प्रेमळ-दया दाखवणारा माझा यहोवा देव
जॉन ॲन्ड्रोनिकोस यांच्याद्वारे कथित
ते १९५६ चे वर्ष होते. माझं लग्न होऊन नऊच दिवस झाले होते; मी उत्तर ग्रीसमधील कोमोटिनीच्या एका अपील कोर्टात उभा होतो. मला आशा होती की देवाच्या राज्याचा प्रचार केल्याबद्दल मला मिळालेली १२ महिन्यांची शिक्षा रद्द केली जाईल. परंतु, अपील कोर्टाच्या निर्णयामुळे माझ्या या आशेचा चक्काचूर झाला आणि खरं तर माझ्यापुढे असलेल्या परिक्षांच्या शृंखलेची ती केवळ सुरवात होती; मला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु या सर्ववेळी यहोवा प्रेमळ-दया दाखवणारा देव ठरला.
ऑक्टोबर १, १९३१ साली माझा जन्म झाला; प्रेषित पौलाने त्याच्या दुसऱ्या मिशनरी दौऱ्यादरम्यान जिथं भेट दिली होती म्हणजे मॅसिडोनियाचे नियपोलीस, कवाला येथे तेव्हा आमचं कुटुंब राहत होतं. मी पाच वर्षांचा होतो तेव्हा आई यहोवाची साक्षीदार झाली होती; ती अडाणी होती तरीसुद्धा तिनं माझ्यामध्ये देवाबद्दल प्रेम आणि हितावह भीती बिंबवण्याचा तिच्याने होईल तितका प्रयत्न केला. माझे बाबा कट्टर पुराणमतवादी होते; त्यांनी ग्रीक ऑर्थडॉक्स परंपरा सोडली नाही. त्यांना बायबलमध्ये बिलकूल आस्था नव्हती, त्यांनी आईला खूप विरोध केला, पुष्कळदा तर तिला मारहाण देखील केली.
अशा विभक्त कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो; बाबा आईला सतत मारहाण करीत, तिच्याशी ते कधी नीट वागले नाहीत आणि एक दिवस तर ते आम्हाला वाऱ्यावर सोडून निघून गेले. लहानपणापासून आई मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला ख्रिस्ती सभांना घेऊन जात असे. पण मी १५ वर्षांचा झालो तेव्हा तरुणपणातल्या इच्छा आकांक्षा आणि स्वातंत्र्याची ओढ मला यहोवाच्या साक्षीदारांपासून दूर घेऊन गेली. पण आईनं मात्र माझं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, मला मदत करायला तिनं खूप अश्रू वाहिले.
गरिबीमुळे आणि माझ्या वाईट सवयींमुळे मी खूप आजारी पडलो; मी तीन महिने अंथरुणाला खिळून पडलो होतो. यावेळी आईला सत्य शिकायला मदत करणाऱ्या एका नम्र बांधवानं, देवाबद्दल माझ्या मनात असलेली प्रांजळ प्रेमभावना ओळखली. मला आध्यात्मिकरीत्या बरे करण्याची आशा आहे, असे त्याला वाटले. दुसरे लोक त्याला म्हणाले: “तू जॉनमागं उगाच आपला वेळ घालवतोयस; तो या गाळातून पुन्हा वर येणार नाही.” पण या बांधवाच्या धीराचे व चिकाटीचे त्याला फळ मिळाले. ऑगस्ट १५, १९५२ रोजी वयाच्या २१ व्या वर्षी यहोवाला मी केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला.
नवविवाहीत पण तुरुंगात
तीन वर्षांनंतर, माझी मार्थाशी ओळख झाली; ती आध्यात्मिक वृत्तीची व उल्लेखनीय गुणांची होती; आमची मागणी झाली. एकदा मार्थानं मला विचारलं, “मी आज प्रचाराला जायचं ठरवलयं, तुम्हाला माझ्याबरोबर यायचं का?” मी चमकून गेलो. कारण आजपर्यंत तरी मी बहुतेक वेळा अनौपचारीकरीत्याच प्रचार केला होता, असं खास प्रचार कार्यासाठी कधी गेलो नव्हतो. त्यावेळी ग्रीसमध्ये प्रचार कार्यावर बंदी होती त्यामुळे आम्हाला आमचं प्रचार कार्य लपूनछपून करावं लागत होतं. यामुळे बहुतेकवेळा आम्हाला अटक होऊ लागली, कोर्टात केस होऊ लागल्या आणि कडक तुरुंगवासही आम्हाला भोगावा लागला. पण साहजिकच माझ्या होणाऱ्या पत्नीने विचारल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता!
