जगावेगळी उदारता
तुम्हाला कोणा राजाला बक्षीस देण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणते बक्षीस निवडाल? तो जगातला सर्वात धनी आणि बुद्धिमान राजा असला तर? त्याला कोणते बक्षीस आवडले असते? सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी, शबाची राणी अशाच एका राजाला—इस्राएलच्या शलमोन राजाला भेटायला चालली होती तेव्हा हेच प्रश्न तिच्या मनात घोळत होते.
बायबल आपल्याला सांगते की, तिने १२० किक्कार सोने आणि “विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने” यांचा नजराणा पेश केला. आजच्या किंमतीनुसार केवळ सोन्याचेच मूल्य ४,००,००,००० डॉलर्स इतके होते. बाल्सम तेल (सुगंधी द्रव्य) हे एक औषधी आणि सुवासिक तेल होते आणि ते सोन्यासारखेच मूल्यवान समजले जात होते. राणीने शलमोनाला किती तेल दिले त्याविषयी बायबल काही सांगत नसले, तरी तिने जितके सुगंधी द्रव्य नजर केले होते तितके कोणीही केले नव्हते असे मात्र बायबल म्हणते.—१ राजे १०:१०.
शबाची राणी फार समृद्ध आणि उदार स्त्री होती हे स्पष्टच आहे. शिवाय, तिच्या उदारतेचा तिला मोबदला मिळाला. बायबल म्हणते की, “शबाच्या राणीने जे जे मागितले ते ते सगळे शलमोन राजाने तिला तिच्या मनीषेप्रमाणे दिले; शिवाय तिने जो नजराणा आणिला होता त्याच्या इतक्या मोलाची देणगी तिला दिली.” (तिरपे वळण आमचे.) (२ इतिहास ९:१२) कदाचित राजा महाराजांमध्ये एकमेकांना बक्षीस देण्याची प्रथा असावी; तरीही, बायबलमध्ये शलमोनाच्या ‘औदर्याचा’ स्पष्ट उल्लेख केला आहे. (१ राजे १०:१३) खुद्द शलमोनाने लिहिले: “उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.”—नीतिसूत्रे ११:२५.
अर्थात, शबाच्या राणीने देखील शलमोनाला भेटण्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम खर्च केला होता. शबाची राणी सध्याच्या येमेन प्रजासत्ताकच्या प्रदेशात राहत होती असे दिसते. तेथून यरुशलेमला येण्यासाठी या राणीने आणि तिच्या काफल्याने सुमारे १,६०० किलोमीटर प्रवास केला असावा. येशूने म्हटल्यानुसार, “ती पृथ्वीच्या सीमेपासून आली.” शबाच्या राणीने एवढा त्रास का घेतला? ती खासकरून “शलमोनाचे ज्ञान ऐकावयास” आली होती.—लूक ११:३१.
पहिले राजे १०:१, २ येथे म्हटले आहे की, शबाची राणी “कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहावयास आली. . . . शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनांत जे काही होते ते सर्व ती त्याजपुढे बोलली.” शलमोनाची प्रतिक्रिया काय होती? “शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकहि गोष्ट नव्हती.”—१ राजे १०:३.
ऐकलेल्या आणि पाहिलेल्या सर्व गोष्टींनी अचंबित होऊन राणी नम्रपणे असे म्हणाली: “हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत!” (१ राजे १०:४-८) शलमोनाचे सेवक संपन्नतेत राहत होते; पण त्यासाठी तिने त्यांना धन्य म्हटले नाही. त्याउलट, देवाने शलमोनाला दिलेले शहाणपण सतत ऐकू शकत असल्यामुळे ते धन्य होते. स्वतः निर्माणकर्ता आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्या बुद्धीचा अनुभव घेणाऱ्या यहोवाच्या आजच्या लोकांपुढे शबाच्या राणीचे केवढे अप्रतिम उदाहरण आहे!
