालदिल झाले होते. पण पौलाचे पत्र अगदी योग्य वेळी आले.
त्यांनी नाशाकडे कधीही माघार का घ्यायची नव्हती
९. (अ) इब्री लोकांस लिहिलेल्या सबंध पत्राचा मुख्य विषय कोणता आहे? (ब) ख्रिस्ती लोक कोणत्या अर्थाने जेरूसलेममधील मंदिरापेक्षा श्रेष्ठ मंदिरात उपासना करीत होते?
९ यहुदियातील इब्री ख्रिश्चनांनी माघार घेऊन स्वतःवर नाश ओढवून घेणे किती निरर्थक होते हे त्यांना पटवून देण्यासाठी पौलाने त्यांना दोन कारणे सांगितली. यांपैकी पहिले कारण असे की ख्रिस्ती धर्मातली उपासनापद्धत कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. हाच पौलाच्या पत्राचा मुख्य विषय होता, हे या सबंध पत्रातून प्रकर्षाने जाणवते. जेरूसलेमचे मंदिर हे भविष्यात येणाऱ्या वास्तविकतेचे अर्थात, त्यापेक्षा कितीतरी पटीने भव्यदिव्य असलेल्या आणि जे ‘हातांनी केलेले नव्हते’ अशा—यहोवाच्या आत्मिक मंदिराचे, केवळ एक प्रतीक होते. (इब्री लोकांस ९:११) आणि ख्रिश्चनांना या मंदिरात, म्हणजेच, खऱ्या उपासनेच्या आत्मिक व्यवस्थेअधीन सेवा करण्याचा बहुमान लाभला होता. नियमशास्त्राच्या करारापेक्षा श्रेष्ठ अशा कराराधीन ते सेवा करत होते आणि हजारो वर्षांपासून अभिवचन दिलेल्या या नव्या कराराचा मध्यस्थ येशू ख्रिस्त, हा मोशेपेक्षा श्रेष्ठ होता.—यिर्मया ३१:३१-३४.
१०, ११. (अ) अहरोनाच्या वंशातला नसूनही, येशू आध्यात्मिक मंदिरात महायाजक म्हणून सेवा करण्यास योग्य का होता? (ब) येशू कोणत्या प्रकारे जेरूसलेममधील मंदिरात सेवा करणाऱ्या महायाजकापेक्षा श्रेष्ठ होता?
१० ख्रिश्चनांचा महायाजक येशू ख्रिस्त हा यहुद्यांच्या महायाजकापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ होता. तो अहरोनाच्या कुळातून आलेला नव्हता. उलट तो “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे” महायाजक होता. (स्तोत्र ११०:४) मलकीसदेकाच्या पूर्वजांची कोठेही नोंद नव्हती, तो प्राचीन काळात शालेमचा राजा होता आणि महायाजक देखील. त्यामुळे येशूच्या भविष्यातील भूमिकेला त्याने अगदी योग्यपणे सूचित केले; कारण येशूला मिळालेले याजकपद कोणा अपरिपूर्ण मानवी पूर्वजामुळे नव्हे तर कितीतरी पटीने श्रेष्ठ असणाऱ्या यहोवा देवाने वाहिलेल्या शपथेमुळे मिळाले होते. मलकीसदेकाप्रमाणे येशू हा केवळ महायाजक नव्हे तर एक अविनाशी राजा देखील आहे.—इब्री लोकांस ७:११-२१.
११ शिवाय, जेरूसलेमच्या मंदिरातल्या महायाजकाप्रमाणे येशूला दर वर्षी बलिदाने देण्याची गरज नव्हती. त्याने एकदाच सर्वकाळासाठी स्वतःचे परिपूर्ण जीवन बलिदान म्हणून दिले. (इब्री लोकांस ७:२७) मंदिरात वाहिली जाणारी सर्व बलिदाने येशूने वाहिलेल्या बलिदानाच्या केवळ प्रतिरूपांप्रमाणे होती. त्याच्या परिपूर्ण बलिदानामुळे विश्वास धरणाऱ्या सर्वांना आपल्या पापांची खरी क्षमा मिळाली. पौलाने इब्री ख्रिश्चनांना आठवण करून दिली की हा महायाजक तोच येशू आहे ज्याला जेरूसलेमचे हे ख्रिस्ती बांधव ओळखत होते, आणि तो कधीही बदलणार नाही. तो नम्र अंतःकरणाचा, कृपाळू असून “आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी [त्याला] सहानुभूति” वाटते. हे शब्द खरोखर दिलासा देणारे होते. (इब्री लोकांस ४:१५; १३:८) त्या अभिषिक्त ख्रिश्चनांना ख्रिस्ताच्या महायाजक पदाखाली सहयाजक म्हणून सेवा करण्याचा बहुमान मिळणार होता! मग माघार घेऊन, भ्रष्ट झालेल्या यहुदी धर्माच्या “दुर्बळ व निःसत्व” गोष्टींकडे परत जाण्याचा विचारही करण्यात काय अर्थ होता?—गलतीकर ४:९.