सन १९५६ मध्ये आमचं लग्न झालं. ह्याच वेळी म्हणजे आमचं लग्न होऊन नऊच दिवस झाले होते आणि मला कोमोटिनीच्या त्या अपील कोर्टाकडून सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न आला; हा प्रश्न मला आधीसुद्धा एकदा आला होता तेव्हा मी माझ्या आईची मैत्रीण असलेल्या एका ख्रिस्ती भगिनीला विचारलं होतं, “मी यहोवाचा एक खरा साक्षीदार आहे हे कसं दाखवू शकेन? कारण मला तर माझा विश्वास प्रकट करण्याची एकही संधी मिळालेली नाही.” ही भगिनी मला तुरुंगात भेटायला आली तेव्हा तिनं मला या प्रश्नाची आठवण करून दिली आणि मला म्हणाली: “आता तुला यहोवावरील तुझं प्रेम दाखवण्याची चांगली संधी आहे. हेच तुझं काम आहे.”
माझा वकील मला जामीनावर सोडवायला आल्याचं मला कळलं तेव्हा मी त्याला म्हणालो की मला माझी शिक्षा पूर्ण होऊ द्यायची आहे. सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेच्या शेवटी मला, माझ्याबरोबर तुरुंगात असलेल्या दोन कैद्यांनी सत्य स्वीकारल्याचं पाहून आनंद वाटला! पुढील वर्षांमध्ये, सुवार्तेच्या नावासाठी मी अनेक कोर्ट केसेसमध्ये सामील होतो.
आम्हाला कधीही पस्तावा झाला नाही
सन १९५९ मध्ये, माझी तुरुंगातून सुटका झाल्यावर काही वर्षांनी, मी मंडळी सेवक किंवा अध्यक्षीय पर्यवेक्षक या नात्याने कार्य करू लागलो व मला मंडळीच्या वडिलांसाठी असलेल्या प्रशिक्षण कोर्ससाठी म्हणजे राज्य सेवा प्रशालेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले. आणि तेव्हाच मला एका सार्वजनिक इस्पितळात कायमची नोकरी देण्यात आली; या नोकरीमुळे मला आणि माझ्या कुटुंबाला संपूर्ण आयुष्यभर आर्थिक सुरक्षितता मिळाली असती. या दोन गोष्टींपैकी मी कोणती निवडावी? मी तीन महिन्यांपासून त्याच इस्पितळात काम करत होतो, आणि इस्पितळाचे व्यवस्थापक माझ्या कामाबद्दल खूप समाधानी होते; पण प्रशालेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं तेव्हा त्यांनी मला बिनपगारी रजा देखील घेण्याची परवानगी दिली नाही. या समस्येवर प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर मी देवाच्या राज्याला प्राथमिकता द्यायचं ठरवलं आणि नोकरीच्या प्रस्तावाला नकार दिला.—मत्तय ६:३३.