शिवाय, राणीने पुढे शलमोनाला जे म्हटले ते देखील उल्लेखनीय होते: “यहोवा तुझा देव धन्यवादित असो.” (१ राजे १०:९, पं.र.भा.) शलमोनाला यहोवाच्याच आशीर्वादाने बुद्धी आणि संपन्नता लाभली होती हे तिने ओळखले. ही गोष्ट, यहोवाने इस्राएलला दिलेल्या अभिवचनाच्या एकवाक्यतेत आहे. तो म्हणाला होता ‘माझ्या आज्ञा पाळल्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धीमान व समंजस लोकांचे आहे.”—अनुवाद ४:५-७.
बुद्धी देणाऱ्याकडे येणे
आधुनिक काळातही, लाखो लोक यहोवाच्या संघटनेकडे आकर्षित झाले आहेत कारण स्वभावतः नव्हे तर देवाच्या परिपूर्ण नियमांचे आणि तत्त्वांचे मार्गदर्शन असल्यामुळे ‘देवाचे इस्राएल,’ ‘बुद्धिमान व समंजस लोक’ आहेत हे त्यांना कळून चुकले आहे. (गलतीकर ६:१६) बाप्तिस्म्याच्या आकडेवारीवरून हे दिसून येते की, अलीकडे दरवर्षी लाखो नवीन शिष्य आध्यात्मिक इस्राएलला जणू असे म्हणतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जखऱ्या ८:२३) यहोवाने त्याच्या सेवकांसाठी आध्यात्मिक अन्नाची केवढी मेजवानी ठेवली आहे ते पाहून हे नवीन जण किती विस्मयचकित होतात! त्यांनी त्यांच्या आधीच्या धर्मांमध्ये असे काही पाहिलेले नव्हते.—यशया २५:६.
महान दात्याला देणे
एवढे सर्व मिळाल्यानंतर आपणही महान राजा आणि दाता, यहोवा देव याला काही देऊ शकतो का असा विचार कृतज्ञ लोक करतातच. बायबल आपल्याला सांगते की, यहोवाला आपण देऊ शकतो असे सर्वात उत्तम दान म्हणजे “स्तुतीचा यज्ञ.” (इब्री लोकांस १३:१५) ते का? कारण हे अर्पण, जीवन वाचवण्याशी थेट संबंधित आहे; आणि या शेवटल्या दिवसांत यहोवाच्या नजरेत हे सर्वात महत्त्वाचे आहे. (यहेज्केल १८:२३) शिवाय, आजारी लोकांना, खिन्न झालेल्यांना आणि इतरांना मदत देण्यामध्ये आपली शक्ती आणि वेळ खर्च करणे हेसुद्धा एक ग्रहणीय अर्पण आहे.—१ थेस्सलनीकाकर ५:१४; इब्री लोकांस १३:१६; याकोब १:२७.
आर्थिक अनुदानांचा यात महत्त्वाचा हातभार लागतो. त्यांच्यामुळे बायबल, बायबल आधारित साहित्य तयार करणे त्याचप्रमाणे ख्रिश्चनांना एकत्र जमण्यासाठी स्थळ मिळवणे शक्य होते. (इब्री लोकांस १०:२४, २५) अनुदानांद्वारे युद्धग्रस्त आणि विपत्तीग्रस्त लोकांसाठी मदत निधी देखील पुरवला जातो.
देवाच्या वचनात देण्यासंबंधाने काही उत्तम मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. उदाहरणार्थ, ते शिकवते की ख्रिस्ती एक ठराविक रक्कम नव्हे तर त्यांच्या परीने जितके जमेल तितके स्वेच्छेने आणि संतोषाने देतात. (२ करिंथकर ९:७) काहीजण जास्त देऊ शकतात; तर इतरांना येशूच्या काळातल्या गरीब विधवेप्रमाणे थोडेसेच देता येऊ शकेल. (लूक २१:२-४) सबंध विश्वाचा धनी यहोवा चांगल्या हेतूने त्याला दिलेले प्रत्येक बक्षीस आणि अर्पण मूल्यवान लेखतो ही विलक्षण गोष्ट नाही का?—इब्री लोकांस ६:१०.