१२, १३. (अ) कधीही माघार न घेण्याचे कोणते आणखी एक कारण पौलाने दिले? (ब) गतकाळात धीराने तोंड दिलेले परीक्षाप्रसंग आठवून इब्री ख्रिश्चनांना कशाप्रकारे नाशाकडे कधीही माघार न घेण्याचे प्रोत्साहन मिळाले असेल?
१२ माघार घेऊन स्वतःवर नाश न ओढवून घेण्याचे आणखी एक कारण पौलाने या इब्री ख्रिश्चनांना सांगितले. ते असे, की आजवर आलेल्या सर्व परीक्षाप्रसंगांना त्यांनी धीराने तोंड दिले होते. पौलाने त्यांना लिहिले: “पूर्वकाळचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली.” त्याने त्यांना आठवण करून दिली की कशाप्रकारे विटंबना व संकटे सोसताना त्यांचा लोकांपुढे “तमाशा झाला.” त्यांच्यापैकी काहींना बंदिवास सहन करावा लागला; तेव्हा त्यांच्या इतर बांधवांनी त्यांचे दुःख आपले समजून त्यांना आधार दिला होता. खरोखर, या सर्व संकटांना दृढ विश्वासाने व धीराने तोंड देऊन त्या इब्री ख्रिश्चनांनी आपल्याकरता एक आदर्श घालून दिला आहे. (इब्री लोकांस १०:३२-३४) पण पौलाने त्यांना ते दुःखाचे दिवस “आठवा” [“आठवत राहा,” NW] असे का म्हटले? त्या आठवणींनी त्यांचे धैर्य खचले नसते का?
१३ नाही. उलट, ‘पूर्वीचे दिवस आठवल्यामुळे’ इब्री ख्रिश्चनांना याची आठवण झाली असेल की कशाप्रकारे यहोवाने त्यांना प्रत्येक परीक्षाप्रसंगात टिकून राहण्यास मदत केली होती. आणि यहोवाच्या मदतीनेच त्यांनी आजवर सैतानाच्या कित्येक हल्ल्यांना तोंड दिले होते. पौलाने त्यांना लिहिले: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री लोकांस ६:१०) होय, यहोवा त्यांची सर्व विश्वासू कार्ये विसरला नव्हता; त्याच्या अनंत स्मृतिकोशात ती जणू जपून ठेवलेली होती. येशूने स्वर्गात संपत्ती साठवा असे सांगितले होते, त्याची येथे आठवण होते. या संपत्तीला चोरांची भीती नाही; शिवाय, तिला कसर लागणार नाही की गंज चढणार नाही. (मत्तय ६:१९-२१) किंबहुना एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने माघार घेऊन स्वतःच नाश ओढवून घेतला तरच ही संपत्ती नष्ट होऊ शकते. अशाप्रकारे माघार घेणे म्हणजे स्वर्गात साठवलेली सगळी संपत्ती आपल्याच हाताने उधळून लावण्यासारखे होईल. या मार्गावर कधीही न जाण्याचे किती जोरदार कारण पौलाने इब्री ख्रिश्चनांना दिले! इतकी वर्षे विश्वासूपणे सेवा केल्यावर सगळे श्रम मातीत मिळवण्यात काय अर्थ? शेवटपर्यंत धीर धरणेच सर्वात चांगले आणि योग्यही आहे.
आपणही कधीच नाशाकडे माघार घेऊ नये
१४. आपल्या समोर येणारी कोणती आव्हाने पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांवर आलेल्या परीक्षांसारखी आहेत?