त्याच सुमारास, जिल्हा आणि विभागीय पर्यवेक्षक आमच्या मंडळीत कार्य करायला आले. ग्रीक ऑर्थडॉक्स पाळक आणि अधिकाऱ्यांचा कट्टर विरोध असल्यामुळे आम्हाला आमच्या सभा खासगीत भरवाव्या लागल्या. एका सभेनंतर जिल्हा पर्यवेक्षक माझ्याकडे आले आणि मी पूर्ण वेळेची सेवा करायचा कधी विचार केला होता का, असं त्यांनी मला विचारलं. त्यांनी मला हे सुचवल्यावर मला असं वाटलं की जणू त्यांनी तीर बरोबर निशाण्यावरच मारला होता, कारण माझा बाप्तिस्मा झाल्यापासून माझं तेच स्वप्न होतं. मी त्यांना उत्तर दिलं: “होय, मला करायची इच्छा आहे.” पण आता आम्हाला एक मुलगी झाली होती; तिचा सांभाळ करायची जबाबदारी आमच्यावर आली होती. त्या बांधवानं मला सांगितलं: “यहोवावर भरवसा ठेव, तो तुमचं स्वप्न साकार करील.” अशाप्रकारे, मग आमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलून मी आणि मार्थानं मिळून थोड्याफार आवश्यक तडजोडी केल्या आणि १९६० सालच्या डिसेंबर महिन्यापासून मॅसिडोनियात मी खास पायनियर म्हणून माझी सेवा सुरू केली; तेव्हा त्या राष्ट्रात आम्ही फक्त पाच खास पायनियर होतो.
एक वर्ष खास पायनियर म्हणून कार्य केल्यावर, अथेन्समधील शाखा कार्यालयाने मला प्रवासी पर्यवेक्षक म्हणून कार्य करण्याचं आमंत्रण दिलं. या सेवेचं प्रशिक्षण घेऊन एक महिन्यानंतर मी घरी आलो व मार्थाला माझे अनुभव सांगत होतो तेवढ्यात, एका मोठ्या मँगनीझ खाणीचे व्यवस्थापक आमच्या घरी आले आणि त्यांनी मला रिफायनिंग डिव्हिजनच्या मॅनेजर पदावर रुजू होण्याची ऑफर दिली; पाच वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट, एक छानसं घर, आणि मोटारगाडी. त्यांनी मला दोन दिवसांत उत्तर कळवायला सांगितलं. पण या वेळी सुद्धा मनात कोणताही किंतू न बाळगता मी यहोवाला प्रार्थना केली: “हा मी आहे, मला पाठीव.” (यशया ६:८) मार्थालाही माझा निर्णय पूर्ण पटला. देवावर भरवसा ठेवून आम्ही आमचं प्रवासी कार्य सुरू केलं, आणि यहोवा सदैव आमच्या पाठीशी होता.
सुखदुःखात सेवा करणे
आम्हाला आर्थिक चणचण जाणवत होती तरी आम्ही तसेच पुढे जात राहिलो आणि यहोवाने आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या. सुरवातीला मी एका मोटारसायकलवर ३०० किलोमीटर अंतर कापून मंडळ्यांना भेटी द्यायचो. बऱ्याच वेळा या प्रवासात पुष्कळ त्रास व्हायचा, दोनतीन वेळा माझा अपघातही झाला. हिवाळ्यात एकदा, एका मंडळीतून मी घरी चाललो होतो आणि पाण्याने तुडूंब भरून वाहत असलेला एक ओढा पार करताना गाडी बंद पडली, आणि गुडघ्यापर्यंत मी भिजलो. नंतर मोटारसायकलच्या टायरमधली हवा गेली. रस्त्यावरून एक मनुष्य चालला होता, त्याच्याजवळ पंप होता म्हणून त्याने मला टायरमध्ये हवा भरायला मदत केली; त्यामुळे मी जवळच्या गावात पोहंचू शकलो व तिथं टायर दुरुस्त केलं. पहाटे तीन वाजता मी घरी पोहंचलो; मी पार गारठून व थकून गेलो होतो.
दुसऱ्या एका प्रसंगी, एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीत जाताना माझी मोटारसायकल घसरली आणि मी गुडघ्यांवर पडलो. गुडघ्यांजवळ माझी पॅन्ट फाटली आणि रक्तानं भिजली. माझ्याकडे दुसरा जोड नसल्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी मला दुसऱ्या बांधवाची पॅन्ट घालावी लागली; आणि ही पॅन्ट माझ्यासाठी खूपच मोठी होती. पण, यहोवाची आणि माझ्या बांधवांची सेवा करण्याचा माझा आवेश कशानेही कमी झाला नाही.