संतोषाने देता यावे म्हणून यहोवाच्या लोकांना विविध गरजांविषयी माहिती दिली जाते आणि त्या गरजा प्रभावशालीपणे कशा भागवता येऊ शकतात हे देखील सांगितले जाते. मग यहोवाचा पवित्र आत्मा इच्छुक अंतःकरणांना प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करतो. प्राचीन इस्राएलमध्ये, निवासमंडपाच्या कामासाठी आणि नंतर मंदिराच्या कामासाठी हीच पद्धत अनुसरण्यात आली. (निर्गम २५:२; ३५:५, २१, २९; ३६:५-७; ३९:३२; १ इतिहास २९:१-१९) सा.यु. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी देखील याच पद्धतीने साधनसंपत्ती एकत्र करून राष्ट्रांपर्यंत राज्याची सुवार्ता पोचवण्यासाठी आणि इस्राएलमधील बांधवांना एका दुष्काळाच्या वेळी मदत करण्यासाठी ती उपयोगात आणली होती.—१ करिंथकर १६:२-४; २ करिंथकर ८:४, १५; कलस्सैकर १:२३.
त्याचप्रमाणे आजही, यहोवाने आपल्या लोकांना आशीर्वादित केले आहे आणि पुढेही त्यांना प्रचाराचे आणि शिकवण्याचे अभूतपूर्व कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व देऊन आशीर्वादित करीत राहील.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
सध्याच्या गरजा?
यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला बंदी होती अशा अनेक देशांमध्ये अलीकडील वर्षांमध्ये त्यांची कायदेशीर नोंदणी करण्यात आली आहे. परिणामस्वरूप, अशा अनेक देशांमध्ये प्रचारकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. साहजिकच, बायबल आणि बायबल आधारित साहित्याला बरीच मोठी मागणी आहे.
अनेक राज्य सभागृहांची देखील आवश्यकता भासत आहे. सध्या, सबंध जगभरात सुमारे ९,००० नवीन राज्य सभागृहांची आवश्यकता आहे. दररोज एक राज्य सभागृह बांधले, तर सध्याची गरज भागवण्यासाठी २४ हून अधिक वर्षे लागतील! आज दररोज सुमारे सात नवीन मंडळ्या बनत आहेत; या मंडळ्या बहुतेककरून अशा देशांमध्ये बनत आहेत, जेथे आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नाही. यांपैकी बहुतेक ठिकाणी फार खर्चीक इमारतींची गरज नाही. काही ठिकाणी तर, मंडळीची गरज भागवणारे आणि समाजात चांगली साक्ष देणारे राज्य सभागृह फक्त ६,००० डॉलरमध्ये बांधून पूर्ण केले जाऊ शकते.
पहिल्या शतकात, काही ख्रिश्चनांची आर्थिक स्थिती इतरांपेक्षा चांगली होती, म्हणून प्रेषित पौलाने लिहिले: “तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यातून त्यांची गरज भागावी, आणि पुढे त्यांच्या वैपुल्यातून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी.” (२ करिंथकर ८:१४) आज, अशाच ‘समानतेने’ जगाच्या अनेक भागांमध्ये बायबल, बायबल आधारित साहित्य, राज्य सभागृहे, विपत्तीग्रस्त भागांसाठी मदत आणि इतर गोष्टींसाठी निधी पुरवला जात आहे. हे दान म्हणजे केवढा आशीर्वाद—देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही!—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
उदार मनाच्या लोकांकडून संस्थेला मिळणाऱ्या पत्रांवरून दिसून येते त्याप्रमाणे या पत्रिकेच्या अनेक वाचकांना मदत करण्याची इच्छा असते; परंतु अनुदान कशाप्रकारे देता येईल त्याविषयी त्यांना नीट ठाऊक नसते. सोबतच्या पेटीत दिलेल्या माहितीवरून त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे निश्चितच मिळतील.