१४ आज देखील खऱ्या ख्रिश्चनांनी कधीही माघार घेण्याचा विचार करू नये. आणि यासाठी तितकीच सबळ कारणे आहेत. एक तर, आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे की शुद्ध उपासनेच्या रूपात यहोवाने आपल्याला एक महान आशीर्वाद दिला आहे. अर्थात, पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांप्रमाणे आपल्या काळातही अधिक सुस्थापित धर्मांचे सदस्य गर्विष्ठपणे त्यांच्या मोठमोठ्या धार्मिक वास्तू आणि अतिप्राचीन परंपरांचा दाखला देऊन आपल्याला तिरस्काराची वागणूक देतात; आपला उपहास करतात. पण यहोवाकडून आपल्याला ही खात्री आहे की त्याला आपली उपासना स्वीकार्य आहे. किंबहुना, पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनाही अनुभवायला मिळाले नाही असे अद्भुत आशीर्वाद आज आपण अनुभवत आहोत. तुम्ही म्हणाल, ‘हे कसे शक्य आहे?’ कारण त्या ख्रिश्चनांच्या काळात तर आध्यात्मिक मंदिराची स्थापना झाली होती. सा.यु. २९ मध्ये ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाल्यावर तो या आध्यात्मिक मंदिराचा महायाजक बनला. त्यांच्यापैकी काहींनी आपल्या डोळ्यांनी देवाच्या पुत्राला पाहिले होते आणि त्याने केलेले चमत्कार देखील त्यांनी पाहिले होते. येशूच्या मृत्यूनंतरही चमत्कार होत राहिले. अर्थात, भाकीत केल्याप्रमाणे कालांतराने अशाप्रकारची चमत्कार करण्याची दाने संपुष्टात आली.—१ करिंथकर १३:८.
१५. आज खरे ख्रिस्ती कोणत्या भविष्यवाणीच्या पूर्णतेच्या काळात जगत आहेत, आणि याचा आपल्या उपासनेवर कोणता परिणाम झाला आहे?
१५ पण आज आपण यहेज्केलच्या ४०-४८a अध्यायांतील मंदिराच्या बहुव्यापक भविष्यवाणीची अतिशय अर्थसूचक पूर्णता होत असलेल्या काळात जगत आहोत. या भविष्यवाणीत सांगितल्यानुसार शुद्ध उपासनेकरता देवाने केलेल्या व्यवस्थेची पुनर्स्थापना झालेली आपण पाहिली आहे. देवाच्या आध्यात्मिक मंदिराचे शुद्धीकरण झाले असून सर्व प्रकारची अशास्त्रीय धार्मिक तत्त्वे, चालीरिती आणि मूर्तिपूजा यांपासून ते मुक्त झाले आहे. (यहेज्केल ४३:९; मलाखी ३:१-५) या शुद्धीकरणामुळे आपल्याला कोणकोणते फायदे झाले आहेत याचा विचार करा.
१६. पहिल्या शतकातले ख्रिश्चन काय घडत असल्यामुळे निरुत्साही झाले होते?
१६ पहिल्या शतकात संघटित ख्रिस्ती मंडळीचे भविष्य अंधकारमय दिसत होते. येशूने भाकीत केले होते की नुकतीच पेरणी केलेल्या गव्हाच्या शेतात कोणी भरमसाट निदण पेरावे तशी ख्रिस्ती मंडळीची स्थिती होईल. किंबहुना एक वेळ अशी येईल जेव्हा गहू आणि निदण सारखेच दिसू लागेल. (मत्तय १३:२४-३०) आणि असेच झाले. पहिल्या शतकाच्या समाप्तीपर्यंत ख्रिस्ती धर्मात गैरशास्त्रीय शिकवणुकींच्या शिरकावाला प्रतिकार करणारा वयोवृद्ध प्रेषित योहान हा एकटाच उरला होता; आणि एव्हाना धर्मत्याग चांगलाच फोफावला होता. (२ थेस्सलनीकाकर २:६; १ योहान २:१८) सर्व प्रेषितांचा मृत्यू झाल्यावर काही काळातच ख्रिस्ती धर्मात वेगळा पाळक वर्ग निर्माण झाला; स्वतःचा वेगळेपणा दाखवण्यासाठी खास प्रकारचा पोषाख घालणारे हे पाळक चर्चच्या सदस्यांवर अत्याचार करायचे. पाहता पाहता धर्मत्यागाचे विष सर्वत्र पसरू लागले. विश्वासू ख्रिश्चन हे सर्व पाहून किती हताश झाले असतील याची कल्पना करा! अलीकडेच स्थापित झालेली खरी उपासना अशी भ्रष्ट होताना पाहून त्यांना निश्चितच अतिशय मनःस्ताप झाला असेल. आणि विशेष म्हणजे ख्रिस्ताने मंडळीची स्थापना करून एक शतकही पूर्ण झाले नसताना हे सर्व घडले.
१७. आधुनिक काळात ख्रिस्ती मंडळी, पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीपेक्षा कोणत्या अर्थाने अधिक काळ टिकून राहिली आहे?