दुसऱ्या एका अपघातावेळी, मला खूप वाईटरीतीने लागलं होतं; माझा एक हात फ्रॅक्चर झाला होता आणि पुढचे दात पडले होते. अशातच, साक्षीदार नसलेली अमेरिकेत राहणारी माझी एक बहीण मला भेटायला आली होती. तिनं मला कार घ्यायला मदत केली. यामुळे माझी खूपच सोय झाली! अथेन्स शाखेतील बांधवांना माझ्या अपघाताची खबर मिळाली तेव्हा त्यांनी मला एक उत्तेजनात्मक पत्र पाठवलं; त्यात रोमकर ८:२८ मधील एक वाक्य होतं: “देवावर प्रीती करणाऱ्यास . . . देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.” ही हमी पुन्हा पुन्हा माझ्या जीवनात खरी ठरली!
सुखद धक्का
सन १९६३ मध्ये मी एका खास पायनियरबरोबर एका गावात कार्य करत होतो; तेथील लोक सुवार्तेला इतका प्रतिसाद देत नव्हते. रस्त्याच्या एका बाजूनं तो आणि दुसऱ्या बाजूनं मी असं आम्ही दोघांनी वेगवेगळे कार्य करण्याचं ठरवलं. एका दारावर मी थाप मारल्या मारल्या त्या घरच्या स्त्रीनं दार उघडलं आणि मला सरळ घरात खेचलं आणि दार लावून घेतलं. मी गोंधळून गेलो, मला काही समजलंच नाही. थोड्यावेळानं, तिनं घाईघाईने त्या खास पायनियरला पण घरात बोलावून घेतलं. आणि मग आम्हाला म्हणाली: “शू. . . शांत बसा, बोलू नका.” थोड्या वेळानं आम्हाला बाहेर लोकांच्या मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. हे लोक आम्हालाच शोधत होते. ते लोक तिथून गेल्यावर या स्त्रीनं आम्हाला सांगितलं, “तुम्हाला वाचवायला मी असं केलं. मला माहीत आहे तुम्हीच खरे ख्रिस्ती आहात, मला तुमचा आदर वाटतो.” आम्ही त्या स्त्रीचे मनापासून आभार मानले आणि तिला पुष्कळ बायबल साहित्य देऊन तिथून निघालो.
चौदा वर्षांनतर, ग्रीसमध्ये मी एका जिल्हा अधिवेशनाला उपस्थित होतो तेव्हा एक स्त्री माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली: “मला ओळखलंत का? तुम्ही आमच्या गावात साक्ष द्यायला आला होता तेव्हा तुम्हाला घरात घेऊन मीच त्या लोकांपासून तुम्हाला वाचवलं होतं.” ती स्त्री जर्मनीला राहायला गेली होती आणि तिथं तिनं बायबलचा अभ्यास केला व यहोवाच्या लोकांबरोबर संगती करू लागली होती. आता तिचं पूर्ण कुटुंब सत्यात होतं.
या सर्व वर्षांमध्ये आम्हाला अनेक “शिफारसपत्रे” मिळाली आहेत. (२ करिंथकर ३:१) आम्हाला ज्यांना ज्यांना बायबल सत्य शिकवण्याचा सुहक्क मिळाला त्यातील बहुतेक जण आता वडील, सेवासेवक व पायनियर या नात्याने कार्य करीत आहेत. सन १९६० मध्ये आम्ही ज्या विभागात सेवा केली होती तेथे तेव्हा मुठभर प्रकाशक होते आणि आता तिथंच १०,००० पेक्षा अधिक यहोवाचे उपासक पाहून माझं मन किती प्रसन्न होतं! याचं सर्व श्रेय प्रेमळ-दया असलेल्या आपल्या देवाला जाते, जो त्याच्या इच्छेप्रमाणे आपला त्याच्या कार्याकरता उपयोग करून घेतो.