शलमोनाच्या वैभवी कारकीर्दीत, त्याच्याविषयी ऐकून “अखिल पृथ्वीवरले राजे” त्याला भेटण्यासाठी येत होते. तरीही, बायबलमध्ये त्यांपैकी कोणाचेही नाव दिलेले नाही—फक्त शबाच्या राणीचे नाव दिले आहे. (२ इतिहास ९:२३) तिने केलेला त्याग खरोखर मोठा होता! आणि तिला त्याचे प्रतिफळही मिळाले—ते प्रतिफळ इतके मोठे होते की, सगळे पाहिल्यानंतर “ती गांगरून गेली.”—२ इतिहास ९:४.
भवितव्यामध्ये, सर्वात महान आणि दानशूर राजा यहोवा देव, त्याच्याकरता त्याग केलेल्यांना शलमोनानेही दिले नव्हते इतका मोठा मोबदला देईल. हे पाहून, ते लोक ‘गांगरून जातील’ कारण यहोवा केवळ त्यांना आपल्या न्यायाच्या भय-प्रेरित दिवसातून वाचवणारच नाही तर त्यानंतर तो ‘आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्राची इच्छा पुरी करील.’—स्तोत्र १४५:१६.
[२२ पानांवरील चौकट]
जगव्याप्त कार्यासाठी वर्गणी
देण्याचे विविध मार्ग
अनेक जण, “संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी वर्गणी—मत्तय २४:१४” हे लेबल असलेल्या दानपेटीत पैसे टाकण्यासाठी मुद्दाम काही रक्कम बाजूला ठेवतात. मंडळ्या प्रत्येक महिन्याला ही एकूण रक्कम स्थानिक शाखा दफ्तराला पाठवतात.
स्वेच्छेने दिलेल्या पैशाच्या देणग्या, थेटपणे Treasurer’s Office, Praharidurg Prakashan Society, Plot A/35, Near Industrial Estate, Nangargaon, Lonavla, 410 401 या पत्त्यावर देखील पाठवल्या जाऊ शकतात. दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची देखील देणगी दिली जाऊ शकते. या वर्गण्या थेट दान आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्र यासोबत पाठवावे.
योजनापूर्वक देणे
थेट पैशाच्या दानाशिवाय जगव्याप्त राज्य सेवेच्या लाभासाठी दान करण्याचे इतर काही मार्ग आहेत. यामध्ये पुढील पद्धतींचा समावेश होतो:
विमा: प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीला, आयुर्विमा पत्राचा किंवा सेवानिवृत्ती/निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणारी असे नाव दिले जाऊ शकते.
बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाणपत्र किंवा वैयक्तिकाचे सेवा निवृत्ती खाते, स्थानिक बँकेच्या अटींनुसार, प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीच्या विश्वस्तासाठी किंवा संस्थेला मृत्यूनंतरचे देय म्हणून दिले जाऊ शकते.
स्थावर संपत्ती: विक्रीयोग्य स्थावर संपत्ती, थेट दानाकरवी किंवा दाता त्याच्या किंवा तिच्या हयातीत हक्क ठेवून प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीला दिली जाऊ शकते. स्थावर संपत्तीचा लेखी करार करण्याआधी, त्या व्यक्तीने संस्थेशी संपर्क साधावा.
मृत्युपत्रे आणि ठेवी: प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीला कायदेशीर मृत्युपत्राद्वारे किंवा लाभार्थी नियुक्त करण्याद्वारे मालमत्ता किंवा पैसा दिला जाऊ शकतो.
“योजनापूर्वक देणे” या नावातच गर्भितार्थ असा की या प्रकारात देणगीदारांना बहुधा थोडीबहुत योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांचे काम स्वेच्छिक देणग्यांद्वारे चालवले जाते.
[२३ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांचे काम स्वेच्छिक देणग्यांद्वारे चालवले जाते