१७ आता याच्याच विरोधातील परिस्थिती विचारात घ्या. आज, प्रेषितांच्या मृत्यूपर्यंत जितका काळ गेला त्यापेक्षा कितीतरी अधिक काळापर्यंत शुद्ध उपासना टिकून राहिली आहे. १८७९ साली या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला तेव्हापासून यहोवाने आपली उपासना उत्तरोत्तर शुद्ध करून आपल्याला आशीर्वादित केले आहे. १९१८ साली यहोवा व ख्रिस्त येशू यांनी आध्यात्मिक मंदिराचे शुद्धिकरण करण्यासाठी त्यात प्रवेश केला. (मलाखी ३:१-५) १९१९ पासून, यहोवा देवाची उपासना करण्यासाठी असणाऱ्या व्यवस्थेत अधिकाधिक शुद्धता आणली गेली. बायबलच्या भविष्यवाण्या आणि तत्त्वांविषयीची आपली समज अधिकाधिक स्पष्ट होत गेली आहे. (नीतिसूत्रे ४:१८) याचे श्रेय कोणाला जाते? अपरिपूर्ण मनुष्यांना निश्चितच नाही. केवळ यहोवा आणि मंडळीचे मस्तक असणारा त्याचा पुत्रच या भ्रष्ट काळातील धर्मभ्रष्टतेपासून आपल्या लोकांचे रक्षण करू शकत होते. म्हणूनच, आज आपल्याला खऱ्या उपासनेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल यहोवाचे आभार मानण्यास आपण कधीही विसरू नये. तसेच, कधीही नाशाकडे माघार न घेण्याचा आपण अगदी पक्का निर्धार करू या!
१८. कधीही नाशाकडे माघार न घेण्याचे कोणते कारण आपल्याजवळ आहे?
१८ इब्री ख्रिश्चनांप्रमाणे, आपल्याजवळही आणखी एक कारण आहे की ज्यामुळे आपण कधीही भ्याडपणे माघार घेऊ नये; आणि ते असे की आपणही आजवर कित्येक परीक्षाप्रसंगांना धीराने तोंड दिले आहे. आपल्यापैकी काहींनी अलीकडेच यहोवाची सेवा करण्याचे सुरू केले आहे, तर काहींनी कितीतरी दशकांपासून यहोवाची सेवा केली आहे, पण आपण सर्वांनीच विश्वासू ख्रिस्ती कार्यांची संपत्ती साठवली आहे. आपल्यापैकी काहींनी तुरुंगवास, सरकारी प्रतिबंध, क्रूर वागणूक किंवा आर्थिक नुकसान अशा वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये छळही सोसला आहे; तर इतरांना त्यांच्या कुटुंबीयांकडून विरोध, तिरस्कार, उपहास आणि अनास्थेची वागणूक सहन करावी लागली. या सर्व प्रकारच्या आव्हानांना, परीक्षांना आपण सर्वांनी धीराने तोंड दिले आणि विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहिलो. आणि असे केल्यामुळे यहोवाच्या अनंत स्मृतीकोशात आपणही विश्वासू सेवेची संपत्ती साठवली आहे. तेव्हा, येथपर्यंत आल्यावर आता माघार घेऊन पुन्हा या भ्रष्ट जुन्या व्यवस्थेत परतण्याची ही निश्चितच वेळ नाही! आपल्याच हातांनी आपल्या सर्व परिश्रमांवर पाणी सोडणे शहाणपणाचे ठरेल का? खासकरून आज, जेव्हा नाश यायला “अगदी थोडा वेळ राहिला आहे”?—इब्री लोकांस १०:३७.
१९. पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?
१९ होय, “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी” कधीही न होण्याचा आपण निर्धार करू या! उलट आपण “विश्वास ठेवणाऱ्यांपैकी” होऊ या. (इब्री लोकांस १०:३९) या विश्वास ठेवणाऱ्यांपैकी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे आणि आपल्या ख्रिस्ती बांधवांनाही असे करण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो? आमचा पुढचा लेख या विषयावर प्रकाश टाकेल.
[तळटीपा]
a टेहळणी बुरूज मार्च १, १९९९ अंक, पृष्ठे ८-२३ पाहा.
तुम्हाला आठवते का?
◻ नाशाकडे माघार घेण्याचा काय अर्थ होतो?
◻ पौलाने ज्या इब्री ख्रिश्चनांना पत्र लिहिले त्यांच्यावर कोणते दबाव होते?
◻ माघार घेऊन स्वतःवर नाश न ओढवण्याची कोणती कारणे पौलाने इब्री लोकांना दिली?
◻ कधीही नाशाकडे माघार न घेण्याचा पक्का निर्धार करण्याची कोणती कारणे आपल्याजवळ आहेत?
[१५ पानांवरील चित्रं]
एकदा भीती वाटल्यामुळे पेत्र “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी” झाला नाही