‘अंथरूणावर’ असताना
प्रवासी कार्य करत असताना मार्थाने मला खूपच साथ दिली, ती नेहमी आनंदी असायची. पण १९७६ च्या ऑक्टोबर महिन्यात ती खूप आजारी पडली व तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. कमरेच्या खालचा पूर्ण भाग लुळा पडल्यामुळे ती व्हिलचेअरवर बंदिस्त झाली. तिच्या दवाखान्याचा खर्च आणि मानसिक त्रास आम्ही कसा काय पेलला? पुन्हा एकदा यहोवावर आम्ही भरवसा ठेवला आणि त्याच्या प्रेमळ व सढळ साहाय्याची आम्हाला प्रचिती आली. मी मॅसिडोनियात कार्य करायला गेलो तेव्हा मार्था उपचारासाठी अथेन्समधील एका बांधवाच्या घरी राहिली. ती मला फोन करून सांगत असे, “मी बरी आहे. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, मी बरी झाल्यावर माझ्या व्हिलचेअरवर बसून तुमच्याबरोबर येईन.” आणि तिनं तसंच केलं. बेथेलमधल्या आमच्या अनेक प्रेमळ बंधूभगिनींनी आम्हाला प्रोत्साहनदायक पत्रं पाठवली. मार्थाला नेहमी, स्तोत्र ४१:३ मधील हे शब्द आठवायचे: “तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला संभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलितोस.”
या गंभीर आरोग्य समस्यांमुळे, १९८६ मध्ये असे ठरवण्यात आले, की मी आमच्या लेकीचं कुटुंब असतं तिथे म्हणजे कवालामध्ये खास पायनियर म्हणून सेवा करणे उचित आहे; आता मी तिथेच राहतो. मागच्या मार्च महिन्यात माझी प्रिय मार्था मला सोडून गेली; शेवटपर्यंत ती विश्वासू राहिली. तिच्या मृत्यूपूर्वी बंधूजन तिला, “कशी आहेस?” असं विचारत तेव्हा ती नेहमी, “मी यहोवाच्या जवळ असल्यामुळे अगदी बरी आहे,” असंच उत्तर द्यायची. आम्ही सभांची तयारी करायचो किंवा कापणीचे पीक खूप आहे अशा क्षेत्रांमध्ये जाण्याचे निमंत्रण मिळायचे तेव्हा मार्था मला म्हणायची: “जॉन, चला आपण जिथं जास्त गरज आहे तिथं जाऊ या.” तिचा आवेश शेवटपर्यंत थंड झाला नव्हता.
काही वर्षांपूर्वी मीही खूप आजारी पडलो होतो. मार्च १९९४ मध्ये मला सांगण्यात आलं की गंभीर स्वरूपाचा हृदय विकार झाल्यामुळे माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागेल, नाही तर हा आजार जिवावर बेतू शकतो. या कठीण काळातही मी यहोवाचे प्रेमळ साहाय्य अनुभवले. मी अतिदक्षता विभागातून बाहेर आलो तेव्हा माझ्या कॉटशेजारी बसून एका विभागीय पर्यवेक्षकाने केलेली प्रार्थना आणि सत्यामध्ये आस्था दाखवणाऱ्या चार जणांसह इस्पितळामध्येच मी स्मारकदिन साजरा केल्याचे आजपर्यंत विसरू शकलेलो नाही.
यहोवाने आम्हाला नित्य साहाय्य केले
वेळ कसा भुर्रकन उडून जातो आणि आपलं शरीरही संथावतं, पण अभ्यास आणि सेवा यांद्वारे आपला अंतरात्मा पुन्हा नवीन होतो. (२ करिंथकर ४:१६) मी गेल्या ३९ वर्षांपासून “हा मी आहे, मला पाठीव,” असे म्हणत आलो आहे. माझे जीवन समाधानी, आनंदी व प्रतिफळदायी ठरले आहे. कधीकधी मला मी “दीन व दरिद्री आहे” असं वाटतं पण मग मी पूर्ण भरवशाने यहोवाला असे म्हणू शकतो: “माझा साहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस.” (स्तोत्र ४०:१७) तो माझ्यासाठी खरंच प्रेमळ-दया दाखवणारा देव आहे.
[२५ पानांवरील चित्र]
मार्थाबरोबर १९५६ साली
[२६ पानांवरील चित्र]
कवाला येथील बंदर
[२६ पानांवरील चित्र]
मार्थाबरोबर १९९७ साली